agricultural news in marathi Integrated pest management in paddy crop | Agrowon

भात पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन

डॉ. नरेंद्र काशीद, डॉ. किरण रघुवंशी
गुरुवार, 29 जुलै 2021

भात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय. एकात्मिक भात पीक व्यवस्थापनातील हा महत्त्वाचा घटक होय. भात पिकातील कीड व रोग व्यवस्थापनाची माहिती घेऊ.
 

भात पिकाचे हेक्टरी उत्पादन कमी येण्यामध्ये कीड व रोग व्यवस्थापनाचा अभाव हे होय. एकात्मिक भात पीक व्यवस्थापनातील हा महत्त्वाचा घटक होय. भात पिकातील कीड व रोग व्यवस्थापनाची माहिती घेऊ.

भात पिकातील दमट हवामान, जास्त आर्द्रता, खाचरात साठून राहणारे पाणी, अनियमित पाऊस या बाबीमुळे किडींसाठी अनुकूल वातावरण तयार होऊन, प्रादुर्भावामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येते. एकूण १०० पेक्षा जास्त किडींची नोंद. पैकी महाराष्ट्रात खोडकिडा, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, लष्करी अळी, काटेरी भुंगा, लोंबीतील ढेकण्या, गादमाशी, खेकडा, इ. प्रमुख किडी.

खोडकिडा 

 • पतंग -पिवळसर, मध्यम आकाराचे. मादीच्या पंखाच्या खालील भागावर प्रत्येकी एक काळा ठिपका, तर नरामध्ये तो नसतो.
 • अंडी - एक मादी १०० ते २०० अंडी पुंजक्याने पानावर घालते. (५ ते ८ दिवस)
 • अळी - अंड्यामधून बाहेर पडलेली अळी प्रथम कोवळी पाने खाते. नंतर खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते. रोपांचा गाभा मरतो. कीडग्रस्त झाडांना लोंब्यांत दाणे भरत नाहीत. अशा पांढऱ्या लोंब्यांना पळींज किंवा स्थानिक भाषेत बगळी, पांढरी पिसी असे म्हणतात. पूर्ण वाढलेली अळी ही रंगाने पिवळसर व डोक्याकडील भाग पिवळसर नारंगी दिसतो. अळी अवस्था १६-१७ दिवसांची असून, सहा अवस्थेतून जाते.
 • कोष -अळी खोडातच कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९-१२ दिवस. एक पिढी ३१ ते ४० दिवसांत पूर्ण होते.

तपकिरी तुडतुडे 

 • मागील तीन ते चार वर्षांमध्ये या किडीचे प्रमाण वाढले आहे.
 • तुडतुडे मादी पर्णकोषात किंवा मध्यशिरेमध्ये १८० ते२०० अंडी घालते. त्यातून ७-९ दिवसांत पिले बाहेर पडतात. २-३ आठवड्यांत पूर्ण वाढ होते. प्रथम तुडतुड्यांचा रंग वाळलेल्या गवतासारखा असतो, नंतर तो तपकिरी होतो.
 • तुडतुडे पानातील रस शोषतात, त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडून झाड सुकते. नंतर वाळते.
 • शेतात कीडग्रस्त भात गोलाकार करपलेला दिसतो, त्यास ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात. तुडतुडे आकाराने लहान, तिरकस व भरभर चालीमुळे ओळखता येतात. शेतात लांब पंखाचे भरपूर तुडतुडे खोडावर खालील बाजूस दिसून येतात.

 हिरवे तुडतुडे :

 • हे तुडतुडे आकाराने लहान, पूर्णावस्थेत हिरवे व पंखावर काळे ठिपके किंवा चट्टे दिसतात.
 • मादी तुडतुडे पानाचा पृष्ठभाग खरवडून पर्णकोषात किंवा पानाच्या मध्यशिरेमध्ये अंडी घालतात. त्यातून ४-८ दिवसांत पिले बाहेर पडून त्यांची २-३ आठवड्यांत पूर्ण वाढ होते. या कालावधीत ते ४ ते ५ वेळा कात टाकतात. प्रौढ तुडतुडे ४ ते ५ मि.मी. लांब असतात. एक पिढी पूर्ण होण्यास १८ ते २५ दिवस लागतात.
 • तुडतुडे पानातील रस शोषतात, त्यामुळे पाने पिवळी पडतात. रोपांची वाढ खुंटते. ही कीड ‘टुंग्रो’ रोगाचा प्रसार करते.

पाने गुंडाळणारी अळी 

 • पतंग लहान, फिकट-पिवळसर असून त्यांच्या पंखांच्या कडांवर काळसर, नागमोडी नक्षी असते. मादी पानावर मुख्य शिरेजवळ ३०० अंडी घालते. त्यातून नुकतीच बाहेर आलेली अळी पांढरट-हिरवी असते. तिची १५-१७ दिवसांत पूर्ण वाढ झाल्यानंतर पिवळसर हिरवी होते.
 • अळी गुंडाळलेल्या पानाच्या आत राहून पृष्ठभागावरील हरितद्रव्य खाते. पाने पांढरट होऊन वाळतात. अळी एक आठवडा कोषावस्थेत जाते. त्यातून बाहेर पडलेले पतंग ३-४ दिवस जगतात. साधारणत: एक महिन्यात एक पिढी पूर्ण होते.

लष्करी अळी 

 • पतंग- मजबूत, तपकिरी असतात.
 • अंडी- मादी पतंग लहान लहान समूहाने २०० ते ३०० अंडी भातावर, गवतावर घालून करड्या धाग्यांनी झाकतात. (अंडे अवस्था -एक आठवडा)
 • अळी -संध्याकाळी किंवा पहाटे पिकावर हल्ला करते. दिवसा चोथ्यात लपून बसते. अळी हिरवट काळ्या रंगाची असते. तिच्या शरीरावर पिवळसर उभ्या रेषा असतात. या अळ्या भाताची पूर्ण पाने खाऊन फस्त करतात, लोंबी कुरतडून खातात. बांधावरील गवत देखील खाऊन पाठीमागे पानाच्या शिरा किंवा काड्याच शिल्लक ठेवतात. अळी अवस्था २०-२५ दिवसांची, कोषावस्था १०-१५ दिवस असते. एक पिढी ३०-४० दिवसांत पूर्ण होते.

काटेरी भुंगा :
भुंग्याचा रंग काळसर निळा असतो आणि त्याला अणकुचीदार काटे असतात. मादी भुंगा सरासरी ५५ अंडी घालते व त्यातून ३-५ दिवसांत अळ्या बाहेर येतात. अळी लहान पिवळसर असून पाने खाते. तिची २ आठवड्यांत पूर्ण वाढ होते आणि कोषावस्था ४-६ दिवस असते. या किडीची अळी व भुंगेरे पिकाचे नुकसान करतात. भुंगेरे पानाचा हिरवा भाग खरडून खातात, तर अळ्या पाने पोखरून वेडेवाकडे लांबट पांढरे चट्टे करतात.

लोंबीतील ढेकण्या 
शेतात या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास विशिष्ट प्रकारचा घाण वास येतो. ढेकण्या निमुळता, आकाराने लहान व लांब पायाचा असतो. पिल्ले हिरवी किंवा तपकिरी असून, प्रौढ ढेकण्या पिवळसर-हिरवा असतो. भाताचे दाणे भरण्याच्या वेळी पिल्ले व प्रौढ ढेकूण त्यातील रस शोषतात. त्यामुळे लोंब्या पोचट राहतात.

गादमाशी :
पूर्ण वाढ झाल्यानंतर डासासारख्या दिसणाऱ्या या माशीचे पाय लांबट असतात. मादीच्या पोटाचा रंग तांबूस, तर नराचा गडद तांबूस असतो. गादमाशी लांबट, फिकट गुलाबी किंवा पिवळसर रंगाची १५०-२०० अंडी पानाच्या पात्यावर किंवा खालील भागावर घालते. अंड्यातून ३ ते ४ दिवसांत अळी बाहेर पडते. अळी प्रथम भाताच्या वाढणाऱ्या कोंबामध्ये जाऊन पानाच्या खालच्या भागाची नळी किंवा पोंगा तयार करते. यालाच ‘सिल्व्हर शूट’ म्हणतात. रोपाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास अनेक फुटवे फुटतात; परिणामी रोपांची वाढ खुंटते. अळी १५ ते २० दिवसांनी कोषावस्थेत जाते. ही पिढी पूर्ण होण्यास ३ आठवडे लागतात.

खेकडा 
खेकडा हा संधिपाद प्राणी असून, भातशेतीमध्ये मुठ्या आणि चिंबोरी प्रकारचे खेकडे आढळतात. खेकडे बांधालगत बिळे तयार करून राहतात. भाताची कोवळी रोपे जमिनीलगत कुरतडून खाण्यासाठी बिळात घेऊन जातात. पहिल्या दीड महिन्यात पिकात जास्त प्रादुर्भाव दिसून येतो. खाचरांच्या बांधात छिद्रे पाडल्यामुळे त्यात पाणी राहत नाही, बांध फुटतात. उभ्या पिकातील नुकसान आणि नंतर बांधबंदिस्तीचा खर्च असे दुहेरी नुकसान होते.

उंदीर
उंदीर हे भात पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये नुकसान करतात. विशेषत: हे नुकसान लोंबी निसवण्याच्या अवस्थेमध्ये जास्त असते. उंदरांचे नुकसान हे प्रामुख्याने शेताच्या मध्यभागात केंद्रित दिसते. उंदीर हे वाढणारे फुटवे तिरप्या रीतीने पाण्याच्या पातळीच्या ५ ते १० सें.मी.वर कुरतडतात. शेतातील उंदरांच्या बिळांचे सक्रिय प्रमाण जास्त असल्यास भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन

 • भात कापणीनंतर उन्हाळ्यात जमिनीची नांगरट करून धसकटे गोळा करून त्यांचा नाश करावा, यामुळे खोडकिडी, लष्करी अळी यांच्या सुप्तावस्थेतील कोषांचा नाश होईल.
 • भात खाचरांचा आकार मर्यादित ठेवून बांधबंदिस्ती करावी. जमीन समपातळीत आणावी.
 • कीड प्रतिकारक वाणांची लागवड करावी.
 • भात शेतात निसर्गत: मिरीड, ढेकूण, कोळी, इ. विविध परभक्षी कीटक उपलब्ध असतात. त्यांचे संवर्धन करावे.
 • पिकांच्या फेरपालटामुळे देखील कीड नियंत्रणास मदत होते.

रासायनिक नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी)
तपकिरी तुडतुडे
इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस. एल.) ०.२५ मिलि.

तुडतुडे, पाने गुंडाळणारी अळी, खोडकिडा :
निंबोळी अर्क (५ टक्के) किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ३ ते ५ मिलि. किंवा
क्विनाॅलफॉस (२५ ई.सी.)३ मिलि.

तुडतुडे, खोडकिडा, गादमाशी
फिप्रोनिल (५ टक्के एस.सी.) ३ मिलि.

पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे
कारटॅप हायड्रोक्लोराइड (५० टक्के एस.पी.) २ ग्रॅम.

लष्करी अळी आणि लोंबीवरील ढेकण्या
क्लोरपायरीफॉस (२० ईसी) ४ मिलि किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (२.५ ईसी) १ मिलि.

जैविक नियंत्रणासाठी

 • जैविक नियंत्रणासाठी ‘ट्रायकोग्रामा’ प्रजातीचे १ लक्ष प्रौढ प्रति हेक्टर आठवड्याचे अंतराने पीक लागणीनंतर एक महिन्यानी चार वेळा प्रसारित करावेत.
 • खोडकीड - ट्रायकोग्रामा जापोनिकम.
 • पाने गुंडाळणारी अळी - ट्रायकोग्रामा चिलोनिस.
 • भात शेतात निसर्गत: मिरीड, ढेकूण, कोळी, इ. विविध परभक्षी मित्रकीटक उपलब्ध असतात. त्यांचे संवर्धन करावे.
 • -खेकड्याच्या बंदोबस्तासाठी खाचरात हंगामाचे सुरुवातीला किंवा प्रादुर्भाव दिसून आल्यास विषारी आमिष वापरावे. त्यासाठी ॲसिफेट (७५ टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी) ७५ ग्रॅम प्रति १ किलो शिजवलेल्या भातामध्ये मिसळावे. त्याचे १०० लहान गोळे करून खेकड्याच्या बिळात टाकावेत.
 • उंदरांच्या नियंत्रणासाठी खोल नांगरट करून शेताच्या बांधाची छटाई करावी. जमीन तयार करते वेळी जुनी बिळे बुजवून त्यांचे निवासस्थान नष्ट करावे. याबरोबरच झिंक फॉस्फाइड (२.५ टक्के) १० ग्रॅम हे खाद्यतेलात (१० मिलि.) मिसळून ३८० ग्रॅम भरड धान्यात मिसळावे. त्याच्या गोळ्या तयार करून विषारी आमिष म्हणून वापराव्यात.

डॉ. नरेंद्र काशीद, ९४२२८५१५०५
(प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे)
डॉ. किरण रघुवंशी, ९४०५००८८०१
(भात रोग शास्त्रज्ञ, कृषी संशोधन केंद्र, लोणावळा, जि. पुणे.)


इतर कृषी सल्ला
जुन्या आंबा बागेचे पुनरुज्जीवनआंबा बागेचे पुनरुज्जीवन म्हणजे छाटणीकरून झाडाचा...
द्विदल पिकांसाठी रायझोबिअम जीवाणू...पेरणीपूर्वी  बीजप्रक्रिया करण्यासाठी...
शेतकरी नियोजन : पीक संत्राशेतकरी : ऋषिकेश सोनटक्के गाव : टाकरखेडा...
राज्यात आठवडाभर पावसात उघडीपीची शक्‍यताया आठवड्यात औरंगाबाद, गडचिरोली, वर्धा, गोंदिया,...
भरड धान्ये : पोषक तत्त्वांचे आगरभारताच्या शिफारशीनुसार संयुक्त राष्ट्राने २०२३ हे...
कंपन्यांच्या माध्यमातून शाश्‍वत...अजूनही शाश्‍वत मूल्यसाखळी विकसित झालेली नाही....
देशावर लाटणं फिरवणारा कंबोडियन पोळपाटभगवान विष्णूच्या या देशात मी माझ्या बाईकवरून...
शेतकरी नियोजन : पीक कापूसशेतकरी : गणेश श्‍यामराव नानोटे गाव : ...
कृषी सल्ला (कपाशी, सोयाबीन, तूर, वांगी...कपाशी फुले उमलणे ते बोंड धरणे बागायती...
तंत्र रब्बी ज्वारी लागवडीचे...कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५...
कृषी सल्ला (खरीप भात, चिकू, नारळ, हळद)खरीप भात  दाणे भरण्याची अवस्था (हळव्या...
रब्बी ज्वारीची पूर्वतयारीरब्बी हंगामात ज्वारीची पेरणी वेळेवर करण्यासाठी...
लिंबूवर्गीय फळपिकांतील तपकिरी फळकूज...सद्यःस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश,...
द्राक्ष बागेत हंगामापूर्वी करावयाची...सध्या फळछाटणीचा कालावधी सुरू असून, येत्या हंगामात...
टोमॅटोतील विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक... अ) प्रतिबंधात्मक किंवा पूर्वनियंत्रण ः...
टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांची ओळखसातत्याने बदलणारे तापमान व अनुकूल वातावरणामुळे...
शेतकरी नियोजन पीक : आंबाशेतकरी : रजनीकांत मनोहर वाडेकर. गाव : ...
रक्तक्षय होण्याची कारणे अन् उपाययोजना...मुलांच्या वाढीच्या काळात, स्त्रियांच्या गरोदरपणात...
जाणून घ्या भाजीपाला पिकांच्या काढणीच्या...योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास...
निसर्गाचा सन्मान केला तर साथ मिळतेच...कर्नाटक हे ३१ जिल्ह्यांचे आणि भौगोलिकदृष्ट्या...