वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील समस्या

प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तापमानात दिवसेंदिवस वाढ (४० अंश सेल्सिअसपर्यंत) होत आहे. आर्द्रताही तितक्याच प्रमाणात (३० टक्के) कमी होत आहे. अशी स्थितीमध्ये सध्या उपलब्ध विविध वाढीच्या अवस्थेत द्राक्ष बागेमध्ये वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याबद्दल द्राक्ष बागायतदारांच्या मनात येणाऱ्या शंकांचे समाधान पुढीलप्रमाणे...
grapes advisory
grapes advisory

प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता तापमानात दिवसेंदिवस वाढ (४० अंश सेल्सिअसपर्यंत) होत आहे. आर्द्रताही तितक्याच प्रमाणात (३० टक्के) कमी होत आहे. अशी स्थितीमध्ये सध्या उपलब्ध विविध वाढीच्या अवस्थेत द्राक्ष बागेमध्ये वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याबद्दल द्राक्ष बागायतदारांच्या मनात येणाऱ्या शंकांचे समाधान पुढीलप्रमाणे... जुन्या बागेतील डोळे फुटण्याची समस्या  या बागेमध्ये काही ठिकाणी नुकतीच खरडछाटणी झाली असेल. या वेळी डोळे फुटण्याचा कालावधी असेल. डोळे फुटतेवेळी तापमान कमी आणि आर्द्रता जास्त असणे आवश्यक असते. मात्र सध्याच्या तापमानामुळे लवकर डोळे फुटणे अपेक्षित नाही. तीव्र सूर्यप्रकाशात डोळ्यावरील पेशींमध्ये जखमा होतात. त्या पेशी मरतात. सतत १५ ते २० दिवस प्रखर सूर्यप्रकाश त्या डोळ्यावर पडला तर डोळे फुटण्यास उशीर होईल, डोळे कदाचित फुटणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल व परिणामी ओलांडे मुके होण्याची शक्यता जास्त असेल. तेव्हा या परिस्थितीमध्ये डोळ्याभोवती आर्द्रता वाढवणे गरजेचे ठरते. यासाठी बागेत ओलांड्यावर पाण्याची फवारणी किंवा शेडनेटचा वापर फायद्याचा राहील. ओलांड्यावरील जुन्या झालेल्या सालीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे पाण्याची फवारणी केल्यास आर्द्रता वाढून डोळे फुटण्यास मदत होईल. शेडनेटच्या सावलीमुळे तापमानात घट होईल. त्यानंतर आर्द्रता वाढते. त्याची डोळे फुटण्यास मदत होते. काही परिस्थितीत बागायतदार ओलांड्यावर शेडनेट गुंडाळतात. शेडनेट प्लॅस्टिकचे असल्यामुळे ओलांड्यावरील तापमान हे बाह्य तापमानापेक्षा जास्त होते. परिणामी, फुटत असलेले डोळे जळून जाऊ शकतात. यापेक्षा वर्तमानपत्र किंवा गोणपाट याने ओलांडे गुंडाळून त्यावर पाण्याची फवारणी केल्यास डोळे फुटण्यास चांगले परिणाम भेटतात. वाढ कमी होण्याची समस्या  काही बागेत खरड छाटणी होऊन एक महिना झाला असेल. या वेळी सात-आठ पानांची अवस्था किंवा काही ठिकाणी सबकेन नुकतेच तयार झाले असेल. वेलीवर फुटींची वाढ व्यवस्थितरीत्या होण्याकरिता तापमान व पाणी या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान प्रकाश संश्‍लेषणाकरिता उपयुक्त असल्याचे बोलले जाते. म्हणजेच या तापमानात प्रकाश संश्‍लेषण चांगले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता वेलीच्या वाढीकरिता पोषक वातावरण दिसत नाही. त्याला खालीलप्रमाणे काही कारणे असू शकतात. जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असणे. बऱ्याचशा जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण ३ ते २५ टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून येते. चुनखडीच्या या अधिक प्रमाणामुळे द्राक्षवेलीस उपयुक्त असलेल्या अन्नद्रव्यांची (नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशिअम, फेरस इ.) उपलब्धता होणे कठीण जाते. त्याचा विपरीत परिणाम वेलीच्या वाढीवर होतो. जमिनीचा सामू ७.५ पेक्षा जास्त झाल्यामुळेसुद्धा या अडचणीत अधिकच भर पडते. यामुळे फुटीच्या पेऱ्यातील अंतर कमी होते. व वाढ खुंटते. परिणामी, पानांचा आकारही कमी होऊन काडीमध्ये आवश्यकतेइतक्या अन्नद्रव्याचा साठा करण्याकरिता प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया समाधानकारक होत नाही. त्यामुळे काडी बारीक राहते. पुढील येणाऱ्या काळात घडनिर्मिती भरपूर झाली तरी घडाचा आकार ५० ग्रॅमपेक्षा जास्त राहणार नाही. उपाययोजना

  • बागेत खरड छाटणीच्या पूर्वी चारीमध्ये शेणखतासोबत सल्फर ४० ते ५० किलो प्रति एकर या प्रमाणात मिसळून घ्यावे.
  • दोन तीन हंगामांत त्याची उपलब्धता केल्यानंतर जमिनीचा सामू कमी होण्यास सुरुवात होईल. वेलीच्या वाढीवर चांगले परिणाम दिसून येतील.
  • पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असणे बऱ्याचदा बागेमध्ये वेलीच्या वाढीवर चुनखडीसोबत पाण्यातील क्षारही हानिकारक ठरतात. आपल्याकडे विहीर, कालवे आणि बोअरवेल असे पाण्याचे स्रोत असतात. या तीनपैकी विहीर आणि बोअरवेलच्या पाण्यात क्षारांचे प्रमाण अधिक असू शकते. म्हणून यावर मात करण्याकरिता खुंट रोपांचा वापर यशस्वी ठरला. असे असूनही जमिनीतून पाण्याद्वारे मूलद्रव्ये शोषून घेण्याची खुंट रोपाची एक ठरावीक क्षमता असते. त्यानंतर वेलीवर त्याचे परिणाम दिसून येतात. पाण्यात जास्त क्षार असलेल्या परिस्थितीत वेलीची पाने करपलेली किंवा काळी पडलेली दिसतील. अशा पानांमध्ये हरितद्रव्याचा अभाव असतो. म्हणजेच या परिस्थितीत प्रकाश संश्‍लेषण समाधानकारक होत नाही. याचाच परिणाम सूक्ष्मघड निर्मितीवर जास्त होतो. उपाययोजना 

  • पाण्यात क्षार असलेल्या परिस्थितीत खरडछाटणीनंतर चारी घेतेवेळी सुमारे १५० किलो जिप्सम प्रति एकर या प्रमाणात मिसळून घ्यावे.
  • ज्या जमिनीत क्षार व चुनखडी या दोन्हीची समस्या आहे, अशा ठिकाणी जमिनीत फक्त सल्फरचा वापर फायद्याचा ठरतो.
  • पाण्याची कमतरता  बागेत फुटींची वाढ होण्याकरिता पाण्याची उपलब्धता अशी असावी की जमीन क्षेत्र क्षारकतेमध्ये (फिल्ड कॅपॅसिटी) असेल. त्याचाच अर्थ जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा. वेलीच्या वाढीकरिता बागेतील एक मि.लि. बाष्पीभवनाकरिता साधारणतः ४२०० लिटर पाणी प्रति हेक्टर प्रति दिवस देण्याची शिफारस असते. म्हणजेच एप्रिल महिन्यात बाष्पीभवनाचा वेग १० मि.लि. असल्यास एक हेक्टर क्षेत्राला ४२००० लिटर पाण्याची आवश्यकता असेल. पाण्याची उपलब्धता यापेक्षा कमी असल्यास बागेत वाढ होण्यात अडचणी येतील. या वाढत्या तापमानात जर फुटीची वाढ पाण्याच्या अभावामुळे थोडी जरी खुंटली तरी वेलीला ताण बसतो. काही काळानंतर पाणी वाढवले तरी वाढीची ती अवस्था निघून गेलेली असते. या परिस्थितीत सूक्ष्मघडनिर्मिती होण्यास अडचणी येतात. उपाययोजना  ड्रीपरच्या खाली खड्डा घेऊन त्यामध्ये कोकोपीटचा वापर करावा. यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्याच्या वजनाच्या सहा पट असल्यामुळे हळूहळू वेलीला पाणी उपलब्ध होत राहते. हलकी जमीन  बऱ्याचदा हलक्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा सरळ व वेगाने होतो. हलक्या जमिनीमध्ये मातीच्या कणांची संख्या कमी असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. खरेतर चारी घेतल्यानंतर मुळाची वाढ व विस्तार होण्यासाठी पाण्याची हालचाल ही आडवी किंवा पसरट होण्याची गरज असते. मात्र हलक्या जमिनीमध्ये वालुकामय कणांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पाणी धरून ठेवणे शक्य होत नाही. उपाययोजना  खरड छाटणीपूर्वी चारी घेतल्यानंतर त्यात तळात पालापाचोळा, वेलीच्या काडींची केलेली कुट्टी, बगॅस, शेणखताचा जास्त प्रमाणात वापर करणे गरजेचे असेल. बगॅस किंवा काड्याची कुट्टी हे हळूहळू कुजेल व कालांतराने खतामध्ये रूपांतरित होईल. त्याचा पाणी धरून ठेवण्यासाठी फायदा होईल. जास्त तापमान  वेलीची वाढ एका ठरावीक तापमानामध्ये होते. तापमान आणि आर्द्रता या दोन्ही घटकांचा ताळमेळ व्यवस्थित बसल्यास वेलीची वाढ अपेक्षेप्रमाणे होते. साधारण तापमानात पानाच्या पेशी आरोग्यपूर्ण, सशक्त असतात. त्यात पाण्याचे योग्य प्रमाण (टर्जिडिटी) असते. पानांच्या पेशीत पुरेशा असलेल्या पाण्यामुळे प्रकाश संश्‍लेषणाचा वेग वाढतो. कारण उपलब्ध पाण्यामुळे हरितद्रव्याची निर्मितीही तितकीच चांगली होते. वेलीच्या पानांच्या पृष्ठभागातून बाष्पोत्सर्जनाद्वारे पाणी निघून जाते. ही परिस्थिती जास्त तापमानात वेगाने होते. वेलीतून जितके पाणी निघून गेले, तितकीच त्या वेलीची पाण्याची मागणीही वाढते. जर यावेळी बागेत तापमान जास्त असेल, पाणी कमी असेल, जमीन हलकी असेल, तर वेलीची पाण्याची गरज पूर्ण होण्यात अडचणी येतील. परिणामी वेलीची वाढ खुंटेल. अशा स्थितीमध्ये सूक्ष्मघड निर्मितीवर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतील. जास्त तापमान असलेल्या बागेमध्ये वारे वाहण्याचा वेगही जास्त असेल. यामुळे पानांसोबतच जमिनीतूनही पाणी उडून जाण्याचे प्रमाण जास्त असेल. उपाययोजना 

  • पानांद्वारे होणारे बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी ॲक्रिलिक पॉलीमर (ॲण्टी स्ट्रेस) दोन ते तीन मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे वाढीच्या अवस्थेनुसार दोन ते तीन फवारण्या घ्याव्यात. चांगल्या परिणामासाठी ही फवारणी शक्यतो सायंकाळी घ्यावी.
  • बागेत पाणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी द्यावी. यामुळे बाष्पीभवनाद्वारे होणारा ऱ्हास कमी करता येईल.
  • ठिबक नळ्या (लॅटरल) जास्त उंचावर असल्यास (जमिनीपासून तीन फूट), पाणी सुरू केल्यानंतर वाऱ्यामुळे पाणी एका ठिकाणी पडत नाही. मुळाच्या कक्षेत पाण्याचा पुरवठा होत नाही. तेव्हा काही दिवसांकरिता (पावसाळा सुरू होईपर्यंत) ही ठिबक नळ्या जमिनीवर खाली घ्याव्यात.
  • वारा प्रतिरोधकाचा वापर करावा. बागेभोवती वारा प्रतिरोधक गवते, शेवरी अशी झाडे लावल्यास बागेत शिरणारे उष्ण वारे रोखले जातील. पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होईल.
  • या बागेत तापमान कमी असताना पाणी द्यावे. या पाण्यासोबत सूक्ष्मघडनिर्मितीसाठी आवश्यक संजीवकांची फवारणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी ६ बीए १० पीपीएम व युरासील २५ पीपीएम या प्रमाणे शक्यतो संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान फवारणी करावी.
  • सूक्ष्म घडनिर्मितीसाठी आवश्यक स्फुरदाची उपलब्धता ठिबकद्वारे करावी. ज्या ठिकाणी वाढ जोमात होताना दिसते. अशा बागेत ०-४०-३७ हे खत २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दोन फवारण्या कराव्यात. सोबतच जमिनीतून एक ते सव्वा किलो प्रति एकर या प्रमाणे चार ते पाच वेळा याप्रमाणे उपलब्धता करावी.
  • डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com