शेतकरी नियोजनः केसर आंबा

आम्ही दोघा भावांनी मिळून २००६ रोजी सहा एकरांवर क्षेत्रावर १ हजार आंबा झाडांची साधारण १७ बाय १७ फूट अंतरावर लागवड केली. दुष्काळ, पाण्याची टंचाई, खोडकिड अशा विविध कारणांमुळे बरीच झाडे गेल्यामुळे सध्या बागेत ७५० केसर आंबा झाडे आहेत. .
शिवाजी आणि तानाजी हे वाडीकर बंधू आपल्या केसर आंबा बागेत.
शिवाजी आणि तानाजी हे वाडीकर बंधू आपल्या केसर आंबा बागेत.

शेतकरी: शिवाजी बाबूराव वाडीकर गाव : नागलगाव, ता. उदगीर जि. लातूर एकूण शेती : ४० एकर केसर आंबा क्षेत्र :  ६ एकर (७५० झाडे) नागलगाव (ता. उदगीर जि. लातूर) येथे आमची एकत्र कुटुंबाची ४० एकर शेती आहे. मी आणि माझा भाऊ तानाजी वाडीकर आम्ही दोघे मिळून शेतातील विविध कामे करतो. आम्ही केसर आंब्यासह सोयाबीन, मूग, शेवगा, तूर ही पिके प्रामुख्याने घेतो.  आम्ही २००६ रोजी सहा एकरांवर क्षेत्रावर १ हजार आंबा झाडांची साधारण १७ बाय १७ फूट अंतरावर लागवड केली. दुष्काळ, पाण्याची टंचाई, खोडकिड अशा विविध कारणांमुळे बरीच झाडे गेल्यामुळे सध्या बागेत ७५० केसर आंबा झाडे आहेत. साधारण २०१०-११ पासून बागेतून अपेक्षित आंबा उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. 

ताण व्यवस्थापन 

  • जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॅक्लोब्युट्राझोल या वाढरोधकांचा शिफारशीप्रमाणे वापर केला होता. त्यानंतर बागेस पाणी देणे बंद करून बाग ताणावर सो़डली.  
  • साधारण २० टक्के मोहोर आल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी ताण तोडण्यात आला. 
  • सिंचन व्यवस्थापन 

  • सिंचनाच्या सोयीसाठी बागेपासून ४ किमी अंतरावरील तळ्याजवळ विहीर खोदली आहे.
  • या विहिरीतील पाणी पाइपलाईनद्वारे लागवड क्षेत्राजवळ उभारण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये आणले जाते. आणि आवश्‍यकतेनुसार शेततळ्यातील पाणी सिंचनासाठी वापरले जाते. 
  • बागेला पाणी देण्यासाठी पूर्वी सिंगल लाईन ड्रीपचा वापर केला जायचा. यंदा जुलैमध्ये त्यास ट्रीपल इनलाईन पद्धतीचे स्वरूप दिले आहे.
  • ताण तोडताना सुरुवातीला १५ मिनिटे सिंचन करण्यात आले. त्यानंतर पाच-पाच मिनिटांनी पाणी देण्याचा अवधी वाढवीत नेला. सध्या बागेस आठ दिवसाआड २ तास पाणी दिले जाते.
  • खत व्यवस्थापन 

  • जुलै महिन्यात झाडांजवळ चर खोदून त्यात चांगले कुजलेले शेणखत टाकले. ड्रीपचे पाणी त्या चरांमध्ये पडून कुजलेल्या खताचा अर्क झाडांच्या मुळांना मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. 
  • जुलैमध्ये १२ः३२ः१६ हे खत १ किलो अधिक कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रत्येकी २०० ग्रॅम अधिक युरिया अर्धा किलो याप्रमाणे प्रति झाड मात्रा दिली. ऑगस्ट महिन्याच्या मध्यात ही मात्रा पुन्हा दिली. 
  • ००ः५२ः३४ (मोनो पोटॅशिअम फॉस्फेट)  २ किलो प्रति एकर प्रमाणे आठवड्यातून २ वेळा देण्यात आले.
  • ताण तोडल्यानंतर ड्रीपद्वारे १९ः१९ः१९ ची  २ किलो मात्रा प्रति एकरी देत आहे.
  • तण व्यवस्थापन बाग पूर्णपणे माळारानावर असल्यामुळे खडकाळ जमिनीत मशागत आणि तणनियंत्रणाची कामे करणे शक्य होत नाही. त्यामुळे तणनियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर केला जातो. त्यानुसार जुलै आणि सप्टेंबर महिन्यात २ वेळा तणनाशकांचा वापर केला आहे.  कीड, रोग व्यवस्थापन 

  • यंदा बागेमध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी घेतली.
  • मोहोर आल्यानंतर आवश्‍यकतेनुसार कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या घेण्यास सुरुवात केली.
  • आठवड्याभरापूर्वी १३:००:४५ (पोटॅशिअम नायट्रेट) ची फवारणी घेतली आहे. 
  • पुढील महिनाभराचे नियोजन

  • साधारण १५ नोव्हेंबरपासून मोहोर येण्यास सुरुवात झाली. सध्या फळे मोहरी, वाटाणा ते बाजरीच्या आकाराची आहेत. 
  • सेंद्रिय पदार्थ कुजविणाऱ्या पदार्थांची फवारणी फळ सेटिंगनंतर घेणार आहे. हे द्रावण २४ हजार लिटर क्षमता असलेल्या हौदात  तयार केले जाईल. दर पंधरा दिवसातून एक वेळ २०० लिटर प्रति एकर याप्रमाणे जीवामृत दिले जाईल.
  • आठ दिवसाआड १३:००:४५ ची एक फवारणी घेतली जाईल. फळगळ टाळण्यासाठी नॅप्थील ॲसिटिक ॲसिड (एनएए) हे संजीवक अधिक युरिया यांची फवारणी घेतली जाईल. फळे  वाटाणा, गोटी आकाराची आणि कोय अवस्थेत असताना अशा ३ फवारण्या घेण्याचे नियोजन आहे. 
  • उत्पादन हवामानाची प्रतिकूलता यंदाही कायम आहे. गतवर्षी आंबा बागेतून ४० टन उत्पादन मिळाले होते. यंदा ५० टन उत्पादनाची अपेक्षा ठेवून व्यवस्थापन करीत आहे. - शिवाजी वाडीकर,  ८३२९९६८४२६ - तानाजी वाडीकर,  ९९२२५७१४२४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com