नवीन बाग लागवडीचे नियोजन

एकदा लागवड झाली, की पुढील १२ ते १४ वर्षे वेल त्याच ठिकाणी राहून आपल्याला उत्पादन देणार आहे. भविष्यात उत्पादनाचा दर्जा आणि होणारा खर्च या बाबी लागवडीवेळी घेतलेल्या निर्णयानुसार ठरतात. आपली जमीन, वळण पद्धती, ज्या उद्देशासाठी द्राक्ष घेणार आहोत, त्यानुसार योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.
grapes advisory
grapes advisory

एकदा लागवड झाली, की पुढील १२ ते १४ वर्षे वेल त्याच ठिकाणी राहून आपल्याला उत्पादन देणार आहे. भविष्यात उत्पादनाचा दर्जा आणि होणारा खर्च या बाबी लागवडीवेळी घेतलेल्या निर्णयानुसार ठरतात. आपली जमीन, वळण पद्धती, ज्या उद्देशासाठी द्राक्ष घेणार आहोत, त्यानुसार योग्य ते नियोजन करणे आवश्यक आहे.  नवीन द्राक्ष लागवड करण्यासाठी सध्याचा कालावधी फार महत्त्वाचा आहे. बागेसाठी जमिनीच्या निवडीपासून योग्य त्या सुधारणा आताच करून घ्याव्यात. एकदा द्राक्ष लागवड झाली, की १२ ते १४ वर्षे ही वेल त्याच ठिकाणी असते. त्यामुळे सुरुवातीस केलेले नियोजन भविष्यात फायद्याचे ठरेल.  जमिनीची निवड  द्राक्ष लागवडीकरिता जमिनीची निवड ही उत्तम दर्जाची द्राक्षे व उत्पादन खर्चात बचत साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. या वेळी घेतलेल्या एका निर्णयामुळे पुढील काळात अडचणी कमी होतात. प्रथम माती व पाणी परीक्षण करून घ्यावे. 

  • हलकी ते मध्यम प्रकारची व पाण्याचा निचरा होणारी जमीन द्राक्ष लागवडीसाठी फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू जर सातपर्यंत असल्यास त्यात फारशा अडचणी येत नाहीत. 
  • ज्या जमिनीचा सामू सात व त्यापेक्षा अधिक आहे, अशा जमिनीला सलाईन (अल्कलीयुक्त) म्हणतात. या जमिनीत अनेक वेळा चुनखडी जास्त असून, तेथील उपलब्ध पाण्यात क्षारांचे प्रमाणही अधिक दिसते. अशा प्रकारच्या जमिनीचे नियोजन आधी करून घेणे आवश्यक असते. ज्या जमिनीत फक्त चुनखडीचे प्रमाण जास्त आहेत, अशा जमिनीचे नियोजन करण्यासाठी सल्फरचा (गंधक) वापर करण्याची शिफारस आहे. माती परीक्षणाच्या अहवालानुसार आपण द्राक्ष लागवड करणार असलेल्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण किती टक्के आहे, हे पाहावे. त्यानुसार सल्फरचे प्रति एकरी प्रमाण ठरवले जाते. 
  • जर पाण्यामध्ये क्षार असलेल्या स्थितीमध्ये जिप्समचा वापर करता येतो. जिथे जमिनीत चुनखडी व पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक आहे, अशा ठिकाणी फक्त सल्फरचा वापर करण्याची शिफारस असते. 
  • लागवडीची दिशा  द्राक्ष पीक हे बहुवर्षीय असल्याने सुरुवातीस घेतलेला निर्णय हा चांगल्या उत्पादनासाठी कारणीभूत ठरतो. यामध्ये लागवडीची दिशा महत्त्वाची ठरते. द्राक्षघडाच्या विकासामध्ये सूर्यप्रकाशाचे महत्त्व अधिक आहे. सूर्यप्रकाशापासून मिळालेल्या किरणांचा वापर करून प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून द्राक्ष वेल ही अन्नद्रव्यांचा साठा निर्माण करते. त्यातून घडाचा विकास होतो. दिवसभरातून दुपारपर्यंत व त्यानंतरसुद्धा एकसारखा सूर्यप्रकाश मिळावा, या उद्देशाने `वाय` किंवा `विस्तारित वाय` पद्धतीचा वापर करणार असल्यास लागवडीची दिशा ही उत्तर दक्षिण असणे गरजेचे असते. तर या तुलनेमध्ये मांडव पद्धतीच्या बागेत पुढील काळात पसरट कॅनॉपी असल्यामुळे दिवसभरातील सूर्यप्रकाश एकसारखा तीव्रतेने मिळेल. म्हणूनच या वळण पद्धतीतील बागेत लागवडीची दिशा महत्त्वाची नसते.  चारी घेणे  द्राक्ष लागवड करण्याकरिता आधी खुंट रोपाची लागवड केली जाते. खुंट रोपाची मुळे जवळपास पाच फूट खोलीपर्यंत जातात. त्यांच्या मुळांच्या विस्ताराकरिता मोकळे वातावरण मिळणे गरजेचे असते. बऱ्याच बागेत जमीन काही ठिकाणी कडक असेल, तर काही ठिकाणी मोकळी असेल, अशा परिस्थितीमध्ये खुंटरोपांची मुळे संपूर्ण बागेत कार्य करणार नाहीत. यासाठी खुंट लागवडीकरिता चारी घेणे महत्त्वाचे असते. ही चारी जवळपास अडीच फूट रुंद व तितकीच खोल असावी. लांबीची लांबी २०० ते २५० फुटांपर्यंत असावी. चारी घेतेवेळी सुरुवातीच्या एक ते सव्वा फूट थरातील माती चारीच्या एका बाजूस टाकावी. त्याखालील थरातील माती चारीच्या दुसऱ्या बाजूस टाकावी. ही चारी उघडल्यानंतर पंधरा दिवसापर्यंत सूर्यप्रकाशात तापू द्यावी. चारी भरतेवेळी वरच्या थरातील माती चारीच्या तळात जाऊ द्यावी. त्यानंतर खालच्या तळातील माती वर टाकून अशा प्रकारे पसरावी. की त्यात अर्धा फूट जागा मोकळी राहील. असे केल्यास खालील थरात उपलब्ध सुपीक मातीचा वापर या वेळी करता येईल. त्यानंतर अर्धा फूट शिल्लक चारीमध्ये काडीकचरा, उसाचे पाचट किंवा बगॅस थोडेफार टाकावे. त्यावर प्रत्येक तीन फुटांत एक घमेले शेणखत टाकून त्यावर मातीच्या परीक्षणाच्या अहवालानुसार शिफारस केलेली खते द्यावीत. (उदा. युरिया, डीएपी, फेरस, मॅग्नेशिअम) त्यावर माती झाकून घ्यावी. यानंतर या चारीमध्ये पुरेसे पाणी द्यावे. असे केल्यास माती चांगल्या प्रकारे बसेल. पुन्हा बाजूला उरलेली माती त्यात टाकून सपाट करून घ्यावी. लागवडीच्या दोन दिवस आधीच चारी पूर्णपणे भिजवून घेतल्यास लागवड करतेवेळी जमीन वाफसा परिस्थितीत येईल.   लागवडीचे अंतर  आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनी असल्याने लागवडीचे अंतरही त्यानुसार बदलेल. त्या सोबत द्राक्ष लागवडीचा उद्देश (खाण्यासाठी, मद्य निर्मिती इ.), वेलीच्या वाढीचा जोम इ. वर अवलंबून असेल. 

  • भारी जमिनीत वेलीच्या वाढीचा जोम जास्त असल्यामुळे साधारणपणे दोन ओळीतील अंतर दहा फूट व दोन वेलींतील अंतर सहा फूट असावे. यापेक्षा कमी अंतर असल्यास कॅनॉपीची गर्दी होऊन घड निर्मितीमध्ये अडचणी येतील. इथे रोगनियंत्रणही कठीण होईल. 
  • हलक्या जमिनीत दोन ओळीत ९ फूट तर दोन वेलींत ५ फूट इतके अंतर पुरेसे होईल. या जमिनीत या पेक्षा जास्त अंतर ठेवल्यास कॅनॉपीची वाढ पूर्ण होत नाही. एकरी वेलीची संख्या कमी राहील व सनबर्निंगची समस्या उद्‍भवू शकते. 
  • लागवडीचा कालावधी  खुंट लागवड केल्यानंतर काही दिवसातच रोपांची वाढ सुरळीत होणे अपेक्षित असते. या करिता बागेतील तापमान महत्त्वाचे असते. बागेत किमान तापमान १५ अंश सेल्सअसपेक्षा अधिक होऊ लागल्यास वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग वाढतो. याचाच अर्थ खुंटरोपांच्या फुटीची वाढ झपाट्याने होताना दिसून येते. ही परिस्थिती साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पाहावयास मिळते. उत्तर भारतात आलेल्या शीतलहरीनुसार आपल्याकडे तापमान कमी जास्त होताना दिसून येते. तेव्हा किमान तापमानाचा विचार करून लागवडीचा कालावधी ठरवावा.  खुंट रोपांची लागवड  लागवड करण्यापूर्वी ठरवलेल्या अंतरावर लहानसा खड्डा घेऊन एक ओंजळ शेणखत व एक ओंजळ वाळू (भारी जमिनीत) टाकून घ्यावी. हलक्या जमिनीतील खड्ड्यात फक्त शेणखत टाकावे. त्यात खुंट रोप लावून पायाने घट्ट माती दाबण्याची काळजी घ्यावी. द्राक्ष लागवडीकरिता खुंट रोपांची निवड महत्त्वाचा विषय बनलेला आहे. आपल्याकडे बऱ्याच खुंट जाती उपलब्ध असल्या तरी सध्या डॉगरीज खुंटावर लागवडीचे प्रमाण अधिक आहे. या व्यतिरिक्त साल्टक्रिक, ११० आर, ११०३ पी, एसओ४ इ. खुंट जाती उपलब्ध आहेत. जमिनीच्या परिस्थितीनुसार व बागेत उपलब्ध समस्येनुसार या खुंट जातींचा वापर करावा.  - डॉ. आर. जी. सोमकुंवर,  ९४२२०३२९८८  (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com