agricultural news in marathi integrated pest management in groundnut crop | Page 2 ||| Agrowon

उन्हाळी भुईमुगातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

डॉ. प्रमोद मगर, डॉ. अनिल ठाकरे, डॉ. सुरेश नेमाडे
रविवार, 24 जानेवारी 2021

भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक असून, निरनिराळ्या किडी, रोग व तणांच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी या पिकाचे मोठे नुकसान होते. भुईमूग पिकावरील कीड व रोगांचे वेळीच एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
 

भुईमूग पीक तीनही हंगामांत घेतले जाणारे पीक असून, निरनिराळ्या किडी, रोग व तणांच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी या पिकाचे मोठे नुकसान होते. भुईमूग पिकावरील कीड व रोगांचे वेळीच एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

भुईमुगावरील किडी

 • भूमिगत किडी - वाळवी, हुमणी अळी, मुळे खाणारी अळी,  
 • रस शोषक किडी - फुलकिडे, तुडतुडे, मावा, 
 • पतंगवर्गीय किडी - पाने पोखरणारी अळी (नागअळी), लाल केसाळ अळी, बिहारी केसाळ अळी व तंबाखूवरील पाने खाणारी अळी. 
 • रोग : मूळकुज, मानकुज, मर रोग, तांबेरा टिक्का (पानावरील ठिपके), शेंडेमर/ बड नेक्रोसिस, भुईमुगावरील स्ट्राईप विषाणू, भुईमूगावरील रोझेट विषाणू इ. 

फुलकिडे 

 • अतिशय लहान फुलकिडे पानाच्या कोवळ्या शेंड्यामध्ये व पानांवर दिसून येतात. 
 • लहान पिल्ले व प्रौढ पानावर खरडून त्यातून निघालेल्या अन्नरसाचे शोषण करतात. पानावर पांढरे-पिवळसर फिक्कट चट्टे पडतात. 
 • पानाच्या खालचा भाग तपकिरी रंगाचा होतो. सूर्यप्रकाशात पाहिल्यास तो चमकतो. 
 • वाहक : फुलकिडे हे शेंडेमर किंवा बड नेक्रोसिस या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
 • आर्थिक नुकसान पातळी- ५ फुलकिडे प्रती शेंडा (घडी केलेल्या पानांमध्ये)

तुडतुडे 

 • हिरवे, पाचरीच्या आकाराचे, चाल तिरकस. 
 • पिल्ले व प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषतात. पाने पिवळी पडतात. प्रादुर्भावग्रस्त पानाच्या शेंड्यावर “V” आकाराचे चट्टे दिसून येतात. अशा करपलेल्या पानांवरील लक्षणांना ‘हॉपर बर्न’ म्हणतात. 
 • या किडीचा प्रादुर्भाव खरीप हंगामात ऑगष्ट- सप्टेंबर महिन्यात आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी- मार्च महिन्यात अधिक आढळतो.
 • आर्थिक नुकसान पातळी - ५ ते १० तुडतुडे प्रति झाड. (पीक उगवणींनंतर ३० दिवस), त्यानंतर १५ ते २० तुडतुडे प्रती झाड.

मावा 

 • लहान आणि अंडाकृती, काळपट, लालसर, तपकिरी किंवा पिवळसर रंग. 
 • पिल्ले व प्रौढ सतत पानातील रस शोषतात. 
 • शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या गोड मधासारख्या चिकट द्रवावर काळ्या बुरशींची वाढ होते. कालांतराने पाने चिकट व काळी पडतात. प्रकाशसंश्लेषण प्रक्रिया मंदावते. झाडाची 
 • वाढ खुंटते. या किडीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडांची पाने सुरवातीला पिवळी  होऊन गळून पडतात. कालांतराने संपूर्ण झाड वाळते. 
 • वाहक : मावा भुईमूगावरील स्ट्राईप विषाणू (Peanut stripe virus), पर्णगुच्छ आणि भुईमूगावरील रोझेट विषाणू या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात.
 • आर्थिक नुकसान पातळी :५ ते १० मावा प्रति शेंडा (सुरवातीच्या अवस्थेत.)

केंद्रीय कीटकनाशक मंडळ, फरिदाबाद शिफारशीत कीडनिहाय कीडनाशके
 

कीड कीटकनाशक (प्रमाण प्रति १० लिटर पाणी)
मावा, मुळे खाणारी अळी क्लोरपायरिफॉस (२०% ईसी) २० मि.लि.
वाळवी  थायामेथोक्झाम (७५% एसजी) २.५ ग्रॅम
मावा, तुडतुडे इमिडाक्लोप्रिड (१७.८% एसएल) २.५ मि.लि.
तुडतुडे, फुलकिडे क्विनॉलफॉस (२५% ईसी) १४ ते २८ मि.लि.
तुडतुडे, फुलकिडे, लीफ मायनर लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (५% ईसी) ५ मि.लि.
लीफ मायनर (पाने पोखरणारी अळी) डेल्टामेथ्रिन (२.८% ईसी) १२.५ मि.लि.
क्विनॉलफॉस (२५% ईसी) २० मि.लि.
तुडतुडे, लष्करी अळी, स्पोडोप्टेरा लिट्यूरा थायामेथोक्झाम (१२.६%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५% झेडसी) ३ मि.लि.
वाळवी, फुलकिडे, तुडतुडे, मुळे खाणारी अळी, मान कुजव्या, खोड सड, टिक्का व तांबेरा रोग   इमिडाक्लोप्रिड (१८.५०%) अधिक हेक्झाकोनॅझोल (१.५०% एफएस) २ मि.लि. प्रति किलो बियाणे.

एकात्मिक कीड व्यवस्थापन 

 • पिकांची फेरपालट करावी. शक्यतो सोयाबीन पीक घेतल्यानंतर भुईमूग पीक घेऊ नये.
 • बीजप्रक्रिया - इमिडाक्लोप्रिड (१८.५०%) अधिक हेक्झाकोनॅझोल (१.५०% एफएस) (संयुक्त कीटकनाशक व बुरशीनाशक) २ मि.लि. त्यानंतर ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम, रायझोबिअम २५ ग्रॅम अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या अनुक्रमाने बीजप्रक्रिया करून पेरणी करावी.
 • चवळी, सोयाबीन, एरंडी या सारखी सापळा पिके भुईमूग पिकाच्या चारही बाजूंनी लावावीत. यामुळे मुख्य पिकावर मावा व तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो.  भुईमूग पिकांमध्ये प्रत्येक १० ओळीनंतर एक ओळ चवळी या सापळा पिकाची लागवड करावी. यामुळे रस शोषक कीड विशेषतः मावा आकर्षित होते. यावर मित्रकीटकांचे संवर्धन होऊन संख्येत वाढ होते. 
 • भुईमूग पिकामध्ये मका आंतरपीक घेतल्यास फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते. 
 • रस शोषक किडींच्या प्रभावी व्यवस्थापनाकरिता २० ते २५ पिवळे निळे चिकट सापळे लावावेत. 
 • पीक लागवडीनंतर ४० दिवसांपर्यंत शेत तणविरहित ठेवावे. शेतात व धुऱ्यावर बावची वनस्पती असल्यास ती उपटून नष्ट करावी. स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव  रोखण्यास मदत होते.  कीड व रोग प्रादुर्भावग्रस्त पाने, अंडीपुंज असलेली पाने, जाळीदार पाने गोळा करून अळीसह नष्ट करावीत.  
 • हेक्टरी पाच प्रकाश सापळे, ३० ते ४० पक्षी थांबे लावावेत. तंबाखूचे पाने खाणाऱ्या अळीच्या सर्वेक्षणाकरिता हेक्टरी ५ आणि कीड व्यवस्थापनाकरिता प्रति हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत. त्यातील ल्युर, प्रलोभने शिफारशीत वेळेत बदलावेत. 
 • लष्करी अळीच्या (स्पोडोप्टेरा लिट्यूरा) एस.एल.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशक ५०० मि.लि. प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी.  किडींचा प्राथमिक स्वरूपाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास निंबोळी अर्क (५%) किंवा कडूनिंब आधारीत कीटकनाशक ॲझाडिरॅक्टिन (३०० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे  वापर करावा.  व्यवस्थापनाचे सर्व उपाय वापरल्यानंतरही किडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक झाल्यास शेवटचा पर्याय म्हणून शिफारशीत रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. 

संपर्क- डॉ. प्रमोद मगर, ७७५७०८१८८५, 
(विषय विशेषज्ञ -कीटकशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)


इतर ताज्या घडामोडी
खरिपात सोयाबीन पेरणीवेळी जोड ओळ पद्धत...जालना ः ‘‘येणाऱ्या खरीप हंगामात सोयाबीन पिकात जोड...
मराठवाडा रेशीम शेतीचा केंद्र बिंदू ः डॉ...जालना : ‘‘हवामान बदलानुसार योग्य त्या पिकांच्या...
‘महाबीज’चे २१० हेक्टरवर सोयाबीन...परभणी ः ‘महाबीज’च्या परभणी विभागांतर्गत सहा...
‘युटोपियन’कडून पाच लाख मेट्रिक टन उसाचे...सोलापूर ः ‘‘यंदा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले...
म्हैसाळच्या आवर्तनासाठी पाणी मागणीची...सांगली ः मिरज पूर्व भागासह कवठेमहांकाळ, जत तालुक्...
`सुधारित शिफारशींसाठी शेतकऱ्यांमध्ये...परभणी ः ‘‘सोयाबीन उत्पादकता वाढ तसेच उत्पादन खर्च...
बूथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले मुंबई : काँग्रेस पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व...
प्रत्येक गावांनी पाण्याचे अंदाजपत्रक...पुणे : गावात पडणारा पाऊस व पिकांना लागणारे पाणी...
नेपाळच्या कांदा व्यापाऱ्याला ...नाशिक : जिल्ह्यात शेतमाल विक्री पश्चात...
वीज जोडणी तोडल्यास राज्यभर आंदोलन :...अकोला : आधीच कोरोनामुळे गेले वर्षभर शेतकरी व...
पालखेड उपबाजार आवारात द्राक्ष मण्यांचे...नाशिक : पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचा...
तीनच दिवसांत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ...नाशिक : सोमवारी ४२३०, बुधवारी ३४८१ आणि गुरुवारी...
रब्बीसाठी आवर्तन सुटले, गिरणाचे पाणी...जळगाव : खानदेशात प्रमुख प्रकल्पांमधून रब्बी व...
किसान सन्मान योजनेत नगर जिल्ह्याचा...नगर : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत भौतिक...
तूरडाळ आयातीचे धोरण बदलावे ः खासदार...बुलडाणा : केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना...
बाजरीचे पीक जोमात, आंतरमशागतीसह खते...जळगाव : खानदेशात बाजरी पीक यंदा जोमात आहे. पिकाला...
सिंधुदुर्गात काजू बी खरेदीला सुरुवात सिंधुदुर्गनगरी ः फळबागायतदार संघ सावंतवाडी आणि...
सक्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात आंदोलन परभणी : महावितरण कंपनीकडून कृषीपंपाच्या वीज देयक...
उन्हाळी नाचणी अकाली पक्वतेची कारणे सध्या राज्यातील काही भागांत नाचणीच्या मुख्य...
...आणि आम्ही वाममार्गावरून ढळलोभारताप्रमाणेच ब्रिटिशांच्या  गुलामीतून एकाच...