औषधी वनस्पतींनी वाढवा प्रतिकारशक्ती

भारत हा औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे आगार आहे. उदा. कडुनिंब, तुळस, हळद, आले, अडुळसा इ. या वनस्पतीमध्ये फ्लॅवोनॉईड घटक, सी जीवनसत्त्व किंवा कॅरोटिनॉईट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.
herbs
herbs

भारत हा औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे आगार आहे. यातील अनेक वनस्पती या आपल्या अवतीभवती सहजपणे उपलब्ध आहेत. उदा. कडुनिंब, तुळस, हळद, आले, अडुळसा इ. या वनस्पतीमध्ये फ्लॅवोनॉईड घटक, सी जीवनसत्त्व किंवा कॅरोटिनॉईट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. त्यातील काही औषधी आणि मसाल्यांच्या पदार्थांची माहिती घेऊ.  आयुष मंत्रालयाने कोविड महामारीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुळशी (Ocimum tenuiflorum), दालचिनी (Cinnamomum verum), मिरी (Piper nigrum), आले (Zingiber officinale) आणि द्राक्ष (Vitis vinifera) अशी काही औषधी वनस्पतींची शिफारस केली होती. औषधी वनस्पतींची पाने व खाद्य भाग यांचा काढा, वाफ किंवा खाद्य यांचा वापर आहारामध्ये घेतल्यास आपली प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी फायदा होऊ शकतो. तेलंगाना शासनाचे कोविड प्रादुर्भावग्रस्त लोकांच्या उपचारासाठी खास आयुर्वेदिक रुग्णालयांच्या उभारणीची घोषणा केली आहे. त्याच गोवा, केरळ आणि हरियाना राज्यातील वैद्यकांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णावर आयुर्वेदिक औषधांद्वारे उपचाराला प्रारंभ केला आहे.  तुळशी (होली बेसिल)  तुळशी (शा. नाव - Ocimum tenuiflorum) हे सर्व भारतभर आढळणारी वनस्पती आहे. भारतामध्ये या वनस्पतीला धार्मिक आणि औषधी महत्त्व आहे. आजीबाईंच्या बटव्यातील ही वनस्पती अनेक घरगुती व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. तुळशीमध्ये सूक्ष्मजीवविरोधी, विषाणूविरोधी अनेक गुणधर्म असून, हवा शुद्ध करण्याचे महत्त्वाचे कामही ती करते. ताण कमी करणे, ताप, दाह कमी करणे, सर्दी, खोकला आणि विषाणूजन्य आजारांमध्ये तुळशीपासून तयार केलेल्या औषधांचा वापर केला जातो. तुळशीतील निर्जंतुकीकरण आणि सूक्ष्मजीवांचा नाश करण्याच्या गुणधर्मांमुळेच नव्हे तर प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या गुणधर्मामुळे महत्त्वाची ठरते. त्यातील प्रति ऑक्सिडिकारक (अॅण्टी ऑक्सिडंट) घटक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ही प्रतिकारकक्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. हे घटक मुक्त कणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासूनही बचाव करतात. नीम  कडुनिंब (शा. नाव Azadirachta indica) हे भारतामधील स्थानिक झाड असून, त्यात १३० पेक्षा अधिक जैविक कार्यक्षम संयुगे आहेत. विषाणूरोधक आणि जिवाणूरोधक गुणधर्मांसोबतच त्यात शक्तीशाली प्रतिकारवर्धक गुणधर्मही आहेत. कडुनिंबाची पाने ही प्रामुख्याने औषधांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये (ओल्या, वाळवलेल्या आणि तेल) वापरली जातात. पानांपासून तेल काढलेले तेल, वाळलेल्या पानांचा औषधांमध्ये वापर होतो. शरीर आणि रक्तातील अशुद्धी दूर करण्यासाठी त्यांचा वापर होतो. त्यातील उच्च प्रतिची प्रति ऑक्सिडीकारक घटक हे शरीराच्या संरक्षणामध्ये मदत करतात. या घटकांमध्ये कर्करोग आणि ह्रदयरोगाचा धोका कमी होतो. कडुनिंबाचे बुरशीरोधक गुणधर्म उपयोगी असून, जळलेली त्वचा किंवा त्वचेच्या अन्य रोगांमध्येही त्याचा वापर केला जातो. जिवाणू नष्ट करण्याच्या क्षमतेमुळे प्रतिकारशक्तीला चालना मिळते. जखमा भरून येण्यासही मदत होते.  आवळा  शा. नाव - Phyllanthus emblica असलेल्या आवळ्याची झाडे भारतीय उपखंडामध्ये सर्वत्र आढळतात. आवळ्यामध्ये सी जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. जीवनसत्त्व सी हे केवळ शरीरातील प्रतिपिंडाच्या वाढीलाच चालना देत नाहीत, तर रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाणही वाढवतात. या पांढऱ्या पेशी शरीराच्या प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग असून, विविध रोगांविरुद्ध लढण्याचे काम करतात. आवळा हा तुरट असून, त्यात मोठ्या प्रमाणात जिवाणूरोधक गुणधर्म असतात. त्याचा फायदा शरीराची एकूणच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी होतो.  शेवगा  शेवगा (शा. नाव -Moringa oleifera) हे झाड बहुवार्षिक शेंगावर्गीय झाड असून, बहुउपयोगी आहे. त्याची लागवड संपूर्ण भारतामध्ये केली जाते. शेवग्यांच्या शेंगा, कोवळ्या पानांची भाजी केली जाते. त्यात औषधी गुणधर्म आहेत. शेवग्याचे पानांपासून मिळवलेला इथेनॉलिक अर्क हा प्रतिकारशक्ती वाढवतो. शेवग्यांमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असून, मेंदूतील कर्करोग (ट्यूमर) ची वाढ रोखण्यास मदत करतो. यात जिवाणूरोधक, विषाणूरोधक आणि बुरशीनाशक गुणधर्म असल्यामुळे विविध रोगांविरुद्ध लढण्यामध्ये शरीराला लढण्यासाठी मदत होते. त्यातील प्रति ऑक्सिडीकारक घटकांमुळे यकृताची इजा टाळणे, मधुमेह नियंत्रण, ह्रदयाचे आरोग्य, जखमा वेगाने भरणे, पचनशक्तीत सुधारणा आणि चेतासंस्थेसंबंधीचे विकार अशा विविध कारणांसाठी उपयुक्त ठरते.  हळद  हळद (शा. नाव - Curcuma longa) ही स्वयंपाकातील मसाल्यांमध्ये आणि औषधी कारणांसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. आयुर्वेदामध्ये हळदीचे अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म सांगितलेले आहेत. अनेक शतकांपासून भारतामध्ये हळदीचा दैनंदिन आहारातही वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला जातो. हळदीला पिवळा रंग देणारे कुरकुमीन हे प्रति ऑक्सिडीकारक घटकांनी समृद्ध असून, प्रतिकारशक्ती वाढवते. शरीरातील मुक्तकणांमुळे होणारे नुकसान कमी करण्यात मदत करते. या गुणधर्मामुळेच हळदीची सांगड कर्करोग प्रतिबंधकतेशी विशेषतः आतड्यांचा कर्करोगाशी घातली जाते. यामुळे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीसाठी कारणीभूत असलेल्या विविध प्रकारच्या प्रथिनांची वाढ रोखली जाते. हे यकृत आणि ह्रदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. विविध प्रकारचे त्वचारोग, सिस्टिक फिब्रॉसिस आणि मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी हळद उपयोगी ठरते. आले आले (शा. नाव ः Zingiber officinale) स्वयंपाकामध्ये विविध पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जाते. त्याच प्रमाणे शीतपेय उद्योगामध्ये, सामान्य आणि अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये, लोणची आणि औषधे उद्योगांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. त्यात दाहविरोधी, जिवाणूरोधक, विषाणूरोधक असे गुणधर्म आढळतात. आल्यामुळे पचन सुधारते, गॅसेसचे प्रमाण कमी होते. सर्दी, फ्लू अशा आजारांमध्ये आराम मिळतो.    मिरी  मिरी (शा. नाव -Pimenta diocia) यामध्ये औषधी, सूक्ष्मजीवविरोधी गुण आहेत. त्याच प्रमाणे कीडनाशक, सूत्रकृमीनाशक, प्रति ऑक्सिडीकारक आणि दुर्गंध कमी करणारे अधिक गुणधर्म आहेत. मिरीला सर्वमसाला (ऑल स्पाईस) असेही म्हटले जाते. कारण वाढलेल्या मिऱ्यांमध्ये लवंग, दालचिनी आणि जायफळ या तिन्हींचे स्वाद एकत्रित आढळतात. मिऱ्याचा वापर अपचन, पचनसंस्थेतील वायू, पोटदुखी, उलटी, हगवण, ताप, सर्दी, उच्च रक्त दाब, मधुमेह आणि स्थौल्यत्व अशा विकारांच्या उपचारांसाठी केला जातो. याचा पोटाचे फुगलेले नळ मोकळे करण्यासाठीही वापर होतो.  लसूण  लसूण (शा. नाव Allium Sativum) हे भारतातील सर्वदूर घेतले जाणारे पीक आहे. त्याचा मुख्यतः वापर स्वयंपाकामध्ये स्वादासाठी आणि भाज्या साठवणीमध्ये केली जाते. लसणांमध्ये जिवाणूरोधक आणि परजिवीविरोधी गुणधर्म असल्यामुळे त्याचा वापर रक्तशुद्धीसाठी आणि कर्करोग प्रतिबंधक म्हणून केला जातो. लसणातील ताजेपणा आणणाऱ्या गुणधर्मामुळे त्वचेच्या संरक्षणासाठी उपयोगी ठरतो. रोजच्या आहारामध्ये लसणाचा वापर केल्यास त्यातील ॲलीसीन या घटकाच्या प्रति ऑक्सिडीकारक गुणधर्मामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.  कढीपत्ता  कढीपत्ता (शा. नाव -Murraya Koenigii) ही त्याच्या सुगंधी आणि विशिष्ट अशा चवीमुळे प्रसिद्ध आहे. ही पाने स्वयंपाकामध्ये स्वादासाठी वापरली जातात. त्याच प्रमाणे वजन कमी करण्यासाठीही वापरली जातात. कढीपत्ता अ, ब, क आणि बी२ ही जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहेत. तसेच ती लोह, कॅल्शिअमचाही स्रोत आहेत. त्यामुळे कॅल्शिअमच्या कमतरतेवरील उपचारांमध्ये त्याचा वापर केला जातो.  संपर्क : महादेव काकडे,  ७८७५५५९३९१ (व्यवस्थापक (संशोधन), एसबीआयआरडी, हैदराबाद.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com