शेतकरी नियोजन पीक ः टोमॅटो

टोमॅटो लागवडीचा कोणताही पूर्व अनुभव नव्हता. त्यामुळे वाण निवड, सुधारित लागवड तंत्र, बाजारपेठेचा अभ्यास व विपणन या सर्व बाबींचा अभ्यास केला. त्यामुळे पीक व्यवस्थापन उत्तमरीत्या करणे शक्य झाले.
Farmer Planning Crop: Tomatoes
Farmer Planning Crop: Tomatoes

शेतकरी ः विठ्ठल सीताराम सोनवणे गाव ः राहुरी, ता.जि. नाशिक एकूण क्षेत्र ः ३ एकर एकूण टोमॅटो लागवड ः ३ एकर (स्वतःची १.५ एकर आणि करार पद्धतीने दीड एकर) माझी नाशिक जिल्ह्यातील राहुरी येथे ३ एकर शेती आहे. मी गेल्या २० वर्षांपासून पूर्णपणे भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर लक्षकेंद्रित करून दर्जेदार उत्पादन घेत आहे. चालू वर्षी पीक बदल करत उन्हाळी हंगामात स्वतःची दीड एकर आणि करार पद्धतीने शेत घेऊन १.५ एकरावर टोमॅटो लागवड केली आहे. यापूर्वी कोबी, फ्लॉवर, ऊस आदी पिके घेत होतो. टोमॅटो लागवडीचा कोणताही पूर्व अनुभव नव्हता. त्यामुळे वाण निवड, सुधारित लागवड तंत्र, बाजारपेठेचा अभ्यास व विपणन या सर्व बाबींचा अभ्यास केला. त्यामुळे पीक व्यवस्थापन उत्तमरीत्या करणे शक्य झाले. लागवड नियोजन 

  •  मी या वर्षी प्रथमच टोमॅटो लागवड केली आहे. लागवडीपूर्वी बियाणे निवड, लागवड तंत्र, पीक व्यवस्थापन आदी बाबींचे कोटेकोर पूर्वनियोजन केले.
  •  रोगप्रतिकारशक्ती, फळधारणा, उत्पादकता, टिकवणक्षमता आणि बाजार पेठेची मागणी या मुख्य बाबी विचारात घेऊन लागवडीसाठी वाणाची निवड केली.
  •  उन्हाळ्यात मालाचा रंग, आकार, चकाकी व टिकवणक्षमता चांगली असणे गरजेचे असते. त्याअनुषंगाने वाणाची निवड करून रोपवाटिकेत रोपांची आगाऊ नोंदणी करून उपलब्धता केली.
  •  लागवडीसाठी ३ फूट रूंद आणि १.५ फूट उंचीचे बेड तयार करून पॉलिमल्चिंग केले. दोन बेडमध्ये ५ फूट अंतर ठेवले. साधारण ८ डिसेंबरला दीड फूट अंतरावर झिग-झॅग पद्धतीने रोगमुक्त आणि सशक्त रोपांची लागवड केली.
  •  माझ्या स्वतःच्या शेतामध्ये लागवडीसाठी साधारण ८ हजार रोपे लागली.
  •  रोपे २५ ते ३५ दिवसांची झाल्यानंतर बांबू, सुतळी व तार वापरून रोपांची बांधणी केली.
  •  करार पद्धतीने घेतलेल्या शेतामध्ये १३ फेब्रुवारीला बेडवरती २ फूट अंतरावर रोपांची लागवड केली. या वेळी झिग-झॅग पद्धतींचा अवलंब न केल्याने लागवडीसाठी फक्त ६ हजार रोपे लागली.
  •  सध्या करार पद्धतीच्या क्षेत्रामध्ये रोपे बांधणीची कामे सुरू आहेत. तर दुसऱ्या प्लॉटमध्ये टोमॅटोची तोडणी सुरू आहे.
  • सिंचन व खत व्यवस्थापन 

  • बेड तयार केल्यानंतर १ डिसेंबरला पाऊस झाला. बेड ओले असल्यामुळे लागवडीनंतर दोन आठवडे सिंचन केले नाही. त्यानंतर प्रतिदिन २ ते अडीच तास ठिबकद्वारे पाणी दिले.
  • सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यानुसार दररोज सकाळी ७ च्या आत किंवा रात्री ८ नंतर ताशी ३ लिटर पाणी ठिबकद्वारे देत आहे.
  • वाढीच्या अवस्थेत ठिबकद्वारे पिकांस विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या. अन्नद्रव्यांचा संतुलित पुरवठा केल्यामुळे रोपे सशक्त होऊन त्यांची प्रतिकारशक्ती वाढते.
  • कीड-रोग व्यवस्थापन 

  •  मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण होते. त्याचा टोमॅटो पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. या काळात पिकांमध्ये मावा, लाल कोळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार कीटकनाशकांच्या फवारण्या घेतल्या. सोबत लागवडीमध्ये साधारण ७० ते ७५ चिकट सापळे लावले. त्यामुळे किडींचे प्रभावी नियंत्रण होण्यास मदत झाली.
  • तसेच टोमॅटोमध्ये टुटा अळीच्या प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी घेतली. तसेच चिकट सापळ्यांच्या वापरामुळेदेखील नियंत्रण होण्यास मदत झाली.
  • पहिल्या प्लॉटमध्ये टुटा अळीच्या प्रादुर्भावाचा अंदाज आल्याने दुसऱ्या प्लॉटमध्ये प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच उपाययोजना अवलंब केला. त्यामुळे करार पद्धतीने लागवड केलेल्या शेतात टुटाचा प्रादुर्भाव सध्यातरी दिसून आलेला नाही.
  • तोडणी आणि उत्पादन 

  • सध्या दीड एकरावरील टोमॅटोची काढणी सुरू आहे. तर करार पद्धतीने घेतलेल्या क्षेत्रात झाडे बांधणीची कामे सुरू आहेत.
  • लागवडीनंतर साधारण ८८-९० दिवसांनी टोमॅटो तोडणीस तयार झाली. प्रत्यक्ष तोडणी ७ मार्चपासून सुरू झाली.
  • सध्या प्रतिदिन १२० -१४० क्रेट टोमॅटो उत्पादन मिळत आहे. एक क्रेट साधारण २२ किलो वजनाचा असतो. उत्पादित मालाची नाशिक येथील बाजार समितीमध्ये विक्री होते. त्यास सरासरी २३० ते २४० रुपये प्रति क्रेट इतका दर मिळत आहे.
  • - विठ्ठल सोनवणे, ८८३००२५६९४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com