शेळीपालनासाठी महत्वाचे मुद्दे...

शेळीपालन व्यवसाय सुरू करताना पूर्वतयारी करावी. आर्थिक गुंतवणूक, बाजारपेठ, बँकेचे कर्ज, व्यवस्थापन आणि विक्रीचे नियोजन याचा अभ्यास करावा. प्रशिक्षण घेतल्याने शेळ्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. आर्थिक नपा वाढविता येतो.
 Important issues in goat farming
Important issues in goat farming

शेळीपालन व्यवसाय सुरू करताना पूर्वतयारी करावी. आर्थिक गुंतवणूक, बाजारपेठ, बँकेचे कर्ज, व्यवस्थापन आणि विक्रीचे नियोजन याचा अभ्यास करावा. प्रशिक्षण घेतल्याने शेळ्यांचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. आर्थिक नपा वाढविता येतो.

पूर्वतयारीशिवाय बरेच शेतकरी शेळीपालनाकडे वळलेले दिसतात. यशस्वी शेळीपालनामागे कष्ट, पूर्वतयारी, मार्केटबद्दलची माहिती आणि आपल्याकडे असलेली संधी याचा प्रथम विचार करावा. शेळी पालन व्यवसाय करताना आपण कशासाठी करणार आहोत,याचे नियोजन करावे. स्थानिक बाजारपेठ, खाटकांना पुरवठा,पैदाशीसाठी,बकरी ईद साठी किंवा दुधासाठी यानुसार शेळीच्या जातीची निवड करावी.

शेळीपालन सुरू करताना २० शेळ्या आणि १ नर असा गट करून सुरवात करावी. आपल्याकडील स्थानिक जातींची पहिल्यांदा निवड करावी. स्थानिक जात निवडल्यामुळे शेळ्यांवर आपल्याकडील वातावरणाचा परिणाम होणार नाही. मरतूक कमी राहील. व्यवस्थापनातील अनुभव आणि बाजारपेठेतील मागणीनुसार पुढे शेळ्यांची संख्या वाढवावी.

शेळीपालनाचे नियोजन 

  • नवीन शेतकऱ्याने कमीत कमी दहा शेळीपालनाच्या गोठ्यांना भेटी देऊन माहिती घ्यावी. त्यामुळे पुढील चुका टाळणे शक्य होईल.
  • शासकीय किंवा शासकीय नोंदणीकृत शेळीपालन प्रशिक्षण केंद्राकडून प्रशिक्षण घ्यावे. यामुळे शेळी पालनातील अडचणी अगोदरच समजतील. आपल्याला ज्या गोष्टींना सामोरे जावे लागणार आहे अशा गोष्टी आपल्याला कळतील.
  • आपली आर्थिक स्थिती, शेड आणि चारा पिकांसाठी जमीन, शेळ्यांच्या जाती, बाजारपेठेची माहिती आणि व्यवस्थापनासाठी मजूर किंवा कुटुंबातील व्यक्तींचा सहभाग याचा आराखडा करून मगच शेळीपालनास सुरवात करावी.
  • गोठ्याची रचना आवश्यकतेनुसार आणि आपल्याकडे असणाऱ्या वातावरणानुसार करावी. गोठा बांधताना अनावश्यक खर्च टाळावा. ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल असा गोठा बांधावा.
  • शेळ्यांमध्ये दर दिवशी जातीच्या क्षमतेनुसार आवश्यक असणारी वजन वाढ होत असेल आणि गोठ्यातील वातावरणामुळे मरतूक होत नसेल तर तो गोठा चांगला समजावा. गोठ्यातील हवा खेळती असावी.गोठ्यामध्ये चांगला सूर्यप्रकाश येणे आवश्यक आहे. यामुळे गोठ्यातील जमीन कडक उन्हात वाळते. गोठ्यात दमटपणा नसल्याने कोंदट वातावरण रहात नाही.
  • लेंडी आणि मूत्रामधून बाहेर पडणाऱ्या वायूमुळे शेळ्या आजारी पडण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन गोठ्याची स्वच्छता ठेवावी.
  • वेगवेगळ्या शारीरिक अवस्थेनुसार शेळ्यांची विभागणी करण्यासाठी गोठ्यात कप्पे करण्याची गरज आहे. गाभण शेळ्या,तीन महिन्यापेक्षा छोटी पिल्ले, पैदाशीचा नर, भाकड शेळ्या, दूध देणाऱ्या शेळ्या, व्यायलेल्या शेळ्या, तीन महिन्यापेक्षा मोठ्या माद्या, तीन महिन्यापेक्षा मोठे नर, आजारी शेळ्यांसाठी कप्पे तयार करावेत. यामुळे आवश्यक चारा, पाणी याचे व्यवस्थापन करणे सोपे जाते.
  • माहितीतील लोकांकडून किंवा स्थानिक बाजारामधून दोन किंवा तीन शेळ्या एकावेळी खरेदी कराव्यात. विकत आणल्यानंतर एका शेडमध्ये कमीत कमी एकवीस दिवस शेळ्या ठेवाव्यात. याला विलगीकरण म्हणतात. यामुळे संभाव्य आजाराचा प्रसार होत नाही.
  • आपल्याकडे येणारे पशुवैद्यक, कामगार यांना दिवसभर वापरण्यासाठी किंवा ज्यावेळी आले आहेत त्यावेळी वापरण्यासाठी वेगळा ड्रेस आणि चप्पल असावी. जी गोठ्यामध्येच ठेवावी. गोठ्याच्या मुख्य दरवाज्यापाशी चुन्याची पावडर टाकावी. यामुळे जैवसुरक्षा जपली जाईल.
  • गोठ्यावर प्रत्येक दिवसाच्या व्यवस्थापनाचे वेळापत्रक असावे. त्याचे काटेकोर पालन करावे.
  • रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ गोठ्यामध्ये फिरून प्रत्येक कप्यामधील शेळ्यांचे बारीक निरीक्षण करावे. त्यांच्या हालचालीमध्ये काही अनैसर्गिक बदल झाला आहे का आणि तो कोणत्या कारणामुळे झाला असेल याची तपासणी करावी. आवश्यकतेनुसार उपाययोजना कराव्यात. जेणेकरून तुमच्या गोठ्यामध्ये भविष्यात येणारे संकट अगोदरच टाळता येऊ शकते.शेळ्यांचे वेळापत्रकानुसार लसीकरण, जंतनिर्मूलन करावे.
  • गोठ्यातील कामकाजाच्या दैनंदिन गोष्टी नोंदवहीमध्ये ठेवाव्यात. या नोंदींचे योग्य वेळी आवश्यकतेनुसार पृथकरण करून शेळी व्यवस्थापनात बदल करावेत. हे बहुतांश पशुपालक करत नाहीत. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते.
  • उन्हाळा,हिवाळा,पावसाळा या ऋतूनुसार आवश्यक बदल करून शेळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. शेळ्यांची वर्षातून एकदा रक्त व लेंडी तपासणी केल्यास त्यांचे खाणे, व्यवस्थापन आणि विविध आजारांच्या नियंत्रणामध्ये योग्य खबरदारी घेता येऊ शकते. उपचारावरील खर्च टाळता येऊ शकतो.
  •  शेळ्यांचा गोठा लाकडी खांब किंवा लाकडी गव्हाणीचा नसल्यास निर्जंतुकीकरण करणे सोपे जाते. गोचीड निर्मूलनासाठी गोठ्याची स्वच्छता करता येते.
  •  पशुतज्ज्ञाच्या सल्यानुसार उपचार करावेत. आजाराचा संसर्ग होण्यापूर्वी नियंत्रणाचे उपाय योजावेत,त्यामुळे नुकसान टाळून आर्थिक बचत होते. शेळीपालकांना चुकीचे मार्गदर्शन करू नये.
  •  पैदाशीचे नर, मादी किमान चार किंवा पाच वर्षापेक्षा जास्त काळासाठी ठेवले जातात.त्यामुळे त्यांचा विमा काढावा. जेणेकरून भविष्यातील त्यांच्या मरतूकीचा तोटा होणार नाही. मरतूक झाल्यास योग्य भरपाई मिळेल.
  •  गोठ्याच्या एकूण संख्येच्या वार्षिक वीस टक्के विना उपयोगी शेळ्या काढून टाकाव्यात. त्यांची जागा आपल्याच गोठ्यामधील दुसऱ्या माद्यांनी किंवा विकत घेतलेल्या नर किंवा मादीने भरावी. जेणेकरून गोठ्याचे सरासरी उत्पादन हे कमी न होता ते वाढेल.
  • आहार व्यवस्थापन 

  • चाऱ्यावरील खर्च हा ७० टक्के असतो. त्यामुळे शेळ्यांना वर्षभर चारा उपलब्ध राहिल या पद्धतीने स्वतःच्या शेतीमध्ये विविध चारा पिकांची लागवड करावी.
  •  दिवसभर स्वच्छ पाणी द्यावे.
  •  शेळ्यांना चारा गव्हाणीतून द्यावे. त्यामुळे चारा वाया जाणार नाही. वाया जाणाऱ्या चाऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करावे.
  • शेळ्यांना शारीरिक अवस्थेनुसार ओला चारा व वाळलेला चारा योग्य प्रमाणात द्यावा. जेणेकरून गाभण शेळी व पैदाशीचे बोकड, भाकड शेळीला त्यांच्या शरीराच्या स्थितीनुसार चारा मिळेल. त्यांच्यापासून मिळणारे उत्पादन हे उत्कृष्ट प्रतीचे असेल.
  • गाभण काळाच्या शेवटच्या पन्नास दिवसांमध्ये गर्भाच्या पोषणासाठी आणि शेळ्यांना शरीरासाठी लागणारा वाढीव चारा दिल्यास पुढे जन्मणारे करडू सशक्त असेल.
  •  शेळ्यांना आवश्‍यकतेनुसार व शारीरिक स्थितीनुसार वाळलेला चारा,ओला चारा, खुराक व खनिज मिश्रण या गोष्टी योग्यवेळी दिल्यास त्यांचे आरोग्य चांगले राहते, नुकसान कमी होते.
  • विक्रीचे नियोजन 

  •  शेळी पालन हे मटण आणि दुधासाठी केले जाते. यामध्येच शेतकऱ्यांना फायदा आहे.
  •  शेळ्या जिवंत वजनावर विकाव्यात. त्यामुळे जातिवंत शेळ्यांना योग्य किंमत मिळेल.
  •  शेळ्या किंवा नर थेट ग्राहकाला देता आल्या तर नफ्यात वाढ होते.
  •  नफा वाढविण्यासाठी स्वतःचे मटणाचे दुकान, शेळीपालक आणि ग्राहकांचा गट करून विक्रीचे नियोजन करावे.
  • संपर्क - डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ ( लेखक पशूतज्ज्ञ आहेत) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com