खरीप हंगामातील फळभाज्यांतील कीड-रोगांचे नियंत्रण

खरीप हंगामातील मिरची, वांगे आणि टोमॅटो या फळभाजी पिकामध्ये विशिष्ट कायिक व पुनरुत्पादन वाढीच्या अवस्थेत पानांमध्ये रसाचे प्रमाण वाढते. या रसाचे शोषण रोग व किडींचा प्रादुर्भावही वाढत असतो.
मिरची पिकातील फळसड आणि पर्णगुच्छ रोगाची लक्षणे
मिरची पिकातील फळसड आणि पर्णगुच्छ रोगाची लक्षणे

खरीप हंगामातील मिरची, वांगे आणि टोमॅटो या फळभाजी पिकामध्ये विशिष्ट कायिक व पुनरुत्पादन वाढीच्या अवस्थेत पानांमध्ये रसाचे प्रमाण वाढते. या रसाचे शोषण रोग व किडींचा प्रादुर्भावही वाढत असतो. रोग व्यवस्थापन खरिपामध्ये ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे बुरशी, विषाणू, जिवाणू यांच्यापासून उद्भवणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढते. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान होऊ शकते. मिरची फळसड आणि शेंडेमर  मिरची पिकावर जुलै-ऑगस्ट या कालावधीत मुख्यत्वे फळसड आणि शेंडेमर या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. ओळखण्याची खूण -

  • फळसडमध्ये मिरची फळावर फिकट पिवळसर, तसेच लांबुळके ठिपके आढळून येतात.
  • शेंडेमर रोगामध्ये झाडाचे शेंडे वरून खाली वाळत जाते. वेळीच उपाययोजना न केल्यास पूर्ण झाड मुळापर्यंत वाळू शकते.
  • नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा प्रॉपिनेब (७० डब्ल्यूपी) ०.५ ग्रॅम किंवा डायफेनकोनॅझोल (२५ टक्के ईसी) ०.२५ ग्रॅम. लिफ कर्ल (चुरडामुरडा) :

  • मिरचीतील सर्वांत घातक रोग.
  • या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशींद्वारे होतो. पांढरी माशी पानातील रस शोषते. यामुळे पानांच्या कडा वरच्या भागाला वळतात. पानांचा आकार लहान होतो. दोन डोळेकांडीमधील अंतर कमी होते. अशा झाडांना मिरची फळे कमी, आकाराने लहान व वेडीवाकडी लागतात.
  • नियंत्रण

  • रोग येऊ नये, यासाठी पांढऱ्या माशीचे नियंत्रण करावे. त्यासाठी
  • पिवळे चिकट सापळे १६० प्रति हेक्टरी पिकांच्या उंचीच्या समकक्ष लावावे.
  • फवारणी प्रति लिटर पाणी
  • पांढरी माशी नियंत्रणासाठी, फेनप्रोपाथ्रिन (३० टक्के ईसी) १ मिलि किंवा पायरीप्रॉक्सीफेन (१० टक्के ईसी) १.७ मिलि किंवा डायमिथोएट (३० टक्के) २ मिलि.
  • वांगी  पानांवरील ठिपके आणि फळसड  पिवळसर, तपकिरी रंगाचे गोलाकार ते अनियमित आकाराचे ठिपके पानावर आढळून येतात. ज्या झाडांना वांग्याची फळे लागलेली आहेत. ती फळे देठापासून खाली पूर्णपणे सडून जातात. नियंत्रण ( फवारणी प्रति लिटर पाणी) मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझीम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम. पर्णगुच्छ  पर्णगुच्छ या विषाणूजन्य रोगाचा प्रसार तुडतुड्यांद्वारे होतो. पानांचा आकार लहान होतो. एकाच ठिकाणी अनेक पाने तयार होऊन गुच्छासारखे दिसतो. अशा झाडांना फळे लागत नाहीत. लागली तरी ती आकाराने खूप लहान व वेडीवाकडी असतात. संख्येने खूप कमी राहतात. नियंत्रण :  फवारणी प्रति लिटर पाणी

  • प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसताच मुळासकट उपटून नष्ट करावीत.
  • डायमेथोएट (३० टक्के) २ मिलि किंवा ॲफिडोपायरोपेन (५० जी./लि.डीसी) १.५ ग्रॅम.
  • टोमॅटो  रोगाच्या प्रादुर्भावामुळे टोमॅटो पिकाच्या शारीरिक वाढीत अडथळे निर्माण होतात. फुलांची संख्या, फळांची संख्या व आकार यामध्ये घट होते. करपा पानांच्या कडेवर फिक्कट तपकिरी रंगाचे ठिपके लांबुळके डाग आढळून येतात. वेळीच नियंत्रण न केल्यास ठिपके वाढत जातात. अशी पाने गळून जातात. पर्यायाने झाड कोमेजते. फळकूज या रोगात टोमॅटोच्या फळावर तपकिरी रंगाचे अनियमित आकाराचे डाग आढळून येतात. वेळीच नियंत्रण न केल्यास हे डाग वाढत जाऊन फळे कुजतात किंवा सडतात. नियंत्रण :

  • प्रादुर्भावग्रस्त फळे तोडून नष्ट करावीत.
  • नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी
  • मॅन्कोझेब (७५ डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम.
  • आवश्यकता भासल्यास १२ ते १५ दिवसांनी बुरशीनाशक बदलून पुन्हा फवारणी करावी.
  • कीड नियंत्रण व्यवस्थापन मिरची पिकावर फुलकिडे पांढरी माशी, कोळी, मावा अशा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. फुलधारणेपूर्वी आणि नंतर मिरची पिकावर जुलै-ऑगस्ट महिन्यात फुलकिड्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पांढरी माशी  ओळख : पांढऱ्या माशीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालील बाजूला राहून पानातील रस शोषतात. पाने पिवळी पडून, मलूल होतात. झाडे निस्तेज होतात. या किडीमुळे लिफ कर्ल या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. नियंत्रण  शेतात पिवळे चिकट सापळे लावावेत. फवारणी प्रति लिटर पाणी फेनपोपॅथ्रीन (३० टक्के) ०.३३ मिलि. फुलकिडे  हे फिक्कट पिवळसर किंवा तपकिरी रंगाचे, आकाराने लहान व लांबट असतात. प्रौढ व पिले पानाचा वरील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषतात. पाने वरील बाजूने आक्रसलेली किंवा वाटीच्या आकाराची होतात. नियंत्रण ( फवारणी प्रति लिटर पाणी)

  • इथिऑन (५० टक्के प्रवाही) ३ मिलि किंवा ॲसिटामीप्रीड ०.१ ग्रॅम, किंवा इमिडाक्लोप्रीड ०.२५ मिलि.
  • आवश्यकतेनुसार कीटकनाशक बदलून १० दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
  • वांगी  पांढरी माशी वांगी पिकावर पांढऱ्या माशीच्या प्रादुर्भावाने पाने पिवळी पडतात व मलूल दिसतात. या किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास पाने चिकट होऊन, त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. नियंत्रण, फवारणी प्रति लिटर पाणी थायामेथोक्झाम ०.४ ग्रॅम. शेंडे व फळे पोखरणारी अळी  शेंडे व फळे पोखरणारी अळी सुरुवातीला शेंड्यांमधून व नंतर फुले, फळे यांचे नुकसान करते. ही अळी शेंड्यामध्ये राहून शेंड्याच्या आतील भाग खाते, त्यामुळे शेंडा मलूल होऊन खाली पडतो. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडे मरतात. नंतर ही अळी कोवळ्या फळांच्या आतील भाग खाते, त्यामुळे फळे वेडीवाकडी झालेली दिसतात. नियंत्रण : फवारणी प्रति लिटर पाणी ॲझाडिरेक्टीन (१० हजार पीपीएम) २ मिलि किंवा थायोडीकार्ब (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) १.५ ग्रॅम, किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ०.४ ग्रॅम. टोमॅटो  नागअळी  टोमॅटो पिकावरच्या वाढीच्या अवस्थेत नव्या व जून झालेल्या पानाच्या आतील हरितद्रव्य ही अळी खाते. त्यामुळे पानावर पांढऱ्या रंगाच्या वेड्यावाकड्या नागमोडी रेषा आढळून येतात. वेळीच नियंत्रण न केल्यास या किडीमुळे टोमॅटो पिकाचे परिपक्वतेच्या अवस्थेत मोठे आर्थिक नुकसान होते. नियंत्रण , फवारणी प्रति लिटर पाणी जैविक नियंत्रणासाठी, व्हर्टिसिलीअम लेकॅनी ४ ग्रॅम. रासायनिक नियंत्रणासाठी, सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के) १.८ मिलि.  हिरवी बोंड अळी किंवा फळे पोखरणारी अळी : लहान अळ्या सुरुवातीला पानावरील आवरण खरडून खातात. त्यानंतर अळी, फुले व कोवळी फळे खातात. पूर्ण वाढ झालेली अळी तोंडाकडील भाग टोमॅटोमध्ये घालून आतील भाग फस्त करते. नियंत्रण ( फवारणी प्रति लिटर पाणी) लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ०.६ मिलि किंवा इंडोक्झाकार्ब १ मिलि. टीप- कीटकनाशकाच्या फवारणीनंतर किमान एक आठवडा फळे काढू नयेत. लेखातील सर्व कीडनाशकांना लेबल क्लेम आहेत. - डॉ. एस. एम. घावडे, ९६५७७२५८४४ डॉ. वंदना. डी. मोहोड, ७०२०९०९७२८ डॉ. एम. एन. इंगोले, ९४२१७५४८७८ (मिरची व भाजीपाला संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com