agricultural news in marathi Implement effective irrigation measures in summer for sugarcane crop | Agrowon

उन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन उपाययोजना

अरुण देशमुख
रविवार, 21 मार्च 2021

पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व निर्णायक घटक आहे. उन्हाळ्यात पाण्याचे काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन करणे हे ऊस उत्पादनासाठी आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. मात्र ज्या शेतकऱ्यांना ते शक्य नाही, त्यांनी प्रवाही पद्धतीची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवता येईल, याची माहिती या लेखातून घेऊ.
 

पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व निर्णायक घटक आहे. उन्हाळ्यात पाण्याचे काटेकोर नियोजन आणि व्यवस्थापन करणे हे ऊस उत्पादनासाठी आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या शक्य असल्यास ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. मात्र ज्या शेतकऱ्यांना ते शक्य नाही, त्यांनी प्रवाही पद्धतीची कार्यक्षमता कशा प्रकारे वाढवता येईल, याची माहिती या लेखातून घेऊ.

भविष्यामध्ये पाणी या सर्वांत महत्त्वाच्या आणि मूलभूत घटकाची कमतरता वाढत जाणार आहे. पाण्याचा कमीत कमी वापर करून जमिनीची सुपीकता आणि पिकाची उत्पादकता कायम ठेवणे हे आपल्यासमोरील आव्हान ठरणार आहे. एकूण बागायतीपैकी ऊस पिकाखालील क्षेत्र आणि वापरले जाणारे पाणी यामुळे ऊस पीक हे नेहमी टीकेला पात्र ठरते. अशा वेळी पाण्याचा अत्यंत काटेकोर वापर करून अधिक उत्पादन शाश्‍वत स्वरूपात मिळविणे गरजेचे ठरत आहे.  
शेतामध्ये ऊस १२ ते १८ महिने उभा असतो. वाढीच्या काळात या पिकास बदलत्या हवामानाला तोंड द्यावे लागते, त्यामुळे ऊस उत्पादनात चढ-उतार आढळून येतात. हिवाळ्यात अति थंडी तर उन्हाळ्यात अति उष्णता अशा परिस्थितीत ऊस पीक वाढत असते. यामुळे अपेक्षित उत्पादन मिळण्यात अडचणी येतात. त्यातही उन्हाळ्यातील पाण्याचे दुर्भीक्ष हे उत्पादन घटण्यामागील प्रमुख कारण आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, मार्च ते जून या कालावधीत ऊस पिकास पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ताण बसतो. मार्च ते जून या चार महिन्यांत संपूर्ण वर्षातील बाष्पीभवनातील ४० ते ४५ टक्के म्हणजे जवळपास निम्मे बाष्पीभवन होते. तर जुलै ते ऑक्टोबर महिन्यात ३० ते ३५ टक्के आणि उरलेले ३० ते ३५ टक्के हे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात होते.

उन्हाळ्यातील हवामान व मानवनिर्मित अडचणी 

 • भूगर्भातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत जाते.
 • कालवे व उपसा जलसिंचन योजनांखालील पाण्याच्या पाळीतील अंतर वाढत जाते.
 • विजेचा पुरवठा कमी प्रमाणात होतो. भारनियमनात वाढ होते. त्यात खंड पडतो. 
 • हवेतील तसेच जमिनीतील तापमान वाढते. हवेतील तापमान काही वेळा ४५ ते ४८ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. ऊस पिकाचेही तापमान वाढते.
 • वेगवान व शुष्क हवेमुळे जमिनीतील आणि ऊस पिकातील ओलाव्यात झपाट्याने घट होते.
 • एकूणच बाष्पीभवनाचा वेग वाढतो. 
 • उन्हाळ्यात दिवसाचा कालावधी जास्त असतो. दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो म्हणजे रात्रीचे तापमानही वाढलेले असते. 
 • मुळांभोवती तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होते, परिणामी, मुळांद्वारे पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणात घट होते. 
 • उसाच्या पानावरील पर्णरंध्राद्वारे होणारे बाष्पोत्सर्जन (ट्रान्स्पिरेशन) कमालीचे वाढते. 
 • वरील सर्व परिस्थितीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसतो. पिकाची समाधानकारक वाढ होत नाही. पाणीटंचाईमुळे ऊस पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. मुख्यत्वे वाढीच्या अवस्थेत असलेल्या आडसाली व पूर्वहंगामी 
 • उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. अंतिमतः उत्पादनात लक्षणीय घट होते. 

पाण्याच्या ताणाचे दुष्परिणाम 

 • ऊस पिकाची पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात. 
 • मुळांची कार्यक्षमता घटते, त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया मंदावते.
 • अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होऊन पानातील हरितद्रव्यांचे प्रमाण घटते.
 • उसातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात धशीचे प्रमाण वाढते. 
 • पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटते. कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. उसाचे वजन घटते.
 • सुरू हंगामात लागवड केलेल्या व खोडवा पिकात फुटव्यांचे प्रमाण कमी राहते. परिणामी, गाळपलायक उसाच्या संख्येत घट होऊन  उत्पादन कमी येते.

उपाययोजना 

 • ऊस उत्पादनातील घट टाळण्यासाठी प्रवाही सिंचन पद्धतीत खालील उपाययोजनांचा अवलंब फायदेशीर ठरू शकतो. 
 • प्रवाही सिंचन पद्धतीत उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी लांब सरी, एका आड एक सरी किंवा जोड ओळ पट्टा पद्धतीचा वापर करावा. 
 • प्रवाही सिंचनाचे पाट व दांड स्वच्छ ठेवावेत.  
 • मे महिन्यातील उपलब्ध पाणी विचारात घेऊन आपल्या शेतातील ऊस पिकाचे क्षेत्र ठरवले पाहिजे. ते त्यानुसार मर्यादित ठेवावे. 
 • लांब सरी पद्धतीमध्ये दोन पाळ्यांतील अंतर कमी ठेवावे. 
 • प्रत्येक सरीतून उपलब्ध पाण्याचा प्रवाह जास्त खोलीच्या भारी जमिनीत १ ते १.५ लिटर प्रति सेकंद, मध्यम जमिनीत २ ते २.५ लिटर प्रति लिटर पाणी आणि हलक्या जमिनीत २.५ ते ३ लिटर प्रति सेकंद याप्रमाणे विभागून द्यावा.
 • ऊस पिकाची खालील वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. पाचट आच्छादनाने पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर वाढविता येते. किमान पाण्याच्या ३ ते ५ पाळीत बचत होते.
 • शेताच्या बाहेरील बाजूस साधारणपणे एक मीटर पट्ट्याचे पाचट काढू नये.
 • पीक नेहमी तणविरहित ठेवावे. म्हणजे उपलब्ध असलेल्या पाण्यात तण वाटेकरी न होता पाण्याचा उसासाठी पुरेपूर उपयोग होईल.
 • सेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढवावा. पाण्याची उपलब्धता पाहूनच रासायनिक खतांचा वापर करावा.
 • पाण्याचे दुर्भीक्ष असल्याने उसास पोटॅश खताची २५ टक्के मात्रा अधिक द्यावी. 
 • दर २१ दिवसांनी दोन टक्के म्युरेट ऑफ पोटॅश अधिक दोन टक्के युरिया (प्रत्येकी २० ग्रॅम प्रति लिटर पाणी) यांचे मिश्रण करून फवारणी करावी.
 • पाण्याचा ताण असताना रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याऐवजी मल्टिन्यूट्रियंट (मॅक्रो आणि मायक्रो) द्रवरूप खतांच्या १ टक्के (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणे १ महिन्याच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. 
 • पट्टा किंवा जास्त अंतरावरील लागवड पद्धतीत मधल्या पट्ट्यात हलकी आंतरमशागत (कुळवणी) करावी.
 • पाण्याचा ताण असलेल्या परिस्थितीत काणी व गवती वाढ या रोगांचा आणि खोडकीड, कांडी कीड, वाळवी अशा किडीचा प्रादुर्भाव वाढतो. काणी व गवती वाढ रोगग्रस्त बेटे मुळासहित काढून नष्ट करावीत. खोडकिडीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा चिलोनीस या मित्र कीटकाचा अथवा कामगंध सापळे यांचा वापर करावा. 
 • १५ मार्चच्या पुढे उसाची नवीन लागवड करू नये. 
 • तुटणाऱ्या उसाच्या खोडव्याचे योग्य व्यवस्थापन उदा. पाचट आच्छादन, पाचट प्रक्रिया (युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर), बुडख्यांची जमिनीलगत छाटणी, नांग्या भरणे आणि मल्टिन्यूट्रियंट द्रवरूप खतांची फवारणी ही कामे करावीत.

- अरुण देशमुख, ९५४५४५६९०२
(सह सरव्यवस्थापक व प्रमुख, कृषी विद्या विभाग, नेटाफिम इरिगेशन इंडिया, प्रा. लि., पुणे)


इतर नगदी पिके
उन्हाळ्यात राबवा प्रभावी सिंचन...पाणी हा ऊस उत्पादनातील अतिशय महत्त्वाचा व...
खोडवा ऊस व्यवस्थापनाचे सुधारित तंत्रराज्यामध्ये तिन्ही हंगामांतील ऊस  तुटून...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांची उसाच्या पानांवर...
दर्जेदार कांदा बीजोत्पादनासाठी...उत्तम कांदा बीजोत्पादनासाठी कंदाच्या योग्य...
उसासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरऊस पिकाची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज कमी असली तरी...
व्यवस्थापन ऊस पाचटाचे ...पाचट आच्छादनामुळे जमिनीचा ओलावा टिकून राहतो. तसेच...
सुरू उसातील सूक्ष्मअन्नद्रव्य व्यवस्थापनमाती परीक्षण अहवालानुसार जमिनीत या सूक्ष्म...
नियोजन सुरू ऊस लागवडीचे...सुरू हंगामातील ऊस लागवड १५ डिसेंबर ते १५...
ऊस पिकावरील तांबेरा रोगाचे व्यवस्थापनपश्‍चिम महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यापासून ते...
आरआरसी’ म्हणजे काय रे भाऊ...?राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर...
गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनाकडे...सध्या अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये असलेल्या...
सूक्ष्म सिंचन पद्धतीवर कांदा लागवडकांदा सिंचनासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर...
कांदा बीजोत्पादनाच्या शास्त्रीय पद्धती बिजोत्पादन करताना जातीची शुद्धता, मानक प्रमाण आणि...
वेचणीयोग्य कपाशीला येत्या पावसाची चिंतामाझे कापसाचे पीक जवळपास ११५ ते १२० दिवसांचे झाले...
दर्जेदार कांदा रोपनिर्मितीचे तंत्रमहाराष्ट्रात रब्बी कांदा पिकाचे क्षेत्र मोठ्या...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोरायनेस्पोरा बुरशीजन्य पानांवरील ठिपके...कपाशीचे पीक हे सध्या ६० ते ७५ दिवसांचे आहे....
कपाशीवरील रस शोषक किडींचे एकात्मिक...सध्या ढगाळ वातावरण कायम असून, कपाशीवर रस शोषक...
कपाशीतील बोंडे सडण्यावरील उपाययोजनामहाराष्ट्राच्या प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्यात...
कपाशीतील आकस्मिक मर रोग नियंत्रणासाठी...पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसामध्ये कपाशी पीक असून,...