शेळीपालनातील महत्त्वाची सुत्रे

शेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने शेळ्या व करडांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उत्तम गुणधर्म असणाऱ्या शेळ्यांची निवड करणे फायद्याचे ठरते.
करडांच्या जोमदार वाढीकडे काटेकोर लक्ष दिले जाते
करडांच्या जोमदार वाढीकडे काटेकोर लक्ष दिले जाते

शेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने शेळ्या व करडांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. उत्तम गुणधर्म असणाऱ्या शेळ्यांची निवड करणे फायद्याचे ठरते. गाभण शेळ्यांची तसेच करडांची योग्य पद्धतीने जोपासना करावी.  शेळीपालन कमी खर्चात अधिक आर्थिक फायदा मिळवून देते. त्यामुळे शेळीला गरिबांची गाय म्हटले जाते. शेळीपालनामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य शेळी जातीची निवड करणे गरजेचे असते. उत्तम उत्पादनक्षमता असलेला कळप तयार करण्यासाठी शेळ्यांच्या निवडीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असते. महाराष्ट्रातील शेळ्यांच्या जाती 

  •   उस्मानाबादी शेळी 
  •   संगमनेरी शेळी 
  •   सुरती (खानदेशी/निवाणी) 
  •   कोकण कन्याल
  •   बेरारी शेळी 
  • शेळीची निवड 

  • शेळीच्या नाकपुड्या मोठ्या असाव्यात. डोळे पाणीदार असावेत.
  • शेळी वयाप्रमाणे पूर्ण वाढ झालेली असावी. शक्यतो एक वेत झालेली शेळी विकत घ्यावी.
  • एका वर्ष वयाच्या शेळीचे वजन ३० किलोपेक्षा कमी नसावे.
  • कास मोठी व मऊ असावी. सड एकसारख्या लांबीचे असावेत. सड सुके नसावेत. 
  • खांद्यापासून पुठ्ठ्यापर्यंतचा भाग सरळ असावा.
  • छाती भरदार, पोट मोठे व डेरेदार असावे. केस व त्वचा तुकतुकीत असावी.
  • शेळीचे चारही पाय मजबूत व सरळ असावेत.
  • नियमितपणे माजावर येणारी व न उलटणारी शेळी असावी.
  • शेळी जुळे करडे देणारी असावी.
  • शेळी आकाराने मोठी असावी. तिची मान लांब असावी. तोंडापासून शेपटीपर्यंत असणारा लांबपणा हेही महत्त्वाचे लक्षण आहे.
  • शेळ्यांचा गोठा 

  • बंदिस्त आणि मुक्त गोठा असे गोठ्याचे दोन प्रमुख प्रकार आहेत.
  • गोठ्याची जागा हवेशीर ठिकाणी असावी. आजूबाजूला पाणथळ जमीन नसावी.
  • गोठ्याची जागा शक्यतो उंच जागी, उतार असलेली व पाण्याचा निचरा होणारी असावी.
  • गोठा बांधताना प्रथम किती जागा लागेल याचा विचार करावा. शेळीसाठी १० चौ.फूट, पैदाशीच्या बोकाडासाठी २५ चौ.फूट व लहान करडासाठी ७ चौ.फूट एवढी जागा लागते.
  •  गोठ्यात शेळ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था असावी. एका शेळीला दररोज किमान ७ लिटर पाण्याची आवश्‍यकता असते.
  • गोठ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येईल आणि हवा खेळती राहील अशी सोय करावी.
  • उपलब्ध साहित्य वापरून गोठ्याची उभारणी करावी. शेळ्यांच्या गोठ्याला जास्त खर्च करण्याची आवश्‍यकता नसते.
  • गोठ्याची लांबी पूर्व-पश्‍चिम ठेवावी.
  • आहारविषयक सवयी 

  • शेळ्यांची तोंडाची रचनेनुसार त्या वरील ओठ आणि जिभेच्या साह्याने खाद्य खातात. खूप लहान गवतदेखील शेळ्या आरामात खातात. जमिनीपासून थोड्या उंचीवरील झुडपे, लहान झाडे सहजरीत्या खाऊ शकतात. 
  • शेळ्या खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असतात. शेळ्या विविध प्रकारचा पाला आणि वनस्पती खाऊ शकतात.
  • शेळ्या वेगवेगळ्या प्रकारची चव ओळखू शकतात (कडू, गोड, आंबट, खारट).
  • हिरव्या वनस्पतीची संख्या कमी असलेल्या ठिकाणी शेळ्या औषधी वनस्पतीही आवडीने खातात. त्यामुळे त्या वाळवंटात देखील राहू शकतात. 
  • शेळ्यांमध्ये खनिज मिश्रणाची गरज जास्त असते.
  • द्विदल चारा शेळ्या आवडीने खातात. 
  • मांसल शेळ्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ३ ते ४ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते.
  • दूध देणाऱ्या शेळ्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ५ ते ७ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते.
  • चाऱ्याचे प्रमाण  हिरवा चारा................... ३ ते ४ किलो वाळलेला चारा ................ अर्धा ते १ किलो पशुखाद्य ......................... २५० ते ३०० ग्रॅम क्षार व जीवनसत्त्वांचा पुरवठा होण्यासाठी क्षारविटा गोठ्यात उपलब्ध कराव्यात. नवजात करडांची देखभाल 

  • करडांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी दुधाव्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्यक असते. 
  • करडे एक आठवडा वयाची झाल्यानंतर शेडमध्ये हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यामुळे त्यांना हिरवा चारा खाण्याची सवय लागते. हिरवा चारा जास्त खाल्यामुळे करडांच्या पचनेंद्रियाची आणि पोटाची लवकर वाढ होते.
  • करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ, कोरडी ठेवावी. करडांना भरपूर मोकळी आणि हवेशीर जागा उपलब्ध करून द्यावी.
  • शेळी व्यायल्यानंतर ती नवजात करडास चाटून स्वच्छ करते. त्यामुळे करडे स्वच्छ होण्याबरोबरच रक्ताभिसरण वाढते. शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास, करडांचे अंग स्वच्छ जाड्याभरड्या कापडाने स्वच्छ करावे. करडाच्या नाका-तोंडातील चिकट स्राव काढावा. जेणेकरून करडांना श्‍वास घेणे सोपे होईल.
  •  व्यायल्यानंतर करडांची नाळ स्वच्छ व निर्जंतुक कात्री किंवा ब्लेडने १ ते दीड इंच लांब अंतरावर कापावी. नाळ कापलेल्या ठिकाणी ‘टिंक्चर आयोडीनचा’ बोळा ठेवावा, म्हणजे नाळेच्या जखमेद्वारे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होणार नाही. टिंक्चर आयोडीनच्या जागी हळदपुडीचाही वापर करता येतो. 
  •  करडांच्या खुरांवर वाढलेला पिवळा भाग हळूच खरडून काढावा. जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल. 
  • करडांना चीक पाजणे 

  • नवजात करडांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. करडे जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाच्या आत त्यांना चीक पाजणे आवश्यक असते. साधारणपणे करडाच्या एकूण वजनाच्या १० टक्के इतका चीक पाजावा. योग्य प्रमाणात चीक दिल्यास निरोगी सशक्त करडे तयार होतात.
  • करडांना चीक दिवसातून ३ ते ४ वेळेस विभागून द्यावा. 
  • चिकामध्ये ग्यामा ग्लोबुलीन्स म्हणजेच रक्षक प्रथिने भरपूर असतात. ही प्रथिने करडांना अनेक संसर्गजन्य रोगांपासून वाचवतात. तसेच चिकामध्ये दुधापेक्षा जीवनसत्त्व ‘अ’ प्रमाण १५ पट जास्त असते. तसेच ३ ते ४ पट जास्त प्रथिने असतात. याशिवाय लोह, तांबे, मँगेनीज आणि मॅग्नेशिअम ही खनिजे सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. चिकामध्ये सारक गुण असल्याने करडाच्या आतड्यात साठलेल्या मलाचे निस्सारण होण्यास मदत होते. 
  • दूध पाजणे 

  • सुरुवातीस एक महिन्यापर्यंत करडाच्या वजनाच्या १० टक्के या प्रमाणात दूध पाजावे. त्यानंतर १ ते २ महिने या काळात १० ते १५ टक्क्यांपर्यंत दूध पाजावे.
  • पुढील २ ते २.५ महिन्यांत दूध हळूहळू कमी करत पूर्ण बंद करावे. करडांना फक्त चारा आणि खाद्यावर वाढवावे. 
  • - डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४ (पशुपोषण शास्त्र विभाग, पशुवैद्यकीय अधिकारी, बारामती ॲग्रो लिमिटेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com