द्राक्ष बागेत द्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेकडे लक्ष

द्राक्षलागवडीखालील विभागामध्ये पावसाची उघडीप दिसून येत आहे. हलकी जमीन असलेल्या भागामध्ये पाण्याचा तुटवटा दिसून येईल. भारी जमीन असलेल्या स्थितीत वेलीला पाण्याची अडचण जाणवली नसेल. ज्या ठिकाणी हलका किंवा एखादा पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी पुढील काही समस्या जाणवू शकतात.
Symptoms of potassium and magnesium deficiency on grapes leaves
Symptoms of potassium and magnesium deficiency on grapes leaves

गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष लागवडीखालील विभागामध्ये पावसाची उघडीप दिसून येत आहे. हलकी जमीन असलेल्या भागामध्ये पाण्याचा तुटवटा दिसून येईल. भारी जमीन असलेल्या स्थितीत वेलीला पाण्याची अडचण जाणवली नसेल. ज्या ठिकाणी हलका किंवा एखादा पाऊस झाला आहे, अशा ठिकाणी पुढील काही समस्या जाणवू शकतात. नवीन फुटीचा जोम जास्त असणे  पाऊस जास्त जरी झालेला नसला तरी वातावरणातील आर्द्रता टिकून आहे. पावसाची एखादी सर आली तरी ओलावा टिकून राहतो. त्यामुळे वातावरणातील आर्द्रताही वाढते. या वेळी जमीन वाफसा स्थितीत असल्यामुळे मुळे जास्त कार्यरत असतात. अशात उपलब्ध असलेल्या खतांचा वापर व मुळांनी तयार केलेली संजीवके यामुळे वेलीची वाढ जोमात होते. ही वाढ जितक्या जास्त होईल, तितकी कॅनोपीत गर्दी तयार होईल. या गर्दीमुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असेल. बागेत या वेळी सूक्ष्मघड निर्मितीची अवस्था संपून काडी परिपक्वतेची अवस्था सुरू झाली असेल.  भुरी रोगाचा प्रादुर्भाव  या वेळी पाने थोड्याफार प्रमाणात जुनी झालेली असतील. या अवस्थेत ढगाळ वातावरण, तापमान (३० ते ३२ अंश सेल्सिअस) व अर्धवट जुनी झालेली कॅनोपीची गर्दी या बाबी भुरीच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरतात. बऱ्याचदा वेलीमध्ये पालाश कमतरता असलेल्या स्थितीत भुरीचा प्रादुर्भाव जास्त असल्याचे दिसून येते. म्हणूनच पालाशची उपलब्धता जमिनीतून तसेच फवारणीच्या माध्यमातून करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकयुक्त बुरशीनाशकांचा वापर करावा. उदा. सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रति लिटर. काडी तळातून दुधाळ झाली असल्यास किंवा एक ते दोन पेरे तपकिरी रंगाची होण्यास सुरुवात झाल्याच्या स्थितीत, बोर्डो मिश्रण अर्धा टक्का तीव्रतेच्या एक किंवा दोन फवारणी (१० दिवसांच्या अंतराने) करता येईल. पहिल्या फवारणीनंतर दुसरी फवारणी करताना पानांची परिस्थिती व काडीचा रंग यानुसार निर्णय घ्यावा. बोर्डो मिश्रणाची तीव्रता अर्धा ते एक टक्क्यापर्यंत वाढवता येईल. डाऊनी मिल्ड्यू  याच बागेत पाऊस जास्त झालेला असेल, व नवीन फुटी निघण्यास सुरुवात झाल्यास आतील कॅनोपितील वाढलेली आर्द्रता व कोवळी पाने या स्थितीमध्ये डाऊनी मिल्ड्यू रोगाचा प्रादुर्भाव जास्त होताना दिसेल. यासाठी नवीन फुटी शक्य तितक्या लवकर काढून टाकाव्यात, ओलांड्यावर असलेल्या फुटी तारेवर बांधून घ्याव्यात. त्यामुळे कॅनोपी मोकळी राहील. अशा कॅनोपित हवा खेळती राहिल्यामुळे डाऊनी मिल्ड्यूसारख्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. डाऊनी नियंत्रणासाठी, पोटॅशिअम सॉल्ट ऑफ ॲक्टिव्ह फॉस्फरस ४ ग्रॅम अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम (टॅंक मिक्स) प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. दुसरी फवारणी १० दिवसांच्या अंतराने तितक्याच मात्रेने  पुन्हा करावी.  अन्नद्रव्याची कमतरता  बऱ्याच बागेत पानाच्या वाट्या होणे, पानाच्या कडा काळ्या पडणे, पानाच्या शिरांच्या मध्यभागी पिवळसरपणा येणे इ. समस्या दिसून येत आहेत. मागील आठवड्यात अनेक ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने पानांमध्ये उपलब्ध पालाशच्या निचरा झाला. यामुळे पानांमध्ये आवश्यक तितकी शक्ती राहिली नाही. परिणामी, त्याच्या वाट्या होण्यास सुरुवात झाली. काडी परिपक्वतेची सुरुवात होत असताना वाढ नियंत्रणात असावी. तसेच पालाशची उपलब्धता करावी. पाऊस झाल्यानंतर पालाशचे पानाद्वारे वहन होणे, तसेच मुळाच्या कक्षेतूनही पालाशचा निचरा झालेला असल्याने त्या सोबतच मॅग्नेशिअमचीही कमतरता दिसून येते. अशा या परिस्थितीमध्ये पानांमध्ये आवश्यक असलेले प्रकाश संश्‍लेषण होत नाही. पाण्यात सोडिअम क्षाराचे प्रमाण जास्त असलेल्या बागेत या स्थितीत पाने काळी पडताना दिसतील. ज्या बागेत सध्या पिवळी पाने दिसत आहेत, तिथे फळछाटणी झाल्यानंतर गोळी घड निघेल किंवा एकाच घडातील मण्याच्या  आकारात फरक दिसून येईल. ही परिस्थिती मुख्यतः पालाश व मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे दिसते.  उपाययोजना 

  • देठ परिक्षण महत्त्वाचे असेल. साधारणतः खरड छाटणीनंतर ४५ व्या दिवशी पाचव्या पानाचे देठ तपासणीसाठी घेतो. परंतु आता काडी परिपक्वतेची अवस्था सुरू झालेली असल्यास सातव्या ते आठव्या पानाचे देठ तपासणीसाठी घ्यावे. 
  • सल्फेट स्वरूपातील पोटॅश व मॅग्नेशिअम तीन ते पाच ग्रॅम  प्रति लिटर या प्रमाणे दोन ते तीन फवारण्या करून घ्याव्यात. उदा. ०-०-५० हे खत ४ ग्रॅम किंवा ०-४०-३७ हे खत ३ ग्रॅम किंवा ०-५२-३४ हे खत ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी, व मॅग्नेशिअम सल्फेट ४ ते ५ ग्रॅम प्रति लिटर इ.
  • बऱ्याच परिस्थितीमध्ये बागेत चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे वेलीवर पालाश व मॅग्नेशिअमची कमतरता दिसून येते. तेव्हा जमिनीतील विपरीत परिस्थितीवर मात करण्याच्या उद्देशाने बोदामध्ये सल्फर चुनखडीच्या प्रमाणानुसार योग्य प्रमाणात  मिसळून घ्यावे. साधारणतः एकरी ४० ते ५० किलो सल्फर मिसळता येईल. फळछाटणीच्या १५ दिवसांपूर्वी शेणखतामध्ये मिसळून सल्फर तितक्याच मात्रेत मातीत मिसळावे. 
  • काही भागांत आगाप छाटणीची वेळ जवळ आली आहे. या स्थितीत माती व पाणी परीक्षण करून घ्यावे.
  • - डॉ. अजयकुमार उपाध्याय,   ०२०-२६९५६०४०, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com