शेतकरी नियोजन : केसर आंबा

२०१६ मध्ये दोन एकरावर केसर आंब्याची १५ बाय ३ फूट अंतरावर लागवड केली. यासोबतच दरवर्षी हळद, आले, मका, औषधी वनस्पती, वनशेती, कलिंगडाच्या विविध जातींची लागवड केली जाते. योग्य व्यवस्थापनाद्वारे दर्जेदार उत्पादन घेण्यावर माझा विशेष भर असतो.
कल्पेश रवींद्र जैन यांची केसर आंबा बाग
कल्पेश रवींद्र जैन यांची केसर आंबा बाग

शेतकरी ः कल्पेश रवींद्र जैन गाव : नागद, ता. कन्नड, जि. औरंगाबाद एकूण क्षेत्र : ५० एकर केसर आंबा ः २ एकर (१६०० झाडे) मी विज्ञान शाखेतून पदवी घेतल्यानंतर दोन वर्ष नोकरी केली. शेतीमध्ये करिअर करण्याच्या उद्देशाने नोकरी सोडली असून, पूर्णवेळ शेती करतो. त्यानंतर २०१६ मध्ये दोन एकरावर केसर आंब्याची १५ बाय ३ फूट अंतरावर लागवड केली. यासोबतच दरवर्षी हळद, आले, मका, औषधी वनस्पती, वनशेती, कलिंगडाच्या विविध जातींची लागवड केली जाते. योग्य व्यवस्थापनाद्वारे दर्जेदार उत्पादन घेण्यावर माझा विशेष भर असतो. ताण व्यवस्थापन  सध्या बाग ताणावर सोडली आहे. हा ताण साधारण डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तोडला जाईल. सिंचन व्यवस्थापन  मराठवाड्यामध्ये पर्जन्यमान हे अल्प असल्याने विहिरीवर अवलंबून राहावे लागते. आमच्याकडे सिंचनासाठी ५ विहिरी आहेत. त्यातील पाणी ठिबक सिंचनाद्वारे बागेला पुरविले जाते. साधारण ७५ टक्के फुलधारणा झाल्यानंतर सिंचन सुरू केले जाते. सुरुवातीला प्रति झाड ५ ते ६ लिटर पाणी ३० मिनिटे दिले जाते. हे पाण्याचे प्रमाण मार्च महिन्यापर्यंत ३५ लिटरपर्यंत जाते. खत व्यवस्थापन  दरवर्षी जून महिन्यामध्ये प्रति झाड १० किलो शेणखत दिले जाते. त्यानंतर १०ः२६ः२६ या रासायनिक खतांची एकरी १०० किलो मात्रा दिली जाते. याशिवाय बहर नियोजनादरम्यान सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि विद्राव्य खतांचा सिंचनातून प्रमाणशीर वापर केला जातो. तण व्यवस्थापन  तणनियंत्रणासाठी शिफारशीत तणनाशकांचा जुलै आणि ऑगस्ट महिन्यांमध्ये २ ते ३ वेळा वापर केला जातो. तणनाशकाचा वापर केल्यामुळे प्रभावी तणनियंत्रण करणे शक्य होते. कीड-रोग व्यवस्थापन  मोहोर आल्यानंतर भुरी, तुडतुडे, फुलकिडे, करपा आदींचा प्रादुर्भाव दिसून येतो. कीड-रोगांचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली जाते. आंतरपीक  केसर आंबा लागवड केल्यानंतर सुरुवातीची ३ वर्षे बागेमध्ये कलिंगड, कांदा आणि आले या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड केली. मात्र ताण व्यवस्थापन, आंतरमशागत व फवारणी या कामामध्ये अडचणी येत असल्याने मागील दोन वर्षांपासून आंतरपीक घेणे बंद केले आहे. आंतरमशागत  दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये आंतरमशागतीची कामे केली जातात. जूनमध्ये छाटणी केलेल्या फांद्या, बागेतील गवत रोटव्हेटरच्या साह्याने जमिनीत गाडले जाते. त्याचा सेंद्रिय कर्ब वाढीसाठी फायदा होतो. उत्पादन  मागील वर्षी सर्वसाधारण व्यवस्थापनातून ३ टन उत्पादन मिळाले होते. या वर्षी १२ टनांचे लक्ष्य ठेवत व्यवस्थापनावर विशेष भर देत आहे. व्यवस्थापनातील अन्य बाबी 

  • मोहोर अवस्थेमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या वापर टाळला जातो. त्याऐवजी नीम तेलाचा वापर केला जातो.
  • बागेमध्ये आंतरमशागतीच्या कामांसाठी पॉवर वीडरचा वापर होतो. त्यातून खर्चात बचत होते.
  • खते दिल्यानंतर ती लगेच माती आड केली जातात.
  • सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पॅक्लोब्युट्राझोल या वाढरोधकांचा वापर शिफारशीप्रमाणे केला आहे.
  • पुढील ३० दिवसांचे नियोजन 

  • सद्यःस्थितीत केसर आंबा बाग मोहोर येण्याच्या अवस्थेत आहे. त्यानुसार पुढील महिनाभराचे नियोजन केले आहे.
  • नवती फुटल्यानंतर ती लवकर पक्व होण्यासाठी व पुढे मोहोर येऊन फळे बाजरीच्या आकाराची झाल्यानंतर फळगळ टाळण्याच्या उद्देशाने नॅप्थील ॲसिटिक ॲसिड (एनएए) संजीवकांचा वापर करण्याचे नियोजन असते.
  • दर ७ दिवसांनी १३:०:४५ या विद्राव्य खतांच्या फवारण्या घेतल्या जातील.
  • अंदाजे १५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत मोहोर येणे अपेक्षित आहे. मोहोरावर किडी व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याच्या नियंत्रणासाठी शिफारशीनुसार फवारणी केली जाईल.
  • - कल्पेश जैन, ९४२१४९०४९१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com