भातशेतीसाठी उपयुक्त यंत्रे

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही कंपन्यांनी भात शेतीमधील कामे सुलभ होण्यासाठी विविध यंत्रे विकसित केली आहेत. या तंत्रज्ञानामुळे भात शेतीमध्ये मजूर आणि वेळेची बचत होण्यास मदत होत आहे.
Automatic rice planting machine
Automatic rice planting machine

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच काही कंपन्यांनी भात शेतीमधील कामे सुलभ होण्यासाठी विविध यंत्रे विकसित केली आहेत. या तंत्रज्ञानामुळे भात शेतीमध्ये मजूर आणि वेळेची बचत होण्यास मदत होत आहे. - मनुष्यचलित भात लावणी यंत्र 

  • छोट्या भात खाचरात पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या रोपवाटिकेमधील रोपांची लावणी करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. ताशी सुमारे २५० चौ.मी. क्षेत्रामध्ये लावणी करता येते.
  • यंत्राला असलेल्या दोन ट्रेमध्ये मुळे स्वच्छ करून भात रोपे ठेवली जातात. यंत्रातील चिमट्यांमध्ये ही रोपे पकडली जातात. तेथून ती खाली असलेल्या पट्टीमुळे जमिनीमध्ये रोवली जातात.
  • यंत्राने भात लावणी करावयाच्या खाचरात उथळ चिखलणी करणे आवश्यक आहे. चिखल चांगला बसून त्यावर १ ते २ सें.मी. पाण्याचा थर असणे गरजेचे आहे.
  • भातपिकाच्या दोन ओळींमध्ये २५ सें.मी. आणि दोन चुडांमधील अंतर सुमारे १५ सें.मी. असते.
  • यंत्र वापरण्यास सोपे असले तरी सुरुवातीला यंत्र वापरण्याचे प्रशिक्षण घेऊन सराव करणे आवश्यक आहे.
  • यंत्राचे वजन २० किलो आहे.
  • यंत्र वापरताना पाठीत वाकून काम करण्याची आवश्यकता नसल्याने पाठ दुखीचा त्रास होत नाही. नखांमध्ये चिखल पाणी जात नसल्याने इजा होत नाही.
  • आठ ओळींचे स्वयंचलित भात लावणी यंत्र 

  • यंत्राने किफायतशीर लावणी करण्याकरिता भात खाचराचे क्षेत्र किमान ८ ते १० गुंठे असावे.
  • टई पद्धतीने तयार केलेल्या साधारण २१ दिवसांच्या भात रोपांची लावणी यंत्राद्वारे जलद गतीने करता येते.
  • चटई रोपवाटिकेसाठी लावणीच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ १ टक्का क्षेत्र पुरेसे आहे.
  • एक एकर क्षेत्राकरीता १० मी. × १मी. आकाराच्या तीन गादीवाफ्यांची चटई पद्धतीची रोपवाटिका पुरेशी आहे.
  • १० × १ मी.च्या एका गादीवाफ्यांसाठी ५ किलो बियाणे लागते. रोपवाटिकेसाठी माती २ मी.मी. चाळणीमधून चाळून वापरावी.
  • यंत्राचा वापर करताना कमी खोलीची चिखलणी करून शेतातील मातीच्या प्रकारानुसार चिखल बसू देणे आवश्यक असते. भात खाचरात ३ ते ४ सें.मी. खोल पाणी असणे आवश्यक असते.
  • यंत्रावर चालकासाठी बसण्याची व्यवस्था आहे. चटई रोपवाटिकेचे आवश्यक आकाराचे काप करून यंत्राच्या ट्रेमध्ये ठेवता येतात.
  • शेतात एका चुडात भाताची ३ ते ४ रोपांची आठ ओळीत १४ ते १७ सें.मी. अंतरावर लावणी करता येते. रोपांची चुडातील संख्या व लावणीची खोली आवश्यकतेनुसार बदलता येते.
  • यंत्राला ४.५ अश्‍वशक्तीचे डिझेल इंजिन आहे. ताशी पाऊण ते एक लिटर एवढे डिझेल लागते. २ ते ४ मजुरांद्वारे दिवसभरात २.५ ते ४ एकर क्षेत्रावर लावणी केली जाते. पारंपरिक पद्धतीने लावणी केल्यास एकरी २५ ते ३० मजूर लागतात.
  • कोनो विडर (शंकू कोळपे)

  • यंत्रामुळे दोन ओळींमधील तण काढून चिखलात गाडले जाते.
  • अवजाराचे वजन ५.६ किलो, एकूण रुंदी १३० मी.मी असून वापरण्यास अत्यंत सोपे आहे.
  • वापरताना खाचरामध्ये ५ते ६ मी.मी. पाण्याची पातळी असणे आवश्यक असते.
  • यंत्राची कार्यक्षमता ६४.५ टक्के, तण काढण्याची क्षमता ८० टक्के असून ५० ते ६० टक्के वेळ, खर्चात बचत होते.
  • ताशी ७ ते १० गुंठे शेतीमधील तण काढले जाते.
  • सुधारित वैभव विळा 

  • जमिनीलगत भाताची कापणी करण्यासाठी उपयोगी.
  • विळ्याचे वजन १९९ ग्रॅम आहे. पात्याची रुंदी २४ मी.मी. आहे. धार देण्याची आवश्यकता नाही.
  • भात कापणी कार्यक्षमता ११२ चौ.मी./तास एवढी आहे. वेळेची बचत होते.
  • पात्याच्या विशिष्ट प्रकारच्या दात्यामुळे सहजपणे कमी ताकदीने भात कापला जातो. भात पीक उपटून येत नाही.
  • पात्याच्या विशिष्ट आकारामुळे कापणी दरम्यान मनगटावर ताण येत नाही.
  • स्वयंचलित भात कापणी यंत्र (रिपर)

  • भात कापणीसाठी कटर बार असून स्टार व्हील आणि बेल्टमुळे कापलेले पीक एका बाजूला ढकलले जाते. पेंढा जमिनीवर सरळ ओळींमध्ये अंथरला जात असल्याने बांधणीचे काम सोपे होते.
  • यंत्रावर ३.५ अश्‍वशक्तीचे पेट्रोल इंजिन असून त्याद्वारे कापणी यंत्रणेला व चाकांना गिअरबॉक्सद्वारे शक्ती संक्रमण होते.
  • यंत्राचे वजन २२५ किलो असून कटरबारची रुंदी १.२ मीटर आहे.
  • जमिनीपासून साधारणतः ११ सें.मी. उंचीपासून भाताची कापणी करण्यात येते.
  • ओल्या जमिनीवर चालण्यासाठी कापणी यंत्राला केज व्हील (लोखंडी चाके) बसविता येतात. यंत्राचा वेग ताशी २.५ कि.मी. आहे. यंत्राद्वारे दिवसाला तीन एकर क्षेत्रावर कापणी करता येते.
  • यंत्राला प्रती तास एक लिटर पेट्रोल लागते.
  • इनव्हरटेड चेन कन्व्हेअर भात मळणी यंत्र 

  • भात मळणी व उफणणी करून स्वच्छ धान्यासोबत भाताचा अखंड पेंढा मिळतो.
  • मळणी करताना ड्रममध्ये कापलेले पीक धरुन ठेवावे लागत नाही. मळणी यत्रांच्या प्लॅटफार्मवर भाताचा पेंडा ठेवल्यानंतर चेनद्वारे ते मळणीसाठी ड्रमवर जाऊन दाणे वेगळे होतात. अखंड पेंढा दुसऱ्या बाजूला पडतो.
  • मळणी यंत्र २ अश्‍वशक्तीच्या विद्युत मोटारीवर चालते.
  • प्रति तास १५० ते २०० किलो स्वच्छ धान्य मिळते.
  • मळणी यंत्राची क्षमता ९५ ते ९७ टक्के आणि धान्य स्वच्छ करण्याची क्षमता ९८ ते ९९ टक्के आहे.
  • यंत्राच्या वापरासाठी दोन मजुरांची आवश्यकता आहे.
  • संपर्क; डॉ. विजय आवारे, ९४२३८३२३९१ डॉ. किशोर धादे, ९०१११२३३५० डॉ. प्रशांत शहारे, ९४२२५४८००५ (कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली, जि. रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com