agricultural news in marathi inedible items can harm to animals | Page 2 ||| Agrowon

अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय

डॉ. मिलिंद थोरात, डॉ. रत्नाकर राऊळकर
रविवार, 7 मार्च 2021

 जनावरांनी प्लॅस्टिक, पॉलिथिन, चामडे, दगड, रबरी वस्तू यांसारख्या अखाद्य वस्तूंचे सेवन केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांच्या जिवाला धोका होतो. अशा अखाद्य वस्तू जनावरांच्या पोटात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 
 

जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे लशीकरणाने टाळता येतात किंवा झाल्यास औषधोपचारांनी बरे होऊ शकतात. परंतु प्लॅस्टिक, पॉलिथिन, चामडे, दगड, रबरी वस्तू यांसारख्या अखाद्य वस्तूंचे सेवन केल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झाल्यास जनावरांच्या जिवाला धोका होतो. अशा अखाद्य वस्तू जनावरांच्या पोटात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या पोटाचे चार कप्पे असतात. जनावरांनी चारा खाल्ल्यानंतर हा चारा रूमेन नावाच्या मोठ्या कप्प्यात जातो. जनावरांच्या पोटाची रचना गुंतागुंतीची असल्यामुळे पोटांचे विकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. रवंथ करणारी जनावरे टाकलेला चारा सर्वप्रथम गिळंकृत करतात आणि नंतर सावकाश रवंथ करतात. काही जनावरे पोटाची खळगी भरण्यासाठी कचऱ्याच्या ढिगावर, उकिरड्यावर मिळेल त्या अखाद्य वस्तू खाताना दिसतात. या बाबींकडे नकळत सर्वांचे दुर्लक्ष होते. 

अखाद्य वस्तूंचा परिणाम 

 • जनावरांना मिळेल तेवढा चारा खाण्याची सवय आणि कोणता चारा खावा व कोणता खाऊ नये याची निवड करता येत नसल्यामुळे नकळत त्यांच्या पोटात न पचणाऱ्या अखाद्य वस्तू जातात. 
 • अखाद्य वस्तूचे ढोबळमानाने दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे न रुतणाऱ्या वस्तू आणि दुसरा प्रकार म्हणजे रुतणाऱ्या वस्तू. न रुतणाऱ्या वस्तूंमध्ये चपला-जोड्यासारख्या चामडी वस्तू, कापडी वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू, नट-बोल्टसारख्या लोखंडी वस्तू, बारीक दगड यांसारख्या वस्तूंचा सामावेश होतो. रुतणाऱ्या अखाद्य वस्तूमध्ये खिळे, तार, सुया, टाचण्या, चमचे, काचेचे तुकडे, हाडांचे तुकडे यांसारख्या वस्तू  मोडतात. 
 • न रुतणाऱ्या वस्तूंपेक्षा रुतणाऱ्या वस्तू अधिक धोकादायक असतात. वस्तू धारदार असल्यास पोट व छातीमधील पडद्याला छेदून हृदयाला इजा करतात. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास जनावरांच्या जिवावर बेतू शकते. 
 • वाढत्या शहरीकरणामुळे चराईचे क्षेत्र कमी झाले. जनावरांना पुरेसे खाद्य मिळत नाही. अखाद्य वस्तू खाण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेसा पौष्टिक आहार न मिळाल्याने जनावरांच्या शरीरात खनिजांची कमतरता निर्माण होते.
 • विशेषतः कॅल्शिअम व फॉस्फरस खनिजांचे प्रमाण जनावरांमध्ये कमी झाल्यास जनावरे अखाद्य वस्तू खाण्यास उद्युक्त होतात. जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शिअम व फॉस्फरसचे प्रमाण हे दोनास एक या प्रमाणात असायला पाहिजे. हे प्रमाण बिघडल्यास जनावरांना पायका नावाचा आजार होतो. या आजारात जनावरे अखाद्य वस्तूचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. 
 • जनावराने चारा खाल्ल्यास तो पचण्यासाठी पोटाची योग्य प्रकारे हालचाल होणे आवश्यक असते. निरोगी जनावराने खाल्लेला चारा प्रथम मोठ्या पोटात जमा होतो व रवंथ करते वेळी पोटाच्या पुढील भागात लोटला जातो. तेथून अन्ननलिकेद्वारे तो रवंथ करण्यासाठी तोंडात येतो आणि रवंथ झाल्यानंतर घास परत गिळला जातो. अखाद्य वस्तूच्या सेवनामुळे या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा निर्माण होते. प्लॅस्टिक, पॉलिथिनच्या पिशव्या जनावरांच्या पोटातील पाण्यावर तरंगतात आणि अन्ननलिकेच्या छिद्रावर जाऊन बसतात. त्यामुळे वायू बाहेर येणे बंद होऊन जनावरांचे पोट फुगते. जनावराने हालचाल केल्यास हा फुगारा लगेच कमी होत असल्यामुळे पशुपालक बरेचदा याकडे दुर्लक्ष करतात. हा फुगारा जनावरांसाठी निश्‍चितच घातक ठरू शकतो.
 • चामडी किंवा अशाप्रकारच्या वस्तू जनावरांच्या पोटातील पाणी शोषून घेत वजनदार होऊन पोटाच्या समोरील भागात घट्ट बसतात. जनावराने केलेली हालचाल, श्‍वास घेताना होणारी सततची हालचाल यामुळे अशा वस्तू आतमधून गंभीर इजा करतात. होणाऱ्या वेदनांमुळे जनावराचे रवंथ करणे कमी होते. कालांतराने ते बंद होऊ शकते.

जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे 

 • वारंवार पोट फुगणे, चारा कमी खाणे.   दुधाच्या उत्पादनात घट होते. 
 • रवंथ कमी करणे किंवा पूर्णतः बंद पडते.   दात चावत राहणे, पाठीचा कणा उंचावतो. 
 • जनावर उताराच्या भागात चालण्यास टाळाटाळ करते.   पातळ चिकट शेण टाकणे, खाली बसताना काळजीपूर्वक बसते.   औषधोपचारास प्रतिसाद न देणे.   तोंडामधून पोटातील चारवट बाहेर येणे. 

उपचार पद्धती 

 • कोणत्याही प्रकारच्या अखाद्य वस्तूचे जनावराने सेवन केल्यानंतर लक्षणे दिसून आल्यास तत्काळ पशुवैद्यकाचा सल्ला  घ्यावा.
 • शस्त्रक्रिया करून खाल्लेल्या वस्तू बाहेर काढून टाकणे हाच एकमेव आणि खात्रीशीर उपाय ठरतो.  जवस खाऊ घालणे, लिंबू, मिठाचे पाणी पाजणे, लोणच्याचा रस्सा पाजणे अशा घरगुती उपचारामुळे उपायांपेक्षा अपाय जास्त होतो. त्यामुळे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करून घेतल्यास कमी खर्चात योग्य इलाज होऊ शकतो. 
 • कोणताही आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा मुळात आजार होणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवणे, जनावरास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य वेळी आवश्यक खनिज मिश्रण देणे, मुबलक चारा पाणी देणे, योग्य वेळी लसीकरण करून घेणे, जंतनाशक औषध देणे, जनावरांना खाद्य देताना त्यामध्ये काही अखाद्य वस्तू जाणार नाही याची दक्षता घ्यावी. बांधकाम सुरू असणाऱ्या भागात चराई न करणे यांसारख्या बाबी कटाक्षाने पाळायला हव्या जेणेकरून आपली जनावरे असल्या जीवघेण्या रोगास बळी पडणार नाही. 

- डॉ. मिलिंद थोरात,   ९०११०८८८२५
(पशू शल्यचिकित्सा व क्ष- किरण शास्त्र विभाग,  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)


इतर कृषिपूरक
निकृष्ट चाऱ्याचे मूल्यवर्धननिकृष्ट चाऱ्याचे रूपांतर सकस व असलेल्या...
अळिंबी स्पॉन निर्मिती प्रयोगशाळेची...चांगल्या प्रतीचे शुद्ध स्पॉन तयार करण्यासाठी...
देशी गाईंमधील प्रजनन व्यवस्थापनावर द्या...देशी गाईंची निवडलेली जात, वंशावळ आणि...
स्पेंट मशरूम कंपोस्टचे मूल्यवर्धनपारंपरिक कंपोस्ट खतामध्ये अनेक प्रकारचे...
उन्हाळ्यातील कोंबड्यांचे आहार व्यवस्थापनउन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना उष्माघात होतो. यामुळे...
संधिवातावर निर्गुडी, निलगिरी उपयुक्तपशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार बाधित भागावर औषधी...
शेळ्यांची निवड पद्धतीशेळीपालनाचे यश पैदाशीसाठी वापरलेली शेळी व बोकड...
प्राणिजन्य क्षयरोगाकडे नको दुर्लक्षजनावरांना क्षयरोग झाल्यास उत्पादनक्षमता १० ते २५...
योग्य खाद्य व्यवस्थापनातून उष्माघाताचे...उन्हाळ्याच्या काळात आहारामध्ये साधारणतः ५ ते ७...
शेतकरी नियोजन पीक : रेशीम शेतीउन्हाळ्यातील तापमानात देखील कोष उत्पादन घेता यावे...
जनावरांतील उष्माघात टाळण्यासाठी...जनावरे आपल्याकडे असलेल्या ऊर्जेचा वापर दूध...
कुक्कुटपालन नियोजन पिलांची (चिक्स) नवीन बॅच ५ मार्च रोजी...
उन्हाळ्यातील ब्रॉयलर कोंबड्यांचे संगोपनवाढते तापमान आणि शारीरिक बदलांशी लढणारी...
लकवा आजारावर ब्राह्मी, वेखंड उपयुक्त लकवा  किंवा पॅरेलिसिस या आजारात अवयवांचे...
उष्ण वातावरणात टिकणारी बेरारी शेळी बेरारी शेळी रंगाने फिक्कट ते गडद तपकिरी असून,...
जनावरांमधील पायाचा वातया आजारामध्ये जनावरात तात्पुरते अपंगत्व म्हणजेच...
कुक्कुटपालनामधील जैवसुरक्षा महत्त्वाची...कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांचे विषाणू, जिवाणू तसेच...
श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस...मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्‍वसनसंस्थेचे आजार...
निरोगी पशुधनासाठी शुद्ध, निर्जंतुक पाणीदुधाळ प्राण्यांचे आहारातील गवत आणि अन्य...
अखाद्य वस्तूंमुळे जनावरांना होणारे अपाय जनावरांना होणारे सर्वसामान्य संसर्गजन्य आजार हे...