वनशेतीमध्ये अंजन, दशरथ, स्टायलो गवताचे आंतरपीक

वनशेतीमध्ये आंतरपीक म्हणून चारा पिकांची लागवड करता येते. अंजन, दशरथ, स्टायलो गवत जनावरांसाठी पौष्टिक आहे. जिरायती तसेच बागायती क्षेत्रामध्ये या चारा पिकांची लागवड करता येते.
Dasharath grass
Dasharath grass

वनशेतीमध्ये आंतरपीक म्हणून चारा पिकांची लागवड करता येते. अंजन, दशरथ, स्टायलो गवत जनावरांसाठी पौष्टिक आहे. जिरायती तसेच बागायती क्षेत्रामध्ये या चारा पिकांची लागवड करता येते. अंजन गवत  अंजन हे बारमाही, गुच्छामध्ये येणारे गवत असून, ०.३-१.२ मीटर उंच वाढते. कमी पाऊस, उष्ण कोरडे हवामान आणि दुष्काळी परिस्थितीमध्ये चांगली वाढ होते. याची मुळे मातीला एकत्र बांधून ठेवतात. म्हणूनच मृदा आणि जलसंवर्धनामध्ये जमिनीची धूप कमी करण्यासाठी या गवताचा उपयोग केला जातो. उन्हाळ्यामध्ये अंजन गवत सुप्तावस्थेत असते. मॉन्सूनच्या आगमनाबरोबर जमिनीतील गड्यामधून फुटवा चालू होतो. गवत पालेदार, रसदार असते. यामधील अत्यल्प तुसाचे प्रमाण आणि चाऱ्याची पचनशक्ती जास्त असल्याने हे गवत जनावरांसाठी फायदेशीर आहे. हे गवत शुष्क भागामध्ये जिथे पावसाचे प्रमाण १०० मिमी ते १५०० मिमी असते, तिथे नैसर्गिकरीत्या योग्य प्रमाणात वाढते. हे गवत सर्व प्रकारच्या जमिनीत, तसेच व्यवस्थित निचरा होणाऱ्या, मध्यम पोत असलेल्या, पडीक, चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या जमिनीमध्ये चांगली वाढ होते. मात्र अधिक उत्पादनासाठी कसदार, मध्यम ते भारी व जास्त कर्ब असलेली जमीन निवडावी. याशिवाय क्षारयुक्त, जमिनीमध्ये सुद्धा येण्याची क्षमता आहे.  जाती बुंदेल अंजन १, बुंदेल अंजन २,  कझरी-३५८, मारवार अंजन (७५) या जातींची ‘आयजीएफआरआय’ संस्थेने लागवडीसाठी शिफारस केली आहे.  लागवडीची पद्धत 

  • लागवडीपूर्वी मशागत केलेल्या जमिनीमध्ये जून-जुलै महिन्यात ५० × ३० सेंमी अंतरावर ६ ते ७ किलो बियाणे ०.५ ते १ सेंमी खोल पेरावे. 
  • मूळ कंद/गड्डे किंवा रूट ट्रेनरमध्ये तयार केलेली ४५ दिवसांची रोपे ५० सेंमी × ३० सेंमी अंतरावर लावून घ्यावीत. अशा प्रकारे, प्रत्येक खड्ड्यामध्ये दोन रोपे या प्रमाणे एक हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे ३३,००० रोपे किंवा मुळांच्या स्लिपची आवश्यकता असते.
  • २ ते ३ वर्षांपर्यंत बियांची उगवणक्षमता टिकते.
  • खत, पाणी व्यवस्थापन 

  • पहिल्या वर्षी लागवडीपूर्वी  प्रति हेक्टरी ५ टन शेणखत, ५० किलो नत्र आणि २० किलो स्फुरद जमीन तयार करताना वापरावे. लागवडीच्या ४० दिवसांनंतर एक भांगलण करून २० किलो 
  • नत्राची मात्रा द्यावी. दुसऱ्या वर्षापासून ४० किलो नत्र जुलै महिन्यामध्ये 
  • द्यावे. 
  • वर्षभर चाऱ्यासाठी उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. बागायती क्षेत्रामध्ये मार्चनंतर महिन्यातून एकदा तरी पाणी द्यावे.  
  • उत्पादन

  • लागवडीच्या पहिल्या वर्षी ऑक्टोबरच्या महिन्यात पहिली कापणी करावी. शाश्‍वत सिंचन उपलब्ध असेल तर ३ ते ४ कापण्या ४० ते ६० दिवसांच्या अंतराने घेता येतात. 
  •  गवताची कापणी जमिनीपासून ५ ते १० सेंमी उंचीवर केल्याने ठोंबापासून नवीन फुटव्यांची वाढ चांगली होऊन जास्त वर्षे उत्पादन घेता येते. 
  • कोरडवाहू जमिनीमध्ये १२ ते १५ टन हिरवा चारा आणि मध्यम पावसाच्या प्रदेशात २५ ते ३० टन प्रति हेक्टरी हिरवा चारा मिळू शकतो. 
  • दशरथ गवत 

  • हे जोमाने वाढणारे, जास्त उत्पादन देणारे, नत्र स्थिरीकरण करणारे आणि द्विदल वर्गीय गवत आहे. छोट्या जनावरांना (शेळी व मेंढी) हिरव्या चाऱ्याचा चांगला स्रोत आहे. हिरव्या चाऱ्यामध्ये १८-२२ टक्के प्रथिने, १.५ ते २ टक्के खनिजे, ८ ते १० टक्के स्निग्ध पदार्थ  आणि ३० ते ३५ टक्के कर्बोदकांचे प्रमाण असते. 
  • कमी ते जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये लागवडीस योग्य गवत आहे. तीव्र दुष्काळ सहन करण्याची व वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये हे चांगले येते. मध्यम ते भारी प्रकारची जमिनीमध्ये जोमाने येते. आम्लधर्मी आणि क्षारपड जमिनीमध्ये लागवड करता येते. मुळांवरील रायझोबियमच्या गाठींमुळे हवेतील नत्राचे जमिनीमध्ये स्थिरीकरण करून होते. 
  • जात लोकल सिलेक्शन 

    लागवड पद्धत 

  • जून-जुलै महिन्यामध्ये हेक्टरी २० ते २५ किलो प्रक्रिया केलेले बियाणे पेरणीस वापरावे. बागायती क्षेत्रामध्ये वर्षभरात कधीही लागवड केली जाते. 
  • बियांचे कवच कठीण असल्यामुळे उगवण क्षमता वाढविण्यासाठी उकळलेल्या पाण्यामध्ये (८० अंश सेल्सिअस) पाच मिनिटे ठेवून नंतर थंड पाण्यामध्ये रात्रभर भिजवून लागवडीस वापरावे.
  • बियाण्यास रायझोबियमची प्रकिया करून सावली वाळवावे. 
  • पेरणी ६० सेंमी × ४५ सेंमी एवढ्या अंतरावर करावी. शेताच्या बांधावरती सुद्धा लागवड करून टंचाईच्या काळात चारा मिळू शकतो. 
  • खत, पाणी व्यवस्थापन 

  • मे महिन्यामध्ये साधारणपणे हेक्टरी पुरेसे शेणखत मिसळून घेऊन २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन २० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २० किलो पालाशची मात्रा द्यावी. दुसऱ्या वर्षीपासून ८० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पावसाळ्यात द्यावे. दोन वर्षांतून एकदा शेणखताची मात्रा दिल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. 
  • उन्हाळी (फेब्रुवारी-मार्च) लागवडीसाठी सुरवातीस २ दिवसांनी व त्यानंतर दर १० ते १५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 
  • उत्पादन

  • लागवडीनंतर सुमारे ६० ते ८० दिवसांमध्ये पहिली कापणी जमिनीपासून २५ ते ३० सेंमी वर केल्याने फुटव्यांची संख्या वाढते. नंतरच्या कापण्या ३० ते ४० दिवसांनी कराव्या. 
  • कमी पाण्याच्या ठिकाणी २-३ कापण्या करून हेक्टरी १५ ते २० टन हिरवा चारा मिळू शकतो
  • बागायती क्षेत्रामध्ये वर्षातून ६ ते ८ वेळा कापणी करून सुमारे ६० ते ८० टन हिरवा चारा मिळू शकतो.  
  • स्टायलो  स्टायलो हे बहुवर्षीय, द्विदल वर्गीय, सरळ वाढणारे, जास्त फुटवे होणारे, झुडूप प्रकारातील प्रजाती आहे. भारतामध्ये व्यावसायिकदृष्ट्या स्टायलोसॅन्थेस हॅमाटा व स्टायलोसॅन्थेस स्कॅब्रा दोन प्रजातींची लागवड केली जाते. कमी पावसाच्या ठिकाणी तसेच कुरणांच्या पुनरुत्पादनासाठी स्टायलो एक उत्तम गवत आहे. या चाऱ्यातून १२ ते १५ टक्के प्रथिने, ०.७० ते १.९० टक्का कॅल्शिअम,  ०.१० ते ०.१५ टक्का फॉस्फरस आणि ०.९०-१.१० टक्का पोटॅशिअम मिळते. ही कमी पावसाच्या ठिकाणीदेखील योग्यरीत्या वाढू शकते. विविध प्रकारच्या मातीमध्ये तसेच पडीक, माळरान, वाळूमय, क्षारयुक्त, मुरमाड व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये वाढण्याची क्षमता आहे. जाती फुले क्रांती 

    लागवड पद्धत 

  • लागवडीसाठी चालू वर्षातील बियाणे निवडावे. योग्य उगवण क्षमतेसाठी बियाणे मे महिन्यात तीव्र उन्हामध्ये सिमेंटच्या चबुतऱ्यावर वाळवून घ्यावे, गरम पाण्यात (६० अंश सेल्सिअस) ३ ते ४ मिनिटे भिजवून घ्यावे. 
  • ८ ते १० किलो बियाणे प्रति हेक्टरी लागते. लागवड ३० × १५ सेंमी अंतरावर २ ते ३ सेंमी खोल करावी. 
  • स्टायलो गवताची फळबाग, वनशेती किंवा बांधावर लागवड करावी. 
  • चराऊ कुरणांच्या पुनरुत्पादनासाठी ५ ते ६ किलो बियाणे जून ते जुलै महिन्यात विस्कटून द्यावे.
  •  खत, पाणी व्यवस्थापन

  • लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी ६ ते ८ टन शेणखत, २० किलो नत्र आणि ३० किलो स्फुरद मिसळून नांगरून घ्यावे. 
  • बागायती क्षेत्रामध्ये महिन्यातून एकदा पाणी द्यावे. कुरणांमध्ये पाण्याची विशेष काही गरज नसते. 
  • उत्पादन 

  • लागवडीनंतर ९० ते १२० दिवसांनंतर जमिनीपासून १० ते १५ सेंमी कापणी करावी.
  • बागायती क्षेत्रामध्ये ३०-३५ टन, कोरडवाहू क्षेत्रामध्ये १५ ते २० टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. 
  • - संग्राम चव्हाण,  ९८८९०३८८८७ (राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती, जि. पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com