द्राक्षातील खरड छाटणीची पूर्वतयारी

पुढील वर्षीच्या दर्जेदार व वजनदार द्राक्ष उत्पादनासाठी खरड छाटणी महत्त्वाची असते. खरड छाटणी पूर्वी नियोजनही महत्त्वाचे असते. आम्ही साधारणपणे पुढील प्रकारे नियोजन करतो.
grapes advisory
grapes advisory

सध्या बऱ्याच बागांमध्ये फळछाटणी पूर्ण होत आहे. द्राक्ष फळे तयार झाल्यानंतर वेलीवर जास्त दिवस ठेवल्यास वेलीवर ताण येतो. त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या उत्पादनावर होऊ शकतो. म्हणून द्राक्ष पीक तयार झाल्यावर आठ ते दहा दिवसांत माल काढून घ्यावा. पुढील वर्षीच्या दर्जेदार व वजनदार द्राक्ष उत्पादनासाठी खरड छाटणी महत्त्वाची असते. खरड छाटणी पूर्वी नियोजनही महत्त्वाचे असते. आम्ही साधारणपणे पुढील प्रकारे नियोजन करतो. द्राक्ष पीक काढल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. मुरमाड व मध्यम जमिनीत मोकळे पाणी दिल्यास द्राक्ष काढणीनंतर मुळाचा विकास चांगल्या प्रकारे होतो. वेलीमध्ये अन्नसाठा तयार होण्यास मदत होते. या अन्नसाठ्यावरच खरड छाटणीनंतरची काडीची योग्य जाडी व घडनिर्मिती अवलंबून असते. खोल काळ्या जमीन असल्यास द्राक्षे काढणीनंतर बागेत पाणी साचणार नाही इतपत हलके पाणी द्यावे. ते शक्य होत नसेल तर ठिबकद्वारे थोडे जास्त पाणी द्यावे. नंतर छाटणीपर्यंत हलका ताण राहील, असा पाणी पुरवठा ठेवावा. जादा पाणी झाल्यास किंवा थोडाही ताण पडणार नाही असे पाणी सतत दिल्यास छाटणी अगोदरच बाग फुटायला लागते. नव्या फुटींची वाढ होऊन अन्नसाठा वाया जातो. त्याच प्रमाणे छाटणीनंतर बाग एकसारखी फुटत नाही. कमजोर फुटी निघतात. पानांची काळजी  द्राक्ष निघाल्यानंतर काही काळ बागेकडे दुर्लक्ष होऊ शकतो. थोड्याशा दुर्लक्षामुळे या काळात पानांवर लाल कोळी, भुरी यांचा प्रादुर्भाव होऊन पाने खराब होतात. कीड किंवा रोगग्रस्त पाने पुरेसे अन्न तयार करू शकत नाहीत. छाटणी आधी पुरेसा अन्नसाठा तयार करून घेण्याचे उद्दिष्ट मागे पडू शकते. अन्नसाठ्याअभावी खरड छाटणीनंतर घडनिर्मिती कमी होते. वेलींची पाने तजेलदार व कार्यक्षम राहण्यासाठी मॅग्नेशिअम सल्फेट ३ ग्रॅम याप्रमाणे एक फवारणी करावी. त्यानंतर भुरी व लाल कोळी नियंत्रणासाठी सल्फरची (२ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे) एक फवारणी उपयुक्त ठरते. प्रादुर्भाव वाढला तर १० ते १२ दिवसांनी पुन्हा एखादी फवारणी घेता येईल. वरंबे व त्यांचे नियोजन  खरड छाटणी अगोदर आठ ते पंधरा दिवस गरजेनुसार वरंबे छोटे किंवा मोठे करावयाचे असतील तर करून घ्यावेत. रुंद वरंबे कमी करताना मुळे कमीत कमी तुटतील असे पाहावे. छाटणी आधी बारा ते पंधरा दिवस नवीन मुळ्यांचा विकास होऊ द्यावा. नंतरच छाटणी करावी. म्हणजे छाटणीनंतर मुळांद्वारे पुरेशा प्रमाणात वेलींना अन्नसाठा होत राहील. ओलांड्याचे नूतनीकरण  खरड छाटणी अगोदर जे ओलांडे मृत झालेले असतील ते काढून टाकावेत. तिथे जवळची काडी ओलांडा म्हणून बांधून घ्यावी. हे काम छाटणीआधीच पूर्ण करावे. छाटणी करताना मजुरांकडून हे काम व्यवस्थित होत नाही. ओलांड्याचे नूतनीकरण राहून जाते. याचा विपरीत परिणाम मिळणाऱ्या वजनावर परिणाम होतो. जिथे ओलांडे आधीपासूनच वाढवायचे राहून गेले आहेत, अशा ठिकाणी ते वाढवण्याची ही सर्वांत योग्य वेळ ठरते. ओलांडे वाढविण्यासाठी खरड छाटणीआधी ओलांडे म्हणून नवीन काड्या बांधून घ्याव्यात. छाटणीपूर्वी विसावा  द्राक्षे काढून झाल्यानंतर बागेस किमान आठ ते दहा दिवस (शक्य असल्यास कमाल महिनाभर) विसावा दिला पाहिजे. विसाव्याच्या काळात वेलीमध्ये अन्नसाठा तयार होत राहतो. त्या अन्नसाठ्यावरच खरड छाटणीनंतरची घडनिर्मिती अवलंबून असते. अनेक वेळा बाग उशिरा (१५ एप्रिलनंतर) खाली झाल्यास विसाव्याकरिता कालावधी उपलब्ध राहत नाही. अशा वेळी बागेमध्ये छाटणीचा निर्णय लवकर घ्यावा लागतो. किमान चार पाच दिवस तरी विसावा द्यावा. कारण २५ एप्रिल नंतर किंवा मेमध्ये खरड छाटणी केल्यास व पावसाळा वेळेवर (सात जूनला) सुरू झाल्यास मालकाडी तयार होण्यात अडचणी येतात. खरड छाटणीचा कालावधी  खरड छाटणीचा सर्वांत योग्य कालावधी म्हणजे २५ मार्च ते ५ एप्रिल. तरी १५ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत केलेल्या खरड छाटणीत मालकाडी तयार होण्यात विशेष अडचण येत नाही. मात्र १५ एप्रिलनंतर केलेल्या खरड छाटणीत पाऊस लवकर आला, तर रोगांचे प्रमाण वाढते. त्यांचे वेळीच नियंत्रण करून पाने चांगली चांगली ठेवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. उशिरा छाटणी केल्यावर मांडवावर दर चौरस फुटाला एक काडी याप्रमाणे कमी काड्या ठेवाव्यात. ‘वाय’मध्ये दोन चौरस फुटास एक याप्रमाणे कमी काड्या ठेवाव्यात. यामुळे पानांची गर्दी होत नाही. ८० टक्के पाने व डोळ्यांना सूर्यप्रकाश मिळतो. घडनिर्मिती होण्याच्या शक्यता वाढतात. खरड छाटणीतील काड्यांचा खत म्हणून वापर  अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठामधील द्राक्ष तज्ज्ञ डॉ. विंक्लर यांच्या जनरल विटी कल्चर या पुस्तकातील संदर्भानुसार, द्राक्ष बागेतून फक्त द्राक्ष घडांचे उत्पादन आपल्याला घ्यावयाचे आहे. तेवढेच शेताबाहेर गेले पाहिजे. त्याव्यतिरिक्त सर्व पाने, काड्या, देठ इ. सर्व द्राक्ष वेलीचे अवशेष पुन्हा द्राक्ष पिकास बारीक चुरा करून दिल्यास पिकाची खताची गरज ९७ टक्क्यांपर्यंत भागू शकते. या लेखकाने द्राक्षाच्या खरड छाटणीतील काड्यांचे वजन केले. एकरी २४०० किलो वजन भरले. त्यातील अन्नद्रव्ये तपासणी करून घेतली. फळ छाटणीतील ९५० किलो वजन भरले. म्हणजेच दोन्ही मिळून ३३५० किलो बायोमास उपलब्ध होते. त्यापैकी काही काड्या मजुरांकडून उचलल्या गेल्या आणि केवळ दोन हजार किलो काड्या शेतातच कुजतील, असे गृहीत धरले तरी त्यापासून वार्षिक ३० किलो नत्र, ७.४ किलो स्फुरद, २० किलो पोटॅश, ३१ किलो कॅल्शिअम, ६.४ किलो मॅग्नेशिअम, १.२ किलो सल्फर, २९८ ग्रॅम झिंक, १५६ ग्रॅम कॉपर हे घटक सेंद्रिय स्वरूपात उपलब्ध होतात. १८०० किलो सेंद्रिय खत उपलब्ध होते. याचा विचार केल्यास एकूण रासायनिक खतामध्ये किमान ५० टक्के बचत नक्कीच होऊ शकते. मी स्वतः १९९९ पासून काड्यांचा चुरा करून बागेस देत आहे. (अधिक माहितीसाठी ः द्राक्ष शेतीचे तंत्र मंत्र, सकाळ प्रकाशन.) काड्यांचा चुरा किंवा खत करताना ट्रॅक्टरच्या रोटर किंवा अन्य यंत्राचा वापर शक्य असून, त्याचा चांगला फायदा होतो. -  वासुदेव काठे, ९९२२७१९१७१ (लेखक नाशिक येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार, प्रयोग परिवाराचे महाराष्ट्र समन्वयक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com