आंबा,काजू नारळ बागायतीचे व्यवस्थापन

जुन्या आंबा कलमांचे शाखीय व्यवस्थापन व पुनरुज्जीवन करावे. काजू बागेत योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच वाळलेल्या निर्जीव, वेड्यावाकड्या फांद्या वर्षातून किमान एकदा काढून टाकाव्यात. समुद्र किनारपट्टीजवळील नारळ, सुपारी बागांच्या संरक्षणासाठी कडेने केतकी, सुरू झाडांची लागवड करावी.
Planting of spice crops in coconut orchard
Planting of spice crops in coconut orchard

जुन्या आंबा कलमांचे शाखीय व्यवस्थापन व पुनरुज्जीवन करावे. काजू बागेत योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच वाळलेल्या निर्जीव, वेड्यावाकड्या फांद्या वर्षातून किमान एकदा काढून टाकाव्यात. समुद्र किनारपट्टीजवळील नारळ, सुपारी बागांच्या संरक्षणासाठी कडेने केतकी, सुरू झाडांची लागवड करावी. सलग दोन वर्षामध्ये झालेल्या चक्रीवादळांमुळे पश्चिम किनारपट्टीवरील शेती बागायतीला भविष्यातील धोक्याचा इशारा दिला आहे. गेली सुमारे १५ वर्षे कोकणामध्ये सातत्याने वातावरण बदल झालेला आहे.२०२१ मध्ये ९ ते १० महिने कोकणाच्या विविध भागामध्ये पाऊस पडत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विविध फळबागांच्या व्यवस्थापनामध्ये आवश्यक बदल आवश्यक आहेत. अस्तित्वात असलेल्या आंबा, काजू बागा 

  • कोकणामध्ये प्रामुख्याने हापूस आंबा लागवड आहे. या बागा प्रामुख्याने किनारपट्टी लगत आहेत. काजू बागा किनारपट्टीपासून सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंत पसरलेल्या आहेत.
  • चक्रीवादळामध्ये आंबा कलमे मुळासकट उन्मळून पडणे तसेच मुख्य फांद्या तुटणे असे नुकसान झाले आहे. मात्र ज्या आंबा कलमांचे शाखीय व्यवस्थापन व पुनरुज्जीवन सुयोग्य पद्धतीने केले आहे अशा कलमांना वादळाचा अल्प ते नगण्य स्वरूपाचा फटका बसला आहे.
  • भविष्यामध्ये आंबा बागा वाचविण्यासाठी कलमांचे शाखीय व्यवस्थापन व पुनरुज्जीवन यांना पर्याय नाही. आंब्याचे कलम या दोन्ही तंत्रज्ञानांना अतिशय उत्तम प्रतिसाद देते, हे सिद्ध झाले आहे.
  • ज्या बागा १५ ते ३० वयोगटामधील आहेत तसेच ज्यांची उत्पादकता चांगली आहे अशा बागेतील कलमांचे शाखीय व्यवस्थापन दरवर्षी करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने फळांची काढणी झाल्यावर सुकलेल्या फांद्या, निर्जीव फांद्या तसेच वेडयावाकडया वाढलेल्या फांद्या काढून टाकाव्यात. पारंपरिक अंतरावर लागवड असल्यास (१०मी X १० मी) अंदाजे २२ ते २४ फूटांपेक्षा जास्त वाढलेल्या फांद्या करवत किंवा सिकेटरच्या साहाय्याने दरवर्षी कापून टाकाव्यात. जेणेकरून कलमांची रुंदी मर्यादित राहील. अशा कलमांमध्ये मध्य फांदी वाढली असल्यास मध्य फांदीची विरळणी ऑक्टोबर महिन्यामध्ये करावी. त्यामुळे कलमांमध्ये हवा व सूर्यप्रकाश यांचे वहन उत्तमप्रकारे होईल.
  • ज्या बागांचे सरासरी वयोमान ३५ ते ४० वर्षांपेक्षा जास्त आहे, कलमे उंच वाढली आहेत आणि उत्पादनामध्ये घट झाली आहे, फळाचा आकार कमी झालेला आहे. अशा बागांचे/झाडांचे पुनरुज्जीवन करून त्यांना पुन्हा उत्पादनामध्ये आणणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबतचे तंत्रज्ञान डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. पुनरुज्जीवनासाठी ऑक्टोबर/मार्च महिन्यामध्ये कलमाची छाटणी ८ ते १० फुटांवर करावी. छाटणी केल्यानंतर लगेचच कीडनाशकांची फवारणी करावी. अशा कलमांना नवीन फुटवे आल्यावर त्यांची विरळणी करून संपूर्ण कलमावर नवीन पालवी विकसित करावी. अशा प्रकारे कलमाची छाटणी करून त्यांना पुन्हा उत्पादनामध्ये आणण्यासाठी सुमारे २ ते ३ वर्षांचा कालावधी लागतो. या दरम्यान रोग व किडीपासून संरक्षण तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पुनरुज्जीवन केल्यानंतर झाडांचे उत्पादन, फळांचा आकार यामध्ये लक्षणीय वाढ होते तसेच रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते.
  •  काजू पिकाबाबत पुनरुज्जीवन तंत्रज्ञान अद्याप विकसित झालेले नाही. मात्र योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच वाळलेल्या निर्जीव, वेड्यावाकड्या फांद्या वर्षातून किमान एकदा काढून टाकाव्यात. जेणेकरून झाड सुदृढ होऊन वादळास तोंड देवू शकतील.
  • नारळ, सुपारी आणि मसाला पिकांच्या बागा

  • समुद्र व खाडी पट्ट्यातील किनाऱ्यावर पारंपरिक नारळ व सुपारीच्या बागा आहेत. चक्रीवादळाचा मोठा फटका या बागांना बसला आहे. नारळ, सुपारीची उंची व रुंदी कमी करता येत नाही. मात्र नवीन लागवड करताना दोन झाडांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे अत्यावश्यक आहे (नारळ-७.५ मी X ७.५ मी; सुपारी २.७ मी X २.७ मी) त्यामुळे झाडांमधील उंच वाढण्याची स्पर्धा कमी होईल तसेच खोड सशक्त व मजबूत होईल.
  • समुद्र किनारपट्टीवर वसलेल्या बागा या वाऱ्याच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांना संरक्षण देणे अशक्य आहे. यासाठी समुद्र किनारपट्टीवर केतकी (केवडा) तसेच सुरू लागवड करावी. केतकीचे वैशिष्टय म्हणजे ते समुद्र किनाऱ्यावर उत्तम वाढते. अल्प देखभाल तसेच वादळामुळे शेंडे मोडले तरी बुंध्यापासून पुन्हा धुमारे फुटून जोमदार बेट तयार होते. केतकीच्या बेटांमुळे उधाणाच्या भरतीचे पाणी थेट बागांमध्ये किंवा वस्तीमध्ये घुसत नाही.
  • समुद्र किनारपट्टीवर सुरू किंवा केतकीच्या एक किंवा दोन रांगा लावून अपेक्षित परिणाम साधता येणार नाही. त्यासाठी या झाडांचा किमान १५ ते २० मीटर रुंदीचा पट्टा लावावा. यासाठी लोक सहभागामधून समुद्र किनाऱ्यावर सुरू आणि केतकीची लागवड करावी.
  • समुद्र व खाडी ज्याठिकाणी एकत्र येतात अशा ठिकाणी कांदळवनांची लागवड करणे आवश्यक आहे. ज्याचा फायदा खाडी किनाऱ्यावरील बागायतीना नक्कीच होईल.
  • फळपिकांची नवीन लागवड 

  • नवीन फळबागांची लागवड अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करणे गरेजेचे आहे. यामध्ये आंबा, काजू, नारळ यांच्या लागवडीबरोबरच फणस, जांभूळ, आवळा, कोकम, रामफळ, पपनस या सारख्या पिकांच्या व्यापारी लागवडीचा विचार करावा. भविष्यामध्ये या पिकांना मोठी मागणी आहे.
  • वरकस जमिनीत आणि पाण्याची उपलब्धता कमी असल्यास आंबा, काजू बरोबरच फणस, जांभूळ, आवळा, रामफळ लागवड करावी. बागायती पीक पद्धतीमध्ये नारळ, सुपारी बरोबरच जायफळ, दालचिनी, काळिमिरी ही मसाला पिके आणि पपनस, जाम, नीर फणस लागवड केल्यास बदलत्या वातावरणामध्येसुद्धा शाश्वत उत्पादन घेता येईल.
  • भविष्यात सर्वच पिकांच्या शाखीय व्यवस्थापनाकडे सुरवातीपासूनच लक्ष द्यावे.
  • संपर्क ः डॉ. योगेश परुळेकर, ८२७५४५४९७८ (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली,जि.रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com