द्राक्ष वेलीच्या निरीक्षणावरून ठरवावे पाणी प्रमाण

खरड छाटणीमध्ये वेलाचे निरीक्षण करून पुढील लक्षणांवरून बागेतील पाण्याचा अंदाज घेता येतो.
grapes advisory
grapes advisory

खरड छाटणीमध्ये वेलाचे निरीक्षण करून पुढील लक्षणांवरून बागेतील पाण्याचा अंदाज घेता येतो.

  •  छाटणीच्या वेळेस सहा-सात तास पाणी दिल्यावर बाग फुटताना म्हणजे १८ ते २० दिवसांनी पाणी द्यावे.
  •  त्यानंतर फुटी पंधरा दिवसांच्या झाल्यावर सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत पाने सुकल्यास पानांवर ताण जाणवल्यास पाणी दिले पाहिजे.
  •  वाढणाऱ्या फुटीचा शेंडा वाकडा असल्यास पाणी जास्त होते असे समजावे. अशा वेळेस शेंडा सरळ होईपर्यंत पुढील पाण्याची पाळी देण्याचे थांबवावे.
  • वाढणाऱ्या फुटीच्या पेराची जाडी जास्त असल्यास पाणी जास्त होत असल्याचे समजावे. ते घडनिर्मिती करता योग्य नसते. दोन पाणीपाळीतील अंतर वाढवावे किंवा पाण्याचे तास कमी करावे.
  •  वाढणाऱ्या फुटीच्या बाळ्या (तनावे) जाड व जोमाने वाढत असल्यास, तसेच त्यांचे पुढील दोन टोके वाकडी असल्यास पाणी जास्त होत असल्याचे समजावे. वरील लक्षणे फळ छाटणीनंतर असल्यास योग्य पाणीपुरवठा समजावा.
  • घडनिर्मितीस योग्य पाणी असल्याची लक्षणे 

  •  नव्याने वाढणारा फुटीचा शेंडा वाकडा न राहता सरळ असावा.
  •  दोन पेऱ्यांतील अंतर हाताच्या बोटाच्या दोन पेरांएवढे म्हणजे दोन ते अडीच इंच असावे.
  •  बाळीत जोम कमी असावा किंवा त्या गळून पडत असाव्यात.
  • सक्षम घडनिर्मिती करता फुटींच्या जोमानुसार पाणी व्यवस्थापन  घडनिर्मिती करता खरड छाटणीनंतर मध्यम जोमात बाग फुटली पाहिजे. याकरिता खरड छाटणीनंतर सबकेन होईपर्यंत व नंतर सबकेन फुटताना पाण्याचा ताण नसावा. म्हणजे फुटींची संख्या योग्य प्रमाणात येते. नंतर सबकेनही चांगले व लवकर फुटतात. सबकेन फुटून २ ते ४ पानांवर आल्यापासून तर सबकेनची पुढील आठ नऊ पाने येऊन टॉपिंग होईपर्यंत मध्यम प्रमाणात पाणी दिले पाहिजे. मालकाडीस पाणी कमी होते की जास्त, हे ओळखण्याच्या खुणा 

  • जर नव्या फुटीचा शेंडा अति जोमदार असेल तर तो टोकाकडे वाकडा असतो. (फोटो क्रमांक १) असे असल्यास पाणी, नत्र व जोम जास्त असल्याचे समजावे. अशा वेळेस मुरमाड जमिनीत व मध्यम जमिनीत पाणी देण्याचे तास कमी करावेत किंवा पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढवावे. दोन फूट किंवा त्यापेक्षा जास्त खोल काळ्या मातीच्या जमिनीत पुढील पंधरा ते वीस दिवस पाणी देणे बंद करावे. पुढे ज्या वेळी शेंड्याची वाढ थांबेल, शेंडा वाकडा न होता सरळ राहील, (फोटो क्रमांक २) अशा वेळी हलके पाणी देणे सुरू करावे.
  • खोल काळ्या जमिनीस जास्त पाणी झाल्यास जमिनीत पाण्याचा ताण तयार होण्यास १५ ते २० दिवस लागतात. तोपर्यंत मालकाडीची वाढ बरीच पूर्ण होत आलेली असते म्हणून खोल काळ्या जमिनीत पाणी फारच जपून दिले पाहिजे.
  • सबकेनची मालकाडी तयार होत असताना सबकेन फुटताना जोम फारच कमी असल्यास पाण्याचा जास्त ताण पडल्याचे समजावे. अशा परिस्थितीत घडनिर्मिती कमी होईल. अशा पाण्याच्या ताणाच्या परिस्थितीत सबकेन फारच हळू फुटतात. सबकेन फुटल्यानंतर त्यांचे शेंडे थांबतात. सबकेनच्या मागील मुख्य काडीचे पक्के झालेले पान सकाळी नऊ ते दहा दरम्यान ऊन कमी असताना सुकल्याचे दिसल्यास पाणी त्वरित पाणी वाढवले पाहिजे. मध्यम ते कमी जोमाने फुटी वाढतील, अशी पाण्याची स्थिती ठेवावी. सबकेन फुटल्यापासून ते सबकेनचा शेंडा बंद करेपर्यंत मध्यम पाणीपुरवठा करावा.
  • घडनिर्मितीच्या कालावधीत पानांच्या निरीक्षणानुसार पाणी व्यवस्थापन  खरड छाटणीनंतर बाग फुटल्यानंतर सरासरी दहा पाने आल्यावर आपण सबकेन करण्यासाठी सहा पानांवर शेंडा मोडतो. शेंडा मोडल्यानंतर चार ते पाच दिवसांत नवीन बगलफुटी येण्यास सुरुवात होते. नवीन बगलफुटी दोन तीन पाने आल्यापासून पुढे ६० दिवस घडनिर्मितीसाठी महत्त्वाचा कालावधी असतो. मेनकेन असेल तर बाग फुटल्यापासून म्हणजे २० ते ८० दिवस असा एकूण ६० दिवस कालावधी असतो. या कालावधीमध्ये घडनिर्मितीसाठी जास्त किंवा कमी पाणी (अति ताण) नसावे. सबकेनला २ ते ४ पाने आल्यापासून ते टॉपिंगपर्यंत सबकेन मागील मुख्य काडीचे पान सकाळी दहा ते दुपारी चार या काळात थोडेसे सुकलेले दिसत असेल आणि संध्याकाळी साडेपाच ते सकाळी नऊपर्यंत तजेलदार दिसत असेल, तर घडनिर्मितीकरिता योग्य पाणीपुरवठा असल्याचे समजावे. या उलट मुख्य काडीची पाने दुपारच्या वेळी न सुकल्यास पाणी जास्त होत असल्याचे समजावे. पाने सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुकलेली राहिली तर पाणी कमी पडत असल्याचे समजावे. पाण्याच्या उपलब्धतेसाठी पानांचे निरीक्षण करताना कोवळ्या पानांऐवजी मुख्य काडीच्या पक्क्या पानांकडे लक्ष द्यावे. आधी पक्की पाने सुकतात. पाण्याचा अति ताण पडला तरच कोवळी पाने सुकतात. एवढा ताण घडनिर्मितीस घातक असतो. म्हणून मुख्य काडीच्या पानांचे निरीक्षण करून त्यानुसार पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा. खरड छाटणीनंतर घड निर्मितीसाठी द्राक्ष जातीनुसार करावयाचे सिंचनातील बदल  आतापर्यंत आपण घेतलेली पाणी व्यवस्थापनाची सर्व माहिती थॉमसन सीडलेस, शरद सीडलेस, सोनाका या द्राक्ष जातीसाठी उपयोगी ठरते. मात्र नानासाहेब पर्पल, जम्बो व सुधाकर सीडलेस या द्राक्ष जातीकरिता थोडे बदल करावे लागतील. १) नानासाहेब पर्पल, जम्बो जातीसाठी पाणी व्यवस्थापन  थॉमसन, शरद सीडलेसपेक्षा नानासाहेब पर्पल, जम्बो या द्राक्ष जातीस घडनिर्मितीकरिता ३० टक्क्यांपर्यंत अधिक पाणी लागते. थॉमसन द्राक्ष जातीत सबकेन केल्यानंतर सबकेन फुटून दोन-तीन पानांवर आल्यापासून तर सबकेनचा शेंडा बंद करेपर्यंत आपण बागेस पाण्याचा मध्यम ताण देतो. या कालावधीत नानासाहेब पर्पल, जम्बो द्राक्ष जातीस पाणी कमी केल्यास घडनिर्मिती कमी होते, म्हणून या कालावधीत या द्राक्ष जातीचे पाणी कमी करू नये. या द्राक्ष जातीमध्ये आनुवंशिक जोम कमी असल्याने शेंडे हळू चालतात, पेरे मध्यम पडतात, यांची पेरेही थॉमसनपेक्षा छोटे असतात. घडनिर्मितीच्या कालावधीमध्ये या द्राक्ष जातीस व त्यांच्या मागील मुख्य काडीचे पान सकाळी दहा ते चार या कालावधीतही सुकायला नको. मात्र नव्या वाढणाऱ्या शेंड्याची जाडी जास्त असेल, शेंडा वाकडा असेल, तर पाणी फारच जास्त होत असल्याचे लक्षात घ्यावे. ते कमी करावे. २) सुधाकर सीडलेसचे खरड छाटणीतील पाणी व्यवस्थापन    घडनिर्मितीकरिता थॉमसन द्राक्ष जातीस जेवढे पाणी लागते, त्याच्यापेक्षा २० टक्के कमी पाणी सुधाकर सीडलेस द्राक्ष जातीस घडनिर्मितीकरिता पुरेसे होते. काही प्रयोगातील निरीक्षण

  •  कमी पाण्यात ज्या वेळी थॉमसनची पाने सुकत होते, त्या वेळी सुधाकर सीडलेसचे पान सुकलेले नव्हते.
  •  ज्या वेळी पाणी कमी पडून थॉमसनचे शेंडे थांबले होते, टॉपिंग करावी लागली नाही, त्या वेळी सुधाकर सीडलेसचा शेंडा चांगला चालू होता. तो बंद करावा लागला. काडीस सोळा-सतरा पाने आलेली होती, म्हणजे योग्य वाढ झाली होती.
  • - वासुदेव काठे, ९९२२७१९१७१ (लेखक कृषी पदवीधर असून, दाभोळकर प्रयोग परिवार, महाराष्ट्र राज्य, मुख्य समन्वयक आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com