रेडूविड ढेकूण मित्र कीटकाची करा घरगुती पैदास

भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि दापोली येथील कृषी कीटकशास्त्र विभागात रेडूविड ढेकूण या मित्रकीटकाद्वारे कीड व्यवस्थापन प्रभावीपणे करता येत असल्याचे दिसून आले आहे. हा मित्रकिटक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आढळला आहे.
रेडूविड ढेकूण मित्रकीटक
रेडूविड ढेकूण मित्रकीटक

भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि दापोली येथील कृषी कीटकशास्त्र विभागात रेडूविड ढेकूण या मित्रकीटकाद्वारे कीड व्यवस्थापन प्रभावीपणे करता येत असल्याचे दिसून आले आहे. हा मित्रकिटक शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आढळला आहे. पीक संरक्षणासाठी रासायनिक कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे पर्यावरणात प्रदूषण, जलस्रोतामध्ये विषारी घटकांचा धोका वाढू शकतो. किडींच्या नियंत्रणासाठी मित्रकीटक अत्‍यंत महत्त्वाचे ठरतात. यातील रेडूविड ढेकूण परभक्षी कीटकाच्या सुमारे ७ हजार प्रजाती जगभरात आढळतात. त्यापैकी सुमारे ९६ टक्के प्रजाती या सजीवांवर जगतात, तर उर्वरित ४ टक्के प्रजाती फुलातील मधुरस सेवन करतात. पीक संरक्षणामध्ये उपयुक्त अशा या मित्रकीटकाचा वापर अनेक देशांमध्ये सुरू झाला आहे. रायनोकोरिस मर्जिनाटस शुष्क व अर्धशुष्क प्रदेशातील शेतात आणि जंगलात आढळतो. पिकांसाठी नुकसानकारक वेगवेगळ्या ४४ किडींचा तो नैसर्गिक शत्रू आहे. ओळख आणि जीवनचक्र 

  • मादी साधारणत: १४० ते १६० अंडी देते. सुरुवातीला लांब, वक्र, पिवळसर असलेली अंडी उबायला आल्यानंतर तपकिरी रंगाची होतात. ती पृष्ठभागाला थोडी जाड असते. (कालावधी सुमारे ९ ते १० दिवस)
  • अंड्यांतून १ मिलिमीटर पिले बाहेर येतात. पिले वेगवेगळ्या पाच अवस्थांतून पुढे जात प्रौढामध्ये रूपांतरित होतात. प्रत्येकी ७ ते १० दिवसांमध्ये ४ अवस्था पूर्ण होतात, तर पाचवी पिले अवस्था १५ ते २० दिवसांत पूर्ण होते. (कालावधी ४५ ते ५० दिवस.)
  • अ) नवजात पिले   :  फिक्कट नारंगी रंगाची असून, कालांतराने ती लालसर नारंगी होतात. ब) दुसरी अवस्था - शरीरावर गोल काळे ठिपके दिसून येतात. क) तिसरी अवस्था - पिले चकचकीत नारंगी असून, काळ्या रंगाचे पाय दिसून येतात. ड) चौथी अवस्था - पिले गडद नारंगी असून, त्यांच्या धडावर लाल रंग दिसून येतो. इ) पाचवी अवस्था -  पिले लाल रंगाची असून, पुढील भागावर फुगवटा आणि काळ्या रंगाचे उदर ठळकपणे दिसून येते.

  • प्रौढाच्या शरीरावर मध्यभागी काळी त्रिकोणी खूण. कडेला लाल दोन त्रिकोणी खुणा.
  • पुढील पायांची जोडी लाल, तर मागील पायांच्या जोड्या काळ्या.
  • पूर्ण वाढलेले नर व मादी ढेकूण १.५ ते २ सेंटिमीटर आकाराचे. प्रौढ नर आणि मादीचे मिलन २० ते २५ दिवसांमध्ये होऊन मादी दगडाच्या आड व खडबडीत पृष्ठभागावर ३० ते ५० च्या गटाने अंडीपुंज देण्यास सुरुवात करते.
  • संपूर्ण जीवनक्रम १०० ते १२० दिवसांत पूर्ण होतो. या काळात शेतातील वेगवेगळ्या किडींच्या नियंत्रणाचे काम ते करतात. कीड व्यवस्थापनासाठी वापर 

  • रायनोकोरिस मर्जिनाटस अळीवर्गीय (बाह्य शरीर आवरण मऊ, सौम्य असलेल्या) आणि रसशोषक किडी उदा. पिठ्या ढेकूण, मावा इ. यांना अधाशीपणे खातात.
  • ढेकणाच्या तोंडाकडील बाजूस टोकदार सोंड असून त्याद्वारे भक्ष्याच्या शरीरात स्वतःची विषारी लाळ सोडतो. त्यामुळे किडीच्या शरीरातील प्रथिने विघटित होऊ लागतात. कीड काही वेळ तडफड करत असली, तरी काही वेळातच निष्क्रिय बनते.
  • अचल झालेल्या भक्ष्यांच्या शरीरातील सर्व अन्नद्रव्ये ढेकूण शोषून घेतो. सोंडेने इजा केलेल्या किडीला खाता न आले तरी ती कीड आपोआप मरण पावते.
  • सर्वसाधारणपणे एक ढेकूण किमान ३० ते ४० भक्ष्यांना खातो. त्यापेक्षा अधिक किडींचा चावा घेऊन मारतो.
  • खाद्यात कपाशीवरील बोंड अळी, सोयाबीनवरील पाने खाणारी अळी, टोमॅटोवरील फळे पोखरणारी अळी, पिठ्या ढेकूण, मावा आदी अनेक किडींचा समावेश आहे.
  • अन्य मित्रकीटकांच्या तुलनेमध्ये शिकारी वृत्ती आणि जीवनक्रम अधिक आहे.
  • नुकसानकारक अळ्या आणि रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी अंडीपुंज अथवा तिसरा किंवा चौथ्या अवस्थेतील पिलांचा वापर करता येतो.
  • पर्यावरणावर विपरीत परिणाम नाही.
  • प्रसारण करताना पानावर साधारणत: सकाळी किंवा संध्याकाळी सोडावेत. वेगवेगळ्या संशोधनानुसार ५००० प्रति हेक्टरी पिले सोडल्यास फायदेशीर दिसले आहे.
  • या मित्रकीटकाची टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीसाठी परिणामकारकता तपासली. त्यात ०.४६ अळी प्रति झाड दिसून केवळ ६ टक्के फळे प्रादुर्भावग्रस्त आढळली. प्रयोग न केलेल्या शेतामध्ये १.३३ अळ्या प्रति झाड दिसून प्रादुर्भावग्रस्त फळांचे प्रमाण २८ टक्के आढळले.
  • घरगुती पातळीवर पैदास

  • प्लॅस्टिकच्या मोठ्या तोंडाच्या बरण्या खरेदी कराव्यात. बरणीचे झाकण काढून सच्छिद्र मलमल कापड रबराने घट्ट बांधावे.
  • प्रौढ नर व मादी ढेकूण किंवा अंडीपुंज उपलब्ध करून बरणीमध्ये सोडावेत. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे उपलब्धता होऊ शकते.
  •  एका ढेकणासाठी खाद्य म्हणून प्रति दिन दोन अळ्या शेतातून आणून बरणीमध्ये टाकाव्यात.
  • बरणीमध्ये अंड्यातून निघालेले रेडूविड ढेकणाची छोटे पिले असल्यास शेतातील छोट्या छोट्या पाच अळ्या दरदिवशी खायला द्याव्यात. वाढ होत जाताना त्यातून अळ्यांची उपलब्धता वाढवत न्यावी. एका दिवसासाठी मोठ्या ढेकणाला दोन अळ्या पुरेशा ठरतात.
  • चार ढेकूण एका छोट्या (दुसऱ्या अवस्थेतील) अळीवर जगू शकतात.
  • शेतात किडी उपलब्ध नसतील, तर साठवणुकीतील धान्यामध्ये मिळणाऱ्या अळ्या किंवा कृत्रिम खाद्य रेडूविड ढेकणाला खायला द्यावे. अशा पद्धतीने संख्या व किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच प्रसारण करावे.
  • -  डॉ. संतोष वानखेडे, ९७६५५४१३२२ (डॉ. वानखेडे, डॉ. शिंदे, डॉ. घवाळे हे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी येथून कार्यरत असून, डॉ. नरंगळकर हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कीटकशास्त्र विभाग प्रमुख आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com