द्राक्ष बागेत खुंट रोपांचे व्यवस्थापन...

सध्याच्या स्थितीत द्राक्ष लागवड असलेल्या विभागामध्ये पाऊस पडत आहे किंवा पावसासाठी वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत वाढीच्या अवस्थेत असलेल्या विविध द्राक्ष बागांचे योग्य नियोजन आवश्यक आहे.
द्राक्ष बागेतील वेलीचा वाढलेला जोम
द्राक्ष बागेतील वेलीचा वाढलेला जोम

सध्याच्या स्थितीत द्राक्ष लागवड असलेल्या विभागामध्ये पाऊस पडत आहे किंवा पावसासाठी वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत वाढीच्या अवस्थेत असलेल्या विविध द्राक्ष बागांचे योग्य नियोजन आवश्यक आहे. द्राक्ष बागेत कलम करण्याचा कालावधी जवळ येत असून, खुंट रोपांचे व्यवस्थापन या वेळी महत्त्वाचे असेल. जानेवारी-मार्च दरम्यान लागवड केलेले खुंटरोप विविध कारणांमुळे लहान राहिले असेल. दुसऱ्या परिस्थितीत या रोपांचे व्यवस्थापन चांगले झाल्यामुळे बऱ्याचशा फुटी एकाच ठिकाणी निघालेल्या दिसतील. कलम करण्याकरिता साधारणतः तीन ते चार फुटी राखल्या जातात. ज्या ठिकाणी फुटींची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणच्या फुटी कमी करणे गरजेचे असले तर अशक्त असलेल्या फुटींचे व्यवस्थापन करून आवश्यक त्या फुटींची जाडी मिळवून घेणे गरजेचे असेल.

  •  कलम करण्याचा कालावधी हा १५ ऑगस्टनंतर सुरू होतो. कलम करण्याकरिता खुंट काडीची जाडी ही जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरावर ८ ते १० मिलिमीटर असावी. ही काडी पूर्ण परिपक्व असल्यास काडीत रसनिर्मिती कमी होते. परिणामी, कलम यशस्वी होण्यास अडचणी येतात. त्याकरिता खुंट काडी अर्धी परिपक्व राहील, अशा प्रकारचे नियोजन करावे.
  • ज्या ठिकाणी जास्त फुटींची संख्या आहे. अशा खुंट रोपांचा काड्या आजच कमी केल्यास, येत्या एक महिन्यात जाडी किती मिळेल याचा अंदाज जर घेता आला तरच फुटींची संख्या कमी करावी. अन्यथा, सर्व फुटी तशाच राहू द्याव्यात.
  • कलम करण्याच्या ३ ते ४ दिवसांपूर्वी आवश्यक त्या फुटी कमी करून इतर फुटी बांबूला बांधून घ्याव्यात. ज्या ठिकाणी जास्त अशक्त (६ ते ७ मिलिमीटर जाड काडी) फुटी आहेत. अशा ठिकाणी मात्र विरळणी करून मोजक्याच तीन फुटी राखाव्यात.
  • गर्दी जास्त असलेल्या ठिकाणी जाड काडी तशीच राहू दिल्यास ती काडी लवकर परिपक्व होईल. तसेच त्या काडीमध्ये रस निर्मितीचा अभाव होईल. अशा काड्या या वेळेस काढून घेता येतील.
  • एकदम लहान, कमी व अशक्त असलेल्या खुंट रोपाच्या खुटी वाढवून घेणे फार महत्त्वाचे असेल. आपल्याकडे सध्या एकच महिना शिल्लक असल्यामुळे काटेकोरपणे व्यवस्थापन महत्त्वाचे असेल.
  • बऱ्याच वेळा ही खुंट रोपांची वाढ होत नसलेल्या ठिकाणी मुळी काम करत नसल्याचे दिसून येते. काही परिस्थिती भारी व चिबड जमीन असल्यामुळे मुळींना कार्य करता आले नाही, मुळी काळी पडली असेल.
  • दुसऱ्या परिस्थितीत जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुळीची वाढ झाली नाही. परिणामी, अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकला नाही. बागेत अशा ठरावीक जागेवर अशी परिस्थिती दिसून येईल. तेव्हा या रोपांच्या मुळांच्या भोवती कुदळीने किंवा खुरपीने खोदून मुळांभोवतालची जागा मोकळी करावी. माती घट्ट असलेल्या परिस्थितीत थोडेफार शेणखत मिसळावे. शेणखत मिसळून घेतल्यास मुळांभोवती वातावरण मोकळे करून घेण्यास मदत होईल. चुनखडी असलेल्या परिस्थितीत जमिनीमध्ये सल्फर मिसळावे.
  • पाऊस नसलेल्या परिस्थिती जास्त प्रमाणात पाणी न देता मोजकेच पाणी द्यावे. या वेळी खुंट रोपांची मुळे खोलपर्यंत गेली असल्यामुळे सध्या पाणी मोजकेच दिल्यास फायद्याचे होईल.
  • युरिया किंवा अमोनिअम सल्फेट किंवा डीएपीचा वापर या वेळी फायद्याचा राहील. कमी प्रमाणात परंतु जास्त वेळा या खतांची उपलब्धता केल्यास वाढ चांगली होण्यास मदत होईल.
  •  पाऊस जास्त प्रमाणात झालेल्या बागेत तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव तितक्याच प्रमाणात दिसून येईल. या रोगाचे बीजाणू पानांमधून रस शोषून घेतात व त्यामुळे पानांतील हरितद्रव्य संपून जाते. परिणामी, पान सुकून गळून पडते. अशा काडीमध्ये रस मुळीच नसतो व त्यामुळे कलम यशस्वी होत नाही. यावर महत्त्वाच्या उपाययोजना म्हणजे कॉपरयुक्त बुरशीनाशकांची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी किंवा क्‍लोरोथॅलोनील दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येईल.
  • जुन्या बागेतील व्यवस्थापन 

  • गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा जास्त प्रमाणात वाढला आहे. त्यासोबतच आर्द्रतासुद्धा जास्त प्रमाणात वाढली आहे. परिणामी, वेलीमधील जिब्रॅलिकचे प्रमाण जास्त झाल्यामुळे फुटींची वाढ जोमात होताना दिसून येईल. शेंड्याकडील भागाचे निरीक्षण केल्यास पेऱ्यातील अंतर वाढताना दिसून येईल. त्याचसोबत परिपक्व होत असलेल्या काडीवर बगल फुटीसुद्धा तितक्याच जोमाने वाढल्याचे दिसून येईल.
  • कॅनॉपीची गर्दी जास्त झाल्यामुळे आर्द्रता वाढून डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव दिसून येईल. सलग पाऊस सुरू असल्यास शेंड्याकडील फुटींवर करपा रोगाचा प्रादुर्भाव तितक्याच प्रमाणात वाढेल. यामुळे काडीची परिपक्वता लांबणीवर जाईल. परिणामी, काडीमध्ये अन्नद्रव्यांचा साठा गोळा करण्यास अडचणी येतील. या परिस्थितीत खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात .
  •  शेंडा पिंचिंग करून घ्यावा : हार्ड पिंचिंग होणार नाही याकडे लक्ष द्यावे. अन्यथा, त्यानंतर निघालेल्या नवीन फुटीवर नवीन घड निघायला सुरुवात होते. तेव्हा फक्त शेंड्याकडील फुटींवर टिकली मारावी.
  •  बगल फुटी काढून घ्याव्यात आणि प्रत्येक फूट तारेवर बांधून घ्यावी. असे केल्यास कॅनॉपी मोकळी होऊन हवा खेळती राहील यामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होईल.
  • काडी परिपक्व होण्याकरिता पालाशची उपलब्धता करावी. ०:४०:३७ तीन ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे तीन ते चार फवारण्या घ्याव्यात. व जमिनीतून २ ते अडीच किलो प्रति एकर याप्रमाणे ठिबकद्वारे तीन ते चार वेळा द्यावे.
  • या वेळी वातावरणात आर्द्रता जास्त वाढल्यामुळे जैविक नियंत्रणाचा वापर फायद्याचे ठरेल. यासाठी ट्रायकोडर्मा बुरशनाशकाचे जमिनीतून २ ते अडीच लिटर प्रति एकर ड्रेंचिंग करावे. तसेच २ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून तीन ते चार फवारण्या कराव्यात.
  • संपर्क ः ०२०-२६९५६०००, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com