पूरक उद्योगातून गटाने तयार केली ओळख

देवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील महिलांनी एकत्र येऊन ओम महिला बचत गटाची सुरुवात केली. गटाच्या माध्यमातून सदस्यांनी पाच वर्षांत पूरक उद्योगांना सुरुवात करत कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम केली आहे.
Savita Katkar while doing motor repair work.
Savita Katkar while doing motor repair work.

देवनाळ (ता. जत, जि. सांगली) गावातील उपक्रमशील महिलांनी एकत्र येऊन ओम महिला बचत गटाची सुरुवात केली. गटाच्या माध्यमातून सदस्यांनी पाच वर्षांत पूरक उद्योगांना सुरुवात करत कुटुंबाची आर्थिक स्थिती भक्कम केली आहे. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील सुमारे तीन हजार लोकसंख्येचे देवनाळ गाव. गावशिवारात बहुतांश अल्पभूधारक शेतकरी. कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. याच गावातील प्रयोगशील महिलांनी आर्थिक प्रगतीसाठी बचत गट स्थापन करून शेतीपूरक व्यवसायाला सुरुवात केली. काही महिलांनी गटाच्या माध्यमातून स्वतः लहान मोठे व्यवसाय उभे केले आहेत. गटामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याची जिद्द आणि आर्थिक बचतीची सवय देखील लागली.  महिला गटाची सुरुवात 

  • साधारणपणे २०१३ मध्ये देवनाळ गावातील चौदा महिलांनी ओम महिला बचत गटाची सुरुवात केली. प्रयोगशील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून पूरक उद्योगाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात प्रत्येक सदस्याने प्रति महिना २५ रुपयांची बचत करण्यास सुरुवात केली. प्रत्येक सदस्याची दर महिना चांगली आर्थिक बचत होऊ लागली. घरामध्ये पैशांची गरज भासेल त्या पद्धतीने सदस्यांनी बचत गटातून कर्ज घेण्यास सुरुवात केली. काही सदस्यांनी शेतीसाठी पैसा उभा केला. टप्प्याटप्प्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड होऊ लागली. आपण घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकतो, अशा विश्‍वास महिलांमध्ये तयार झाला. 
  • सध्या द्राक्षायनी कुंभार गटाच्या अध्यक्षा आणि आक्काताई कुंभार सचिव म्हणून कार्यरत आहेत. गटामध्ये धनश्री कुंभार, शांता जिड्डी, कमला कुंभार, सुमन हंजी, उज्ज्वला कुंभार, पूजा कुंभार, सविता काटकर, सुनिता शिंदे, मीनाक्षी काटकर, धानाक्का जिड्डी, धानाम्मा मुधोळ या सदस्या आहेत. सर्व महिला सदस्या एकोप्याने गटाची धुरा सांभाळतात.
  • व्यवसायाची निवड  केवळ बचत करून आर्थिक प्रश्‍न सुटणार नव्हता. त्यासाठी शेतीपूरक व्यवसाय आणि स्वतःच्या कुटुंबासाठी जोडधंदा सुरू करणे हा उद्देश बचत गटातील सदस्यांनी डोळ्यासमोर ठेवला. दोन वर्षांनंतर जिल्हा परिषदेकडील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हा गट महामंडळाकडे जोडला. कन्याकुमारी बिराजदार यांनी गटातील सर्व सदस्यांची बैठक घेऊन कोणता शेतीपूरक व्यवसाय सुरू करता येईल याचे मार्गदर्शन केले. चर्चेमुळे गटातील महिलांनी आपण कोणता जोडधंदा सुरू करू शकतो किंवा कोणत्या शेतीपूरक व्यवसायाची उभारणी करू शकतो  याचा अभ्यास सुरू केला. गटातील प्रत्येक सदस्याने गरजेनुसार शेळीपालन, म्हैस-गाय पालन, कपड्यांचे दुकान, बेकरी असे व्यवसाय निवडले. पंप दुरुस्तीमध्ये पारंगत  पंप दुरुस्तीच्या व्यवसायाबाबत सविता काटकर म्हणाल्या, की माझे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. माझे पती वीस वर्षांपासून शेतीपंपासह अन्य विद्युत मोटार दुरुस्तीचे काम करतात. मी पतींकडून मोटार दुरुस्तीचे काम शिकले आणि घरातच विद्यूत मोटार दुरुस्त करू लागले. पण यासाठी भांडवल कमी पडत असल्याने बचत गटाचा आधार मिळाला. गटाकडून कर्ज घेऊन पंप दुरुस्तीला लागणारे साहित्य घेऊन वेळेत कामे पूर्ण करू देऊ लागले. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोटार दुरुस्तीची मोठ्या प्रमाणात मागणी सुरू झाली आणि आर्थिक उत्पन्नात वाढदेखील झाली.  पशुपालनास प्रारंभ 

  •  गटातील सदस्या आक्काताई कुंभार आणि सुमन हंजी यांना शेतीची आवड आहे. त्यांच्या कुटुंबाची शेती असल्यामुळे त्यांनी म्हैस, गाईपालन हा व्यवसाय करण्याचे ठरविले. आक्काताई यांनी संकरित गाई आणि सुमन यांनी म्हैस घेतली. गाई, म्हशींचे योग्य व्यवस्थापन केल्याने दुधाचेही चांगले उत्पादन मिळू लागले. दूध विक्रीतून आर्थिक आधार मिळाला.
  • द्रोपती कुंभार, पूजा कुंभार यांनी शेळीपालन सुरू केले. बाजारपेठेच्या मागणीनुसार बोकडांची विक्री केली जाते. प्रति बोकडास वजनानुसार ७ ते ८ हजार रुपयांचा दर मिळतो. येत्या काळात द्रोपती कुंभार यांनी मोठा शेळीपालन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून सध्या शेडची उभारणी केली आहे.
  • बचत गट ठरला फायद्याचा  गटाच्या प्रगतीबाबत सविता काटकर म्हणाल्या, की बचत गटातील सदस्यांना मागणीनुसार कर्जाचे वाटप केले जाते. गटातील सदस्या वेळेत कर्ज भरतात. व्याजातून जी रक्कम येते, ती सदस्यांना समान दिली जाते. त्यामुळे महिलांना आर्थिक आधार मिळतो. सुरुवातीला गटाला बॅंकेकडून १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज मिळाले. त्यांनतर तीन लाख, सात लाख आणि दहा लाख असे कर्ज मिळाले. कर्ज मिळाल्यानंतर बॅंकेच्या अधिकाऱ्यांकडून सामाजिक अकेंक्षण म्हणजे प्रत्यक्ष येऊन दिलेल्या कर्जातून नव्या केलेल्या गोष्टींची पाहणी केली. सदस्यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केल्याने बॅंकेत बचत गटाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. बचत गटामुळे महिलांमध्ये आर्थिक स्थिरता आली. नवनवीन पूरक व्यवसायाला चालना मिळाली.  कपडे विक्री आणि किराणामाल दुकानाची सुरुवात 

  • गटातील सदस्या धनश्री कुंभार यांनी साडी, कपडे विक्री दुकान सुरू केले आहे. यासाठी गटाकडून सुरुवातीला ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून फायदा होऊ लागला. त्यानंतर ७५ हजार रुपयांचे कर्ज मिळाले. महिन्याकाठी ४० ते ५० हजार रुपयांची उलाढाल होते. यातून खर्च वजा जाता महिन्याला १० ते १५ हजार रुपये निव्वळ नफा राहतो.
  • द्राक्षायनी कुंभार यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले. महिन्याकाठी ५० हजार रुपयांची उलाढाल होते. त्यातून १५ हजार रुपये नफा मिळतो. होलसेल किराणा दुकान असल्याने परिसरात विक्रीसाठी त्यांचे पती कुबेर यांची मदत होते.
  • प्रतिक्रिया महिला बचत गटामुळे आम्हाला आमच्या आवडीचे व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली. कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर सदस्यांची आर्थिक प्रगती सुरू आहे. व्यवसाय वाढीसाठी जिल्हा परिषद विभागाकडून माहिती मिळत आहे.  - द्राक्षायनी कुंभार  ७४९९६०७५३५ (अध्यक्षा, ओम महिला बचत गट)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com