शेततळ्याची आखणी, अस्तरीकरण

शेततळ्यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते. आपत्कालीन स्थितीमध्ये पिकास पाण्याची उपलब्धता होते. रब्बी हंगामाच्या सुरुवातीस शेततळ्यात पाणी साठविले, तर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून रब्बी हंगामातील मर्यादीत क्षेत्रात एखादे पीक घेता येते.
use 500 microns thick plastic film in farm pond for lining
use 500 microns thick plastic film in farm pond for lining

शेततळ्यामुळे भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते. आपत्कालीन स्थितीमध्ये पिकास पाण्याची उपलब्धता होते. रब्बी हंगामाच्या सुरुवातीस शेततळ्यात पाणी साठविले, तर ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून रब्बी हंगामातील मर्यादीत क्षेत्रात एखादे पीक घेता येते.  शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास ‘शेततळे’ असे म्हणतात. शेततळ्यातील पाण्याचा वापर संरक्षित जलसिंचनासाठी केला जातो. पावसाच्या अनिमितपणामुळे पिकास ताण पडतो. अशावेळी शेततळ्यांतील पाणी सिंचनासाठी वापरता येते. शेततळ्यातील पाण्याचा वापर मत्स्य उत्पादनासाठी, जनावरांना पाणी पिण्यासाठी, शेती आणि घरगुती वापरासाठी होऊ शकतो.  साधारणपणे, पावसाचे वाहून जाणारे पाणी शेतात अडविण्यासाठी शेततळ्याच्या वरच्या बाजूस पाणलोट क्षेत्राची आवश्‍यकता असते. जेणेकरून वाहून जाणारे पावसाचे पाणी खोदलेल्या तळ्यात साठविता येईल. बऱ्याच वेळा शेततळ्याचे क्षेत्र कमी असल्यामुळे त्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठविता येत नाही. अशावेळी इतर ठिकाणाहून पाणी आणून शेतात साठविण्यासाठी साठवणूक तलाव उपयोगी पडतात. शेततळ्यासाठी जागेची निवड 

  • पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी, काळी चिकन मातीचे प्रमाण  जास्त असलेली जमीन शेततळे उभारणीसाठी उपयुक्त असते. 
  • साधारणपणे जमिनीच्या उतारावरील जागा शेततळ्यासाठी निवडावी.
  • मुरमाड, वालुकामय, सच्छिद्र खडक किंवा खारवट जमीन शेततळ्यास निवडू नये. 
  • शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे असते. 
  • खोलगट, शेताच्या खालच्या बाजूची जमीन शेततळ्यासाठी निवडावी. तसेच सर्व पाणी निवडलेल्या जागेवर एकत्रित येईल असे नियोजन करावे. 
  •  पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. अशा जागेतील तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजूला थोड्या अंतरावर खोदावे.
  • शेततळे बांधताना घ्यावयाची काळजी 

  • शेततळ्यासाठी जागा निवडताना कठीण, मुरुम, खडक, जिवंत पाण्याचे झरे लागणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याकरिता जमीन निवडताना ट्रायल पीट घेऊन तळ्याची जागा निश्‍चित करावी.
  • आकारमान निश्‍चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषांप्रमाणे शेततळ्याची जागा निश्‍चित करावी.
  • चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्‍चित करावी.
  •   शेततळ्याचे क्षेत्रफळ साठवणूक क्षमतेप्रमाणे निश्‍चित करावे. जेणेकरून शेततळ्यामुळे जमिनीचे कमीत कमी क्षेत्रफळ व्यापले जावे. त्यामुळे पाण्याचा पसारा कमी ठेवला जाईल आणि बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान कमी होऊ शकेल.
  • शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, ओलिताखाली आणावयाचे क्षेत्रातील पीकपद्धती निश्‍चित करावी.
  •  शेततळे खोदताना तळ्याच्या बाजूचा उतार योग्य ठेवावा, बाजूच्या भिंती सपाट व गुळगुळीत करून घ्याव्यात. शेततळ्यातील टोकदार दगड, धारदार वस्तू, काचा, झाडांच्या मुळ्या इत्यादी गोष्टी काढून टाकून त्यावर पाणी मारून ते धुमसून घ्यावे. अस्तिरीकरणाच्या दृष्टीने ही सर्व पूर्वतयारी खोदाईचे काम करतानाच करून घ्यावी.
  •  प्रथम खोदाई नंतर कुंपण घालणे आणि त्यानंतर प्लॅस्टिक अस्तरीकरण या क्रमाने शेतळ्याचे काम पूर्ण करावे. खोदाई केल्यानंतर काढलेली माती शेततळ्याच्या आकारानुसार लावून घ्यावी. नंतर दबाई करून बांध बनवावा. 
  •  शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या २ ते अडीच टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः २ हेक्टर क्षेत्राकरिता ३० बाय ३० बाय ३ मीटर (२७०० घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे.
  • शेततळे बांधताना बांधावरील माती तळ्यात वाहून येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काडीकचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून घुशी, उंदीर, खेकडे इत्यादींपासून संक्षण होईल.
  • शेततळ्याची निगा 

  • शेततळे घेण्यापूर्वी मृद्‌ व जलसंधारणाचे उपाय करावेत. जेणेकरून पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही. 
  • शेततळ्यात गाळ येऊ नये यासाठी शेततळ्यात पाण्याचा प्रवाह प्रवेश करतो, त्या ठिकाणी गाळण यंत्रणा बसवावी. विशेषकरून शेतामध्ये उताराला आडवी किंवा समतल मशागत करावी. 
  • तसेच पाण्याचा प्रवाह प्रवेश करतो त्याच्या अगोदर २ बाय २ बाय १ मीटर आकाराचे खोदकाम करावे. पाणी ज्या बाजूने बाहेर वाहून जाते तेथे गवत लावावे. त्यामुळे गाळ खड्ड्यामध्ये साचेल आणि 
  • प्रवाहाबरोबर आलेल्या गाळाची गवताच्या पानांमुळे गाळणी होईल.
  • बऱ्याच ठिकाणी शेततळे भरल्यानंतर जास्तीचे पाणी खालच्या तोंडातून मोकळे न वाहता ते शेततळ्याच्या वरच्या बाजूने शेतात मागे पसरलेले दिसते. हे असे शेततळ्याचे खालचे तोंड वरच्या तोंडापेक्षा उंच ठेवल्यामुळे होते. त्यामुळे शेततळ्यात पाणी आत येणाऱ्या तोंडापेक्षा पाणी बाहेर जाणारे तोंड हे किमान ६ इंच तरी खाली असावे. 
  • बाष्परोधकामुळे पाण्यावर अत्यंत पातळ थर तयार होतो. त्यामुळे पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांनी कमी होते. बाष्परोधकांचा वापर पावसाळा सोडल्यास इतर दोन्ही हंगामांत करणे फायद्याचे ठरते. वाऱ्याचा वेग जास्त असतो, त्यावेळी बाष्परोधके तलावाच्या कडेला जमा होतात. त्यामुळे त्याचा प्रभाव पडत नाही.
  • शेततळ्यासाठी अस्तर  ज्या जमिनीत पाणी धरून  ठेवण्याची क्षमता अत्यंत कमी आहे. तसेच पाणी पाझरण्याचा वेगही प्रचंड आहे. तेथे पावसाळ्यात पाण्याने पूर्ण भरलेले शेततळे काही दिवसांत कोरडे होते. पर्यायाने अशा शेततळ्यातून अपेक्षित फायदा होत नाही. शेततळ्यातील पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे.

  • शेततळ्यातील पाणी जमिनीमध्ये मुरून वाया जाऊ नये. यासाठी विशेष प्रकारच्या ५०० मायक्रॉन दर्जाच्या प्लॅस्टिक फिल्मचा अस्तरीकरणासाठी वापर करावा.  प्लॅस्टिकचे कापड शेततळ्यात पसरताना मुरमाची किंवा मातीची अणकुचीदार टोके वर येणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्याकरिता सुक्या मातीचे किंवा वाळूचे थर पसरावेत. त्यावर प्लॅस्टिकचे कापड घड्या पडणार नाही या पद्धतीने टाकावे.
  • खोदाई पूर्ण झाल्यावर शेततळ्यातील साफसफाई व प्लॅस्टिक फिल्म अस्तरीकरणास योग्य तळ, सर्व बाजू उतार व माथा इत्यादींचे ड्रेसिंग, फिनिशिंग करावे.
  • पाण्याच्या वजनामुळे प्लॅस्टिक फिल्म खाली घसरणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी फिल्म शेततळ्याच्या काठापासून बंद करून संपूर्ण शेततळ्यात बसवावी. फिल्ममुळे शेततळ्यात साठवलेले पाणी जमिनीमध्ये मुरत नाही.
  • शेततळे तयार झाल्यानंतर बऱ्याचदा जनावरे कापड चावून खराब करतात. तसेच गाई किंवा म्हशींसुद्धा शेततळ्यात पडण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाप्ती शेततळ्याच्या चारही बाजूंनी कुंपण करावे.
  • - वैभव सूर्यवंशी,  ९७३०६९६५५४, (विषय विशेषज्ञ-कृषी अभियांत्रिकी, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com