भातावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

महाराष्ट्रात भातावर बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य अशा तिन्ही प्रकारचे रोग आढळतात. सध्याच्या अवस्थेत करपा (ब्लास्ट), पर्ण करपा हे बुरशीमुळे होतात. अणुजीवामुळे कडा करपा हे रोग होतात. फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या भात शेतीमध्ये आभासमय काळजी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.
Integrated management of diseases on paddy
Integrated management of diseases on paddy

महाराष्ट्रात भातावर बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य अशा तिन्ही प्रकारचे रोग आढळतात. सध्याच्या अवस्थेत करपा (ब्लास्ट), पर्ण करपा हे बुरशीमुळे होतात. अणुजीवामुळे कडा करपा हे रोग होतात. फुलोऱ्याच्या अवस्थेत असलेल्या भात शेतीमध्ये आभासमय काळजी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. रोगाचे निदान करून नियंत्रणाचे योग्य ते उपाय वेळीच करावेत. सोबत आपल्या भागात येणाऱ्या रोगांची लक्षणे, नियंत्रण उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. म्हणजेच त्यासाठी प्रतिकारक योग्य जातींची निवड, बीजप्रक्रिया, रोपवाटिकेतील व्यवस्थापन, लागवडीचे अंतर याबाबत योग्य त्या उपाययोजना करता येतात. करपा

रोगाची लक्षणे 

  • रोगाचा प्रादुर्भाव अगदी रोपावस्थेपासून ते पीक पक्वतेपर्यंतच्या काळात कधीही होऊ शकतो. 
  • पान, खोड व लोंबीच्या मानेवर लक्षणे दिसतात. 
  • पानावर लंबगोलाकार म्हणजेच मध्यभाग फुगीर व दोन्ही कडा निमुळते असे असंख्य ठिपके पडतात. ठिपक्यांचा मध्य राखाडी व कडा गर्द तपकिरी रंगाच्या असतात. ठिपक्यांचा आकार आणि रंगावरून हा रोग ओळखता येतो. 
  • तीव्र प्रादुर्भावामध्ये अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने करपतात. 
  • पानांप्रमाणेच लोंबीच्या दांड्यावर सुद्धा रोग येतो. रोग झालेल्या ठिकाणी मान मोडून लोंबीत दाणे भरत नाहीत.
  • नुकसान या रोगामुळे भात पिकास सर्वांत जास्त (५० ते ८० टक्के) नुकसान होते. खोडाच्या लोंबीच्या मानेवर रोग आल्यास नुकसानीचे प्रमाण वाढते. रोगाची प्रसार

  • या रोगाचे प्रमाण पेरभातामध्ये किंवा घाट माथ्यावरील पाणी साठवून न ठेवल्या जाणाऱ्या भातशेतामध्ये जास्त असते. 
  • खाचरामधील पाणी अतिशय कमी झाल्यास सुद्धा रोगाचे प्रमाण वाढते. 
  • रोगाचा प्रथम प्रादुर्भाव हा रोगग्रस्त बियाण्यांपासून, शेतातील दुय्यम प्रसार हवेमार्फत होतो. 
  • रोगप्रसारासाठी अनुकूल बाबी

  • पेरभात, घाटमाथ्यावरील लागवड किंवा भात खाचरात पाणी नसणे किंवा अतिशय कमी असणे.
  • जास्त काळ पानावर साठणारे दव.
  •  जास्त सापेक्ष आर्द्रता (९० ते ९२ टक्के)
  • अधून मधून पडणारा हलका पाऊस.
  • नत्र खतांचा अतिरिक्त वापर.
  •  ढगाळ हवामान (कमी सूर्यप्रकाश).
  •  दाट लागवड. 
  • कडा करपा रोगाची लक्षणे 

  • प्रादुर्भाव साधारणत: फुटवे फुटणे ते लोंब्या निसवण्याच्या काळात होतो. 
  • कोकणासारख्या जास्त पावसाच्या प्रदेशात हा रोग मोठ्या प्रमाणात येतो. 
  • या रोगामुळे भात पानांचे शेंडे आणि कडा फिकट हिरवट होऊन करपतात. करपलेल्या भागाचा रंग फिकट तपकिरी असतो. हिरवट भागाला लागून असलेल्या कडा सरळ नसून वेड्यावाकड्या असतात. रोगग्रस्त पान दोन बोटांत धरून ओढले असता त्याचा  स्पर्श खडबडीत लागतो. अन्य दोन बुरशीजन्य रोगांचा स्पर्श असा खडबडीत लागत नाही. 
  • नुकसान भात उत्पादक विभाग, रोगास बळी पडणारी जात व पीक वाढीची अवस्था, अनुकूल हवामान आणि रोगाच्या तीव्रतेनुसार पिकाचे ७० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.  रोगाचा प्रसार 

  • रोगाचा प्रथम प्रादुर्भाव रोगग्रस्त बियाणे व शेतामधील प्रसार पाणी  आणि पावसाच्या थेंबामार्फत होतो. 
  • रोगाच्या वाढीसाठी साधारणत: मध्यम उष्ण हवामान (२५ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान) आणि जास्त आर्द्रतेची (७० टक्क्यांपेक्षा जास्त) आवश्यकता असते.
  • आभासमय काजळी किंवा काणी

    लक्षणे  लोंबीत दाणे भरण्याऐवजी पिवळ्या किंवा शेंदरी रंगाच्या गाठी तयार होतात. नंतर गाठींचा रंग शेवाळी ते काळपट होतो. गाठींचा स्पर्श मऊ मखमलीसारखा जाणवतो. या गाठीमधून काळसर भुकटी बाहेर येते.  रोगाचा प्रसार भातवाढीसाठी पोषक असलेल्या वातावरणामध्ये हा रोग बळावतो. शेतातील किंवा बांधावरील सहजीवी वनस्पतीवरील रोगकारक बीजांणूमुळे पिकावर रोगाचा प्रथम प्रादुर्भाव होतो.  उदबत्ता रोगाची लक्षणे  नेहमीसारखी लोंबी बाहेर न पडता राखाडी पांढरट रंगाची सुरसुरी सारखी दाणे विरहित लोंबी बाहेर पडते. थोड्याच दिवसात रोगट लोंब्या काळ्या पडतात. नुसत्या काड्या उदबत्तीसारख्या दिसतात.  रोगाचा प्रसार  प्रथम प्रादुर्भाव बियाण्यामार्फत होतो. पावसाळी थंड हवामानात रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार वेगाने होतो.  एकात्मिक रोग व्यवस्थापन भात पिकाचे शेतात रोगांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात.

  • शेत व शेताचे बांध स्वच्छ व तण विरहित ठेवावेत.
  • रोग प्रतिकारक जातींचा वापर करावा. (उदा. करपा या रोगांस प्रतिकारक जाती : फुले समृद्धी, इंद्रायणी, भोगावती, फुले मावळ, बासमती ३७०, कर्जत संकरित भात -१, सह्याद्री २, सह्याद्री ३, सह्याद्री ४, इ.)
  • निरोगी शेतातील रोगमुक्त किंवा प्रमाणित बियाण्यांचा वापर करावा.
  • बीजप्रक्रिया बियाणास तीन टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. द्रावणावर तरंगणारे हलके आणि रोगग्रस्त बी काढून टाकावे. तळात बसलेले बी काढून स्वच्छ पाण्याने २-३ वेळा धुऊन सावलीत वाळवावे. त्यानंतर बुरशीनाशक आणि अणुजीवनाशकांची खालीलप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. अ) करपा, उदबत्ता या रोगांच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम प्रति किलो बियाण्यास ३ ग्रॅम या प्रमाणे चोळावे. त्यानंतर सुडोमोनस फ्लुरोसन्स ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. ब) कडा करपा या रोगाच्या नियंत्रणासाठी,

  • स्ट्रेप्टोमायसीन* ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात बी आठ तास भिजवावेत.
  •  भात पिकाची दाट लागवड करू नये.
  • रासायनिक खतांचा वापर शिफारशीत मात्रेप्रमाणेच करावा. नत्रयुक्त खते प्रमाणापेक्षा जास्त टाकल्यास रोग व किडींचे प्रमाण वाढते.
  • खाचरात पाणी साचू न देता ते वाहते ठेवावे.
  • काणी आणि उदबत्ता रोगग्रस्त लोंब्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून त्याचा नाश करावा.
  • चारसूत्री भात लागवड पद्धतीचा वापर करावा. यात अ) भात पिकाच्या अवशेषांचा वापर (भात तूस अगर पळिंजाच्या राखेचा वापर) ब) गिरिपुष्प हिरवळीच्या खताचा मर्यादित वापर, क) सुधारित किंवा संकरित भाताच्या रोपांची नियंत्रित लागवड,  ड) युरिया ब्रिकेटचा कार्यक्षम वापर या चारसूत्रांवर भर द्यावा.   रासायनिक नियंत्रणासाठी... अ) करपा, आभासमय काजळी आणि पर्णकोष करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी,  फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)

  • कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) १ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल (२५ ई.सी.) १ मि.लि. किंवा हेक्झाकोनॅझोल (५ ई.सी.) २ मि.लि. किंवा मॅन्कोझेब (७५ डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम या सोबत स्टिकर (चिकट द्राव) १ मि.लि. 
  • आवश्यकतेनुसार पुढील २ ते ३ फवारण्या १० दिवसांच्या अंतराने कराव्यात.
  •  ब) कडा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, फवारणी (प्रमाण प्रति लिटर पाणी)

  • कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यू.पी.) २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन * ०.१५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मि.लि.  
  • आवश्यकतेनुसार पुढील फवारणी १० ते १५ दिवसांच्या अंतराने करावी. 
  • ( टीप :  लेबलक्लेम शिफारशी आहेत.) पुढील हंगामात रोगांचा प्रसार रोखण्यासाठी,

  • भात कापणीनंतर उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करावी. धसकटे गोळा करावेत. यामुळे सुप्तावस्थेतील रोग अवशेषांचा नाश होईल.
  • भात खाचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्ती करावी. जमीन समपातळीत आणावी. 
  • परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी रोग नियंत्रक योजनांचा एकत्रितरीत्या अवलंब करावा.
  • टीप :   स्ट्रेप्टोमायसिन हे संक्षिप्त नाव वरील लेखात घेतले असले तरी या प्रतिजैविकातील सक्रिय घटक पुढीलप्रमाणे आहेत. स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्‍लीन हायड्रोक्‍लोराइड १० टक्के. - एस. आर. परदेशी, ७५८८०५२७९३  (सहायक प्राध्यापक-वनस्पती रोगशास्र विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी जि.नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com