कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे नियंत्रण
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे नियंत्रण

कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे नियंत्रण

एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्याचा वापर शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळवणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची शेतातील संख्या मर्यादेत ठेवणे असा दुहेरी फायदेशीर ठरू शकतो.

पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मशागत, कीड प्रतिकारक वाणाचा वापर यासह यांत्रिक, भौतिक, जैविक पद्धतींचा संयुक्तिक वापर केला जातो. किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न असतो. कीडनाशकांचा मर्यादित आणि अचूक वापर केल्यास पिकांचे नुकसान टाळण्यासोबतच वातावरणाचा समतोल राखता येतो. एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये कामगंध सापळ्याचा वापर शत्रू किडींच्या आगमनाचे वेळीच संकेत मिळवणे आणि नर पतंगाचा नायनाट करून किडींची शेतातील संख्या मर्यादेत ठेवणे असा दुहेरी फायदेशीर ठरू शकतो. कपाशी पिकामध्ये ठिपकेदार, अमेरिकन आणि गुलाबी बोंड अळी अशा विविध बोंड अळ्यांमुळे पूर्वी ५०-५५ टक्क्यांपर्यंत नुकसान होत असे. बीटी वाणांच्या आगमनाने यात काहीशी सुधारणा झाली असली, तरी अळ्यांनी बीटी प्रथिनांविषयी प्रतिकारकता विकसित केल्याने पुन्हा प्रादुर्भाव वाढत आहे. कामगंध सापळा म्हणजे काय?

  • पतंगवर्गीय कीटकामध्ये (Lepidoptera) मादी आणि नर यांचे मिलन होण्यासाठी एका विशिष्ठ प्रकारच्या गंध सोडला जातो. काही कीटकांच्या प्रजातींमध्ये नराद्वारे सोडलेल्या गंधाकडे स्वजातीय मादी आकर्षित होते. तर काहींमध्ये मादी नराला आकर्षून घेण्यासाठी आपल्या शरीरातून गंध सोडते. अशा गंधामुळे विजातीय पतंग आकर्षिले जातात.
  • कापसावरील बोंड अळ्यांचा मादी पतंग विशिष्ठ प्रकारचा गंध आपल्या शरीराद्वारे सोडतात. नर पतंग त्याकडे आकर्षिले जातात. असे गंध कृत्रिमरीत्या तयार करून गोळ्यांच्या स्वरूपामध्ये सापळ्यामध्ये वापरले जातात. या गोळ्यांना ल्यूर अथवा सेप्टा म्हणतात. त्या प्लॅस्टिकच्या सापळ्याला कामगंध सापळे म्हणतात.
  • या गोळ्यांवरील कामगंध हवेत संप्लवन होऊन मिसळतो.
  • कामगंध हे प्रजातीनिहाय विशिष्ठ प्रकारचे असून, प्रत्येक बोंड अळीसाठी वेगळ्या प्रकारचा कामगंध असतो.
  • जगातील कीटकांच्या जवळपास १०० पेक्षा अधिक प्रजातींमधील कामगंधाच्या माहितीची नोंद आहे. त्यात भारतातील पिकावर आढळणाऱ्या २० आणि साठवणीच्या धान्यावर येणाऱ्या ७ प्रजातींचा समावेश आहे.
  • कापसावरील बोंड अळीसाठी विशिष्ट कामगंध ल्यूर ः

  • पतंग - कामगंध ल्यूर
  • अमेरिकन बोंड अळी - हेलील्यूर
  • ठिपकेदार बोंड अळी - इरव्हिट ल्यूर
  • शेंदरी बोंड अळी - पेक्टिनो ल्यूर
  • अन्य अळ्यांसाठी ल्यूर
  • तंबाखूवरील अळीसाठी - स्पोडोल्यूर
  • पाने गुंडाळणाऱ्या अळीसाठी - ईरिन ल्यूर
  • कामगंध सापळा व त्याचे प्रमाण ः

  • सापळ्याच्या वरील भागाला छप्पर असून, तिथे ल्यूर बसविण्यासाठी जागा असते.
  • त्याखाली पतंग आत येण्यासाठी काही मोकळी जागा सोडून एक कडे असते. त्यावर प्लॅस्टिक पिशवी बसवलेली असते.
  • हा सापळ्याच्या छप्पर पिकाच्या उंचीपेक्षा एक ते दोन फूट उंचावर राहील अशा प्रकारे काठीला बांधावे.
  • पिशवीचा खालचा भाग बंद करून काठीला बांधावा.
  • मोठ्या प्रमाणावर कीड पकडण्यासाठी हेक्टरी १० सापळे किडीनिहाय बसवावेत. किडींच्या आगमनाचे संकेत मिळण्यासाठी २ हेक्टर क्षेत्रास एक सापळा पुरेसा होतो.
  • कामगंध ल्यूरची संयुगे वातावरणात मिसळत राहतात. त्यांचा परिणाम साधारणपणे एक महिनाभर टिकतो. ल्यूरच्या पॅकेटवर सांगितलेल्या काळानंतर ल्यूर बदलून नवी लावावी.
  • सापळ्याच्या पिशवीत अडकलेले पतंग ठराविक कालमर्यादेत काढून टाकावेत. त्या पिशव्या रिकाम्या कराव्यात.
  • किडीचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक दिसल्यास कीटकनाशकाचा वापर करावा. कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी सापळे काढून ठेवावेत. नंतर पुन्हा कामगंध सापळे लावावेत.
  • फायदे :

  • किडीच्या आगमनाचे संकेत त्वरित मिळतात. त्यानुसार व्यवस्थापनाची दिशा निश्चित करता येते.
  • किडींची आर्थिक नुकसानीची पातळी निश्चित करता येते. उदा. अमेरिकन बोंड अळीचे ८ ते ९ पतंग प्रति सापळा सतत ५ ते ६ दिवस आढळणे.
  • कीड नियंत्रणासाठी वापर केल्यास रासायनिक कीटकनाशके आणि मजुरीचा खर्च कमी होतो.
  • किडींची संख्या कमी असतानाच सापळ्याद्वारे पिकाचे संभाव्य नुकसान टाळता येते.
  • सापळे बिनविषारी असल्यामुळे वातावरणाचे प्रदूषण होत नाही.
  • परोपजीवी किडी सुरक्षित राहतात.
  • सापळ्यांचा वापर अत्यंत सुलभ व सोपा आहे.
  • -डॉ .पी .आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक ), ७५८८१५१२४४ -योगेश मात्रे (पी.एचडी. विद्यार्थी), ७३८७५२१९५७ (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com