मत्स्यपालन, काथ्या उद्योग, कृषी पर्यटन उद्यमशील गाव हडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने बागायतीसह मत्स्यपालन, काथ्या उद्योग व कृषी पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. त्यातून तरुण व महिलांना स्थानिक रोजगार उपलब्ध झाला.
 raising fish seeds in bay traps.
raising fish seeds in bay traps.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हडी (ता. मालवण) गावाने बागायतीसह मत्स्यपालन, काथ्या उद्योग व कृषी पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात चालना दिली. त्यातून तरुण व महिलांना स्थानिक रोजगार उपलब्ध झाला असून गावाची आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण-आचरा मार्गावर मालवण शहरापासून अवघ्या आठ किलोमीटरवर आणि कालावल खाडीच्या कवेत वसलेले हडी गाव जैवविविधतेने समृद्ध आहे. गावात १५ वाड्या असून, लोकसंख्या दोन हजारांच्या सुमारास आहे. पारंपरिक पद्धतीने गाव भातशेती करायचे. पण आर्थिक सक्षमतेसाठी ग्रामस्थांचा आंबा, काजू, नारळ आदी पिकांकडे कल वाढला. त्याखालील क्षेत्र झपाट्याने वाढले. याच वेळी गावातील तरुणाई रोजगाराच्या नव्या वाटा शोधत होती. संकटात शोधली संधी गावाला सहा किलोमीटर लांबीची खाडी लाभली आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या गडनदीचे बांदीवडेच्या पुढे खाडीत रूपांतर झाले. कांदळवन क्षेत्र तयार झाले. बंधारे ओलांडून खाडीतील खारे पाणी शेतजमिनीत घुसू लागले. शेकडो एकर जमीन क्षारपड होऊ लागली. भातशेती, बागायती वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न शेतकरी करीत होते. परंतु संकट थांबत नव्हते. गावातील काही तरुणांनी पुढे येत क्षारपड जमिनीत मत्स्यपालन करण्याचा विचार मांडला. तेवढ्यावर न थांबता दोघांनी तमिळनाडू येथे जाऊन मत्स्यपालनाचे प्रशिक्षण घेतले. त्यातून गावात कोळंबी प्रकल्पाला सुरुवात केली. मात्र तांत्रिक समस्यांमुळे शेतकरी काहीसे आर्थिक अडचणीत आले. कांदळवन संरक्षण काही वर्षांनी संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमांतर्गत (यूएनडीपी) कांदळवन संरक्षित करण्याच्या प्रकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड झाली. काही गावांनी विरोध केला. परंतु हडी गावाने तो राबविण्याची मागणी केली. त्यानुसार राज्य शासनाच्या साह्याने कामास सुरुवात झाली. प्रकल्पांतर्गत माशांच्या स्थानिक प्रजाती पालनाचा विचार पुढे आला. आर्थिक साह्याची तयारी दर्शविली. कांदळवन संरक्षण उपजीविका योजना असे नामकरण झाले. खाडीच्या पाण्यात सापळ्यात मत्स्यबीज सोडून वाढ करण्याचे प्रशिक्षण गावातील काही तरुणांना देण्यात आले. सापळे, मत्स्यबीज, खाद्य पुरविण्यात आले. हळूहळू चांगला रोजगार निर्माण होऊ लागला. काथ्या उद्योगांची उभारणी शासनाच्या चांदा ते बांदा योजनेअंतर्गत गावात भाग्यश्री महिला काथ्या उद्योगाची उभारणी झाली आहे. त्यास ग्रामपंचायतीने २० गुंठे जमीन दिली आहे. संस्थेमार्फत काथ्या पुरवून गरजेनुसार वस्तू बनवून घेतल्या जातात. गावातील कित्येक टन सोडण विनावापर वाया जात होती. प्रकल्पामुळे त्यास चांगली किंमत मिळत आहे. कृषी पर्यटनाला चालना मालवण शहरात वर्षाला किमान पाच लाखांपर्यंत पर्यटक येत असावेत. हडी गावाने देखील कृषी पर्यटनाला चालना दिली. विविध प्रकारचे पक्षी, माशांच्या जाती पर्यटकांना दाखवून त्याचे महत्त्व सांगितले जाते. हडी गाव दृष्टिक्षेपात

  • भौगोलिक क्षेत्र- ८७४ एकर
  • आंबा बाग क्षेत्र- २८७ एकर, उलाढाल सुमारे अडीच कोटी.
  • नारळ- ११० एकर, उलाढाल-१ कोटी,
  • काजू- ५२ एकर
  • सौरऊर्जा युनिटद्वारे ग्रामपंचायतीला वीजपुरवठा.
  • ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार-
  • आर. आर. पाटील सुंदर गाव, स्मार्ट व्हिलेज, तंटामुक्त गाव- जिल्हास्तरावर प्रथम.
  • उद्यमशील बाबी

  • मत्स्यपालन युनिट्स- ८०. प्रति युनिट- एक लाख रुपयांपर्यंत उलाढाल
  • कोळंबी प्रकल्प युनिट्स- दोन- (पाच एकरांत) उत्पादन ५० टन
  • एकूण मत्स्योत्पादन-५७ टन, प्रति किलो सरासरी दर २०० रु.
  • मत्स्यपालन- उलाढाल-१ कोटी १४ लाख रु.
  • केरळ, कर्नाटक राज्यातून मत्स्यबीज आणून डिसेंबर ते जानेवारीत सापळ्यांत सोडले जाते.
  • तांबोशी, गुंजी, काळुंदर, शिनाले, जिताडा, कालव, खेकडा आदींचे पालन.
  • सात महिन्यांत ७०० ते ८०० ग्रॅम वजनाचा मासा तयार होतो.
  • गोव्यातील व्यापाऱ्यांकडून गावात येऊन प्रतिकिलो ३०० ते ३५० रुपये दराने खरेदी.
  • काथ्या उद्योग रोजगार- थेट- ६ महिला, ४ पुरुष
  • हडी, वायंगणी आणि कांदळवन- तीन गावांतील ७५ हून अधिक महिलांना घरीच रोजगार
  • काथ्या उद्योगातून २० लाखांपर्यंत, तर पर्यटन व्यवसायातून दहा लाखांची उलाढाल
  • नारळाच्या टाकाऊ सोडणाला उसापेक्षा दर हडी गावात नारळ झाडांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत असावी. नारळ काढल्यानंतर त्याचे सोडण फेकून दिले जायचे. परंतु काथ्या उद्योगामुळे त्यास उसापेक्षाही जास्त म्हणजे प्रति टन तीन हजार रुपये दर मिळू लागला. दर उसापेक्षा अधिक आहे. जैवविविधता केंद्र गावात १०१ प्रकारचे रंगीबेरंगी, दुर्मीळ पक्षी आढळून आले आहेत. त्यांची छायाचित्रे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गावात लावली आहेत. यात लालचकोत्री, सोनपाठी सुतार, तांबट, बदामी डोक्याचा राघू, पोपट, चातक, पावशा, निळकंठ, वेडा, मोर, सोनकपाळी पर्णपक्षी, टकाचोर अशी विविधता आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्याचे ‘बुकलेट’ तयार केले आहे. प्रतिक्रिया पर्यावरणाला धक्का न लावता गावाचा विकास करण्याचा निर्धार केला. विविध प्रकल्पांद्वारे गावातच रोजगार निर्माण व्हावा यादृष्टीने विविध संकल्पना राबविल्या. त्यातून गावाची आर्थिक उलाढाल वाढली आहे. - महेश मांजरेकर, सरपंच ८७६६४७१६०० भाग्यश्री महिला उद्योगातून आम्हाला काथ्या पुरविला जातो. घरातील काम सांभाळून चार तास देऊन दोरी, पायपुसणी बनवून संस्थेला पुरवतो. कोणतीही गुंतवणूक न करता त्यातून महिन्याला उत्पन्न सुरू झाले आहे. - वेंदाती साळकर खाडीतील मत्स्यपालनातून सात महिन्यांत अडीच लाख रुपये उत्पन्न मिळते. प्रतिकिलो तीनशे ते साडे तीनशे रुपये दराने मासे विकले जातात. - प्रवीण मांजरेकर, ९३०९५६९६८१ चांदा ते बांदा योजनेअंतर्गत काथ्या उद्योगाची उभारणी झाली. जिल्ह्याचे मुख्य समन्वयक राजेश कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील चारही युनिट्‍सचे काम चालते. प्रकल्पाची उलाढाल २० लाखांच्या जवळपास आहे. जितेंद्र वजराठकर, प्रकल्प समन्वयक, ७५८८६२७००५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com