संकल्प करूया देशी गोवंश संवर्धनाचा...

सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य जबाबदारीपूर्वक समजून घेतले पाहिजे. यासाठी वसुबारस सणाचे औचित्य साधून देशी गोवंशाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन करण्याचा संकल्प करूयात.
Breeding of purebred cattle is a need of the hour.
Breeding of purebred cattle is a need of the hour.

सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य जबाबदारीपूर्वक समजून घेतले पाहिजे. यासाठी वसुबारस सणाचे औचित्य साधून देशी गोवंशाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन करण्याचा संकल्प करूयात. सांस्कृतिक, लोकजीवन, अर्थकारण आणि समाजकारणातील पशुधनाचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता भारतातील विविध उत्सव, परंपरांच्या माध्यमातून पशुधनाच्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक दाखल घेतली जाते. शेतकरी बांधवांचा सखा बैलांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी पोळा साजरा केला जातो, तसाच गायीचे पावित्र्य आणि महत्त्व उत्सवपूर्वक व्यक्त करण्यासाठी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस हा उत्सव साजरा करण्यात येतो. यादिवशी गोधनाची पूजा करतात. अर्थकारणात गोवंश महत्त्वाचा  भारतीय अर्थकारणामध्ये प्राचीन काळापासून गोधनाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पंचगव्य, शेणखत इत्यादी माध्यमांतून भरीव योगदान राहिले आहे. ‘देशी गोवंश’ हा केवळ सांस्कृतिक अस्मिता नसून भारतातील सुमारे सर्वच भागात विपुल प्रमाणात आढळून येणारे लोकप्रिय पशुधन आहे. मात्र काळाच्या ओघात, विविध परकीय राजवटीच्या माध्यमातून भारतात विदेशी गोवंशाने शिरकाव केला. श्‍वेत क्रांती म्हणजेच विक्रमी दूध उत्पादनात भारताने स्वातंत्र्योत्तर काळात मारलेली मजल नक्कीच कौतुकास्पद ठरते, परंतु संकरीकरणास शास्त्रीय बाजूने नीटसे समजून न घेतल्याने गल्लत झाली. अधिकाअधिक दूध उत्पादनाच्या हव्यासापोटी विदेशी गोवंशाच्या दुधाळ गुणधर्मावर पशुपालक भाळून गेला, मात्र गोठ्यातील देशी वंशाच्या गोधनाची अंगभूत रोगप्रतिकारक्षमता, किमान परिस्थितीत कमाल व माफक उत्पादनक्षमता, पर्यावरण अनुकूलता अशा महत्त्वपूर्ण बाबींचा सोईस्कर विसर पडला. आपल्या भागातील पशुधनाचे उत्पादक आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म माहिती नसल्याने किंवा न उलगडल्याने पुढील पिढीस हा वारसा सुपूर्द करताना आपण बहुमोल गोधनास ‘गावरान किंवा गावठी’ म्हणत दुर्लक्ष झाले. तथापि, आताच्या सुजाण पिढीने आपल्या देशी गोवंशाचे माहात्म्य जबाबदारीपूर्वक समजून घेतले पाहिजे. यासाठी वसुबारस सणाचे औचित्य साधून देशी गोवंशाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संवर्धन करण्याचा संकल्प करूयात. भारतीय गोवंशाचे संवर्धन  भारतीय गोवंशाला स्थानिक हवामानात अनुकूलरीत्या जुळवून घेण्याची विलक्षण शक्ती निसर्गाने प्रदान केली आहे. याशिवाय सकस दूध देण्याची क्षमता, निकृष्ट दर्जाचा चारा पचविण्याची क्षमता, काही रोगाविरुद्ध प्रतिकार क्षमता यांसारखे गुणधर्म देशी गोवंशामध्ये आहेत. देशातील एकूण ५० गोवंशापैकी महाराष्ट्रात मुख्यतः देवणी, डांगी, गवळाऊ, खिल्लार, लाल कंधारी आणि कोकण कपिला या सहा जाती आढळतात. देवणी दूध आणि शेतीकाम या दुहेरी हेतूने मराठवाड्यातील लातूर जिल्हा परिसरात प्रामुख्याने आढळणारा गोवंश म्हणजे देवणी. माफक उंची, मध्यम बांधा, बांधेसूद शरीरयष्टी असलेला देवणी गोवंश रंगाने पांढरा असून काळ्या रंगांच्या ठिपक्यांवरून वानेरा, बालंक्या आणि शेवरा अशा उपजाती आढळतात. देवणी वळू राष्ट्रीय पशू स्पर्धेत अनेकदा विजयी झाले आहेत. डांगी महाराष्ट्र-गुजरात लगतच्या पश्चिम घाटातील डांगी गोवंश भातशेतीच्या कामासाठी उपयुक्त आहे. पांढऱ्याशुभ्र रंगावर लाल व काळे डाग असलेला डांगी गोवंश मध्यम आकाराचा आहे. कातडीतून तेलकट स्राव पाझरत असल्याने गोवंशाचे जोरदार पावसापासून नैसर्गिक संरक्षण होते. गवळाऊ दूध आणि शेतीकामासाठी आर्वी, गौळणी अशा नावाने परिचित गवळाऊ हा विदर्भातील प्रमुख गोवंश. वर्धा हे गवळाऊ गोवंशाचे माहेरघर. मध्य प्रदेशातील बालाघाट, छिंदवाडा, दुर्ग, राजनांदगाव या लगतच्या प्रदेशात देखील हा गोवंश दिसतो. हा गोवंश हलक्या बांध्याचा, लांबट आणि पांढऱ्या व राखाडी रंगाचा आहे. डोके लांब व निमुळते व फुगीर, रोमन प्रकारचे नाक, बदामी आकाराचे डोळे, मध्यम आकाराचे उंच कान, पूर्ण विकसित वशिंड, पायाच्या घोट्यापर्यंत पोचणारी लांबलचक शेपटी ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. लाल कंधारी लाखलबुंदा नावाने स्थानिक भागात परिचित असा हा लाल कंधारी हा प्रमुख गोवंश. नांदेड सोबतच लातूर, हिंगोली, परभणी, बीड या भागांतही लाल कंधारी गोवंश आढळतो. मध्यम आकार, रेखीव शरीर, लाल तांबडा रंग, भव्य फुगीर कपाळ, लोंबते कान, डोळ्यांभोवती चमकदार काजळी, मध्यम आकाराची वक्राकार शिंगे (बोथट), काळी खुरे, लहान कास असते. हा चपळ गोवंश आहे. खिल्लार हा चपळ आणि उत्तम भारवाहक गोवंश आहे. कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सांगली आणि सातारा जिल्हा तसेच लगतच्या कर्नाटकातील बेळगाव, विजापूर आणि धारवाड भागांत हा गोवंश आढळतो. राखाडी- पांढरा रंग, क्वचित चेहऱ्यावर ठिपके दिसून येतात. कपाळावर शिंगांपासून नाकपुड्यापर्यंत खाच दिसत असल्याने कपाळ फुगीर दिसते. लांबट तोंड, टोकदार काळ्या नाकपुड्या (क्वचित गुलाबी), लांबट डोळे, लांबलचक मागे वळून पुढे वरच्या दिशेने आलेली टोकदार शिंगे, मजबूत वशिंड, काळी खुरे, मऊसर त्वचा तुकतुकीत असते. आखीव व रेखीव, उंचीपुरी, चपळ, बांध्याची भक्कम शरीरयष्टीची खिल्लार बैल अथकपणे ओझे वाहून नेऊ शकतात. बैलजोड्या शेतीकामास उत्तम असल्याने बाजारात चांगली मागणी आणि किंमत असते. कोकण कपिला समुद्र किनाऱ्यालगतच्या दमट हवामानास अनुकूल असलेला गोवंश. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हा आणि पश्चिम घाटात हा गोवंश दिसतो. तांबड्या विटकरी आणि राखाडी काळ्या रंगाची जनावरे इतरही मिश्र रंगसंगतीत आढळतात. लहान ते मध्यम आकारमान, सुडौल शरीररचना, सरळ समांतर कान व कपाळ याचबरोबर पापण्या, नाकपुड्या, खुरे, शेपटीचा गोंडा इत्यादी काळ्या रंगात दिसतो. विषम हवामानात, डोंगराळ भागात शेती आणि ओझे वाहतुकीसाठी हा गोवंश लघू व मध्यम शेतकऱ्यांना रोजगाराचे महत्त्वाचे साधन आहे. लुप्त होणारे गोवंश उत्तर महाराष्ट्रातील सोनखेडी गोवंश किंवा विदर्भातील कठाणी, उमरडा, खामगांवी नावाने लोकपरिचित असलेले स्थानिक गोवंशाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. परराज्यांतील दुधाळ गोवंश  गुजरातमधील गीर, मध्य प्रदेशातील निमारी आणि माळवी, कर्नाटकातील कृष्णाखोरी सारखा देशी गोवंश महाराष्ट्रातही दिसतो. राज्यातील पशुपालक दुधाळ जाती म्हणून राष्ट्रीय मान्यता असलेल्या गीर (गुजरात), साहिवाल व लाल सिंधी (पंजाब) आणि थारपारकर (राजस्थान) या गाईंचे संवर्धन करत आहेत. पशुपैदासकार संघटना महत्त्वाच्या  केरळ राज्यात नामशेष होत चाललेल्या वेचुर गोवंश संवर्धनासाठी वेचुर संवर्धन ट्रस्ट, केरळ स्थानिक गोपैदासकार संघटना कार्यरत आहे. याचबरोबरीने कर्नाटक राज्यात कासारगोड ड्वार्फ काँझर्व्हेशन सोसायटी, वाडकरा गोसंवर्धन ट्रस्ट सारख्या संस्था स्थानिक गोवंशाचे संवर्धन करत आहेत. महाराष्ट्रात गवळाऊ, देवणी गोवंशाचे पशुपैदासकार संघटनेच्या माध्यमातून चांगले संवर्धन होत आहे. कोकण कपिला, डांगी गोवंश संवर्धनासाठी पशुपालकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रत्येक भागात स्थानिक गोधन संवर्धनासाठी सक्षम पशुपैदासकास संघटनांची लोकसहभागातून उभारणी ही काळाची गरज आहे. - डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९ (सहायक प्राध्यापक, पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com