सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेतील समस्या

द्राक्ष बागेत सध्या वातावरणातील तापमानात सातत्याने घट होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला दिसतो. या परिस्थितीत द्राक्ष बागेत आर्द्रतेचे प्रमाण वाढते. जमिनीमध्ये ओलावा वाढल्यामुळे वेलीची पाणी शोषून घेण्याची क्षमतासुद्धा तितकीच वाढते. अशा स्थितीमध्ये द्राक्ष बागेत येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ.
grapes advisory
grapes advisory

द्राक्ष बागेत सध्या वातावरणातील तापमानात सातत्याने घट होत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला दिसतो. या परिस्थितीत द्राक्ष बागेत आर्द्रतेचे प्रमाण वाढते. जमिनीमध्ये ओलावा वाढल्यामुळे वेलीची पाणी शोषून घेण्याची क्षमतासुद्धा तितकीच वाढते. अशा स्थितीमध्ये द्राक्ष बागेत येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाययोजना यांची माहिती घेऊ. फुटी जोमात वाढणे  अचानक झालेल्या पावसामुळे मुळांच्या कक्षेत पाण्याचे प्रमाण वाढते. तसेच दोन ओळींच्या मध्यभागीही पाणी साचून राहते. या ठिकाणी पाणी उपलब्ध झाल्यामुळे कार्यक्षम पांढऱ्या मुळांची वाढ बोदाव्यतिरिक्त इतर भागांतही जास्त होते. पांढऱ्या मुळांचे क्षेत्र वाढल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांपैकी नत्राचा पुरवठा वेलीला अधिक होतो. जमिनीत असलेली मुळे संजीवकांची उत्पत्ती करून वेलीला पुरवठा करतात. अशा स्थितीमध्ये वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढते. फुटींची वाढ जोमात होताना दिसून येते. फुटीच्या पेऱ्यातील वाढलेले अंतर हे वेलीतील शरीरशास्त्रीय हालचालींचा वाढलेला वेग दर्शवते. या प्रक्रियेत सायटोकायनिनचे प्रमाण कमी होणे, नत्र व पाण्याचा पुरवठा वाढणे यामुळे वेलीचा जोम जास्त वाढलेला दिसतो. काडीवरील बगलफुटींचीही वाढ होते. यासोबत पानांचा आकार व संख्या वाढते. पानांची गर्दी वाढून काडीवरील डोळ्यावर सूर्यप्रकाश पडत नाही. परिणामी, सूक्ष्मघड निर्मितीमध्ये अडचणी येतात.  उपाययोजना 

  • ज्या बागेत जास्त पाऊस झाला, अशा ठिकाणी पोटॅशयुक्त खतांची फवारणी २.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. ही फवारणी एक दिवसाआड या प्रमाणे दोन ते तीन वेळा करावी. यासोबत जमिनीतून दोन ते तीन किलो प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे पालाशयुक्त खत द्यावे. जमिनीतील ओलाव्याच्या प्रमाणानुसार पालाशची मात्रा ठरवावी. अधिक पाऊस झाला असल्यास दोन मात्रा द्याव्यात. 
  • फुटीची वाढ पुरेशी झाली असल्यास शेंडा पिंचिंग करून घ्यावे. 
  • फुटींवर निघालेल्या बगलफुटी त्वरित काढून घ्याव्यात. यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीमध्ये बाधा येणार नाही. 
  • वेलीचा जोम वाढण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास ६ बीए १० पीपीएम या प्रमाणे एक फवारणी करावी. तसेच ०-४०-३७ हे खत २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे एक दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात. 
  • पानांच्या वाट्या होणे  

  • बऱ्याचशा बागेत सबकेन झाल्यानंतर बगलफुटींचा शेंडा मारून घेतला असेल. अशा वेळी काडी एकतर तळातून दुधाळ रंगाची होण्यास सुरुवात होते. तसेच पानांची परिपक्वता होण्यास सुरुवात झाली असेल. या वेळी बागेमध्ये वेलीस पाण्याची उपलब्धता कमी असल्यास काडीची परिपक्वता सोपी होईल. मात्र अचानक झालेल्या पावसामुळे वेलीत वेगळ्या घडामोडी होऊन काडीची परिपक्वता लांबणीवर पडते. दुसऱ्या परिस्थितीत अचानक झालेल्या पावसामुळे वेलीची मुळे अन्नद्रव्याचा पुरवठा करतात. ते पुरेसे न पडल्यामुळे वेलीवर ताण बसल्याची स्थिती निर्माण होईल. यामुळे पालाशची कमतरता अचानक झाल्याचे चित्र दिसते. अर्धपरिपक्व पानांच्या वाट्या होतात. 
  • अचानक वाढलेल्या तापमान व आर्द्रतेमुळे रसशोषक किडींचा (फुलकिडे) प्रादुर्भावही वाढलेला दिसतो. जेव्हा मुळांद्वारे पाणी जास्त शोषले जाते, तेव्हा वेलीच्या पेशींमध्ये रस निर्मिती जास्त होते. यामुळेच पाने लवचिक, लुसलुशीत होतात. ही कीड पानांतील रस शोषून घेत असल्याने पानांच्या वाट्या होतात. 
  • उपाययोजना 

  • फुटीचा शेंड्याकडील भाग पांढऱ्या कागदावर आपटून पाहिल्यास त्यावर फुलकिडे पडलेले दिसतात. या स्थितीमध्ये शिफारशीप्रमाणे कीटकनाशकांची त्वरित फवारणी करून घ्यावी. 
  • या वेळी ०-०-५० या खताची २ ते ३ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे एक ते दोन फवारण्या दिवसाआड करून घ्याव्यात. जमिनीतूनही दीड ते दोन किलो प्रति एकर या प्रमाणे पालाश ठिबकद्वारे द्यावे. अर्थात, एकदा वाट्या झालेली पाने सरळ होत नाहीत. मात्र पुढील नवीन येणारी फूट सशक्त राहून त्यांना ही समस्या राहणार नाही.
  • जर बागेत सबकेनच्या पुढे सात पानांची अवस्था असल्यास ०-४०-३७ हे खत दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे दोन ते तीन फवारण्या कराव्यात. यामुळे सूक्ष्म घडनिर्मितीमध्ये बाधा येणार नाही. 
  • पानाच्या वाट्या झालेल्या बागेत ढगाळ वातावरण असल्यास भुरी रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. या रोगाच्या प्रादुर्भावाकरिता पोषक वातावरण तयार होते. वेलीस पालाशची कमतरता निर्माण झाल्यामुळे रोगाचे बीजाणू अधिक वेगाने वाढ करू शकतात. हे बिजाणू पानातून रस शोषून घेतात. परिणामी, काही स्थितीमध्ये देठ काडीपासून वेगळा होऊन पानगळ होऊ शकते. अशा परिस्थितीत सल्फर (८० डब्ल्यूडीजी) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करणे फायद्याचे ठरू शकते.
  • घड बाहेर पडणे  खरडछाटणीनंतर घडाचे चांगले पोषण होण्याकरिता साधारणपणे ८ ते १० मि.मी. जाडीची काडी व त्या काडीवर १६० ते १७० वर्ग सेंमी क्षेत्रफळांची १६ ते १७ पाने आवश्यक असतात. त्यानंतर आलेली पाने उपयोगाची नसून, शेंडा खुडणे गरजेचे होते. आपण बागेतील परिस्थिती पाहून (१३ ते १४ पानांच्या अवस्थेत) पाण्यावर नियंत्रण ठेवलेले असल्यास काडीची परिपक्वता तळापासून लवकर सुरू होईल. शेंड्याकडील वाढही थांबलेली असेल. वेळीच पाण्यावर नियंत्रण ठेवलेले नसल्यास शेंडा वाढ जास्त होते. काडीची परिपक्वता लांबणीवर जाते. काडी कच्ची राहिल्यामुळे फुटींची वाढ तितक्याच जास्त जोमात होईल. त्यानंतर आपण खुडा काढण्याची पद्धत अवलंबतो. खरेतर एक किंवा दोन पाने खुडल्यास वाढ लवकर थांबते. मात्र बऱ्याचदा आपण शेंड्याकडील आठ नऊ पाने खुडतो. याला हार्ड पिंचिंग असे म्हणतात. ही इतकी पाने खुडल्यामुळे निघालेल्या प्रत्येक नव्या फुटीवर दोन ते तीन घड आलेले दिसतात. या स्थितीत बागायतदार घाबरून जातात. आताच हे घड आले तर पुढील हंगामात घड येतील की नाही, ही शंका त्यांच्या मनात येते.  खरेतर काडीच्या तळातून तीन ते चार डोळे सोडल्यास पुढील प्रत्येक डोळ्यामध्ये घड असतो. मात्र आपल्याला आवश्यक असा सशक्त आणि जोमदार असा घड ६ ते ८ डोळ्यांमध्ये (सबकेन), तर ६ ते ९ डोळ्यांमध्ये (सरळ काडी) दिसून येतात. १७ पानांनंतर खुडा काढला जातो. या खुड्यानंतर निघालेले घड हे तसेही आपल्या फायद्याचे नसतात. कारण आपल्याला आवश्यक असलेला घड मागील डोळ्यांमध्ये सुरक्षित आहेत. जास्त खुडा काढल्यामुळे आणि घड बाहेर निघाल्यामुळे त्या काडीतील अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो. म्हणून घाबरून न जाता पुढील उपाययोजना कराव्यात.  उपाययोजना 

  • शेंड्याकडील फुटींची फक्त टिकली मारावी. 
  • पालाशची उपलब्धता फवारणीद्वारे व जमिनीतून करावी.
  • सूक्ष्म घडनिर्मितीच्या अवस्थेत ही परिस्थिती आल्यास ०-४०-३७ हे खत ३ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. 
  • टायगर बड फुटण्याची समस्या   नवीन बागेत (रिकट नंतर) ओलांडा तयार झाल्यानंतर फलधारीत काड्याची पूर्तता व्हावी, व त्या काडीमध्ये सूक्ष्म घडनिर्मितीही व्हावी, यासाठी बागायतदार बऱ्याच उपाययोजना करत असतात. यामध्ये सुरुवातीस नत्र व पाण्याची अधिक उपलब्धता केली जाते. त्यामुळे वेलीच्या वाढीचा जोम वाढतो. वेलीचा जोम वाढताना पेऱ्यातील अंतरही तितकेच वाढते. ही परिस्थिती सूक्ष्म घडनिर्मितीला हानिकारक असते. म्हणून सायटोकायनिनयुक्त संजीवकांची फवारणी (उदा. ६ बीए आणि युरासिल) केली जाते. त्यानंतर वाढ विरोधकांची सुद्धा एक ते दोन फवारणी करतात. इतकेच नाही तर शेंडा पिचिंग व बगलफुटी काढणे ही कामे केली जातात. यामुळे सायटोकायनिनचे प्रमाण वेलीमध्ये जास्त वाढते. या सर्व गोष्टींमुळे वेलीवर दाब निर्माण होतो. परिणामी, नाजूक असलेला भाग म्हणजे नुकताच तयार होत असलेला टायगर बड (मुख्य डोळा) जास्त फुटतो.  उपाययोजना 

  • फुटीवर ३ ते ४ पाने पुन्हा वाढू द्यावीत. 
  • नत्राचा वापर - युरिया २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे दोन फवारण्या कराव्यात.
  • शेंडा पिंचिंग करणे आठ दिवसांकरिता थांबवावे.
  • सायटोकायनिनयुक्त संजीवक व वाढ विरोधकांची फवारणी करू नये. 
  • काडीवर निघालेल्या बगलफुटी दोन ते तीन पानांच्या होईपर्यंत काढू नयेत.
  • पुढे तीन ते चार पानांची वाढ होत असल्यास काडीची परिपक्वता काही काळ लांबणीवर जाईल. आठ दिवसांनंतर शेंड्याकडे टिकली मारून वाढ नियंत्रणात ठेवता येईल. टायगर बडवरील आवरण घट्ट होऊन डोळा सुरक्षित राहील.
  • - डॉ. आर. जी. सोमकुंवर,  ९४२२०३२९८८ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com