जिरायतीमध्ये आंतरपीक पद्धतीवर द्या भर

 सोयाबीन एरंडी आंतरपीक
सोयाबीन एरंडी आंतरपीक

जिरायती शेतीमध्ये आंतरपीक पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते. मुख्य आणि आंतरपिकांची वाढीची पद्धत भिन्न असावी. मुख्य आणि आंतरपिकांच्या पक्वतेच्या कालावधीत योग्य फरक असावा. मुख्य व आंतरपीक एकमेेकास स्पर्धक नसून, पूरक असावेत.  जिरायती शेतीमध्ये हमखास उत्पादनाच्या दृष्टीने योग्य पिके आणि पीक पद्धतीचे नियोजन करावे. शिफारशीत जातींची निवड करावी.  परिस्थितीनुरूप उत्पादन तंत्रज्ञान आणि कमी खर्चाच्या उपायांचा उपयोग करावा.  पीक पद्धतीचे नियोजन करताना गरजेप्रमाणे पर्यायी पिकांचा समावेश करावा. जिरायती शेतीमध्ये प्रामुख्याने एक पीक पद्धती, आंतरपीक पद्धती व दुबार पीक पद्धतींचा अवलंब केला जातो. जमीन, हवा, पाणी व अन्नद्रव्य या नैसर्गिक घटकांचा समतोल आणि परिणामकारकरित्या उपयोग होण्यासाठी मुख्य आणि आंतरपिकांची योग्य निवड करावी.

आंतरपिकाची निवड : मुख्य आणि आंतरपिकांची वाढीची पद्धत भिन्न असावी. मुख्य व आंतरपिकांची मुळांची व्यवस्था शक्यतो भिन्न असावी (सोटमूळ व तंतुमय). मुख्य आणि आंतरपिकांच्या पक्वतेच्या कालावधीत योग्य फरक असावा. मुख्य व आंतरपीक एकमेकास स्पर्धक नसून, पूरक असावेत.   आंतरपिके ही प्रामुख्याने कडधान्य वर्गातील असावीत.

पीक लागवडीचे नियोजन : ज्वारी अाणि तूर :

  • ही आंतरपिक पद्धती ३:३  किंवा ४:२ ओळीच्या प्रमाणात पेरावी.
  • ही एक स्वयंचलित फेरपालट होणारी पीक पद्धती असून, एकाच क्षेत्रात गरज पडल्यास दोन ते तीन वर्षे घेता येते. असे करताना पुढील वर्षी ज्वारीच्या क्षेत्रावर तुरीच्या ओळी पेरल्या जातील याची काळजी घ्यावी.
  • अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ज्वारी आणि तूर ही पद्धती जास्त फायदेशीर आहे. या पद्धतीत निव्वळ ज्वारीच्या तुलनेत प्रतिहेक्टरी ३ ते ४ हजार रुपये जास्त मिळतात.
  • बाजरी अाणि तूर :

  • कमी पाऊस आणि मध्यम जमिनीसाठी ही आंतरपीक पद्धती उपयुक्त आहे.
  • या पद्धतीत ओळीचे प्रमाण ३:३ ठेवावे. ही पद्धती उशिरा पेरणीसाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
  • या आंतरपीक पद्धतीमध्ये निव्वळ बाजरीच्या तुलनेत २ ते ३ हजार रुपये प्रतिहेक्टरी जास्त मिळतात. दुष्काळी परिस्थितीत ही आंतरपीक पद्धत प्राधान्यक्रमाने घ्यावी.
  • कापूस अाणि तूर :

  • ही एक पारंपरिक पट्टा पद्धती आहे. यामध्ये कापसाच्या विशिष्ट ओळीनंतर तुरीच्या एक अथवा दोन ओळी पेरण्यात येतात.
  • कापसाच्या ६ किंवा ८ ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरावी.
  • सोयाबीन अाणि तूर :

  • आंतरपीक पद्धतीची शिफारस मध्यम ते भारी जमिनीकरिता आहे.
  • सोयाबीन आणि तूर या पिकांच्या ओळीचे प्रमाण ४:२ असे ठेवावे. उशिरा पेरणीसाठीसुद्धा ही पद्धत उपयुक्त व फायदेशीर आहे.  
  • सर्वसाधारणपणे या आंतरपीक पद्धतीपासून निव्वळ तुरीच्या तुलनेत २५०० ते ३००० रुपये प्रतिहेक्टरी जास्त मिळतात.
  • कापूस आणि सोयाबीन/उडीद/मूग :

  • हमखास पावसाचा भाग, मध्यम ते भारी जमिनीसाठी उपयुक्त .
  • संकरित जात ९० सें.मी. बाय ९० सें.मी. आणि सरळ कापसाच्या जातींसाठी ९० सें.मी. बाय ६० सें.मी. अंतर ठेवून कापसाच्या दोन ओळीमध्ये एक ओळ उडीद, सोयाबीन किंवा मुगाची (१:१ ओळीच्या प्रमाणात) पेरावी.
  • सोयाबीनच्या लवकर येणाऱ्या परभणी सोना (एमएयूएस-४७) किंवा एमएयूएस ७१,८१ एमएयूएस १५८,जेएस३३५ या जाती आंतरपिकांसाठी निवडाव्यात.
  • या आंतरपीक पद्धतीपासून निव्वळ कापसाच्या तुलनेत प्रतिहेक्टरी तीन ते चार हजार रुपये नफा मिळतो.
  • उडीद आणि सोयाबीन ही पिके कापसामध्ये आंतरपीक घेत असताना माथ्यावर अथवा सपाट जमिनीवर शक्यतो उडिदाची लागवड करावी. सखल भागात सोयाबीनच्या पिकाला प्राधान्य द्यावे.
  • एरंडी अाणि सोयाबीन :

  • मध्यम ते हलक्या जमिनीकरिता; तसेच पावसाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये उशिरा पेरणीकरिता ही पद्धती फायदेशीर.
  • या आंतरपीक पद्धतीत दोन पिकांच्या ओळीचे प्रमाण १:१ ठेवावे.
  • दुष्काळी परिस्थितीत या आंतरपीक पद्धतीपासून इतर पीक पद्धतीच्या तुलनेत २५०० ते ३००० रुपये प्रतिहेक्टरी अधिक मिळतात.
  • पर्जन्यमानानुसार शिफारस केलेल्या महत्त्वाच्या आंतरपीक पद्धती :

    अ.क्र.    आंतरपीक पद्धती   ओळीचे प्रमाण    जमिनीचा प्रकार
    अ. हमखास पावसाचा प्रदेश - -
    १.   कापूस अाणि सोयाबीन     १:१     मध्यम ते भारी
    २.        तूर अाणि सोयाबीन  २:४  मध्यम
    ३.     ज्वारी अाणि तूर   ३:३ अथवा ४:२     मध्यम ते भारी
    ब. कमी पावसाचा प्रदेश - -
    १.       ज्वारी अाणि तूर   ३:३ अथवा ४:२    मध्यम ते भारी
    २.      बाजरी अाणि तूर   २:१ अथवा ३:३     मध्यम
    ३.       तूर अाणि मूग    १:२, २:४   मध्यम
    ४.  तूर अाणि तीळ     १:२     मध्यम
    ५.   तूर अाणि सोयाबीन     १:२, २:४   मध्यम

    पेरणीयोग्य पावसाच्या आगमनानुसार पीकपद्धतीचे नियोजन.

    अ.क्र.        पेरणीची वेळ शिफारस केलेली पीकपद्धती
    १.  ३० जून   कापूस अाणि सोयाबीन, सोयाबीन अाणि तूर, ज्वारी अाणि तूर, एरंडी अाणि सोयाबीन, ज्वारी/बाजरी अाणि सोयाबीन (आंतरपीक पद्धती), मूग/उडीद
    २.      १५ जुलै  कापूस अाणि सोयाबीन, सोयाबीन अाणि तूर, एरंडी अाणि सोयाबीन, ज्वारी/बाजरी अाणि सोयाबीन (आंतरपीक पद्धती)
    ३.        ३० जुलै सोयाबीन अाणि तूर, बाजरी अाणि तूर, एरंडी अाणि सोयाबीन
    ४.      १५ ऑगस्ट   एरंडी अाणि सोयाबीन, सोयाबीन अाणि तूर, बाजरी अाणि तूर

    टीप : जमिनीतील ओलाव्याच्या उपलब्धतेनुसार पेरणीच्या तारखांमध्ये ५ ते ७ दिवसांचा कालावधी मागे पुढे करता येतो. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जिरायती विभागासाठी मुख्य आणि आंतरपिकासाठी शिफारस केलेल्या जाती

    अ.क्र.    पीक     संकरित / सुधारित वाण
    १.       ज्वारी  सीएसएच-९, सीएसएच-१४, सीएसएच-१८, पीव्हीके - ४००, पीव्हीके- ८०१, पीव्हीके - ८०९
    २.     बाजरी    बीके-५६०, डब्ल्यूसीसी-७५, एआयएमपी-९२९०१, पीपीसी - ६
    ३.    कापूस (अमेरिकन/ देशीवाण)     पीएचएच-३१६, एनएच-६१५,एनएच-६३५, एन.एच.-५४५, एन.एच.-४५२, पीएच-३४८, पी.ए. -२५५
    ४.  सोयाबीन      एमएयूएस-७१, ८१, १५८, १६२
    ५.    तूर     बीएसएमआर-७३६, बीएसएमआर-८५३, बीडीएन -७०८, बीडीएन -७११, बीडीएन-७१६
    ६.    उडीद     टीएयू-१,२, बीडीयू-१ टीपीयू-४
    ७.   मूग     मूग कोपरगाव, बीपीएमआर-१४५, बी.एम. २००२-१
    ८.   एरंडी     ज्योती, डीसीएच-११७, व्हीआय - २, अरुणा.

    संपर्क : डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com