कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
कृषिपूरक
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापन
उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे अंड्यांची उत्पादन क्षमता व गुणवत्ता खालावते. खाद्य परिवर्तन क्षमतेवर परिणाम होतो. सरासरी वजन व रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मरतुकीचे प्रमाण वाढते. हे धोके लक्षात घेता योग्य आहार व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे अंड्यांची उत्पादन क्षमता व गुणवत्ता खालावते. खाद्य परिवर्तन क्षमतेवर परिणाम होतो. सरासरी वजन व रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मरतुकीचे प्रमाण वाढते. हे धोके लक्षात घेता योग्य आहार व्यवस्थापनावर भर देणे आवश्यक आहे.
साधारण तापमानामध्ये (१८ ते २४ अंश सेल्सिअस) कोंबड्यांवर कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. अशा वातावरणात सरासरी वजन वाढ, खाद्य परिवर्तन क्षमता व अंडी उत्पादन चांगल्या प्रकारे होऊन कोंबड्या त्यांच्या शरीराचे सामान्य तापमानादरम्यान (१०४ ते १०६ फॅरानाइट) नियंत्रित ठेवतात.
उष्माघाताची कारणे
- कोंबड्यांमध्ये तयार होणारी ऊर्जा व वातावरणात पसरणारी ऊर्जा यांचा समतोल बिघडल्यामुळे सूर्यप्रकाश, तापमान व आर्द्रता यांचा असमतोल होतो.
- कोंबड्यांची जात, प्रजात, वजन आणि शारीरिक प्रक्रियांचा वेग वाढतो.
- उत्पादन क्षमता तसेच खाद्याची गुणवत्ता.
- शेडमधील कोंबड्यांची संख्या, अयोग्य व्यवस्थापन.
- आतील व बाहेरील तापमानात फरक, आहाराचे अयोग्य व्यवस्थापन.
परिणाम
प्रत्यक्ष लक्षणे
- वाढ खुंटते. खाद्य परिवर्तन क्षमता (FCR) खालावते
- उत्पादन क्षमतेवर परिणाम. शरीरामध्ये क्षारांचे प्रमाण कमी होते.
- शरीरात पाणी जमा होते. मरतुकीचे प्रमाण वाढते.
- ३२ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असल्यास कोंबड्यांवर अधिक ताण येतो. ७० पेक्षा जास्त आर्द्रता असल्यास कॉक्सिडिओसिस किंवा रक्ती हगवणीचे प्रमाण वाढते.
- ऑक्सिजन वायू कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे रक्तदाब कमी होतो.
- अंड्यांमधील अर्कात एपिनेफ्रिनचे प्रमाण वाढते.
- कोंबड्या दूर जाण्याचा प्रयत्न करतात. पंख पसरवून लिटरच्या सान्निध्यात बसतात.
- शरीरावरील पिसे कमी किंवा नाहीशी होतात.
- अंतर्गत भागांमधून रक्त त्वचेकडे पसरते ज्यामुळे त्वचेचा रंग गडद होतो.
- बाह्य परजीवींचे प्रमाण वाढते, कोंबड्या धापा टाकू लागतात. एकमेकांना चोची मारतात.
अप्रत्यक्ष लक्षणे
- रक्तातील सामू वाढतो व पेशींमधील कमी होतो.
- बाइकार्बोनेट आयन्सचे प्रमाण कमी होते. रक्तामध्ये स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण वाढते.
- हीट शॉक प्रोटिन्सचे प्रमाण वाढते. होमिओस्टॅसिस बिघडते
- मादींमध्ये संप्रेरकांचा असमतोल निर्माण होतो. ज्याचा परिणाम प्रजननावर दिसून येतो.
- रोगप्रतिकारक शक्तीसाठी कारणीभूत असणारे अवयव आकारमानाने कमी होतात.
आहार व्यवस्थापन
पाण्याचे महत्त्व
पाणी विविध शारीरिक क्रियांसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. पाण्याद्वारे इलेक्ट्रोलाइट व इतर औषधेदेखील देतो. जास्त तापमान असल्यास कोंबड्या जास्त प्रमाणात पाणी पितात.
फास्टिंग
- फास्टिंग म्हणजे कोंबड्यांना खाद्यापासून दूर ठेवणे. यामुळे चयापचयातून उष्णतेची निर्मिती कमी प्रमाणात होते.
- स्नायूंच्या आकुंचनातून, हालचालींमध्ये उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते. म्हणून उष्णतेचा ताण वाढण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी कोंबड्यांना दिवसा जास्त तापमान असल्यास खाद्य देणे टाळावे.
ऊर्जा
जास्त तापमान असल्यास कोंबड्या खाद्य कमी खातात. त्यामुळे आवश्यक ऊर्जा मिळत नाही. अशा वेळेस खाद्यामध्ये तेलाचा वापर करू शकतो, यामुळे खाद्याची क्षमता वाढून कोंबड्यांना आवश्यक ऊर्जा मिळते.
प्रथिने
- उच्च तापमान असल्यास कोंबड्या खाद्य कमी खातात.परिणामतः विविध पोषक घटक (अमिनो आम्ल, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वे) शरीरात कमी प्रमाणात जातात. जेव्हा त्यांची मात्रा कमी पातळीवर पोहोचते, तेव्हा उत्पादनावर परिणाम दिसून येतो.
- अत्यंत जास्त तापमान असल्यास आहारात प्रथिनांची मात्रा कमी करणे आवश्यक ठरते. प्रथिनांमुळे निर्माण होणारी ऊर्जा ही कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थांपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेपेक्षा जास्त असते.
- कोंबड्यांना जास्त प्रमाणात ऊर्जा (उष्मा) बाहेर उत्सर्जित करावी लागते, यामुळे हीट स्ट्रोकचा धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यापेक्षा अत्यावश्यक अमिनो आम्लाची (लाइसिन आणि मिथिओनिन) योग्य मात्रा राखणे नेहमी फायदेशीर ठरते.
फॅट
- फॅट किंवा तेलापासून निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाण हे कर्बोदके आणि प्रथिनांमधून तयार होणाऱ्या उष्णेतेपेक्षा कमी असते.
- खाद्यामध्ये फॅटचा वापर योग्य प्रमाणात केला असता इतर खाद्य घटकांची ऊर्जा वाढून शरीराला मदत होते.
जीवनसत्त्वे
- कोंबड्यांमध्ये उष्णतेचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने, खाद्यामध्ये जीवनसत्त्व क, ई आणि अ चा वापर सामान्यपणे केला जातो. साधारणतः कोंबड्या जीवनसत्त्व-क चे संश्लेषण करू शकतात, परंतु कमी किंवा जास्त पर्यावरणीय तापमान, जास्त आर्द्रता, जास्त उत्पादनाचे प्रमाण आणि परजीवी यामुळे योग्य ती मात्रा निर्माण होऊ शकत नाही.
- जीवनसत्त्व क आणि ई आहार पूरक, विशेषतः संयुक्तरीत्या दिले असता, कोंबड्यांची उत्पादन क्षमता, अंड्यांची गुणवत्ता सुधारते. तसेच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होऊन निर्माण होणाऱ्या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी होते.
- जीवनसत्त्व ई : व्हिटलॉजेनीनचे (रक्तामधील एक प्रोटीन, ज्यापासून अंड्यातील बलक तयार होतो) प्रमाण रक्तामध्ये वाढवून अंडी उत्पादनावर चांगला परिणाम होतो.
क, ई आणि अ चा संबंध
- जीवनसत्त्व ई : ‘अ’चे शोषण शरीरात चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते. ऑक्सिडेटिव्ह ब्रेकडाउन होत नाही. त्यामुळे योग्य त्या प्रमाणात पेशींना ऊर्जा मिळते.
- जीवनसत्त्व क : ‘ई’च्या अँटिऑक्सिडेंट गुणधर्मात वाढ होते, फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी होते.
ॲसिड बेस बॅलेन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स
- उष्णतेमुळे शरीरातील ॲसिड बेस बॅलेन्स बिघडतो. यामुळे “रेस्पिरेटरी अल्कलॉसिस” अवस्था निर्माण होते.
- श्वसनाची गती वाढल्यामुळे जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायू शरीराबाहेर उत्सर्जित केला जातो. परिणामी, बाइकार्बोनेट आयन्सची मात्रा रक्तामध्ये वाढून सामू वाढतो.
- यासाठी आपण सोडिअम बायकार्बोनेट, पोटॅशिअम क्लोराइड कॅल्शिअम क्लोराइड आणि अमोनिअम क्लोराइड इलेक्ट्रोलाइट्स वापरू शकतो.
बीटेन (नैसर्गिक)
- बीटेन एक ओस्मोलाईट म्हणून काम करते. यामुळे तणावग्रस्त परिस्थितीत कोंबड्यांना पाणी आणि आयन्सचे संतुलन टिकवून ठेवता येते.
- तापमान वाढले असता शरीराचे व परिणामी पेशींचे निर्जलीकरण म्हणजेच डीहायड्रेशन होते. बीटेन स्नायूंच्या पेशींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढवते. सदर पेशींद्वारे प्रथिनांचे जास्त प्रमाणात संश्लेषण केले जाते.
खनिजे
खाद्य सेवन कमी झाल्यामुळे शरीरात कॅल्शिअमची मात्रा खालावते. याचा परिणाम अंड्यांच्या वजनावर आणि कवचाच्या गुणवत्तेवर होतो.
शेडचे व्यवस्थापन
- शेडची बांधणी पूर्व-पश्चिम करावी.
- स्वच्छ व निर्जंतुक पाणी उपलब्ध करून द्यावे. स्प्रिंकलर्स आणि फॉगर्सचा वापर करावा.
- तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. फॅन व कूलर्सची संख्या वाढवावी.
- आतील व बाहेरील तापमानात ५ ते १० अंश सेल्सिअसचा फरक असावा.
- कोंबड्यांची गर्दी कमी करावी.
- लिटरची जाडी ६ सेंमीने कमी करणे.
- तापमान व आर्द्रतेवर नियंत्रण ठेवणे.
- डॉ.अक्षय वानखडे, ८६५७५८०१७९
(लेखक पशू पोषण तज्ज्ञ आहेत)
- 1 of 36
- ››