नवीन आंबा बागेची लागवड करताना...

आंबा कलमाची लागवड करताना कलमाचा जोड जमिनीच्या वर राहिल याची काळजी घ्यावी.
आंबा कलमाची लागवड करताना कलमाचा जोड जमिनीच्या वर राहिल याची काळजी घ्यावी.

आंबा लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी सध्याचा काळ अनुकूल असून एक वर्ष वयाच्या लागवडयोग्य रोपांची लागवड करावी. आंबा लागवड करताना विविध सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. परिणामी दीर्घकाळापर्यंत दर्जेदार उत्पादन मिळते. हवामान : आंबा फळपिकासाठी उष्ण व समशीतोष्ण हवामान अनुकूल आहे. मोहोर येण्यासाठी तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येणे गरजेचे असते. फळधारणेसाठी २० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. जमीन : निचरा होणारी, १.५ ते २ मीटर खोलीची आणि त्याखाली मुरुम असलेली जमीन (सामू ५.५ ते ७.५ ) निवडावी.

जाती हापूस, केशर, पायरी, तोतापुरी, नीलम या आंब्याच्या उन्नत जाती आहेत. तर आम्रपाली, रत्ना, साईसुगंध या संकरित जाती आहेत. महाराष्ट्रात कोकणातील उष्ण व दमट हवामान हापूस, पायरी या जातींना पोषक आहे. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील कोरड्या हवामानात प्रामुख्याने केसरची लागवड केली जाते.

लागवड : पारंपरिक पद्धतीमध्ये १० x १० मीटर अंतरावर लागवड (एकरी ४० झाडे) करतात. घन लागवड पद्धतीत ५ x ५ मीटर अंतरावर एकरी १६० झाडे बसतात. लागवडीसाठी १x१x१ मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. उन्हात खड्डे तापल्यानंतर खड्डा ३० ते ४० किलो शेणखत, ३० ते ४० किलो माती, २०० ग्रॅम निंबोळी पेंड , १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने भरावा. कोरडवाहू लागवड जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये करावी. लागवडीसाठी एक वर्षावी, निरोगी कलमे निवडावीत. कलमांचा बुंधा जाड व मजबूत असावा. कलम लावताना अगोदर भरून ठेवलेल्या खड्ड्यात मध्यभागी पिशवीच्या आकाराचा खड्डा काढावा. पिशवी कापून मुळाभोवती असलेला मातीचा गोळा फुटणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर गोळा दोन्ही हाताने धरून खड्ड्यात ठेवावा. गोळ्याभोवती माती हाताने व पायाने दाबावी. कलमांना काठीचा आधार द्यावा. लागवडीनंतर पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन : कलमाच्या विस्ताराच्या आत १५ सें.मी. खोल व ३० ते ४० सें.मी. रुंद चर खोदून त्यात खते टाकावीत व चर बुजवून घ्यावा. पहिल्या वर्षी प्रतिकलमास १० किलो शेणखत , तसेच नत्र १५ ग्रॅम, स्फुरद १५ ग्रॅम व पालाश ५० ग्रॅम याप्रमाणात द्यावे. नत्र ५० टक्के, संपूर्ण स्फुरद व पालाश जुलै महिन्यात द्यावे. उरलेले नत्र सप्टेंबरमध्ये द्यावे.

पाणी व्यवस्थापन : कलमांना पहिली तीन वर्षे हिवाळ्यात आठवड्यातून एकवेळ तर उन्हाळ्यात आठवड्यातून दोनवेळा पाणी द्यावे. प्रत्येक पाळीला २० ते ३० लिटर पाणी द्यावे. पावसाळ्यामध्ये आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे.

संपर्क : अमोल क्षीरसागर, ९८२२९९१४९५   (उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com