कपाशी अवशेषातील बोंड अळीचा नाश करणारी यांत्रिक उपचार प्रणाली

कपाशी पिकामध्ये अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड अळी या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव ही मोठी समस्‍या आहे. गेल्‍या पाच वर्षांपासून महाराष्‍ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, आणि तेलंगणा या राज्‍यांमध्‍ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव २० ते ६० टक्क्यांपर्यंत आणि कापूस उत्‍पादनामध्‍ये १० ते ३० टक्के नुकसान दिसून आले.
Mechanical treatment system for destruction of pink ball worm in cotton
Mechanical treatment system for destruction of pink ball worm in cotton

कपाशी पिकामध्ये अमेरिकन बोंड अळी आणि गुलाबी बोंड अळी या दोन्ही किडींचा प्रादुर्भाव ही मोठी समस्‍या आहे. गेल्‍या पाच वर्षांपासून महाराष्‍ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात, आणि तेलंगणा या राज्‍यांमध्‍ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा प्रादुर्भाव २० ते ६० टक्क्यांपर्यंत आणि कापूस उत्‍पादनामध्‍ये १० ते ३० टक्के नुकसान दिसून आले. कपाशी गुणवत्‍तेची हानी अधिक आहे. गुलाबी बोंड अळीच्‍या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान  गुलाबी बोंड अळीच्‍या प्रादुर्भावामुळे रुईचा उतारा आणि तंतूच्‍या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो. तंतूची लांबी (१३.९%), मुलायमता (२५%) एकरूपता (८.८%), ताकद (११.५ %) आणि कापसाचा शुभ्रपणा (डिग्री ऑफ रिफ्लेक्टन्स) (१६.३ %) हे गुणधर्म कमी होतात. पिवळेपणा (४२.४%) आणि छोट्या तंतूचे प्रमाण (६७.३%) हे दोष वाढतात. रुईचा उताराही १६ ते १७ टक्क्यांनी कमी होतो. बोंड अळीच्‍या प्रादुर्भावामुळे कापसाची रंग (कलर ग्रेड) सुद्धा कमी होते. संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली प्रादुर्भावग्रस्त कापूस पाहिला असता त्‍यावर सूक्ष्‍मजंतूची वाढ झालेली दिसून येते. बोंड अळीच्‍या मलमूत्राचे डाग दिसतात. तंतूच्‍या कडा तुटलेल्‍या दिसतात. यामुळे तंतूची ताकद कमी होते. परिणामी, कापूस उत्‍पादक शेतकरी आणि जिनिंग उद्योजक दोघांनाही आर्थिक फटका बसू शकतो. गुलाबी बोंड अळी पुनरुत्पादन, प्रसार चिंतेचा विषय  

  •   कपाशी शेतीप्रमाणे जिनिंग उद्योग हेही गुलाबी बोंड अळीची पुनरुत्पादन, प्रसार होण्‍यासाठी तितकेच जबाबदार आहेत. जिनिंग प्रक्रियेदरम्‍यान निघालेल्‍या कचऱ्यात गुलाबी बोंड अळीच्या विविध अवस्था दिसून येतात. परिणामी जिनिंग उद्योगाच्या परिसरातील शेतांमध्‍ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. 
  •   जिनिंग उद्योगासाठी कापूस वाहतूक करून दूरवरून आणला जातो. या लांब पल्ल्याच्या प्रवासातही किडींचा प्रसार होण्याची शक्यता असते. 
  •  जिनिंग उद्योगामध्‍ये जिनिंग आणि सफाई यंत्रातून कापूस प्रक्रिया केल्‍यानंतरही गुलाबी बोंड अळी जिवंत राहण्‍याची शक्यता असते. अशी जिवंत राहिलेली बोंड अळी जिनमधील कचरा, सरकी आणि रुई यांमध्‍ये विभागली जाते. जिवंत राहिलेल्‍या आणि मेलेल्‍या अळ्या या सायक्‍लॉनमधील कचरा, पूर्वसफाई यंत्र, कचरा पेटी आणि रुई सफाई यंत्रात जमा होतात. तसेच कवडी कापूस आणि जिनिंगमधील साफसफाई केलेल्‍या कचऱ्यामध्ये अळीच्या विविध अवस्था दिसून येतात. या कचऱ्याची काळजीपूर्वक विल्‍हेवाट न लावल्यास गुलाबी बोंड अळीचा प्रसार वाढू शकतो. जिनिंग उद्योगातून होणारा बोंड अळीचा प्रसार रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जिनिंग कारखान्‍यातील सर्व कापूस सफाई यंत्रे, सायक्‍लोन, कवडी कापूस, अपरिपक्‍व आणि न उघडलेली बोंडे अशा सर्व कचऱ्यामध्‍ये अळीच्या जिवंत अवस्था दिसून येतात. म्‍हणून हा सर्व कचरा एखाद्या यांत्रिकी उपचार पद्धतीने चिरडणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सिरकॉटमधील डॉ. व्‍ही. जी. आरुडे व सहकाऱ्यांनी जिनिंग उद्योगातील कचऱ्याची विल्‍हेवाट लावण्‍यापूर्वी अळीच्या विविध अवस्था चिरडून नष्ट करण्यासाठी जिन कचरा यांत्रिकी उपचार प्रणाली विकसित केली आहे. हे संशोधन सार्वजनिक व खासगी क्षेत्रातील भागीदारीत करण्यात आले. ही प्रणाली एका तासात २.५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करू शकते. 
  •   या प्रणालीचे सेंट्रिफ्युगल कचरा पंखा, सायक्‍लोन आणि कॉम्पॅक्टर असे मुख्‍य भाग आहेत. 
  •   यातील सेंट्रिफ्युगल पंखा हा अमेरिकी कृषी विभागाच्या निकषानुसार  बनवला असून, त्यात सर्व कचरा चिरडून बाहेर फेकला जातो. या प्रक्रियेमध्ये कचऱ्यातील बोंड अळ्या चिरडून नष्‍ट होतात. 
  •   सायक्‍लोनचा वापर हवा आणि चिरडलेला कचरा वेगळा करण्‍यासाठी होतो. यातून वायू प्रदूषण कमी होते. 
  •   कॉपॅक्‍टरमुळे चिरडलेल्‍या कचऱ्याची घनता कमी होते. कमी जागेमध्ये अधिक कचरा साठवता येतो. विल्हेवाट लावणे सोपे होते.
  • गुलाबी बोंड अळीचा मृत्युदर  यंत्राची कार्यक्षमता तपासण्यासाठी जिनिंग प्रक्रियेतील विवध यंत्रांतून (उदा. कापूस पूर्वसफाई यंत्रे, रुई सफाई यंत्रे आणि सायक्‍लोन) निघालेल्या कचऱ्यामध्‍ये निर्धारित प्रमाणात जिवंत गुलाबी बोंड अळ्या, कोष इ. मिसळण्यात आले. या कचऱ्यावर यांत्रिकी उपचार प्रणालीत प्रक्रिया केली. त्यातून बाहेर पडलेल्या कचऱ्यातील बोंड अळ्यांच्या मृत्यूचा दर ताबडतोब आणि तेरा दिवसांनंतर तपासला. त्वरित केलेल्या तपासणीत अळी, कोष मृत्‍यू दर १०० टक्के आढळला. तेरा दिवसानंतरही उपचार केलेल्‍या कचऱ्यातही बोंड अळीच्‍या पतंगाची वाढ झालेली दिसून आली नाही. म्हणजेच ही प्रणाली जिनिंग कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी पूर्ण सक्षम असल्याचे दिसून आले. म्हणजेच या प्रक्रियेमुळे जिनिंगच्या कचऱ्याद्वारे बोंड अळीच्या प्रसाराची शक्यता शून्यापर्यंत कमी होते.  फायदे   या प्रणालीमुळे गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र जिनिंग उद्योगात तोडण्‍यास मदत होते. 

  • या प्रक्रियेतच बोंड अळ्या नष्‍ट झाल्‍यामुळे पुढील प्रसार रोखला जातो. या प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्‍या उत्‍पादनात होणारी घट (५ टक्के) आणि गुणवत्तेतील घट (५ टक्के  टाळता येईल.)
  •   या प्रणालीच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे आणि जिनिंग उद्योजकांचे होणारे एकरी किमान ३५०० रुपये नुकसान टाळता येईल.  जिन कचरा यांत्रिकी उपचार प्रणालीचा विकास हा सार्वजनिक आणि खासगी संयुक्‍त भागीदारीत केला आहे. सिरकॉटने ही प्रणाली बनवणे, विकणे यांचा परवाना बजाज स्टील इंडस्ट्रीज, नागपूर यांना दिला आहे.
  • बोंड अळीचा प्रसार रोखण्‍यासाठी... यांत्रिक पद्धत गुलाबी बोंड अळ्या जिनिंग उद्योगातून नष्‍ट करण्‍यासाठी जिन कचरा यांत्रिकी प्रणालीची शिफारस केली आहे. विल्हेवाट लावण्यापूर्वी सर्व कचरा या प्रणालीतून योग्य पद्धतीने चिरडून टाकावा. व्‍यवस्‍थापन पद्धत 

  • जिनिंग आवारात वेगवेगळ्या ठिकाणी किमान १० गंधसापळे लावावेत. त्यात पतंग अडकतील.
  • खराब झालेल्‍या सरकीची पद्धतीने विल्‍हेवाट लावणे. प्रादुर्भावग्रस्त आणि अपरिपक्‍व बोंडे नष्‍ट करणे.
  • जिनिंगमध्‍ये कापूस आणि सरकी अधिक साठवणे टाळावे.  
  • वेचणीनंतर शेतातील कापूस पीक, पऱ्हाटी ताबडतोब नष्‍ट करणे.  जिनिंग परिसराची स्‍वच्‍छता राखणे.
  • नियामक उपाय  नियमित निरीक्षण करून प्रादुर्भावग्रस्त सरकी, कचरा योग्‍य पद्धतीने नष्‍ट करावा. कायदेविषयक उपाय नवीन कापूस हंगाम सुरू होण्‍यापूर्वी किमान ४५ दिवस आधी जिनिंग आणि सरकी तेल उद्योग बंद करणे. सामुदायिक विस्‍तृत दृष्टिकोन   संबंधित संस्थांनी एकत्र येऊन एक कृती आराखडा बनवून त्‍यांची अंमलबजावणी करणे, निर्मूलनासाठी समुदायात जनजागृतीसाठी प्रयत्न करणे. यांत्रिक उपचार प्रणालीच्या वापराची योग्य पद्धत   विकसित केलेल्‍या प्रणालीच्या वापराची योग्य किंवा प्रमाणित पद्धतही सिरकॉटने स्‍थापित केली आहे. या पद्धतीनुसार सदर प्रणालीतील घटक पुढील क्षमतेचे असावेत.

  •   सेंट्रिफ्युगल पंखा हा किमान ६९० मि.मी. व्‍यासाचा आणि सहा सरळ पाती असलेला असावा. सेंट्रिफ्युगल पंख्‍याद्वारे किमान ४८०० घनमीटर हवा प्रति तास आणि ३६३ डब्‍ल्यूजीपी दाबाने फेकण्‍याची क्षमता असावी. पंख्‍याची गती ४१९२ मीटर प्रति मिनिट म्‍हणजेच सुमारे ३००० फेरे प्रति मिनिट (आर.पी.एम.) राखली पाहिजे. पाइपमधून हवेचा वेग १७ मीटर प्रति सेकंद इतका असावा. हवा आणि कचरा वाहून नेणाऱ्या पाइपचा व्‍यास २५४ मि.मी. असणे गरजेचे आहे. 
  •   १डी ते ३डी प्रकारचा सायक्‍लॉन वापरणे आवश्‍यक आहे. त्याचा व्‍यास ८४५ मि.मी. आणि उंची २४४५ मि.मी. असेल. 
  •   कॉपॅक्‍टरमधील स्‍क्रूवाहकाचा व्‍यास आणि पीच ३२० मि.मी. आणि गती ७२ फेरे प्रति मिनिट (आर.पी.एम.) असणे गरजेचे आहे. वर नमूद केलेल्‍या इष्‍टतम पद्धतीचा अवलंब केल्‍यास बोंड अळी पूर्णपणे नष्‍ट होते. 
  • संपर्क - डॉ. व्‍ही. जी. आरुडे, ९८८१०२४४६० (डॉ. व्‍ही. जी. आरुडे, हे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्‍था, मुंबई येथे वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ असून, डॉ. पी. जी. पाटील हे संचालक आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com