पूर्वहंगामी उसासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये

एक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०.६० ते ०.७५ किलो स्फुरद आणि १.५० ते २.०० किलो पालाश जमिनीतून शोषून घेतले जाते. त्यामुळे माती परिक्षण करून शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय, रासायनिक आणि जिवाणू खतांचा एकत्रित वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.
Integrated nutrient management leads to vigorous growth of sugarcane.
Integrated nutrient management leads to vigorous growth of sugarcane.

एक टन ऊस उत्पादनासाठी १.२५ ते १.५० किलो नत्र, ०.६० ते ०.७५ किलो स्फुरद आणि १.५० ते २.०० किलो पालाश जमिनीतून शोषून घेतले जाते. त्यामुळे माती परिक्षण करून शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय, रासायनिक आणि जिवाणू खतांचा एकत्रित वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीच्या जैविक आणि भौतिक सुपिकतेमध्ये वाढ होते. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीत हवा खेळती राहते, जिवाणूंची संख्या आणि सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. यामुळे अन्नद्रव्ये उपलब्ध होण्याचे प्रमाण देखील वाढते. रासायनिक खताबरोबर सेंद्रिय खतांपैकी जे उपलब्ध असेल ते वापरावे. लागवडीपूर्वी किंवा लागवडीच्या वेळेस सेंद्रिय खत वापरावे. कारण सेंद्रिय खताद्धारे अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सावकाश होते. शेणखत 

  • शेणखतात ०.८० टक्के नत्र, ०.६५ टक्के स्फुरद आणि ०.८८ टक्के पालाश असते.
  • पूर्वहंगामी उसासाठी हेक्टरी २५ टन शेणखत खत वापरावे. यापैकी शेणखताची अर्धी मात्रा ऊस लागवडीपूर्वी म्हणजेच दुसऱ्या नांगरटीपूर्वी शेतात पसरून द्यावी व उरलेली अर्धी मात्रा सरी वरंबे तयार केल्यानंतर सरीमध्ये मिसळून द्यावी.
  •  शेणखत उपलब्ध नसल्यास उसासाठी इतर सेंद्रिय स्त्रोतांचा वापर करणे आवश्यक आहे.
  • पाचटाचे कंपोष्ट 

  •  उसाचे पाचट शेतातच कुजविल्यास त्याचा पिकासाठी तसेच जमिनीस चांगला फायदा होतो.
  • पाचटामध्ये ०.४२ ते ०.५० टक्के नत्र, ०.१७ ते ०.२० टक्के स्फुरद आणि ०.९० ते १.०० टक्के पालाश आणि ३२ ते ४० टक्के सेंद्रिय कर्ब असतो.
  • एक हेक्टर क्षेत्रामधून ७.५ ते १० टन पाचट मिळते आणि त्यापासून ३१.५ ते ५० किलो नत्र, १२.७५ ते ३० किलो स्फुरद, ५२.५० ते १०० किलो पालाश आणि ३ ते ४ हजार किलो सेंद्रिय कर्ब जमिनीत मिसळले जाते.
  • शेताच्या बाहेर पाचटाचे सेंद्रिय खत

  • एक टन पाचटासाठी ५ ते ६ मीटर लांबी, २ मीटर रुंद व १ मीटर खोलीचा खड्डा घ्यावा. शक्य झाल्यास पाचटाचे लहान तुकडे करावेत. त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
  • पाचटाचा सुरवातीला २० ते ३० सें.मी जाडीचा थर देऊन या थरावर एक टन पाचटासाठी ८ किलो युरिया व १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट व १०० लिटर पाणी शिंपडावे. त्यानंतर १ किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणू संवर्धनाचे मिश्रण असलेला शेणकाला समप्रमाणात पाचटावर टाकावा. तसेच आवश्यकता वाटल्यास जास्त पाणी शिंपडावे.
  • अशा रीतीने पाचटाचे थर जमिनीच्यावर एक फुटांपर्यंत भरून घ्यावेत. त्यानंतर खड्याचा वरचा भाग शेणमातीने झाकून घ्यावा. एक ते दीड महिन्याच्या अंतराने खड्डयाची चाळणी करावी. आवश्यकतेनुसार खड्डयामध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी पाणी शिंपडावे. साधारणतः ६० टक्के ओलावा राहील या बेताने पाण्याचा वापर करावा अशा प्रकारे चार ते साडेचार महिन्यात पाचटापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते.
  • लागवड केलेल्या उसामध्ये पाचटाचे सेंद्रिय खत 

  • तोडणी झाल्यानंतर खोडवा घ्यावयाचा नसेल तर राहिलेले पाचट गोळा करून ते नवीन लागवड करावयाच्या प्रत्येक सरीमध्ये पाचट दाबून घ्यावे. त्यावर साधारणपणे १ टन पाचटासाठी ८ किलो युरिया आणि १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट १०० लिटर पाण्यामध्ये द्रावण करून पाचटावर शिंपडावे. त्यानंतर १०० लिटर पाणी, १०० किलो शेण, तसेच १ किलो कंपोष्ट जिवाणू संवर्धन याचा शेणकाला त्यावर शिंपडावा.
  • रिजरच्या सहाय्याने सरीचा वरंबा व वरंब्याची सरी करून सर्व पाचट झाकून घ्यावे. यानंतर तयार झालेल्या सरीमध्ये नेहमीच्या पद्धतीने रासायनिक खतमात्रा द्यावी. ऊस लागवड करावी. चार ते साडेचार महिन्यामध्ये झाकलेल्या सरीमधील पाचट कुजून शेतातच सेंद्रिय खत तयार होते.
  • खोडव्यामध्ये पाचटाचे सेंद्रिय खत 

  •  लागवडीचा ऊस तुटून गेल्यावर खोडवा पिकामध्ये बुडके मोकळे करून सरीमध्ये पाचट दाबून टाकावे. त्यानंतर बुडखे धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटून घ्यावेत. त्यामुळे बुडख्यावर सूर्यप्रकाश पडून नवीन कोंब जोमदार येतील. त्यावर लगेच १० ग्रॅम कार्बेन्डाझिम १० लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची बुडख्यावर फवारणी करावी. यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगाचा प्रतिबंध होतो.
  • शेतात पसरलेल्या पाचटावर प्रती १० गुंठे क्षेत्रावर १ टन पाचटासाठी ८ किलो युरिया १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट समप्रमाणात पाचटावर टाकावे. त्यानंतर १ किलो पाचट कुजविणारे संवर्धन यांचे शेणामध्ये द्रावण करून तो शेणकाला पाचटावर समप्रमाणात शिंपडावा. खोडव्याला पहिले पाणी द्यावे. ही क्रिया ऊस तुटून गेल्यावर पहिल्या १५ दिवसात करावी.
  • खोडव्यामध्ये पाचटाचे नियोजन केल्यास सुरवातीच्या काळात सरीमध्ये आच्छादन म्हणून उपयोग होतो. त्यामुळे जमिनीतील ओलाव्याचे बाष्पीभवन कमी होऊन सिंचनाच्या पाण्याची बचत होते. तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
  • साडेचार ते पाच महिन्यानंतर सर्व पाचट कुजून खोडव्यामध्ये उत्तम सेंद्रिय खत तयार होते. पाचट ठेवण्यासाठी ४.५ ते ५ फुटाची सरी ठेवावी.
  • प्रेसमड केक/ प्रेसमड कंपोष्ट 

  • प्रेसमड केकमध्ये १.५ टक्के नत्र, २.२७ टक्के स्फुरद आणि १.० टक्के पालाश असते.
  • लागवडीच्या उसासाठी प्रति हेक्टरी ६ टन वाळलेली प्रेसमड वापरल्यास स्फुरदयुक्त खताची ३३ टक्के मात्रा कमी करावी.
  • प्रति हेक्टरी ९ टन वाळलेले प्रेसमड वापरल्यास स्फुरदयुक्त खतांची ६६ टक्के मात्रा कमी करावी.
  • सध्या काही साखर कारखाना प्रक्षेत्रावर प्रेसमड केक, उपलब्ध काडी कचरा आणि स्पेंट वॉश यांचे एकत्रित कंपोष्ट केले जाते. याला प्रेसमड कंपोस्ट असे म्हणतात.
  • प्रेसमड केक किंवा प्रेसमड कंपोष्ट हे नांगरट झाल्यानंतर सरी सोडण्यापूर्वी जमिनीमध्ये मिसळावे. म्हणजे ते मातीत चांगले मिसळले जाते.
  • गांडूळ खत 

  • गांडूळ खतामध्ये ०.७५ ते २.० टक्के नत्र, ०.८२ टक्के स्फुरद आणि ०.६५ ते १.२५ टक्के पालाश असते.
  • ऊस पिकासाठी प्रति हेक्टरी ५ टन गांडूळखत वापरावे. गांडूळ खत लागवडीपूर्वी सरीमध्ये टाकून मातीने झाकावे.
  • हिरवळीची खते 

  • शेणखताची उपलब्धता कमी असल्यास पूरक खत म्हणून ऊस लागवडीपूर्वी ताग, धैंचा, शेवरी, चवळी, उडीद यासारखी हिरवळीचे पीक घ्यावे.
  •  तागापासून हेक्टरी ९० किलो, धैंचा पासून हेक्टरी ८४ किलो तर चवळीपासून हेक्टरी ७४ किलो नत्र जमिनीला मिळते.
  • ऊस लागवडीपूर्वी किंवा उसात आंतरपीक असे एका हंगामात सलग दोन वेळा हिरवळीचे पीक घेता येते.
  • रासायनिक खतांचा वापर

  • पूर्वहंगामी उसासाठी नत्र ३४० किलो, स्फुरद १७० किलो आणि पालाश १७० किलो प्रति हेक्टरी लागते. त्यासाठी ७३८ किलो युरिया, १०६२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि २८४ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरी द्यावे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅगेनीज सल्फेट आणि ५ किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी द्यावे.
  • पूर्वहंगामी उसासाठी रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक (किलो प्रति हेक्टर)

    खतमात्रा देण्याची वेळ नत्र (युरिया)  स्फुरद(सिं.सु.फाँ) पालाश (म्यु.ऑ.पो.)
     लागवडीच्या वेळी ३४(७४ ८५ (५३१) ८५ (१४२)
    लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी १३६(२९५) -- --
     लागवडीनंतर १२ ते १६ आठवड्यांनी ३४ (७४) -- --
     मोठ्या बांधणीच्या वेळी १३६(२९५) ८५(५३१) ८५ (१४२)
    एकूण ३४० (७३८) १७० (१०६२) १७० (२८४)  

    टीप:

  • अॅसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकाची बीज प्रक्रिया केल्यास नत्र खताची मात्रा ५० टक्के व स्फुरद खताची मात्रा २५ टक्के कमी करून द्यावी.
  • को.८६०३२ या ऊस जातीची उत्पादनक्षमता जास्त असल्यामुळे रासायनिक खतांची खतमात्रा २५ टक्यांनी जास्त देण्याची शिफारस आहे.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर

  • माती परीक्षण अहवालानुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपाययोजना कराव्यात. २) जमिनीत लोह, जस्त, मंगल आणि बोरॉन या सूक्ष्मअन्नद्रव्यांची कमतरता आहे, त्या जमिनीत रासायनिक खतांव्यतिरिक्त लोहासाठी २५ किलो फेरस सल्फेट, जस्तासाठी २० किलो झिंक सल्फेट, मंगलसाठी १० किलो मॅगेनीज सल्फेट आणि बोरॉनसाठी ५ किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी वापरावे.
  • सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करताना ते जसेच्या तसे जमिनीत देऊ नयेत. सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते ही शेणखतात १:१० या प्रमाणात मिसळून त्यावर पाणी शिंपडावे व ५ ते ६ दिवसांनी चांगले मुरल्यावर ते रासायनिक वरखतांच्या मात्रेसोबत जमिनीत चळी घेवून द्यावे. त्यामुळे जमिनीमध्ये सुक्ष्मअन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते.
  • जिवाणू खते

  • ऊस बेण्याला अॅसेटोबॅक्टर हेक्टरी १० किलो आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू हेक्टरी १.२५ किलो प्रति १०० लिटर पाण्याच्या द्रावणात ३० मिनिटे बुडवून लागवड केली असता, ५० टक्के नत्र आणि २५ टक्के स्फुरद खताची बचत होऊन उत्पादनात वाढ होते.
  • अॅसिटोबॅक्टर हे जिवाणू बेण्याच्या पेशीमध्ये प्रवेश करून नत्राची बचत करतात.
  • स्फुरद विरघळविणारे जिवाणू जमिनीतील स्फुरद ऊस वाढीसाठी उपलब्ध करून देतात.
  • संपर्कः डॉ.सुभाष घोडके, ९९६०४८२७८० (मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com