कोकरांच्या वेगवान वाढीसाठी मिल्क रिप्लेसर केले तयार

कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील राष्ट्रीय पशू पोषकता आणि शरीरशास्त्र संस्थेच्या संशोधकांनी दुधाला पर्यायी पूरक आहार (मिल्क रिप्लेसर सप्लीमेंट) तयार केला आहे.
Milk replacers made for rapid growth of lambs
Milk replacers made for rapid growth of lambs

मेंढ्यांच्या मांसाला वाढणारी मागणी पुरवण्यासह कोकरांची वेगवान वाढ आणि प्रतिकारशक्ती पुरवण्यासाठी कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील राष्ट्रीय पशू पोषकता आणि शरीरशास्त्र संस्थेच्या संशोधकांनी दुधाला पर्यायी पूरक आहार (मिल्क रिप्लेसर सप्लीमेंट) तयार केला आहे. प्रति किलो मिल्क रिप्लेसर दिल्यानंतर कोकराचे वजन १.५ ते २ किलोपर्यंत वाढत असल्याने आर्थिकदृष्ट्या ४५० रुपयांपर्यंत प्राप्ती शेतकऱ्यांना होते. मेंढीच्या मांसाची मागणी वाढत असून, शहरी आणि अर्धशहरी भागामध्ये त्याची किंमत ३०० ते ३५० रुपये प्रति किलो पर्यंत पोचली आहे. यामुळे सामान्यतः केवळ भटक्या जमातीपुरतीच पाळली जाणारी मेंढ्यांचे पालन स्थानिक शेतकरीही करू लागले आहेत. मेंढ्यांच्या उत्तम जाती आणि संतुलित आहाराकडेही त्यांचे लक्ष वेधले जात आहे. कोकरू अवस्थेमध्ये पोषक आहाराच्या अभावामुळे पिल्लांची प्रतिकारशक्ती कमी राहून विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी पिल्लांच्या वजनामध्ये घट येते. त्याच प्रमाणे या अवस्थेत मरतुकीचे प्रमाणही अधिक राहते. पुढे अशा मेंढीचा वाढीचा वेग, पुनरुत्पादन आणि दूध देण्याची क्षमता कमी राहते. गर्भावस्थेच्या पूर्व काळामध्ये (९० ते १०० दिवस) वजन कमी राहिल्याने पुढील पिढ्याही अशक्त जन्मण्याचा धोका राहतो. या साऱ्या समस्या कमी करण्याच्या उद्देशाने मेंढी पालनामध्ये पिल्लाच्या जन्मानंतरच्या वाढीचा वेग वाढवण्यासाठी भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या बेंगळुरू (कर्नाटक) येथील राष्ट्रीय पशू पोषकता आणि शरीरशास्त्र संस्थेच्या संशोधकांनी दुधाला पर्यायी पूरक आहार (मिल्क रिप्लेसर सप्लीमेंट) तयार केला आहे. हा आहार उत्तम दर्जाच्या व अधिक पचनीय अशा कच्च्या मालापासून बनवण्यात येतो. दर्जा उत्तम ठेवतानाच त्याची किंमत किमान पातळीवर ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मिल्क रिप्लेसरचा गर्भावस्थेच्या पूर्व स्थितीमध्ये वापरण्याची पद्धत व नेमके प्रमाण ठरविण्यासाठी बेंगळुरू येथील संस्थेमध्ये आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कोकरांवर प्रयोग आणि चाचण्या घेण्यात आल्या. विशेषतः या भागामध्ये लोकप्रिय असलेल्या नारी सुवर्णा या मेंढी जातीवर प्रयोग करण्यात आले. इथे या मेंढ्यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच तिच्यामध्ये जुळी पिल्ले देण्याचे प्रमाण अधिक असल्याने पिल्लावस्थेमध्ये दुधाची व पोषक घटकांची कमतरता भासते. अशा पिल्लांसाठी संस्थेकडून शेतकऱ्यांना मिल्क रिप्लेसर देण्यात आले. ते देण्याची नेमकी पद्धत शिकवण्यात आली.

  • प्रयोगासाठी दोन ते तीन आठवडे वयांच्या कोकरांची निवड करून त्या दोन गटामध्ये विभागण्यात आल्या. नियंत्रित गटाला शेतकरी वापरत असलेली पद्धत कायम ठेवण्यात आली. दुसऱ्या गटला प्रति दिन ४० ग्रॅम या प्रमाणे मिल्क रिप्लेसर ६० दिवसांसाठी दुधासोबत पूरक म्हणून देण्यात आले. उर्वरित सर्व पालन पद्धती व व्यवस्थापन एकसारखे ठेवण्यात आले. दर आठवड्याला त्यांचे वजन नोंदवण्यात आले.
  • मिल्क रिप्लेसरशी जुळवून घेण्यासाठी पिल्लांना ३ ते ४ दिवस लागले. एकदा त्यांनी जुळवून घेतल्यानंतर फारशी समस्या उद्भवली नाही.
  • ज्या पिल्लांना मिल्क रिप्लेसर देण्यात येत होते. ती पिल्ले अधिक कार्यरत, चपळ, आरोग्यपूर्ण राहिली. तसेच त्यांचे वजनही नियंत्रित गटाच्या तुलनेमध्ये वेगाने वाढले. (१५० ग्रॅम विरुद्ध ७० ग्रॅम प्रति दिन प्रमाणे).
  • पूरक खाद्यांचे अर्थशास्त्र  प्रति किलो मिल्क रिप्लेसर दिल्यानंतर कोकराचे वजन १.५ ते २ किलोपर्यंत वाढले. मिल्क रिप्लेसरचा प्रति किलो खर्च १५० रुपये होता. तर वाढलेल्या वजनांचे बाजारमूल्य गृहित धरल्यास ते सरासरी दीड किलो वजनासाठी साधारणपणे ४५० रुपये इतके होते. प्रति किलो मांसाचा ३०० रुपये धरण्यात आला आहे.

  • नफा खर्चाचे गुणोत्तर ३.० पर्यंत राहिले.
  • प्राथमिक चाचण्यांचे निष्कर्ष उत्साहवर्धक राहिले आहेत.
  • जे शेतकरी प्रयोगामध्ये सामील झाले, त्यांनी या नव्या पूरक खाद्यांचा कोकरांसाठी स्वीकार करण्याची इच्छा व्यक्त केली.
  • हे मिल्क रिप्लेसर तंत्र कोकरांच्या वेगवान वाढीसाठी व एकूण प्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. मांसाच्या उत्पादनामध्ये वेगाने वाढ होण्यास, पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे.
  • या नव्या तंत्राच्या सर्वदूर प्रसारासाठी संस्थेमार्फत प्रयत्न केले जात आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com