agricultural news in marathi Embryo transplantation and IVF technique for goat breeding, | Page 2 ||| Agrowon

शेळीप्रजननासाठी भ्रूण प्रत्यारोपण, आयव्हीएफ तंत्र

डॉ. चैतन्य पावशे,  डॉ. रुचिका सांगळे
शनिवार, 21 ऑगस्ट 2021

सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने वाढवायची असेल तर जैविक तंत्रज्ञानाचा उपयोग हा चांगला पर्याय आहे. या पद्धती वापरून आनुवंशिक सुधारणा वेगाने करणे शक्य आहे.  
 

सध्याच्या  शेळ्यांची उत्पादकता वेगाने वाढवायची असेल तर जैविक तंत्रज्ञानाचा उपयोग हा चांगला पर्याय आहे. या पद्धती वापरून आनुवंशिक सुधारणा वेगाने करणे शक्य आहे.  

सर्वसाधारणपणे भारतात शेळीपालन प्रामुख्याने मांसासाठी केले जाते. अजूनही शेळीपालनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले जात नाही. शेळीपालन शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक स्थिती बदलण्याची क्षमता या व्यवसायात आहे. भारतातील शेळ्यांची संख्या लक्षात घेता शेळीपालनापासून मिळणाऱ्या उत्पादनात दुप्पटीने वाढ होणे अपेक्षित आहे. 

भारतात आढळणाऱ्या शेळ्यांच्या अनुवांशिकतेत विविधता आहे. त्यानुसार त्यांच्या पैदास प्रणालीमध्ये एक विशिष्ट प्रकारची सुसूत्रता असायला हवी, परंतु काही अडचणींमुळे पैदास  प्रणाली शिस्तबद्धपणे राबवली जात नाही. उत्पादनाचा भाग हा अनुवांशिकतेशी संबंधित असतो. अनुवांशिकतेनंतर योग्य व्यवस्थापन, आहार व रोग नियंत्रण या अधिक उत्पादनाशी संबंधित बाबी येतात. चांगल्या अनुवांशिकतेमुळे शेळ्या चांगले मांस आणि दूध देऊ शकतात. जातिवंत आई-वडिलांकडून येणारे उत्पादकतेचे गुण जन्मणाऱ्या करडांमध्ये उतरल्यास त्यांची उत्पादन क्षमता वाढते.

प्रजननात जैविक तंत्रज्ञानाची गरज  

 •  जैविक तंत्रज्ञान हे असे तंत्र आहे, की ज्याच्या मदतीने शेळ्यांमध्ये चांगले आनुवंशिक गुण वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. याच्या वापराने शेळीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, कातडी या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत होते. या पद्धती वापरून आनुवंशिक सुधारणा वेगाने करणे शक्य आहे.  
 • काही विकसित देशांनी जैवतंत्रज्ञानाच्या वापराने ट्रान्सजेनिक शेळ्या तयार केल्या आहेत. ट्रान्सजेनिक म्हणजे, शेळीच्या भ्रूणामध्ये जनुकीय पातळीवर बदल करून त्या शेळीपासून मिळणाऱ्या दुधात औषधी गुणधर्म असणारी प्रथिने तयार करणारे जनुक असणाऱ्या शेळ्या तयार करणे होय. ट्रान्सजेनिक शेळीपासून मिळणाऱ्या दुधाच्या सेवनाने आजाराचा उपचार करण्यास किंवा आजार टाळण्यास मदत होते. 
 • शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन पद्धती, टेस्ट ट्यूब बेबी, फक्त मादी किंवा नर करडेच तयार होतील असे पूर्वानुमान करणारे शुक्राणू विलीनीकरण तंत्र आणि माजाचे एकत्रीकरण इत्यादी तंत्रांचा समावेश होतो.
 • भ्रूण प्रत्यारोपण, टेस्ट ट्यूब बेबी सारख्या आधुनिक जैविक तंत्रज्ञानाच्या मदतीने जातिवंत नर आणि मादीचा वापर करून त्यांचे गुणसूत्र १०० टक्के पुढील पिढीस आनुवंशिकतेने प्राप्त करून देऊ शकतो.

 आयव्हीएफ तंत्रज्ञान

 • टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे पूर्ण बाळ प्रयोगशाळेत निर्मिती केली जाते, असा बहुतेकांचा समज आहे. परंतु तसे नाही. इन विट्रो फर्टिलायझेशन(आयव्हीएफ) या शब्दाचा अर्थ शरीरबाह्य फलन असा होतो. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने भ्रूणाची सहा ते सात दिवस वाढ प्रयोगशाळेत करतात. त्यानंतर प्रत्यारोपणक्षम भ्रूण दाई शेळीमध्ये प्रत्यारोपित करतात आणि भ्रूणाचा उर्वरित विकास हा मातेच्या गर्भाशयातच होतो.
 • शेळ्यांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी तयार करण्यासाठी कत्तलखान्यातून शेळ्यांची बीजांडे आणतात. त्या  बीजांडात असणाऱ्या स्त्रीबीजकोषातून स्त्रीबीज (follicles) बाहेर काढली जातात. ही स्त्रीबीजे परिपक्व करून प्रयोगशाळेमध्ये फलन माध्यमात शुक्राणू सोबत फळवली जातात. 
 •  फलन माध्यमात शुक्राणू टाकण्याआधी वीर्यातील नको असलेले घटक काढून त्यावर उपचार केले जातात. योग्य तेच शुक्राणू फलन माध्यमात स्त्रीबीजासोबत टाकले जातात. योग्यता असणारा एकच शुक्राणू स्त्रीबीजात प्रवेश करतो व फलन होऊन भ्रूणाची निर्मिती होते. हा भ्रूण प्रत्यारोपणक्षम होईपर्यंत प्रयोग शाळेत योग्य अशा माध्यमात  इन्क्यूबेटरमध्ये ठेवला जातो. इनक्युबेटर हे शेळीच्या गर्भाशयासारखे वातावरण असणारे यंत्र असून याला ‘कृत्रिम गर्भ पिशवी’सुद्धा म्हणतात. जेथे ७ दिवस भ्रूणाची वाढ केली जाते.
 •  सुरुवातीला टेस्ट ट्यूब बेबीसाठी लागणाऱ्या स्त्रीबीजाच्या संकलनासाठी कत्तलखान्यातील शेळ्यांच्या बीजकोषाचा वापर करण्यात येत होता. यामध्ये स्त्रीबीज संकलित केलेल्या शेळीची आनुवंशिकता शोधणे कठीण होते. पण सध्या लॅप्रोस्कोपी यंत्राद्वारे स्त्रीबीज संकलित केले जाते. ही स्त्रीबीजे फलीकरणासाठी वापरली जातात.
 • प्रयोगशाळेत भ्रूणाचा विकास झाल्यानंतर तयार झालेला प्रत्यारोपणक्षम भ्रूण दाई शेळीमध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्राप्रमाणेच शस्त्रक्रिया करून प्रत्यारोपित करतात. सध्या पशुप्रजनन स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, अकोला  येथे या विषयावर संशोधन सुरू आहे.
 •  शेळीपालकाकडे भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे गर्भधारणा झाल्यास जर मादी करडू जन्मले तर पुढे तिचा प्रजननात वापर करून पुढील पिढ्या उत्पादनक्षम बनवण्यास मदतीचे ठरते. बोकड झाल्यास त्याची चांगल्या किमतीत विक्री केली जाते किंवा त्यांना कळपात प्रजननासाठी ठेवले जाते.

भ्रूण प्रत्यारोपण 

 •  ही कृत्रिम गर्भधारणेची पद्धत आहे. या तंत्रामध्ये निवडक अति उच्च आनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या शेळ्यांना दाता म्हणून आवश्यक संप्रेरकाची इंजेक्शने देऊन त्यांच्या अंडाशयातून अधिकाधिक स्त्रीबीजाचे उत्पादन करण्यात येते. त्यानंतर अशा शेळ्यांमध्ये सिद्ध बोकडाच्या वीर्याने कृत्रिम रेतन करण्यात येते. 
 • कृत्रिम रेतनानंतर दाता शेळीतील ७ दिवसांचे तयार झालेले भ्रूण शस्त्रक्रिया करून संकलित करण्यात येतात. याच वेळी दाता शेळ्यांप्रमाणेच ऋतुचक्राचे नियमन केलेल्या ‘दाई’ शेळ्यांमध्ये संकलित केलेल्या भ्रूणाचे शस्त्रक्रियेद्वारे किंवा दुर्बीण लॅप्रोस्कोपी तंत्राद्वारे प्रत्यारोपण करण्यात येते. 
 •  एकावेळी साधारणपणे एका शेळीतून ६ ते १० सशक्त भ्रूणांचे संकलन होते. एका वर्षात असे चार वेळा भ्रूण संकलन करता येते. म्हणजे एका    शेळीपासून वर्षभरात २४ ते ४० किंवा जास्त सशक्त भ्रूणांचे संकलन करता येते.
 • भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे ४० टक्के गर्भधारणा मिळते. म्हणजे एका शेळीपासून एका वर्षाला १० ते २० करडे मिळवता येतात. याउलट एकाच वंशावळीची नैसर्गिकरीतीने एका शेळीपासून एका वर्षात ४ ते ५ करडे घेता येतात.
 • भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे आपल्याला हव्या त्या जातीची पिढी एकाच वर्षात तयार करता येते. हाच फरक कृत्रिम रेतन तंत्रापेक्षा भ्रूण प्रत्यारोपण तंत्राला विशेष महत्त्व प्राप्त करून देतो. भ्रूण प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी थोडेसे तांत्रिक ज्ञान, उपकरणे, साधणे व अधिक खर्च लागतो.

 भ्रूण प्रत्यारोपणाचे फायदे

 • मांसाची उत्कृष्ट प्रत असणाऱ्या शेळ्यांची निर्मिती करता येते. शेळीचे दूध पचण्यास हलके तसेच औषधी गुणधर्म असणारे असल्याने शहरात त्याला चांगला दर मिळू शकतो. चांगले दूध उत्पादन असणाऱ्या शेळ्यांपासून जास्तीत जास्त करडे तयार करता येतात. 
 • या तंत्रज्ञानापासून तयार झालेली मादी शेळी लवकर वाढते, उत्तम उत्पादन देते. पुढे कळपात प्रजननासाठी उपयोगात आणून व्यवसायात वृद्धी करणे शक्य होते.
 • तयार होणारे नर बोकड पुढील काळात चांगल्या किमतीत विक्रीसाठी किंवा कृत्रिम रेतन प्रयोग शाळेत गोठीत वीर्य निर्मितीसाठी वापरता येतात.
 • उत्कृष्ट दर्जाचे भ्रूण गोठवून पुढे ही वंशावळ जतन करता येते. भविष्यात त्याचा कृत्रिम रेतनाप्रमाणे वंशावळ जतन करण्यास व वाढवण्यासाठी उपयोग करता येतो.
 • या पद्धतीपासून उत्कृष्ट दर्जाची वंशावळ निर्माण करता येते. या प्रयोगासाठी लागणारी संप्रेरके, भ्रूण संकलनासाठी लागणारी माध्यमे व इतर सामग्री ही बाहेरच्या देशातून मागवावी लागतात. त्यामुळे हे तंत्र सध्याच्या परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांसाठी थोडे महागडे आहे. 
 •  गोठीत वीर्य प्रयोगशाळेसाठी उत्कृष्ट नर बोकड निर्मितीसाठी हे तंत्र वापरणे फायदेशीर आहे. या तंत्रामध्ये शेळीच्या अधिक बीज निस्सारणासाठी लागणाऱ्या संप्रेरकाचा खर्च कमी करण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबीद्वारे भ्रूण निर्मिती करणे याबाबत यशस्वीरित्या संशोधन करण्यात आले आहे.

- डॉ. चैतन्य पावशे,  ९९२१६११८९    
(डॉ. पावशे हे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथील पशुप्रजनन स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख  आहेत. डॉ. सांगळे या संशोधक विद्यार्थिनी आहेत.)


इतर कृषिपूरक
आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी?शेळी पालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापनाला...
पशुपालकांना मिळणार KCC अंतर्गत पैसे किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच केसीसी ही एक योजना...
पशुपालन क्षेत्रात गुंतवणुकीची गरज भारतीय कृषी-अन्न व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाच...
दुधाळ जनावरांसाठी कॅल्शियमचे महत्त्व गाय म्हैस विल्यानंतर त्यांच्या शरीरात कॅल्शियमची...
भारताच्या डेअरी निर्यातीत पुढील दशकात...भारतातील दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत पुढील...
गोपैदाशीचे धोरण अन् उद्दिष्टे...उच्च आनुवंशिकता आणि दुग्धोत्पादन क्षमता असलेली...
कोंबड्यांना द्या योग्य गुणवत्तेचे पाणीकोंबड्यांना पाणी देण्यापूर्वी शुद्धीकरण करावे....
जनावरांमधील आंत्रविषार आजारजनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना पावसाळ्यात...
जनावरे वारंवार उलटण्याची समस्यापशुपालकांनी आपल्या गोठ्यातील जनावरांची माजाची...
कृत्रिम रेतनाची योग्य वेळ महत्त्वाची जनावरांमध्ये कृत्रिम रेतन करताना गर्भधारणा यशस्वी...
मध निर्यातीला चालना देण्यावर अपेडाचा भर पुणे - युरोप आणि इतर देशांमध्ये मधाच्या...
अंडी शाकाहरी कि मांसाहारी?मुळातचं अंडी देणं ही कोंबडीची नैसर्गिक प्रक्रिया...
जनावरांमधील थायलेरीया आजारथायलेरीया हा परोपजीवीमुळे होणारा आजार असून याची...
उष्णता ताणाचे वासराच्या आरोग्यावर दीर्घ...दुधाळ जनावरांवर उष्णतेच्या ताणाचा...
शाश्‍वत मत्स्यसंवर्धनात नवीन संधीशाश्‍वत मत्स्यसंवर्धन हे अनेक प्रकारे शेतीशी...
शेतकरी नियोजन रेशीम शेतीमागील काही वर्षांत परभणी तसेच हिंगोली, नांदेड या...
जनावरांमध्ये ज्वारी धाटांची विषबाधाजनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे...
योग्य नियोजनातून सक्षम करा गोशाळाराज्यातील विविध गोशाळांची ओळख विशिष्ट देशी...
तुती, रेशीम कीटकांचे व्यवस्थापन तंत्रप्रौढ रेशीम कीटक संगोपनगृहात रेशीम किटकास...
मत्स्य व्यवसाय अन् शिक्षणामधील संधीमाशांपासून प्रथिने अत्यंत सहज उपलब्ध होत असल्याने...