हुरड्यासाठी ज्वारी लागवडीचे व्यवस्थापन

ज्वारीच्या तुलनेमध्ये हुरड्याला दरही (१२० ते २०० रुपये प्रति किलो) चांगला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हुरडा या घटकावर लक्ष केंद्रित करून ज्वारीची लागवड करावी.
हुरड्यासाठी ज्वारी लागवडीचे व्यवस्थापन
हुरड्यासाठी ज्वारी लागवडीचे व्यवस्थापन

मराठवाड्यातील पावसाची स्थिती मुळात बेभरवशाची. पावसावर आधारित ज्वारीसारख्या पिकांचे नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांची संघर्ष काही चुकत नाही. अशा वेळी रब्बी ज्वारींची हुरड्यासाठी नियोजन करणे फायद्याचे ठरू शकते. कारण एका टप्प्यातच ज्वारीचे पीक हुरड्यावर येते. शेतात आगोटीमध्ये भाजलेल्या हुरड्याची गावरान चव अगदी शहरी झालेल्या माणसांनाही खेचून घेते. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांसह व्यावसायिक पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या बहुतांश कृषी पर्यटन केंद्रामध्ये हुरडा पार्ट्यांचे आयोजन सुरू होते. ज्वारीच्या तुलनेमध्ये हुरड्याला दरही (१२० ते २०० रुपये प्रति किलो) चांगला. त्यामुळे शेतकऱ्यांनी हुरडा या घटकावर लक्ष केंद्रित करून ज्वारीची लागवड करावी. हुरडा ज्वारी नियोजनाचे फायदे 

  • खास हुरड्यासाठी विकसित जातींच्या बीजोत्पादनातून अधिक नफा होऊ शकतो.
  •  ज्वारीमध्ये खनिज आणि तंतुमय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे. त्यात असणाऱ्या स्टार्चचे विघटन हळूवारपणे होते. परिणामी, मधुमेही आणि स्थौल्यत्व असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरते.
  • ज्वारीतील फायटोकेमिकल्स आणि पोषकतेच्या गुणधर्मामुळे ‘लो कॅलरिज हाय फायबर’ आहार म्हणून अधिक उपयुक्त.
  • ज्वारीचा आहारात समावेश केल्यास शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी चांगला उपयोग होतो.
  • मशागत

  • मूग व उडीद पिकांच्या काढणीनंतर वखराने उतारास आडवी मशागत करावी. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत साठवले जाईल. या ओलाव्याचा उपयोग रब्बी ज्वारी पिकाच्या वाढीसाठी होईल.
  • सोयाबीन पिकानंतर रब्बी ज्वारी लागवड करणार असाल, तर सोयाबीन काढणीनंतर मशागत केल्यास ओलावा कमी होऊ शकतो. मशागत करून ज्वारीची पेरणी केल्यास ओलाव्याच्या अभावामुळे ज्वारीची उगवण कमी होते. त्यामुळे सोयाबीन काढणीनंतर जमिनीची मशागत न करता (झिरो टिलेज) रब्बी ज्वारीची पेरणी करावी. चांगली उगवण होऊन ज्वारीची उत्पादकता वाढू शकते. सोयाबीननंतर कमी पाण्यामध्ये (दोन पाण्यामध्ये) रब्बी ज्वारीचे दुप्पट उत्पादन मिळू शकते.
  • ज्वारीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी.
  • ओलावा साठवणीसाठी जमिनीच्या उतारास आडवी जमिनीत लहान सरी वरंबे किंवा समपातळी वाफे तयार करावेत. सप्टेबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यातील पावसाचे पाणी जमिनीत मुरते. त्याचा पिकास फायदा होतो.
  • पेरणीचा कालावधी

  • ऑक्टोबर महिन्याचा पहिला पंधरवडा (१ ते १५ ऑक्टोबर)
  • एसजीएस-८-४ या वाणाची नोव्हेंबरपर्यंत पेरणी करता येते.
  • लवकर पेरणी केल्यास खोडमाशीचा उपद्रव वाढतो, तर उशिरा पेरणी केल्यास बियाण्यांची उगवण कमी होते.
  • बीजप्रक्रिया  काणी रोग प्रतिबंधासाठी, गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम प्रति किलो बियाणे, खोडमाशी, खोडकिडा प्रतिबंधासाठी इमिडाक्लोप्रीड (४८ टक्के एफएस) १४ मि.लि. प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. ताटांची योग्य संख्या व रुंद पेरणी 

  • दोन ओळींतील अंतर ४५ सें.मी. (१८ इंच) ठेवावे. हेक्‍टरी १० किलो बियाणे लागते.
  • उगवणीनंतर तीन आठवड्यांनी दोन रोपांतील अंतर १५ सें.मी. ठेवून विरळणी करावी. हेक्‍टरी ताटांची संख्या १ लाख ३५ हजार इतकी ठेवावी.
  • हुरड्यासाठी ज्वारीचे सुधारित वाण  एसजीएस-८-४  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण. हुरड्याची प्रत उत्तम असून, चवीला रुचकर व गोड. कणसातून दाणे सहज वेगळे होतात. अन्य हुरडा वाणापेक्षा दाणे टपोरे. प्रतिहेक्‍टरी १५-१६ क्विंटल हुरडा आणि ७०-७५ क्विंटल कडब्याचे उत्पादन.  फुले उत्तरा  महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण. हुरडा गोड आणि रुचकर, दाणे सहजरीत्या वेगळे होतात. प्रतिहेक्‍टरी २० ते २२ क्विंटल हुरडा आणि ६० ते ६५ क्विंटल कडब्याचे उत्पादन. फुले मधुर  महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण पश्‍चिम महाराष्ट्र, रब्बी हंगामातील हुरडा लागवडीसाठी प्रसारित. हुरडा गोड व रुचकर, दाणे कणसापासून सहजरीत्या वेगळे होतात. अवर्षणप्रवण स्थितीत लागवडीस योग्य. खोडमाशी, खोडकिडा व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम. हेक्‍टरी ३० ते ३२ क्विंटल हुरडा आणि ६५ ते ७० क्विंटल कडब्याचे उत्पादन. अन्य वाण :  सुरती, गूळभेंडी, कुची कुची, काळी दगडी, वाणी हे स्थानिक वाणसुद्धा हुरड्यासाठी उपलब्ध आहेत. रासायनिक खतांचा वापर 

  • कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी हेक्‍टरी ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद पेरणीबरोबर ओलिताखालील रब्बी ज्वारीसाठी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश. ज्यात अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीवेळी व अर्धे नत्र ३५ ते ४० दिवसांनी पाण्याची पाळीबरोबर द्यावे.
  • पेरणीपूर्वी शेणखत (७५० किलो शेणखत अधिक २० किलो नत्र प्रति हेक्टर) दिल्यास चांगला फायदा होतो.
  • ज्या शेतकऱ्यांनी सऱ्या करून ठेवलेल्या आहेत, त्यांनी सरी काढणीबरोबरच रासायनिक खताची मात्रा पेरून द्यावी. उत्पादनात भरीव वाढ, तसेच चांगल्या प्रतीचा कडबा मिळू शकतो.
  • आंतरमशागत 

  • रुंद पद्धतीने (४५ सें.मी.) अंतरावर ज्वारी पेरणी करावी. म्हणजे पिकांमध्ये कोळप्याच्या साह्याने दोन वेळेस आंतरमशागत करता येते. त्यामुळे तणांच्या नायनाटाबरोबरच जमिनीतील ओलावा साठून राहण्यास मदत होते.
  • पेरणी केल्यानंतर ३ आठवड्यांनी दोन ओळींत सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन (मूग, उडीद इ. चे काड) केल्यास उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे.
  • काढणी  अंगठा व बोटाच्या मध्ये ज्वारीचा दाणा दाबून पाहिल्यास दुधासारखा द्रव किंचित बाहेर येते. दाणे मऊसर लागतात. झाड फुलोऱ्यात आल्यानंतर १५ ते २५ दिवसांत ही अवस्था येते. या टप्प्यावर दाण्यामध्ये स्टार्च वेगाने साचत असते. या अवस्थेत एकूण धान्य वजनाच्या ५० टक्के एवढे असते. पुढे हुरड्याच्या अवस्थेत दाण्यामध्ये ते प्रमाण ६५ ते ६८ टक्के एवढे असते. हुरडा अवस्थेमधील कणसे आणल्यानंतर कणसे खुडून ती हाताने चोळावेत. हाताने चोळल्यानंतर त्यामधील दाणे सहज वेगळे होऊ शकतात. साठवणूक हुरडा ४ अंश सेल्सिअस तापमानात साठवल्यास ३० दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो. - प्रीतम भुतडा, (सहायक कृषिविद्यावेत्ता), ९४२१८२२०६६ डॉ. एल. एन. जावळे, (ज्वारी पैदासकार) , ७५८८०८२१५७ (ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com