रिकट नंतरचे व्यवस्थापन

रिकट घेतलेल्या बागेमध्ये नवीन फुटी जोमाने येण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनाकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर योग्य रीतीने होणे गरजेचे असते.
अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनामुळे जोमात होत असलेली वाढ
अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनामुळे जोमात होत असलेली वाढ

रिकट घेतलेल्या बागेमध्ये नवीन फुटी जोमाने येण्यासाठी अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापनाकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर योग्य रीतीने होणे गरजेचे असते. बऱ्याचशा बागेमध्ये नवीन बागेत रिकट घेतला गेला आहे. त्यानंतर नवीन फुटी निघण्यास सुरुवात झाली आहे. बदलत्या वातावरणाचा विचार करता बागेत यावेळी वाढ व्यवस्थित होण्याकरिता सिंचनाचे व्यवस्थापन महत्त्वाचे असेल. त्याच प्रमाणे फुटींची वाढ जोमात होण्याच्या दृष्टीने अन्नद्रव्य व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे असेल. जोपर्यंत नवीन फुटी व्यवस्थित निघत नाहीत, तोपर्यंत इतर गोष्टींचा परिणाम वेलीवर दिसणार नाही. त्या करिता बागेतील व्यवस्थापन सुरवातीच्या काळात काटेकोरपणे ठेवणे गरजेचे असेल.  एकसारख्या फुटीसाठी  एकसारखी फूट निघण्याकरिता वेलीची मुळे किती सक्षम असणे गरजेचे आहे. आपण रिकटच्या पंधरा दिवसांपूर्वी घेतलेल्या चारीमुळे आता व्यवस्थितरीत्या मुळांचा विकास झालेला असेल. यामुळे बागेत उपलब्ध अन्नद्रव्यांचा पुरवठा वेलीस होईल. मुळांचा विकास जितका चांगला झाला असेल, तितकेच वेलींवर फुटींची वाढ दिसून येते. यालाच आपण ‘रूट टू शूट रेशो’ (मुळे ते फुटवे गुणोत्तर) असे म्हणतो. हे मिळण्याकरिता बागेतील वातावरणात समतोल महत्त्वाचा असतो. हा समतोल त्या वेळी असलेले तापमान, जमिनीचा प्रकार व वेलीस उपलब्ध केलेले पाणी व अन्नद्रव्ये यावर अवलंबून असतो. रिकट वातावरणाचा विचार करता साधारण फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेतला जातो. या वेळी तापमान ३५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक वाढलेले दिसेल. या वेळी आर्द्रताही बऱ्यापैकी कमी झालेली अनुभवास येईल. जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याची उपलब्धता या वेळी करणे महत्त्वाचे असेल. साधारणतः प्रत्येक मि.मी. बाष्पीभवनाच्या दरानुसार ४२०० लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस या प्रमाणे गरजेचे असल्याचे मानले जाते. ही उपलब्धता जुन्या बागेकरिता शिफारस म्हणून पूर्ण केली जाते. परंतु या वेळी रिकट घेतल्यानंतर जोपर्यंत फुटी एकसारख्या व जोमदार निघत नाहीत, तोपर्यंत हे नियोजन काम करणार नाही. या बागेत पाणी जास्त प्रमाणात दिले गेल्यास आर्द्रता वाढेल, त्याचाच परिणाम नवीन फुटींची जोमदार वाढ करून घेण्यासाठी होईल. ज्या बागेत भरपूर पाणी आहे, अशा ठिकाणी मोकळे एक ते दोन पाणी देण्यास हरकत नाही. मात्र पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या ठिकाणी बोद पूर्णपणे भिजेल, याची काळजी घ्यावी.  अन्नद्रव्य व्यवस्थापन  प्रमुख अन्नद्रव्यांपैकी या वेळी नत्र महत्त्वाचे असते. या वेळी १८-४६-०, युरिया, १२-६१-०, १०-२६-२६ या पैकी कोणत्याही खतांचा वापर करता येईल. जलदरीत्या उपलब्ध होणारे ग्रेडमधील नत्रयुक्त खताचा वापर करणे कधीही फायद्याचे ठरेल. युरियाची उपलब्धता ५ किलो प्रति एकर तीन दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा ठिबकद्वारे उपलब्ध करावे. इतर विद्राव्य खतांचा ग्रेडमधील एक ते सव्वा किलो प्रति एकर प्रति दिवस प्रमाणे ८ ते १० दिवस पूर्तता करावी.  खत व पाण्याचा पुरेपूर फायदा घेऊन फुटींची वाढ जोमात होते. निघालेल्या फुटींपैकी एक फूट निवडावी की दोन फुटी निवडाव्या किंवा कोणत्या प्रकारची फूट निवडावी, हा प्रश्‍न बागायतदारांसमोर असतो. निघालेल्या फुटींपैकी वरील फूट जास्त जोमात दिसेल, त्यानंतर खालील फुटीचा जोम कमी असेल, तर पुन्हा खालील तिसऱ्या क्रमांकाची फूट जोमदार दिसेल. यालाच ‘शेंड्याचे प्रभुत्व असेही म्हटले जाते. फूट निवडतेवेळी वरच्या जोमदार निघालेल्या फुटीचे तीन ते चार डोळ्यांवर शेंडा पिंचिंग करून घ्यावे. असे केल्यास खालील दुसऱ्या क्रमांकाची फूट जोमदार वाढेल. हीच फूट बांबूला सुतळीच्या साह्याने बांधून घ्यावी. रिकट घेतेवेळी काडीच्या वरील टोकावर कदाचित झालेला रोगाचा प्रादुर्भाव या निघालेल्या फुटीला शेंडा मारल्यानंतर खालील फुटींवर प्रसार होणार नाही. वरील शेंडा मारल्यामुळे खालील फूट जोमात वाढून त्याची खोड तयार करण्यात मदत होईल. खोड तयार करतेवेळी ‘थांबा व पुढे चला’ (स्टॉप ॲण्ड गो) अशा पद्धतीने पुढे जावे. या पद्धतीकरिता वाढत   असलेली फूट ८ ते ९ पानांची झाल्यास पाच ते सहा पानांवर शेंडा खुडून घेणे, यामुळे बगलफुटी जोमात निघतील. या निघालेल्या बगलफुटी पुन्हा तीन ते चार पानांवर खुडून घ्याव्यात. शेवटची फूट न खुडता बांबूस बांधून घ्यावी. ही वरील फूट पुन्हा ९ ते १० पानांची होताच सहा सात पानांवर खुडून घ्यावी. यावर निघालेल्या बगलफुटीसुद्धा तीन चार पानांवर खुडून घ्याव्यात. असे केल्यास काडीवर उपलब्ध पानांमुळे प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्ये तयार करून बांबूस बांधलेल्या काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा निर्माण होतो. तयार होत असलेले खोड जाड होण्यास मदत होईल. खोड जवळपास दोन ते तीन टप्प्यांत तयार करावे.  पहिल्या वर्षी कलम केलेल्या बागेत वेलीवर फेरसची कमतरता दिसून येते. ही समस्या पहिल्या वर्षी जास्त प्रमाणात आढळून येते. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून या पूर्वी आपण शेणखतात सुमारे १० किलो प्रति एकर फेरस सल्फेटची उपलब्धता केली होती. यानंतर चार ते पाच पाने अवस्थेपासून एक ते दीड ग्रॅम फेरस सल्फेट प्रति लिटर पाणी या प्रमाणे पाच ते सहा दिवसांच्या अंतराने फवारणीद्वारे पूर्तता करावी. फुटींची वाढ जसजशी जास्त होईल, तसतशी फेरस सल्फेटची मात्रा अर्ध्या ग्रॅमने वाढवत कमाल तीन ग्रॅमपर्यंत न्यावी. फवारणी ही शक्यतो सायंकाळी केल्यास पानांची खते शोषण्याची क्षमता जास्त असल्याने फायदेशीर ठरेल.  दोन खोड पद्धती  बऱ्याचदा बागेमध्ये दोन खोड पद्धतीचा अवलंब केला जातो. अशा ठिकाणी दोन ओळींतील व वेलींतील अंतर जास्त आहे, अशा ठिकाणी दोन खोड पद्धती असल्यास फायदा होऊ शकतो. एका खुंटावरून निघालेल्या दोन फुटींवर केलेले कलम व दोन्हीही कलम एकसारखे फुटल्यास एकाच वेळी नेता येईल. बऱ्याचदा एका काडीवर केलेले कलम दोन काड्यामध्ये विभागले जाते, त्याला दोन खोड पद्धत म्हणून वर नेतो. तसे न करता जर एकाच खुंटाच्या दोन काड्यांवर दोन वेगळ्या फुटी खोड म्हणून नेता आल्यास परिणाम चांगले मिळतील. दोन खोड पद्धतीमुळे वरील कॅनॉपीचा विकास सुद्धा तितक्याच जोमाने होईल. बागेत जर दोन वेलीतील अंतर कमी असल्यास या कॅनोपीची गर्दी होऊन आपण पुढे अडचणीत येऊ शकतो. सूर्यप्रकाशाचा अभाव म्हणजेच घडनिर्मितीकरिता अडचणी, दाटीमुळे रोगांचा प्रादुर्भाव आणि वाढीकरिता पोषक वातावरण तयार होणे इ. समस्यांचा सामना करावा लागेल. या करिता बागेत कमी अंतर असलेल्या ठिकाणी फक्त एक खोड पद्धत अवलंबणे फायद्याचे ठरेल. कीड व्यवस्थापन  या वेळी बागेमध्ये तापमान जास्त असून, पाणी अधिक दिल्यामुळे आर्द्रताही तितकीच वाढते. लुसलुशीत असलेल्या नवीन फुटींच्या शेंड्याकडे या वेळी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. जास्त आर्द्रता, जास्त तापमान आणि कोवळी फूट या किडीच्या प्रादुर्भावाकरिता फायदेशीर असते. ही कीड पानांतून अन्नद्रव्ये शोषून घेते. यामुळे पाने एकतर आकसल्याप्रमाणे होतात किंवा पानांच्या वाट्या होण्याची समस्या दिसून येते. जुन्या पानांची वाटी झालेली असल्यास पालाशची कमतरता आहे, असे समजावे. नवीन पानांची वाटी झाल्याचे दिसत असल्यास रसशोषक किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याची खात्री करावी. तेव्हा दोन्ही परिस्थितीचा विचार करता पालाशचा वापर व कीटकनाशकाची फवारणीद्वारे करावा. फवारणी प्रति लिटर पाणी.

  •   स्पिनोसॅड (४५ एससी) ०.२५ मि.लि. किंवा
  •   सायॲण्ट्रांनिलीप्रोल (१० एसडी) ०.७ मि.लि. किंवा
  •   फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६२५ ग्रॅम किंवा 
  •   इमामेक्टिन बेन्जोएट (५ एसजी) ०.२२ मि.लि.
  • प्रादुर्भाव दिसताच आलटून पालटून कीटकनाशक बदलून फवारणी करावी. - डॉ. आर. जी. सोमकुंवर,  ९४२२०३२९८८ (संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com