शाश्वत विकासाची दिशा देणारे मराठवाडा शेती साहाय्य मंडळ

शाश्वत ग्राम आणि शेती विकासाचा अविरत वसा घेऊन मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे काम सुरू आहे.पाणलोट क्षेत्रांसह इतर कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी व अधिकारी या संस्थेस भेटी देऊन लाभ घेतात.
 जल,मृद संधारणाच्या कामामुळे झालेला पाणीसाठा.
जल,मृद संधारणाच्या कामामुळे झालेला पाणीसाठा.

शाश्वत ग्राम आणि शेती विकासाचा अविरत वसा घेऊन मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे काम सुरू आहे.पाणलोट क्षेत्रांसह इतर कृषी तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी व अधिकारी या संस्थेस भेटी देऊन लाभ घेतात. मराठवाडा शेती साहाय्य मंडळ ही संस्था १९६९ साली स्थापन झाली. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी अधिनियम १९५० आणि सोसायटी रजिस्ट्रेशन अधिनियम१८६० तसेच एफसीआरओ अंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहे. १९६९ पूर्वी ‘वॉर ऑन वॉन्ट' (गरजेविरुध्द लढा) या उपक्रमातून शेती सिंचन, वन, वृक्ष संवर्धन, शेती सपाटीकरण, तळे उभारणी या प्रकारची कामे केली जात होती. ही कामे करत असताना जल भूमिसंवर्धन करणे आणि त्यासाठी मानवी संसाधने निर्माण करणे, लोक क्षमता, क्रियाशीलता वाढविणे गरजेचे आहे, हे संस्थेच्या लक्षात आले आणि संस्थेने पूर्वीचे नाव बदलून मराठवाडा शेती साहाय्य मंडळ या नावाने कार्य सुरु केले. मराठवाडा शेती साहाय्य मंडळ ही संस्था पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्याबरोबरच जालना, परभणी, उस्मानाबाद बुलडाणा या जिल्ह्यामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करणाऱ्या शासकीय अशासकीय पाणलोट कार्यान्वयन यंत्रणांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम यशस्वीपणे करीत आहे संस्थेचा कार्यभार  सद्यःस्थितीत मराठवाडा शेती साहाय्य मंडळाच्या अध्यक्षपदी राजेंद्र बारवाले असून अजय गांधी, नंदकिशोर कागलीवाल, सुदामराव साळुंके, युगंधर मांडवकर, भगवानराव काळे हे विश्वस्त म्हणून तर कृषीरत्न विजयअण्णा बोराडे विश्वस्त तथा कार्यवाहक म्हणून काम पाहत आहेत. संस्थेतील विविध विभागांतर्गत कृषी, जल भूमीसंवर्धन, कीटक शास्त्र, फलोत्पादन, कृषी अभियांत्रिकी, फळ व भाजीपाला प्रक्रिया, सामाजिक विषय सक्षमीकरण, पशुधन, शिक्षण इत्यादी विषयांवरील विशेषज्ञ आणि सहाय्यक कर्मचारी वर्ग कायम व हंगामी स्वरूपी कार्यरत आहेत. संस्थेचे ध्येय  ग्रामीण भागातील महिला व पुरुषांचा जीवन दर्जा उंचविण्यासाठी उपलब्ध साधन सामग्रीचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्यास सक्षम बनविणे हे संस्थेचे ध्येय आहे. ग्रामीण भागातील महिला, पुरुषांचा आर्थिक, भौतिक, सामाजिक, मानसिक, गुणात्मक-सकारात्मक बदल करण्यासाठी उपलब्ध साधन सामग्रीचे वैज्ञानिक पद्धतीने योग्य नियोजन व व्यवस्थापन करण्याची क्षमता निर्माण करण्याचे काम संस्था करत आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने जालना, औरंगाबाद जिल्ह्यात असून काही समन्वित संस्थांच्या माध्यमातून बुलडाणा, वाशीम, परभणी, उस्मानाबाद, अकोला इत्यादी जिल्ह्यात संस्थेने कार्य विस्तारले आहे. संस्थेची उद्दिष्ट्ये 

  • ग्रामीण भागातील पुरुष व महिलांना संघटित करून, त्यांचा नैसर्गिक साधन संपत्तीचे योग्य व्यवस्थापन पाण्याच्या कार्यक्षमतेचा विकास.
  • पाणलोट क्षेत्र विकास संकल्पनेचा अंगीकार करून जमीन व पाणी संशोधनाचे पुनरुज्जीवन, संवर्धन व विकास करून उत्पादकतेत वाढ. ग्रामीण भागातील स्त्री-पुरुषांचे जीवनमान उंचावणे.
  • कृषी, पशुसंवर्धन व संलग्न क्षेत्रात गरजेवर आधारित तंत्रज्ञानाची निर्मिती, विकास आणि प्रचार व प्रसार. महिलांचे सबलीकरण करून त्यांना गावातील विकास कार्याच्या मुख्य प्रवाहात आणणे.
  • किशोरी व महिलांचे सबलीकरण करून त्यांचे सामाजिक स्थान उंचावणे.
  • ग्रामीण युवकांचे प्रशिक्षण आणि त्यांच्या क्षमतांचा विकास करून सामाजिक दृष्ट्या उपयुक्त कार्यक्रमाकडे त्यांची क्षमता वळविणे.
  • कृषी विज्ञान केंद्रांतर्गत उपक्रम भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली मार्फत मराठवाडा शेती साहाय्य मंडळ संस्थेस सप्टेंबर १९९२ मध्ये कृषी विज्ञान केंद्र हा महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर होऊन मार्च १९९३ पासून जालना जिल्ह्यासाठी प्रत्यक्ष कार्यरत झाला. सल्ला सेवा उपक्रम शेतकरी, महिला, ग्रामीण युवती व विस्तार कार्यकर्ते यांच्यासाठी मृदाशास्त्र, पशुसंवर्धन, गृहविज्ञान, अन्नतंत्र, कृषी अभियांत्रिकी, पीक उत्पादन, उद्यानविद्या, पीक संरक्षण आदी विभागामार्फत सल्लासेवा व समुपदेशन केले जाते.  कोजागरी निमित्ताने चर्चासत्र ग्रामीण व शहरी भागातील सर्व स्तरातील नागरिक, शेतकरी, नोकर वर्ग, व्यावसायिक यांना आपले विचार मांडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक खुले व्यासपीठ आहे. दरवर्षी कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने सर्वांसमोर एक सामाजिक विषय निवडून त्यावर मुक्त चर्चा केली जाते. सुधारणात्मक उपाय योजना सुचविल्या जातात. दरवर्षी या कार्यक्रमात कोजागरी पौर्णिमेच्या रात्री ७ ते ८ या वेळेत नागरिक नियमितपणे हजर राहतात.  धुलिवंदनाला वैचारिक बैठक प्रत्येक वर्षी कृषी विज्ञान केंद्रावर विचारांचे धूलिवंदन खेळण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातून सर्व स्तरातील नागरिक एकत्र जमतात. या दिवशी सामाजिक विषयावर आपली मते मुक्तपणे मांडतात. त्यातूनच नावीन्यपूर्ण कार्यक्रमाची सुरवात होते. २००२ साली धूलिवंदन कार्यक्रमातून 'आम्ही सुधारू आमचा गाव' हा कार्यक्रम सुरू झाला.  कृषी विज्ञान मंडळ मराठवाडा शेती साहाय्य मंडळ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविला जात असलेला कृषी विज्ञान मंडळ हा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालविलेला स्वयंस्फूर्त असा मासिक चर्चासत्र उपक्रम सप्टेंबर, १९९७ पासून अविरत सुरू आहे. या उपक्रमात जालना, औरंगाबाद, परभणी, आणि बुलडाणा जिल्ह्यातील ४०० गावातील १५०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे. दर महिन्याच्या ५ तारखेस शेतीविषयक चर्चासत्रासाठी शेतकरी कृषी विज्ञान केंद्रात एकत्र येतात. हंगामाच्या गरजेनुसार शेती विषयक विषय समोर ठेवून चर्चासत्र आणि त्या विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाते. मागील महिन्याच्या विषयावर तीन प्रश्न उपस्थितांना विचारून त्याचे उत्तरे देणाऱ्यास चांदीचे नाणे बक्षीस दिले जाते. आम्ही सुधारू आमचा गाव' गावाच्या दृष्टीने तेथील स्वयं प्रशासन तयार होऊन विविध उपक्रमांचे परिणामकारक व्यवस्थापन होण्यासाठी गावातील महिला, पुरुष, युवक, किशोरी, शेतकरी, वंचितांची क्षमता वाढविण्यासाठी संस्थेने २००२ ते २००७ या कालावधीत पीएसीएस प्रकल्पांतर्गत ‘आम्ही सुधारू आमचा गाव' हा कार्यक्रम औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ६० गावांमध्ये कार्यान्वित केला होता. या प्रकल्पातंर्गत महिला स्वयं सहाय्यता गट स्थापना व सक्षमीकरण, किशोरी सक्षमीकरण, युवक संघटन सक्षमीकरण, शेतकरी संघटन, शासकीय समन्वय, उपजीविका, दुष्काळ निवारण, दर्जेदार शिक्षण या उद्देशाने गावातील सर्व घटकांमध्ये जाणीव जागृती, प्रशिक्षणे, कौशल्यवृद्धी, स्वयंव्यवसाय, स्पर्धा, सहली, प्रात्यक्षिके आदी उपक्रम कार्यान्वित केले आहेत. रुजविली माथा ते पायथा संकल्पना संस्थेने प्रारंभीच्या काळात माती, पाणी संवर्धन कार्य हाती घेऊन वाटचाल सुरु केली. जालना जिल्ह्यातील देव पिंपळगाव, रेवगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव, आडगाव या गावात माती अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना यशस्वीरीत्या राबविली. या अनुभवातूनच आडगाव ठोंबरे (ता.जि. औरंगाबाद) हे गाव राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाले. या ठिकाणी माथा ते पायथा ही संकल्पना यशस्वीरीत्या रुजली. समाजासमोर एक आदर्श पाणलोट नमुना तयार झाला. आजतागायत औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील २४ गावांमध्ये ९,१३३ हेक्‍टर क्षेत्रावर पाणलोट क्षेत्र विकास दृष्टीने एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, इंडो-जर्मन पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविला आहे. यातूनच आडगाव, जडगाव, कडवंची, आसरखेडा, शिवणी (खेडेकर) या आदर्श पाणलोटाची निर्मिती झाली आहे. संस्थेचे शैक्षणिक योगदान

  • १९९३-९४ पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुक्‍त कृषी शिक्षण प्रमाणपत्र, पदविका व पदवी अभ्यासक्रम.
  • वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कृषी महाविद्यालयाची सुरवात.
  • स्वयंसहाय्यता गट क्षेत्रात कार्य करणाऱ्या व नव्याने कार्य करणाऱ्यासाठी मुक्‍त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत स्वयंसहाय्यता गट प्रेरक प्रेरीका प्रमाणपत्र अभ्यासक्रम.
  • 'आमची शाळा' नावाने ५ ते १० वी पर्यंत गुरुकुल निवासी विद्यालय. यामध्ये स्वावलंबी जीवनमूल्यांची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने मुलांना मार्गदर्शन.
  • ‘‘शेतकरी व शेती केंद्रबिंदू मानून संस्थेची वाटचाल सुरू आहे. पाणलोट, माती संवर्धनानंतर आता बदलत्या हवामानानुसार पीक पद्धतीकडे लक्ष देत आहोत.ग्रामीण भागातील मुला-मुलींना अल्प दरात दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून संस्था विविध उपक्रम राबवीत आहे. - विजयअण्णा बोराडे (विश्वस्त तथा कार्यवाहक,मराठवाडा शेती साहाय्य मंडळ) संपर्क : पी.डी.जोशी :७३५००१३१७९ पंडित वासरे : ७३५००१३१५१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com