शेतकरी नियोजन : रेशीम शेती

आमची एकत्रित कुटुंबाची २० एकर शेती आहे. शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीस २००९ मध्ये सुरुवात केली. त्यासाठी ६ एकरांवर तुती लागवड केली. पहिली ४ वर्षे रेशीम कोष उत्पादनावर भर दिला. त्यातून या व्यवसायातील बारकावे समजले.
 श्रीधर सोलव आपल्या तुती लागवडीमध्ये
श्रीधर सोलव आपल्या तुती लागवडीमध्ये

शेतकरी ः श्रीधर सोलव गाव ः बरबडी, ता. पूर्णा, जि. परभणी एकूण क्षेत्र ः २० एकर तुती लागवड ः ९ एकर आमची एकत्रित कुटुंबाची २० एकर शेती आहे. शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीस २००९ मध्ये सुरुवात केली. त्यासाठी ६ एकरांवर तुती लागवड केली. पहिली ४ वर्षे रेशीम कोष उत्पादनावर भर दिला. त्यातून या व्यवसायातील बारकावे समजले. त्या वेळी १०० अंडीपुंजांपासून ७० ते ७५ किलोपर्यंत रेशीम कोष उत्पादन मिळायचे. उत्पादित कोषाची बंगळूर जवळच्या रामनगरम येथील बाजारपेठेत विक्री केला जात असे. रेशीम कोष उत्पादनातून शाश्‍वत उत्पन्न मिळू लागले. मागील काही वर्षांत परभणी तसेच हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील शेतकरी रेशीम शेतीकडे वळले आहेत. चॉकी (बाल्यकिटक)द्वारे दर्जेदार कोष उत्पादन मिळत असल्यामुळे चॉकीची मागणी वाढली आहे. परंतु आमच्या भागात चॉकी सेंटर नव्हते. ही संधी ओळखून जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालय, तसेच केंद्रीय रेशीम मंडळाच्या परभणी येथील कार्यालयातून बाल्य रेशीम कीटक (चॉकी रेअरिंग सेंटर) संगोपन व्यवसायाबाबत माहिती घेतली. त्यानंतर सन २०१३ मध्ये रेशीम कोष उत्पादन बंद करून मिनी चॉकी रेअरिंग सेंटर सुरू केले. चॉकीची मागणी वाढत असल्यामुळे उत्पादन क्षमता वाढविण्याचे ठरविले. त्यासाठी आणखी ३ एकरांवर तुती लागवड केली. आता एकूण ९ एकर तुती लागवड झाली आहे.

  • कर्नाटकातील म्हैसूर येथील संस्थेत चॉकी सेंटर व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण घेऊन २०१८ मध्ये मॉडेल चॉकी सेंटर सुरू केले. त्यासाठी शेतामध्ये सिमेंट विटांच्या बांधकामाच्या पक्क्या संगोपनगृहाची उभारणी केली. या संगोपनगृहात एका वेळी साडेआठ हजार अंडीपुंज उबबिण्याची क्षमता आहे.
  • परभणी, नांदेड, लातूर, बीड, तसेच हिंगोली जिल्ह्यातील रेशीम कोष उत्पादकांना चॉकीचा (बाल्य अवस्थेतील कीटकांचा) पुरवठा केला जातो. आता विदर्भातील तसेच शेजारील तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांकडूनही चॉकीला मागणी आहे. संबंधित शेतकऱ्यांकडून १५ दिवस आधी आगामी मागणी घेतली जाते.
  • अंडीपुंजाचे हॅचिंग झाल्यानंतर दोन मोल्ट अवस्थेतील बाल्य रेशीम कीटकांना १० दिवसांचा कालावधी लागतो. बाल्यावस्थेतील कीटकांचे संगोपन काळजीपूर्वक करावे लागते. या अवस्थेत रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण बॅच बाद होण्याचा धोका असतो. रोगमुक्त, गुणवत्तापूर्ण चॉकी उत्पादन हीच दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाची पहिली पायरी आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेतली जाते. दुसऱ्या अवस्थेतील मोल्टनंतर १२ तासांच्या आत संबंधित शेतकऱ्यांपर्यंत चॉकी पोहोचविली जाते.
  • सध्या प्रति शेकडा चॉकीचा दर हा २२०० रुपये इतका आहे. यासोबतच शेतकऱ्यांकडून १०० रुपये वाहतूक खर्च घेतला जातो. एका दिवसामध्ये सर्व चॉकी पोहोचविली जाते. त्यानंतर पुढील बॅचचे नियोजन सुरू होते.
  • तुती बागेचे व्यवस्थापन  चॉकीसाठी तुतीला रासायनिक खतांच्या मात्रा दिल्या जात नाहीत. वर्षातून दोन वेळेस एकरी दोन ट्रॉली शेणखत दिले जाते. पहिला मात्रा मे महिन्याच्या शेवटी तर दुसरी सप्टेंबर महिन्यात दिली जाते. संबंधित शेतकऱ्यांपर्यंत चॉकी पोहोचविल्यानंतर तुती बागेतील कामांवर भर दिला जातो. खुरपणी करून बाग स्वच्छ केली जाते. त्यानंतर गरजेनुसार पाणी दिले जाते. संगोपनगृह निर्जंतुकीकरण  रेशीम शेती व्यवसायामध्ये संगोपनगृहाची स्वच्छता, निर्जंतुकीकरण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. चॉकी पोहोचविल्यानंतर संगोपनगृह आणि ट्रेचे फॉर्मेलिन, ब्लिचिंग पावडर, तसेच अन्य शिफारशीत घटकांद्वारे निर्जंतुकीकरण केले जाते. त्यानंतर साध्या पाण्याने धुऊन घेतले जाते. या कामांसाठी साधारण ७ ते १० मजूर लागतात. परंतु आमच्या एकत्रित कुटुंबातील सदस्य या कामांसाठी मदत करतात. त्यामुळे मजुरीवरील खर्चात मोठी बचत होते. मागील १५ दिवसातील कामकाज 

  • यवतमाळ जिल्ह्यातील दोन आणि तेलंगणातील निर्मल भागातील तीन असे पाच गावांतील शेतकऱ्यांनी ७ ऑक्टोबर रोजी ४ हजार अंडीपुंज चॉकीसाठी आणून दिले आहेत. त्यांचे १० ऑक्टोबर रोजी हॅचिंग झाले. आणि १३ रोजी पहिला मोल्ट बसला. १५ ते १७ ऑक्टोबरला तुती पानांवर त्यांचे फीडिंग सुरू झाले. १७ तारखेला संध्याकाळी संबंधित शेतकरी संगोपनागृहावर येऊन चॉकी घेऊन गेले.
  • प्रति १०० चॉकी २२०० रुपये या दराने जागेवरच विक्री करण्यात आली. बॅच संपल्यानंतर संगोपनगृहाचे निर्जंतुकीकरण करून घेतले.
  • पुढील १५ दिवसांचे नियोजन 

  • दिवाळी सणानिमित्त मजुरांना सुट्टी दिली जाते. त्यामुळे याकाळात दरवर्षी चॉकीनिर्मिती आठवडाभरासाठी बंद असते.
  • नोव्हेंबर महिन्यात रेशीम कोष उत्पादन घेण्यासाठी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील देवठाणा, वझूर, माटेगाव येथील शेतकऱ्यांनी चॉकीची मागणी नोंदविली आहे. त्यासाठी मी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडे अंडीपुंजासाठी मागणी केली आहे. साधारण ७ नोव्हेंबरला बॅच सुरू करून १० नोव्हेंबरला हॅचिंग (उगवण) होईल. ही बॅच १७ नोव्हेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना चॉकीचा पुरवठा केला जाईल.
  • - श्रीधर सोलव, ८००७४३७६१२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com