Shewanti flowers are getting good rates. Plot of Abhijit Sadalge in Danoli (Tal. Shirol) ready for harvesting.
Shewanti flowers are getting good rates. Plot of Abhijit Sadalge in Danoli (Tal. Shirol) ready for harvesting.

सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार तगलेला...

गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर थबकलेला कोल्हापूरचा फुलबाजार येणाऱ्या सणांकडे डोळे लावून बसला

गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर थबकलेला कोल्हापूरचा फुलबाजार येणाऱ्या सणांकडे डोळे लावून बसला आहे. कोरोनामुळे झालेले लॉकडाउन, मजुरांची कमतरता आणि फुलांना मागणी नसल्याने घसरलेले दर यात भर पडली ती जुलैमध्ये आलेल्या पुराची, सगळ्या बाजूंनी अंधाराची स्थिती असताना श्रावण महिन्यापासून वाढू लागलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत कोरोनामुळे झालेली टाळेबंदी व महापुराच्या तडाख्याने कोलमडलेल्या फूल उत्पादकांना गणेशोत्सवासह विविध सणांमुळे दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या पंधरवड्यापासून फुलांच्या दरात हळूहळू वाढ होऊ लागल्याने फूल उत्पादकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटत आहे. गणेशोत्सवावर कोरोनाचे काहीसे सावट असले, तरी घरगुती गणेशोत्सव, गौरी यामुळे तरी फुलांच्या दरात वाढ होण्याची शक्यता शेतकरी व व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे मागणी अजिबातच नव्हती, परिणामी दर नाहीत. अशा स्थितीत अनेकांना फुलपिके काढून टाकावी लागली. ज्यांनी तशीच जोपासली होती, त्यांना जुलै महिन्यात आलेल्या महापुराचा फटका बसला होता. या दोन्ही बाबींमुळे फुलांची बाजारपेठेतील आवक घटली आहे.  चार महिन्यापासून घसरलेल्या दरात वाढ सुरू कोल्हापूरच्या पश्‍चिम भागातील निशिगंधाला साधारणत: एप्रिल व मे महिन्यांमध्ये चांगला दर असतो. या काळात अन्य ठिकाणांहून होणारी आवक कमी असल्याने राशिवडे परिसरातून कोल्हापूर बाजारपेठेत जाणाऱ्या निशिगंधाला सरासरी १५० ते २०० रुपये प्रति किलो दर मिळतो. यंदा या महिन्यात दर वाढायला सुरुवात व्हायला आणि लॉकडाउनची तीव्रता वाढायला एकच गाठ पडली. परिणामी, फुलांची मागणी एकदम कमी होऊन दर घसरले. निशिगंध फुलांचे दर प्रति किलो १५० रुपयांवरून घसरून ते तळाला म्हणजे २० रुपयांपर्यंत खाली आले. त्या वेळी कमी झालेले दर तब्बल पाच ते सहा महिन्यांनी म्हणजेच श्रावण महिन्यापासून हळूहळू वाढू लागले आहेत. सध्या निशिगंधास १३० ते १४० रुपये प्रति किलो इतका दर मिळत आहे. हा दर जास्त नसला तरी समाधानकारक आहे. येत्या आठवड्यामध्ये गणपती, गौरी यांचे आगमन होत आहे. या कालावधीत निशिगंधाचे दर ४०० ते ५०० रुपयांपर्यंत जातील अशी शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. त्याच प्रमाणे गुलाब, शेवंती, झेंडू इ. फुलांच्या दरातही वाढ अपेक्षित आहे. निशिगंधाची स्थानिक आवक कमी कोल्हापुरात दररोज साधारणपणे ५०० ते ७०० किलो निशिगंध फुलांची गरज असते. सध्या राधानगरी तालुक्यातून शंभर ते दीडशे किलो इतकीच फुले कोल्हापूर बाजारपेठेत येत आहेत. अन्य फुले पंढरपूर, बारामती, नगर या भागांतून कोल्हापूर बाजारपेठेत येत आहेत. उत्सव सुरू झाल्यानंतर पहिल्या सप्ताहात दर चढे राहण्याची शक्यता आहे. या सणाच्या दृष्टीने अनेक शेतकरी निशिगंध काढणीचे नियोजन करत असतात. मात्र यंदा महापुरामुळे अनेकांच्या फुलशेतीचे नुकसान झाले. महापुरातून कशीबशी वाचली, त्यांना गणेशोत्सवात चांगले दर मिळतील अशी आशा आहे. झेंडू दरातही वाढ  १ महिन्यापूर्वी झेंडूचे दर केवळ १० ते १५ रुपये प्रति किलो होते. बहुतांश शेतकऱ्यांनी काढणीही थांबवली होती. श्रावण सुरू झाल्यानंतर मात्र दर हळूहळू वाढत गेले. झेंडूचा दर १५ रुपयांवरून ४० ते ५० रुपये प्रति किलो पर्यंत गेला आहे. काही ठिकाणी छोटे व्यापारी जागेवर येऊन फूल खरेदी करू लागले आहेत. फुलांचे दर  मंगळवार (ता. ७) फूल सरासरी दर (प्रति किलो) केशरी, गुलाबी झेंडू................ ४० रुपये गलांडा.................................. ८० रुपये शेवंती.................................... १०० रुपये गुलाब.................................... ५०० रुपये (शेकडा) प्रतिक्रिया माझ्याकडे अनेक वर्षांपासून अर्धा एकर निशिगंध लागवड आहे. गेल्या दोन वर्षांपासून फुलशेती मोठ्या अडचणीत आली आहे. सातत्याने होणारे लॉकडाउन व सार्वजनिक सण समारंभ साजरे करण्यावर आलेली बंदी यामुळे फुलाची मागणी घटली. दरही मोठ्या प्रमाणात घसरले. आम्हालाही निशिगंधाचे व्यवस्थापन करताना मोठ्या अडचणी आल्या. अनेक वर्षांपासून फुलशेती विशेषतः निशिगंध सांभाळलेले असल्याने उत्पादन सुरू ठेवले आहे.  - दत्तात्रय देसाई  ९९२२६७१६२८ (राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर)

गेल्या काही महिन्यांपासून टाळेबंदी, महापूर अशा अनेक कारणांमुळे फुलांची मागणी कमी झाली होती. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मागणी हळूहळू वाढू लागली आहे. गेल्या दोन, तीन दिवसांत अनेक भागांत पाऊस सुरू झाल्याने आवकही मोजक्याच फुलांची व कमी प्रमाणात सुरू आहे. पुढील काळात सणाच्या पार्श्‍वभूमीवर फुलांना वाढती मागणी व दरही चढे राहण्याची शक्यता आहे. - विक्रम जरग, फूल व्यापारी

आमच्याकडे दरवर्षी खुल्या शेतीसह हरितगृहामध्ये गुलाब, झेंडू, शेवंती अशी फुलपिके घेतली जातात. कमी क्षेत्रामध्येही चांगले उत्पन्न मिळवून देणारी फुलशेती गेले दोन वर्षे मागणी अभावी अडचणीत आली होती. त्यात गेल्या महिन्यातील पुरामुळे सर्व रस्ते बंद झाले. फुलांचे मार्केट डाउन झाले. श्रावणापासून फुलांचा बाजार वाढत आहे. कोल्हापूर बाजारात गेल्या महिन्यात झेंडूला प्रतिकिलो केवळ १५ ते २० रुपये इतका दर होता. आता तो चाळीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. गुलाबाचे दरही प्रति गुलाब एक ते दीड रुपये इतके घसरले होते. सध्या गुलाबास पाच रुपये प्रति नग दर मिळत आहे. शेवंतीला ५० ते ६० रुपये किलो इतका दर आहे या वर्षीही केवळ घरगुती गणेशोत्सवातूनच थोडीफार मागणी वाढेल. सण होईपर्यंत तरी फुलांचे दर चांगले राहतील असा अंदाज धरून मी फूल काढणीचे नियोजन करत आहे. यंदा गणेशोत्सवात किमान १५ दिवस दर चांगले राहावेत, ही इच्छा. तसे राहिल्यास उत्पादकांचा तोटा काही प्रमाणात तरी भरून निघेल अशी अपेक्षा आहे. - सचिन पाटील  ९३७३५३८३९३ (कांडगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

मी गेल्या तीन वर्षांपासून सुमारे दोन एकर क्षेत्रावर शेवंतीची शेती करतो. दरवर्षी श्रावण ते गणपती उत्सवाच्या दरम्यान माझी शेवंतीची फुले बाजारात येतील असे नियोजन असते. अगदी मिरज, मुंबई या ठिकाणीही मी शेवंतीची फुले पाठवतो. पंधरवड्यापूर्वी माझा प्लॉट सुरू झाला. त्या वेळी प्रति किलो ३० ते ४० रुपये इतका दर मुंबई मार्केटला मिळत होता. आता हा दर साठ रुपये किलोपर्यंत गेला आहे.  - अभिजित सदलगे  ८७६६५६५४९३ (दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com