agricultural news in marathi grapes advisory | Agrowon

जुन्या बागेतील खरड छाटणीनंतरचे व्यवस्थापन

डॉ. आर. जी. सोमकुंवर
गुरुवार, 25 मार्च 2021

द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गारपीट, वादळी पाऊस झाला. त्यानंतर वातावरणात तापमान कमी झाले असून, सोबत आर्द्रताही वाढली. येत्या काही दिवसांनंतर दिवसाच्या तापमानात जास्त वाढ होईल व आर्द्रताही कमी होईल. अशा उपलब्ध परिस्थितीमध्ये जुन्या द्राक्ष बागेत खरड छाटणीनंतरच्या स्थितीमध्ये पुढील कार्यवाही केल्यास फायदेशीर राहील.

गेल्या काही दिवसांपूर्वी द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गारपीट, वादळी पाऊस झाला. त्यानंतर वातावरणात तापमान कमी झाले असून, सोबत आर्द्रताही वाढली. मात्र ही परिस्थिती जास्त काळ टिकून राहणार नाही. येत्या काही दिवसांनंतर दिवसाच्या तापमानात जास्त वाढ होईल व आर्द्रताही कमी होईल. अशा उपलब्ध परिस्थितीमध्ये जुन्या द्राक्ष बागेत खरड छाटणीनंतरच्या स्थितीमध्ये पुढील कार्यवाही केल्यास फायदेशीर राहील.

खरडछाटणी झालेल्या बागेमध्ये डोळे फुटण्याची अवस्था सुरू असेल. याच भागात पाऊस झाला असल्यास जमिनीत ओलावा निर्माण झाला असेल. परिणामी, या बागांमध्ये आर्द्रता थोडीफार वाढेल. हीच वाढलेली आर्द्रता खरड छाटणीनंतर डोळे फुटण्यास मदत करेल. ज्या बागेत डोळे नुकतेच फुटलेले आहेत, अशा ठिकाणी निघालेल्या फुटी जोमात वाढताना दिसून येतील. नुकत्याच झालेल्या पावसाचा अशा परिस्थितीतील बागेत ८ ते १० दिवसांपर्यंत फायदा होईल. यामध्ये फुटी लवकर व एकसारख्या निघतील. तसेच निघालेल्या फुटींची वाढ जोमात होईल. उपलब्ध परिस्थितीचा चांगला फायदा घेऊन फुटी व्यवस्थित निघण्याकरिता नत्राचा थोडाफार वापर करणे फायद्याचे ठरेल. एकदा निघालेली फूट जोमदार असली, तरी पुढील दहा दिवसांनंतर तापमान वाढून आर्द्रता कमी झाल्याच्या स्थितीत वाढ आपोआप नियंत्रणात राहील. युरियाद्वारे नत्राचा वापर एकरी सव्वा ते दीड किलो या प्रमाणे दिवसाआड पाच ते सहा वेळा करावा. 

या पूर्वीच छाटणी झालेल्या आणि आता नवीन फुटी चार ते पाच पानांच्या झाल्या आहेत, अशा बागेमध्ये वाढलेल्या आर्द्रतेमुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव (उदा. फुलकिडे) आढळून येईल. या वेळी वाढलेल्या आर्द्रतेमुळे वाढीचा जोम जास्त असल्यामुळे पाने लुसलुशीत असतील. ही परिस्थिती रसशोषक किडीकरिता फायद्याची असते. नवीन पानांच्या वाट्या (शेंड्याकडील फुटी) झाल्याचे दिसल्यास या ठिकाणी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव असल्याचे समजावे. या वेळी पुढील पैकी एका कीडनाशकांची फवारणी करून घ्यावी.

फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी 

  •    स्पिनोसॅड (४५ एससी) ०.२५ मि.लि. किंवा 
  •   स्पिनोटोरम (११.७ एससी) ०.३ मि.लि. किंवा 
  •    सायअॅण्ट्रानिलीप्रोल (१० ओडी) ०.७ मि.लि. किंवा 
  •   फिप्रोनील (८० डब्ल्यूजी) ०.०६२५ ग्रॅम.

बागेत जास्त पाऊस झाला व बागेत सात आठ पानांची अवस्था आहे, अशा ठिकाणी त्या फुटीवरील मध्यभागातील पानांच्या (चौथे -पाचवे पान) वाट्या झाल्याची स्थिती आढळून येईल. ही स्थिती रसशोषक किडींचा प्रादुर्भाव नसून, पालाशची कमतरता अचानक झाल्यामुळे उद्‍भवलेली असेल. शक्यतो जुन्या पानांच्या वाट्या झाल्याचे दिसून येईल. वाट्या झालेल्या परिस्थितीत ०-४०-३७ हे विद्राव्य खत एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दिवसाआड तीन वेळा फवारणी घ्यावी. ही फवारणी सायंकाळच्या वेळी घ्यावी. या वेळी वातावरणातील तापमान कमी असून, आर्द्रता वाढत असल्यामुळे पानांची द्रावण शोषून घेण्याची क्षमता जास्त असेल. 

फुटींची विरळणी करणे
या वेळी निघालेल्या फुटी जोमदार असल्यामुळे विरळणीही तितकीच महत्त्वाची असेल. शक्यतो सहा- सात पानांच्या अवस्थेत विरळणी करण्याची शिफारस केली जाते. या वेळी वाढीचा जोम जास्त असल्यास लवकरात लवकर ही कार्यवाही करून घ्यावी. वेलीस मिळालेल्या प्रत्येक वर्गफूट अंतराकरिता अर्धी काडी या प्रमाणे नियोजन करावे. उदा. १० बाय ६ फूट अंतरावरील वेलीवर ३० काड्या पुरेशा होतात. ही वेल ‘वाय’ वळण पद्धतीवर लागवड केलेल्या वेलीवर इंग्रजी ‘एच’ प्रमाणे ओलांडा तयार झाला असल्यास प्रत्येक ओलांड्यावर आठ काड्या या प्रमाणे नियोजन करावे. म्हणजे जवळपास ३२ काड्या एका वेलीवर तयार होतील. सामान्यतः एका वेलीवर ८० व त्यापेक्षा जास्त फुटी दिसून येतील. आपल्याला या सर्व फुटींची गरज नसल्यामुळे मोजक्या फुटी ठेवून  उपलब्ध अन्नद्रव्याचा पुरेपूर वापर करण्याच्या उद्देशाने फुटींचे नियोजन करून घ्यावे. फुटींची विरळणी करतेवेळी एकाच डोळ्यातून निघालेल्या दोन फुटी, खाली जमिनीकडे वळत असलेल्या फुटी काढण्याकडे जास्त लक्ष द्यावे. ओलांड्यावर प्रत्येक फूट अडीच ते तीन इंचांवर ठेवल्यास पुढील काळात मोकळी कॅनॉपी मिळून हवा खेळती राहील. प्रकाश संश्‍लेषणाच्या माध्यमातून अन्नद्रव्यांचा साठा तयार करून काडीची जाडी वाढवण्यास मदत होईल. 

सबकेन तयार करणे  
ज्या बागेत जास्त पाऊस झाला असेल, अशा ठिकाणी वाढीचा जोम जास्त आहे. ९ पानांच्या अवस्थेत सातव्या पानांवर शेंडा मारून घ्यावा. त्यानंतर काही दिवस वाढ एकदम खुंटल्याप्रमाणे दिसून येईल. ही स्थिती दोन ते तीन दिवस राहील. त्यानंतर नवीन बगलफूट निघण्यास सुरुवात होईल. ही फूटही तितक्याच जोमाने निघणे गरजेचे असेल. यासाठी बागेतील फुटीची विरळणी करून नुकत्याच तयार झालेल्या कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहील, असे वातावरण तयार करावे. काही बागेत पाऊस झाला नसेल, तापमानातही वाढ अधिक असेल व त्यासोबत पाण्याचा तुटवडा असल्यास फुटींची वाढ होण्यात अडचणी येतील. अशा परिस्थितीत सबकेन करण्याचे टाळावे. ही फूट पुढे गेल्यानंतर ११ ते १२ व्या डोळ्यावर शेंडा मारून घ्यावा. यालाच ‘सरळ काडी ठेवणे’ असे म्हटले जाते. थोडक्यात, ज्या बागेत जमीन भारी असून, पाणी उपलब्धता आहे, तापमानात घट झाली आहे आणि वाढीचा जोम जास्त आहे, अशाच बागेत सबकेन करणे फायद्याचे ठरेल. ही परिस्थिती उपलब्ध नसल्यास सरळ काडी ठेवून कॅनॉपी व्यवस्थापन सांभाळावे.

- डॉ. आर. जी. सोमकुंवर,  ९४२२०३२९८८, 
(संचालक, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

टॅग्स

इतर कृषी सल्ला
अपारंपरिक ऊर्जा विकासामध्ये संधीभारतामध्ये अपारंपरिक ऊर्जा ही सौर ऊर्जा, पवन...
... तेथे लव्हाळे वाचतीहवामान बदलाच्या प्रचंड संकटासमोर कोणी टिकू शकत...
गारपिटीसह पावसाची शक्यताया आठवड्यात महाराष्ट्रावर १००६  हेप्टापास्कल...
जमिनीची सुपीकता हाच शाश्‍वत शेतीचा...जमिनीतील सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वामुळे जिवंतपणा...
फुलशेतीचं ब्युटी‘फुल’ थायलंड!थायलंडमध्ये घरोघरी फुलझाडं जपलेली दिसतात. पोराला...
सहकार क्षेत्रामध्ये महिला संस्थांना...सहकार चळवळ कृषी व वित्त या क्षेत्राकडून आता...
जल, मृद्संधारण, बियाणे तपासणी महत्त्वाचीमहाराष्ट्रातील ८२ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर...
माणगा अन् मेस बांबूचे सुटले कोडेगेल्या आठवड्यात फायटोटॅक्सा (Phytotaxa) या...
जमीन सुपिकतेसाठी खतांचा कार्यक्षम वापर माती परीक्षणाच्या आधारावर सेंद्रिय खते जैविक खते...
उत्तम सूक्ष्म घडनिर्मितीसाठी उपाययोजनाद्राक्ष विभागात सटाणा, (जि. नाशिक), बोरी, इंदापूर...
कृषी सल्ला (कापूस, लसूण, फळपिके)पीक अवशेषाचा आच्छादन म्हणून वापर करावा....
ब्रह्मपुत्रा, बराक नद्यांच्या क्रोधाचा...हिमालय पर्वतराजीमध्ये होत असलेल्या बदलांमुळे...
ढगाळ हवामानासह पावसाची शक्‍यताबुधवार (ता. ५ मेपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेस...
शेतीच्या गप्पा आणि थायलंडचा बाप्पा...थायलंडचा विकास शेतीविकासाच्या वाटेनंच झालाय....
मत्स्यसंवर्धन तलावासाठी योग्य जागेची...तलावामध्ये माशांची चांगली वाढ होण्यासाठी तलाव...
कृषी निविष्ठा विक्री व्यवस्थापनाची...कृषी निविष्ठा परवाना प्रक्रिया उपक्रमांतर्गत...
उन्हाळ्यातील अंबिया बहारातील फळगळ...आळ्याने पाणी देण्याची पद्धत वापरात असलेल्या...
कृषी सल्ला ( ​केळी, आंबा, सिताफळ,...आंबा बागेला पाण्याचा ताण बसू देऊ नये. नवीन लागवड...
उन्हाळी भुईमूगाचे व्यवस्थापन तंत्रसर्व प्रकारचे योग्य व्यवस्थापन केले तर उन्हाळी...
अति उष्ण, ढगाळ हवामानआठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील...