देशी, जर्सी, एचएफ गाईंचे अर्थशास्त्र

दुग्धोत्पादनासाठी गाईला अनेक ठिकाणी प्रथम स्थान दिले जाते. मात्र दुग्ध व्यवसाय सुरू करण्याअगोदर कोणत्या जातीच्या गाईचे पालन केल्यास अधिक नफा मिळेल, याविषयी अधिक माहिती घेतली पाहिजे.
Gawlau and HF Gopalan
Gawlau and HF Gopalan

शेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय प्राधान्याने केला जातो. दुग्धोत्पादनासाठी गाईला अनेक ठिकाणी प्रथम स्थान दिले जाते. मात्र दुग्ध व्यवसाय सुरू करण्याअगोदर कोणत्या जातीच्या गाईचे पालन केल्यास अधिक नफा मिळेल, याविषयी अधिक माहिती घेतली पाहिजे. देशी गाई, जर्सी आणि एचएफ या गायींच्या जातींचे आर्थिक विश्‍लेषण पाहू.  पशुपालनामध्ये पारंपरिक देशी जातीच्या तुलनेमध्ये  जर्शी आणि एचएफ गाईपासून प्रति वेत अधिक दूध उत्पादन मिळते. मात्र या गाई आपल्या स्थानिक वातावरणामध्ये कितपत तग धरतात, त्यासाठी चारा व खाद्यांवर होणारा खर्च यामुळे अलीकडे अनेक जण देशी गोपालन अधिक फायदेशीर असल्याचे सांगतात. अशा वेळी त्यांचे प्रति वेत दूध उत्पादन, होणारा खर्च आणि एकूण आर्थिक विश्‍लेषण करून योग्य तो निर्णय घेतला पाहिजे.  देशी गाय  जिच्या पाठीवर वशिंड आणि गळ्याला पोळ आणि मूलतः भारतीय असलेली गाय होय.  परदेशी गाय  जर्सी व एचएफ या गायजातीमध्ये पाठीवर वशिंड नाही, गळ्याला पोळ नसलेल्या आणि मूलतः पाश्‍चात्त्य देशातील (फ्रान्स, आइसलॅंड, नेदरलॅंड) येथील गाई होय.  सध्या ग्रामीण भागामध्ये देशी गायीपाठोपाठ जर्शी गाई सर्वत्र आढळून येतात. काही ठिकाणी तर देशी गाईपेक्षाही परदेशी गाईंचे प्रमाण वाढलेले दिसून येते. त्यामागील कारणांचा विचार केला असता परदेशी (जर्सी आणि एचएफ) गाईंचे वार्षिक दूध उत्पादनक्षमता अधिक आहे. तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे देशी गाय आणि जर्शी, एच एफ गायी यांच्या वार्षिक दूध उत्पादन क्षमतेत खूप फरक आहे. पुणे, मुंबई व कोल्हापूर वगळता देशी गाय म्हणून दुधाचे मार्केटिंग न केलेल्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठेतील देशी गाय व जर्सी, एचएफ गाईच्या दुधाला जवळपास सारखीच किंमत मिळते. 

  • देशी गाईच्या तुलनेत जर्शी व एचएफ जातीच्या गाईंमध्ये वार्षिक दूध उत्पादनक्षमता जास्त आहे. स्निग्धांशाचे (फॅट) प्रमाणही सारखेच आहे. 
  • पुणे, मुंबई व कोल्हापूर या ठिकाणी देशी गाईंच्या (गीर, साहीवाल, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ) दुधाचे दर जरी प्रति लिटर जास्त (६० ते ७० रु.) आहेत. मात्र या गायींची प्रतिदिन दूध देण्याची क्षमता ५ ते १० लिटर एवढीच आहे. जर्सी, एचएफ गाईंची प्रति दिन दूध देण्याची क्षमता सरासरी २० लिटर आहे. या गाईंच्या दुधाचे दर स्थानिक बाजार पेठ व फॅटनुसार बदलतात. शिवाय खाद्य, संगोपन व अन्य देखभाल खर्च हा देशी गाई आणि जर्सी, एच एफ गाई यांना जेमतेम सारखाच येतो. देशी गाईंचे दूध म्हणून वेगळी मार्केटिंगची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांसाठी जर्शी व एचएफ या परदेशी गाई दुग्धोत्पादनासाठी योग्य ठरतील असे वाटते. 
  • देशी गायीच्या तुलनेत जर्शी व एचएफ गाईपासून मिळणारे उत्पन्न जास्त आहे. शिवाय या गाईंच्या दुधापासून आपण तूप, खवा, पनीर, दही यांसारखे प्रक्रियायुक्त पदार्थ घरगुती पातळीवर बनवून स्थानिक बाजारपेठेत त्यांची विक्री करू शकतो. स्थानिक बाजार पेठेत गायीचे तूप साधारणतः ४३२ ते ८५० रु. प्रति किलो प्रमाणे विकले जाते. पनीर २५० ते ३०० रू. प्रति किलो दराने विकले जाऊ शकते. 
  • गोपालनाची दोन उदाहरणे

  •   पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बीबी येथील मंडली किशन मंडाळ यांनी लॉकडाउनच्या काळात एका एचएफ गाईपासून दूध व्यवसायास सुरुवात केली. दोन महिन्यांमध्ये दूध विक्रीच्या नफ्यात शिलकीतील काही रक्कम मिसळून चार गाई विकत घेत आपला दूध व्यवसाय वाढवला. गाईंच्या खाद्य व्यवस्थापन आणि दिवसाला सात किलो रतीब यामुळे एक गाय दिवसाला चाळीस ते पंचेचाळीस लिटर दूध देते. महिन्याला बहुतांश खर्च वजा जाता त्यांना तीस हजार रुपयांपर्यंत नफा होतो.
  •   गीर, साहीवाल, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व अन्य देशी गाईंच्या दुधापासून शुद्ध तूप, खवा यांच्या निर्मिती केल्यास फायदा राहू शकतो. या तूप, खवा यांच्यासाठी पुणे, मुंबई व कोल्हापूर, नागपूर, वर्धा तसेच स्थानिक बाजारपेठेत उत्तम दराने विक्री होऊ शकते. वर्धा जिल्ह्यातील आमगाव मदनी येथील राधाकृष्ण गोसेवा प्रकल्पाचे संचालक नंदकिशोर गावंडे हे गवळाऊ गाईपासून मिळणारे दूध, दुधापासून खवा व अन्य उत्पादन उदा. पेढा, पनीर, दही, ताक, तूप तयार करून विकतात. सोबत गोमूत्र अर्क, फिनाईल, शेणाची उत्पादने यांचे उत्पादन घेतात. म्हणजेच देशी गाईंचे पालन करताना अन्य प्रक्रिया उत्पादनाच्या निर्मितीला प्राधान्य दिल्यास अधिक फायदेशीर ठरत असल्याचे त्यांचे मत आहे. 
  • - डॉ. प्रसाद पाटील,  ९५८८६१२५६१, आर. बी. बाजड,  ८८३०९००४०५ (दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, वरूड, पुसद)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com