नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
मिरचीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन
मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची कमी उत्पादकतेमागे किडींचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. या पिकावर येणाऱ्या किडीमुळे ३४ ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अगदी रोपवटिकेपासून ते रोपलागवडीच्या नंतर शेवटच्या तोडणीपर्यंत निरनिराळ्या टप्प्यात एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा अवलंब करावा.
मिरची हे प्रमुख भाजीपाला पीक आहे. या पिकाची कमी उत्पादकतेमागे किडींचा प्रादुर्भाव हे प्रमुख कारण आहे. या पिकावर येणाऱ्या किडीमुळे ३४ ते ७५ टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अगदी रोपवटिकेपासून ते रोपलागवडीच्या नंतर शेवटच्या तोडणीपर्यंत निरनिराळ्या टप्प्यात एकात्मिक कीड व्यवस्थापनांचा अवलंब करावा.
फळ पोखरणारी अळी
ही अळी तपकिरी हिरवट रंगाची असून, शरीराच्या दोन्ही बाजूंनी गडद पट्टा असतो. शरीरावर तुरळक केस असतात. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अळी ही पाने व फुले व रोपाच्या शेंड्यावर उपजीविका करते. नंतर ती फळांना अनियमित आकाराची मोठी छिद्रे पाडून आतील भाग खाते.
नियंत्रण
- फळ पोखरणारी अळीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामाची अंडी ५० हजार प्रति हेक्टरी शेतामध्ये सोडावेत.
- ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
- फळ पोखरणाऱ्या अळीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एचएनपीव्ही (२५० एलई) प्रति ५०० लिटर पाण्यातून सायंकाळी फवारणी करावी.
- फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. किंवा फ्ल्युबेंडायअमाईड (३९.३५ एससी) ०.२ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. गरजेनुसार पुढील फवारणी कीटकनाशक बदलून ८ ते १० दिवसांच्या अंतराने करावी.
फुलकिडे
हे अतिशय छोटे, निमुळते व नाजूक असतात. रंगाने फिक्कट पिवळे किंवा करड्या रंगाचे असून, त्याची लांबी १ मि.मी.पेक्षा कमी असते. ही किड पंखविरहित अळ्या व पंख असले तरी अळीसारखी अशा दोन्ही अवस्थेत आढळते. त्यांच्या पंखाना मध्ये शिर असते. ती लांब केसांनी व्यापलेली असते. पानाच्या वरचा पापुद्रा खरडता येईल, अशी त्यांच्या तोंडाची रचना असते. पाने खरवडून त्यातून येणारा रस ही कीड शोषून घेते. पाने वरच्या बाजूला मुरडली गेल्यामुळे पानांचा आकार द्रोणासारखा दिसतो. या किडीचा उपद्रव पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून सर्व अवस्थांमध्ये आढळतो. पाने चुरगळ्यासारखी दिसतात. अशा झाडाची वाढ खुंटते. अशा झाडाला मिरच्या फार कमी लागतात.
मावा
ही किड पाने, कळ्या, फुले तसेच झाडाच्या कोवळ्या भागावर दिसून येते. झाडाच्या पेशीतील रस अखंडपणे शोषण करते. परिणामी, पाने सुरकुतल्यासारखी दिसतात. ही कीड शरीराबाहेर मधासारखा चिकट पदार्थ सोडते. चिकट पदार्थावर काळसर बुरशीची वाढ होते. पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. झाडाची वाढ खुंटते. उत्पादनात घट येते.
पांढरी माशी
या किडीची पिले, प्रौढ माशी पानातील रस शोषते. झाडाची पाने लहान आकाराची होऊन चुरडतात. उत्पादनात घट येते.
कोळी
याला अष्टपदी असे म्हणतात. हे आकाराने सूक्ष्म वर्तुळाकार (१ मि.मी.) असून, रंगाने लाल किंवा पिवळसर असतात. ही कीड पानाच्या खालील बाजूस राहून रस शोषते. प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालील बाजूस मुरडल्या जातात. झाडाच्या खालच्या बाजूची पाने आकाराने मोठी गर्द हिरवी, राठ पण कोकडलेली दिसतात. सर्व साधारणपणे पानाचे देठ लांबलेले आढळतात. प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते. फुले मोठ्या प्रमाणावर गळून पडतात. फळांचा आकार लहान व विद्रूप होतो. उत्पादनात भारी घट होते.
एकात्मिक व्यवस्थापन
- कीड सहनशील वाणाची लागवड करावी.
- पिकाची फेरपालट करावी. शेतामध्ये मिरची पिकावर मिरचीचे पीक घेणे टाळावे.
- मिरचीच्या रोपावर हलकेसे पाणी शिंपडल्यास फुलकिडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
- मिरची पिकासोबत ४:१ या प्रमाणात चवळी, कोथिंबीर किंवा उडीद यांचे आंतरपीक घ्यावे. झेंडू या सापळा पिकाची ४५ दिवसांची १०० झाडे प्रति एकरी लावावीत.
- निंबोळी पेंड दोनदा (रोप लावतेवेळी व एक महिन्यानंतर) १०० किलो प्रति एकरी विभागून द्यावी.
- पांढऱ्या माशीसाठी पिवळे चिकट सापळे १० प्रति हेक्टर लावावेत.
- क्रायसोपाच्या अळ्या २ प्रति झाड रस शोषण करणाऱ्या किडी नियंत्रणात राहण्यास मदत होते. मिरचीवरील फुलकिडे मावा, पांढरी माशी या रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी फिप्रोनील (५ टक्के) १.६ मि.लि किंवा स्पीनोसॅड (४५ एसएल) ०.३२ मि.लि.
- कोळीच्या नियंत्रणाकरिता, फवारणी प्रति लिटर पाणी स्पायरोमेफेसीफेन (२२.९ एससी) ०.८ मि.लि.
संपर्क : डॉ. पी. आर. झंवर (सहयोगी प्राध्यापक), ७५८८१५१२४४,
योगेश मात्रे (पी.एचडी. विद्यार्थी), ७३८७५२१९५७
(कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)