शेतकरी नियोजन : पीक संत्रा

माझी १६ एकर शेती असून त्यापैकी १२ एकरांवर संत्रा लागवड आहे. एकूण १३०० झाडांपैकी वडिलोपार्जित सुमारे ४३ वर्षाची २०० झाडे, २० वर्षाची २०० झाडे, १८ वर्षाची ४०० झाडे आहेत. मी २०१८ मध्ये इंडो-इस्राईल पद्धतीने ६ बाय ३ मीटर अंतरावर ५०० झाडांची लागवड केली आहे.
ऋषिकेश सोनटक्के संत्रा बागेत सुनियोजित व्यवस्थापनावर भर देतात.
ऋषिकेश सोनटक्के संत्रा बागेत सुनियोजित व्यवस्थापनावर भर देतात.

शेतकरी : ऋषिकेश सोनटक्के गाव :  टाकरखेडा मोरे, ता. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती. एकूण क्षेत्र :   १६ एकर संत्रा क्षेत्र :  १२ एकर (१३०० झाडे) एकूण १६ एकरपैकी १२ एकरांवर संत्रा लागवड आहे. एकूण १३०० झाडांपैकी वडिलोपार्जित सुमारे ४३ वर्षाची २०० झाडे, २० वर्षाची २०० झाडे, १८ वर्षाची ४०० झाडे आहेत. मी २०१८ मध्ये इंडो-इस्राईल पद्धतीने ६ बाय ३ मीटर अंतरावर ५०० झाडांची लागवड केली आहे. या पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या ५५५ तर पारंपरिक पद्धतीमध्ये ती फक्त २७८ इतकीच असते. झाडांची संख्या वाढल्याने उत्पादन वाढण्यास मदत होते. बागेतील ४३ वर्षाच्या २०० झाडांवर मृग बहार, तर उर्वरित सर्व झाडांवर आंबिया बहाराचे नियोजन केले आहे. बागेच्या व्यवस्थापनाकरिता जमीन व झाडांची गरज ओळखून जैविक आणि रासायनिक पद्धतींचा समतोल साधला आहे. फळांची गुणवत्ता चांगली असल्यास दरही चांगला मिळतो, ही बाब लक्षात घेऊन फळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष केंद्रित करतो. नागपुरी संत्र्याची सरासरी उत्पादकता हेक्टरी ५.५ टन इतकी अत्यल्प आहे. परंतु, बागेच्या सुनियोजित व्यवस्थापनामुळे मला मागील वर्षी दुपटीपेक्षाही अधिक उत्पादन मिळवले आहे. मागील १० दिवसांतील कामकाज 

  • बागेत तणांचा प्रादुर्भाव असल्यास झाडांना अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे बाग तणविरहित ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. मागील आठवड्यात बागेतील तण ग्रासकटरच्या साह्याने काढले आहे.
  • बागेला पोषक घटकांचा पुरवठा होण्यासाठी हिरवळीचे खत (बोरु) कापून ते जमिनीत गाडून टाकले. या माध्यमातून सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते.
  • त्यानंतर रिंग पद्धतीने रासायनिक खतांची मात्रा देण्यात आली. त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट २ किलो, युरिया १ किलो, पोटॅश ५०० ग्रॅम, झिंक सल्फेट २०० ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्ये २५० ग्रॅम प्रति झाड याप्रमाणात देण्यात आले.
  • सध्या झाडांवर जास्त वजनाची फळे आहेत. फळांच्या वजनामुळे झाडे वाकू नयेत, यासाठी झाडांना बांबूच्या साह्याने आधार दिला आहे.
  • मागील आठवड्यात झाडांमधील गुळवेल, वासनवेल आदी वेलवर्गीय वनस्पती काढून टाकल्या आहेत. झाडांचा बुंध्यालगतचा भाग स्वच्छ केला आहे. त्यानंतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ट्रायकोडर्माचे ड्रेचिंग केले.
  • वातावरणातील बदलामुळे संत्रा फळांची गळ झाली होती. फळगळ नियंत्रणासाठी लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या शिफारशीनुसार फवारणी घेतली. लिंबूवर्गीय फळ तज्ज्ञ डॉ. योगेश इंगळे यांचेही फळगळ व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन लाभले.
  • सध्या फळे परिपक्व होण्याच्या अवस्थेत असून, या काळात फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून एकरी ६ कामगंध सापळे लावले आहेत.
  • पुढील २० दिवसांतील कामकाज 

  • सध्या पावसाची संततधार सुरू आहे. अतिपावसामुळे तपकिरी कूज, फळकूज या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. नियंत्रणासाठी तज्ञ्जांच्या सल्ल्यानुसार उपाययोजनांचा अवलंब केला जाईल. तसेच बागेतील साचलेले पाणी बाहेर काढले जाईल.
  • बागेमध्ये पडलेली फळे कीड-रोगांच्या प्रसाराला अधिक पोषक ठरतात. पुढील २ दिवसांत पडलेली फळे गोळा करून त्यांची विल्हेवाट लावली जाईल.
  • बागेतील संपूर्ण झाडावर आवश्‍यकतेनुसार कीटकनाशकांची फवारणी केली जाईल.
  • - ऋषिकेश सोनटक्के, ९६६५५९८५३७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com