वनशेतीद्वारे चारा व्यवस्थापन

कुरणामध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडवण्यासाठी कंटूर चर, बांध आणि सऱ्या केल्यामुळे गवतांची वाढ होण्यास मदत होते. कुरणाच्या एकूण क्षेत्रापैकी १५ ते २० टक्के क्षेत्रावर चारा वृक्षांची लागवड केल्यास जमिनीची सुपीकता, सूक्ष्म वातावरण बदल, चारा उपलब्धता, जळाऊ लाकूड आणि पक्ष्यांना निवारा मिळतो.
Lucerne and maize intercrops for fodder in bamboo plantations.
Lucerne and maize intercrops for fodder in bamboo plantations.

कुरणामध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडवण्यासाठी कंटूर चर, बांध आणि सऱ्या केल्यामुळे गवतांची वाढ होण्यास मदत होते. कुरणाच्या एकूण क्षेत्रापैकी १५ ते २० टक्के क्षेत्रावर चारा वृक्षांची लागवड केल्यास जमिनीची सुपीकता, सूक्ष्म वातावरण बदल, चारा उपलब्धता, जळाऊ लाकूड आणि पक्ष्यांना निवारा मिळतो. मारवेल 

  • हे बहुवर्षीय, खोल मूळ प्रणाली असणारी गवत प्रजाती आहे. या चाऱ्यामध्ये ७ ते ८ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.  हे गवत गायरान, चराईसाठी तसेच कापून जनावरांना देण्यासाठी, वाळवलेले गवत आणि मुरघास तयार करण्यासाठी वापरतात. 
  • चाऱ्याची गुणवत्ता खालावलेल्या कुरणांच्या पुनरुत्पादनासाठी हे गवत अत्यंत चांगले आहे.
  • भारतामध्ये मारवेलच्या डायकांथियम अ‍ॅन्युलाटम व डायकांथियम कॅरीकोसम या प्रजाती मोठ्या प्रमाणात चारा उत्पादनासाठी वापरतात. 
  • हे चारा पीक ३०० ते १५०० मिमी पावसाच्या प्रदेशात लागवडीस योग्य आहे. विविध प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करता येते, परंतु काळ्या जमिनीत जोमाने वाढते. क्षारपड जमिनीतही लागवड करता येते. मात्र आम्लयुक्त जमिनीत लागवडीस योग्य नाही.
  • पिकाची  दुष्काळ सहन करण्याची जास्त क्षमता असून मुरमाड, पडीक जमिनीमध्ये लागवड शक्य. 
  • जाती : फुले मारवेल-६-४०, फुले गोवर्धन, जेएचडी-२०१३, मारवेल-८, मारवेल ९-४ 
  • पहिल्या पावसाच्या सरीनंतर जूनमध्ये चांगल्या प्रकारे तयार केलेल्या जमिनीमध्ये हेक्टरी ४ ते ६ किलो बियाणे ओळीमध्ये पेरले जाते. या शिवाय ४० ते ४५ दिवसांची रूट ट्रेनर मध्ये बनवलेली रोपे किंवा रूट स्लीप्स (मूळ गड्डे) ६० सेंमी × ४० सेंमी किंवा ९० सेंमी × ४५ सेंमी अंतरावर लागवड करावी. कुरण किंवा गायरानामध्ये छोटे खड्डे करून बियाणे २ ते ३ सेंमी खोल लावावे. पेरणीच्या ३० ते ४५ दिवसांनंतर खुरपणी करावी. वानिकीकुरण पद्धतीमध्ये मारवेल लागवड करता येते.  
  • पूर्व मशागतीवेळी पुरेसे शेणखत मिसळून नांगरट करावी. त्यानंतर  पेरणीच्या वेळी २० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद प्रती हेक्टरी द्यावे. तसेच प्रती वर्षी पावसाळ्यामध्ये २० किलो नत्र आणि २० किलो स्फुरदची मात्रा द्यावी. 
  • चराऊ कुरणांमध्ये पाण्याची विशेष गरज पडत  नाही. परंतु महिन्यातून एक तरी पाण्याची पाळी द्यावी जेणेकरून वर्षभर हिरवा चारा मिळू शकतो. 
  • लागवडीनंतर ६० व्या दिवशी पहिली कापणी जमिनीपासून १० सेंमी उंचीवर करावी. जिरायती क्षेत्रामध्ये दोन कापण्या सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात कराव्यात. सुमारे २० ते २५ टन हिरवा चारा मिळतो. शाश्वत सिंचनाची सोय असल्यास ५ ते ७ कापण्या होतात. प्रति हेक्टरी सुमारे ६० ते ७० टन हिरवा चारा मिळतो. 
  • लुसर्न

  • या चारा पिकास मेथी घास म्हणून ओळखले जाते. पीक  द्विदल वर्गीय असून, नत्र स्थिरीकरण करते. दुष्काळ सहनशीलता, बहुवार्षिक (३-४ वर्ष), सतत उत्पादनक्षम व खोल मूळ प्रणालीमुळे कमी पाणी क्षेत्रामध्ये लागवडीस उपयोगी आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये १८ टक्के प्रथिने, २५ ते ३५ टक्के तंतुमय पदार्थ आणि ७० टक्के पचन क्षमता असते.  
  • विविध प्रकारच्या जमिनीमध्ये लागवड करता येते. ६ ते ७ सामू असणाऱ्या, पाण्याचा निचरा व्यवस्थित होणाऱ्या व सुपीक असलेल्या जमिनीत जोमदार वाढ होते. क्षार जास्त असलेल्या जमिनीत वाढ होत नाही.   
  • जाती : सिरसा-९, आनंद, सीओ-१,  आयजीएफआरआय-एस-२४४ (चेतक) आणि  क्षारपड जमिनीमध्ये टी-१ आणि आरएल- ८८. 
  • ऑक्टोबर महिन्यापासून जानेवारीपर्यंत कधीही पेरणी केली जाऊ शकते. प्रती हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे पुरेसे असते. पेरणी उशिरा केल्यास २५ किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्व २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन बियाणे विस्कटावे आणि त्यावरून कुळवाची पास काढून बियाणे मातीखाली झाकण्यासाठी फिरवावे. बियाणे १ सेंमी पर्यंतच खोल जाईल याची काळजी घ्यावी. देशी नांगर किंवा पेरणी यंत्राने देखील ३० सेंमी ओळीमध्ये पेरणी करू शकतो. पेरणीपूर्व सिंचन देऊन पेरणी केल्यास उगवण जोमाने होते. 
  • बागायती क्षेत्रामध्ये डाळिंब, सीताफळ, शेवगा व बांबू यामध्ये आंतरपीक म्हणून घेता येते.  
  • लागवडीपूर्वी पुरेसे शेणखत द्यावे. पेरणीच्या वेळी २०-२५ किलो नत्र, १०० किलो स्फुरद व ४० किलो पालाश हेक्टरी द्यावे. त्यानंतर दर वर्षी ८० किलो स्फुरद आणि ४० किलो पालशची हेक्टरी मात्रा द्यावी. पेरणीनंतर पहिल्या महिन्यामध्ये चांगल्या वाढीसाठी कमीत कमी ७ दिवसांच्या अंतराने सतत पाणी द्यावे. नंतर हिवाळ्यामध्ये १५-१८ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यामध्ये १०-१२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. तुषार सिंचनाचा वापर करावा. 
  • पहिली कापणी सरासरी ५०-६० दिवसांनी जमिनीपासून १५ सेंमी उंचीवर करावी. त्यानंतरची कापणी ३०-४० दिवसांनी पीक ५०-५५ सेंमी उंचीचे झाल्यावर द्यावी. एका वर्षात सुमारे ८०-१०० टन हिरवा चारा ६ ते ८ कापण्यांमध्ये चार वर्षांपर्यंत मिळतो. 
  • नैसर्गिक कुरणांचे व्यवस्थापन  नैसर्गिक गवताळ प्रदेश व चराऊ कुरण ही एक जैव-विविधतेने परिपूर्ण अशी परिस्थिकी आहे. भारतातील एकूण भौगोलिक क्षेत्राच्या जवळजवळ २४ टक्के क्षेत्र हे  गवताळ प्रदेश व चरावू कुरणांनी व्यापलेले आहे. परंतु यामध्ये घट होत आहे. यामध्ये अमर्याद शहरीकरण, चराईचे अतिरेकीकरण, खराब व्यवस्थापन, जंगलतोड,  अतिक्रमण, वणवा आणि गायरान व कुरण क्षेत्राचे शेतीमध्ये रूपांतर इ. कारणे आहेत. उर्वरित चराऊ जमिनी एकतर खराब झाल्या आहेत किंवा त्यांची उत्पादन क्षमता १ एसीयू/हे. (वयस्क गोवंश एकक) पेक्षाही कमी झाली आहे. यामुळेच या कुरणाच्या पुनरुज्जीवनासाठी खालील बाबींना योग्यरीत्या अवलंबले पाहिजे.

  • तण व झुडपांचे निर्मूलन  ः यामध्ये खुरपणी, खणून, जाळून आणि तणनाशकांचा वापर करून नको असलेल्या प्रजातींना कमी करावे लागेल. गवताळ प्रदेशात घाणेरी, रानमोडी, गाजर गवत, प्रोसोपीस आणि इतर परकीय प्रजातींची वाढ झाली आहे. या प्रजातींचे निर्मूलन करावे. 
  • चरण्यापासून संरक्षण : चराऊ कुरणांना सजीव किंवा तारेच्या कुंपण घालून अतिक्रमण कमी केल्यास उपयोगी गवताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. सजीव कुंपणामध्ये करवंद, मेहंदी, कोरफड, निवडुंग व बोर अशी झाडे चर काढून लावावीत. 
  • मृदा आणि जलसंधारण : कुरणामध्ये ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडवण्यासाठी कंटूर चर, बांध आणि सऱ्या केल्यामुळे गवतांची वाढ होण्यास मदत होते. 
  • नियंत्रित चराई आणि कापणी : कुरणांच्या क्षमतेप्रमाणे चराई करण्यास मान्यता देणे किंवा कापून चारा घेऊन जावा.
  • खतांची मात्रा : गवताच्या वाढीस उपयुक्त असणाऱ्या पोषक घटकांचे प्रमाण योग्य ठेवल्यास उत्पादकता वाढण्यास मदत होते. हेक्टरी ४० किलो नत्र आणि २० किलो स्फुरदाची मात्रा पावसाळ्यामध्ये दिल्यास नैसर्गिक कुरणांची उत्पादकता ३० टक्के व प्रथिनांचे प्रमाण ७ पासून १५ टक्क्यांपर्यंत वाढले जाते. 
  • सुधारित जाती व द्विदल वर्गीय प्रजातींचा वापर : जास्त उत्पादकता, पोषक घटकांचे प्रमाण व कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता असलेल्या सुधारित जातींचा वापर करावा. गवत वर्गीय कुरणामध्ये द्विदल वर्गीय प्रजातींचा जसे की स्टायलोची लागवड केल्यास ३ ते ४ पटींनी उत्पादकता वाढण्याबरोबरच नत्राचे स्थिरीकरण होते. अंजन गवत आणि स्टायलो हे मिश्रण एकत्रित केल्यास कुरणांचे पुनरर्ज्जीवन होते.
  • चारा वृक्षांची लागवड : कुरणाच्या एकूण क्षेत्रापैकी १५ ते २० टक्के क्षेत्रावर चारा वृक्षांची लागवड केल्यास जमिनीची सुपीकता, सूक्ष्म वातावरण बदल, चाऱ्या उपलब्धता, जळाऊ लाकूड, प्राणी आणि पक्षांना निवारा मिळतो. चारा वृक्षांमध्ये बाभूळ, कडुनिंब, हादगा, बोर, शेवरी, वड, पिंपळ, पिंपरन आणि निंबारा या वृक्षांची लागवड करता येते.
  • - संग्राम चव्हाण,  ९८८९०३८८८७  (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि.पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com