जमीन सुपिकतेसाठी खतांचा कार्यक्षम वापर

माती परीक्षणाच्या आधारावर सेंद्रिय खते जैविक खते व योग्य तेवढ्या प्रमाणात गरजेनुसार रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होईल.
Fertilizer management through drip irrigation increases crop yield.
Fertilizer management through drip irrigation increases crop yield.

माती परीक्षणाच्या आधारावर सेंद्रिय खते जैविक खते व योग्य तेवढ्या प्रमाणात गरजेनुसार रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होईल. पीक उत्पादन आणि उत्पन्नातसुद्धा वाढ होईल. रासायनिक खते वापरताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार नियोजन करावे.  पिकांसाठी सेंद्रिय खते, जैविक खते आणि माती परीक्षणाच्या आधारावर योग्य वेळी, योग्य प्रमाणात रासायनिक खतांचा तसेच विद्राव्य खतांचा संतुलित वापर करावा. 

  • माती परीक्षणाच्या आधारावर सेंद्रिय खत, जैविक खताच्या वापराबरोबर शिफारशीत रासायनिक खताची मात्रा योग्य वेळी द्यावी. 
  • नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विशेषतः युरियाचा वापर करताना नीम कोटेड युरियाचा वापर करावा. 
  • नत्रयुक्त खताची मात्रा एकाच वेळी न देता पिकाच्या विविध अवस्था लक्षात घेऊन कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे द्यावी. नत्रयुक्त खताची मात्रा दोन किंवा तीन हप्त्यात विभागून द्यावी. जमिनीमध्ये दिलेले नत्र उडून किंवा वाहून जाऊ नये याकरिता पाण्याच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे.
  • सर्वसाधारणपणे कमी कालावधीच्या पिकात स्फुरद व पालाशयुक्त खते एकाच हप्त्यात पेरणीच्या वेळी बियांपासून पाच सेंटीमीटर खोलीवर द्यावीत. ही खते विभागून द्यावयाची झाल्यास संबंधित कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे पिकाच्या शाखीय वाढीनुसार व पाण्याची उपलब्धता पाहून तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार विभागून सुद्धा देता येऊ शकतात. 
  • डाळवर्गीय व तेलवर्गीय पिकासाठी गंधक युक्त खताचा वापर करावा.
  • दीर्घकालीन पिकासाठी संयुक्त खताच्या वापरासाठी प्राधान्य द्यावे.
  • स्फुरदाची उपलब्धता सुकर होण्याकरिता पूर्णपणे विद्राव्यशील खताची निवड करावी. स्फुरदाची कार्यक्षमता वाढण्यासाठी स्फुरद विद्राव्य करणाऱ्या जिवाणू संवर्धकाचा वापर करावा.
  • चुनखडीयुक्त जमिनीत युरिया, अमोनिअम सल्फेट, तसेच स्फुरदयुक्त खते जमिनीच्या पृष्ठभागावर देऊ नयेत. स्फुरदयुक्त सिंगल सुपर फॉस्फेट सारखी खते शेणखतात मिसळून दिल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.
  • रासायनिक खते देण्यापूर्वी पिकांची फेरपालट करताना कडधान्य, हिरवळीची खते यांचा पिकाची फेरपालट करताना समावेश करावा. यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढीस लागतो. रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते.
  • पिकांच्या गरजेनुसार अन्नद्रव्यांचा रासायनिक खताद्वारे पुरवठा करावा.  उदाहरणार्थ सर्वसाधारणपणे तृणधान्य पिकाला नत्र जास्त लागते. कडधान्य पिकाला स्फुरद जास्त लागतो. गळीत धान्य पिकाला स्फुरद पालाश व गंधकाची गरज जास्त असते. जमीन हलकी किंवा अतिशय निचऱ्याची असल्यास नत्रयुक्त खतांबरोबर पालाश युक्त खत वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत विभागून देता येते. खतांचा वापर माती परीक्षणाच्या अहवालानुसार करावा.  
  • माती परीक्षणाच्या अहवालानुसार संबंधित सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार वापर करावा. संबंधित सूक्ष्म अन्नद्रव्ये शेणखतामध्ये मिसळून पेरणीपूर्वी द्यावीत. माती परीक्षणाच्या अहवालानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास संबंधित सूक्ष्म अन्नद्रव्य उदाहरणार्थ जस्त,मंगल, तांबे इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्ये संबंधित पिकातील शिफारशीप्रमाणे आणि कमतरते प्रमाणे चिलेटेड स्वरूपात घेऊन फवारणीतून सुद्धा देता येतील.  
  • माती परीक्षणानुसार संबंधित पिकातील कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार विद्राव्य खते ठिबक सिंचनाद्वारे पिकांना त्यांच्या वाढीच्या अवस्थेनुसार दिल्यास अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम शोषण होऊन कार्यक्षमता वाढते. खताची बचत होते.
  • अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करताना केवळ रासायनिक खतांवर विसंबून न राहता जैविक खते तसेच सेंद्रिय खताचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे आहे.  जिवाणू संवर्धकांचा वापर करावा.  जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यास नत्राचे स्थिरीकरण व स्फुरदाची उपलब्धता होण्यास फायदा होतो. त्यामुळे रासायनिक खताच्या मात्रेत बचत होते.जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास सुद्धा मदत मिळते. पिकाचे उत्पादनात वाढ मिळते.
  • समस्यायुक्त जमिनीत रासायनिक खते देण्यापूर्वी जमिनीची सुधारणा करून घ्यावी. या नंतर रासायनिक खताचा वापर केल्यास अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो.जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.
  • - डॉ.दीपाली कांबळे, ९३०७१६३९३९ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com