दुधाळ जनावरांमधील माज ओळखण्याच्या आधुनिक पद्धती

दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य म्हणजेच सुलभ प्रजनन महत्त्वाचे आहे. त्यासाठी दुधाळ जनावरे नियमितपणे माजावर केव्हा येतात, हे अचूक ओळखणे ही पशुपालन व्यावस्थापनेतील महत्त्वाची बाब आहे.
Artificial or natural insemination at the right time increases the chances of pregnancy.
Artificial or natural insemination at the right time increases the chances of pregnancy.

दुधाळ जनावरांतील व्यवस्थापनामध्ये मुख्य कार्य म्हणजेच सुलभ प्रजनन महत्त्वाचे आहे. त्यासाठी दुधाळ जनावरे नियमितपणे माजावर केव्हा येतात, हे अचूक ओळखणे ही पशुपालन व्यावस्थापनेतील महत्त्वाची बाब आहे. माजाचे तांत्रिक पद्धतीने व्यवस्थापन तसेच योग्य वेळी कृत्रिम अथवा नैसर्गिक रेतन केल्यास गर्भधारणेचे प्रमाण वाढते.

  • प्रत्येक गाई-म्हशीचा वयात येण्याचा कालावधी हा त्यांच्या जातीच्या गुणधर्मावर, आहार नियोजन व वातावरण यावर अवलंबून असतो.
  • संकरित कालवडी वयाच्या १२ ते १८ व्या महिन्यांत, तर देशी कालवडी व वगारी ३६ ते ४८ महिन्यांत प्रथम माजावर येतात असे निदर्शनास आले आहे.
  • परंतु जनावरांतील पहिला माज हे वयापेक्षा वजनावर अवलंबून आहे. जसे की, कालवडीकरिता २५० किलो आणि वगारीसाठी २७५ किलो किमान वजन पहिल्या माजाकरिता आवश्यक आहे.
  • व्यालेल्या गाई साधारणपणे ३० ते ७५ दिवसांनी, तर म्हशी ६० ते १२० दिवसांनी माज दाखवणे अपेक्षित असते. वयात आलेल्या कालवडी किंवा वगारी दर २१ दिवसांनी माजावर येतात. हे माजाचे चक्र गाभण असेपर्यंत चालू असते.
  • गाईचा माज सर्व साधारणपणे २४ ते ३६ तास व म्हशीचा माज १२ ते २४ तास असतो. गाय माजावर आल्यानंतर साधारणपणे ८ ते १२ तासांनंतर रेतन करवून घ्यावे, म्हणजे मधल्या माजाच्या कालावधीमध्ये कृत्रिम रेतन केल्यास गर्भधारणेची शक्यता अधिक असते.
  • व्यवस्थापनाची सूत्रे 

  • दररोजच्या व्यवस्थापनामध्ये पशुपालकाने जनावरांचे रोजच्या रोज सकाळ- संध्याकाळ माज ओळखण्यासाठी निरीक्षण करणे गरजेचे आहे. सर्व जनावरांमध्ये माजाची सर्व लक्षणे दिसून येतातच असे नाही. स्पष्ट माज असेल तर सर्व माजाची लक्षणे दिसून येतात.
  • मुका माज असलेल्या जनावरांमध्ये माजाची संपूर्ण लक्षणे दिसून येत नाहीत. प्रामुख्याने म्हशीमध्ये माजाची लक्षणे स्पष्ट दिसून येत नाहीत. वारंवार लघवी करणे व योनी मार्ग लालसर होणे या प्रकारची माजाची लक्षणे दिसून येतात. मुका माज असल्याने म्हशीमध्ये काळजीपूर्वक माज ओळखणे आवश्यक आहे.
  • माजाची लक्षणे 

  • अस्वस्थ असणे, चारा-पाणी कमी होणे.
  • सतत शेपटी उचलणे व वारंवार लघवी करते.
  • दूध उत्पादन कमी होते.
  • योनी मार्ग किंचित लालसर, ओलसर आणि सुजल्यासारखा दिसते. योनीमधून काचेसारखा, स्वच्छ, पारदर्शक व चिकट स्राव लोंबत दिसतो (बळस). हा बळस शेपटीवर तसेच मागील भागावर चिकटलेला दिसून येतो.
  • माज ओळखण्याच्या आधुनिक पद्धती 

  • ब्रीडिंग व्हील : हा प्रजननविषयी माहिती देणारा गोलाकार तक्ता असतो. या मध्ये पुढील माजाच्या तारखा, विण्याच्या तारखा अशी माहिती नोंदवली जाते. यामुळे रोजच्या रोज किती आणि कोणते जनावर माजावर येणार याची पूर्वकल्पना येते.
  • गाई-म्हशींच्या शेपटीच्या वरचा भाग रंगवून ठेवायचा. जेव्हा जनावर माजावर येतात आणि दुसरे जनावर त्या माजावर आलेल्या जनावरावर पाय टाकतात, तेव्हा तो शेपटीवरचा रंग पुसला जातो. या वरून माज आलेले जनावर ओळखता येते.
  • नसबंदी केलेला वळू : सकाळ आणि संध्याकाळी नसबंदी केलेला वळूद्वारे गाई-म्हशीमध्ये नियमित माज ओळखता येतो.
  • पेडोमीटर : पेडोमीटर हे जनावरांच्या पायाची गती मोजण्यासाठी पायाला बसविण्याचे उपकरण आहे. जनावरे माजावर नसतानाच्या कालावधीपेक्षा, माजावर असताना दुप्पट चालतात. त्या उपकरणामध्ये दर्शविलेल्या आकड्यावरून माजावर आलेली जनावरे ओळखता येतात.
  •  प्रोजेस्टेरॉन संप्रेरकाची चाचणी : माजावर असलेले जनावरे प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाचे प्रमाण दुधात आणि रक्तात कमी होते. माज नसतानाच्या काळात दुधातील प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण १० नॅनोग्रॅम\मिलि लिटर, तर रक्तातील प्रमाण ७ न्यॅनोग्रॅम\मिलिलिटर पेक्षा जास्त असते. माजावर असताना हे प्रमाण दुधामध्ये ३ न्यॅनोग्रॅम\मिलिलिटर पेक्षा कमी झालेले दिसते आणि रक्तातील प्रमाण ०.५ नॅनोग्रॅम\मिलिलिटर पेक्षा कमी झालेला आढळून येतो.
  • व्हिडिओ कॅमेरा \ सीसीटीव्ही : गोठ्यातील फिरत्या सीसीटीव्ही कॅमेराद्वारे, माजावर आलेल्या जनावरांची लक्षणे आणि हालचाली चित्रीत करता येतात. त्यामुळे मोठ्या कळपामध्ये माजावर आलेल्या गाई-म्हशी अचूक ओळखता येतात.
  • श्‍वानांचा वापर : कळपातील जनावरांचा माज ओळखण्यासाठी प्रशिक्षण दिलेल्या श्वानांचा वापर केला जातो. श्‍वान, जनावरांचा पार्श्‍व-भाग वास घेऊन माजावर आलेली जनावरे ओळखतात.
  •  हीट-माउंट डिटेकटरर्स : हे उपकरण गाई-म्हशीच्या पाठीवर लावले जाते. जेव्हा माजावर आलेल्या गाई-म्हशी, इतर जनावर तिच्यावर पाय टाकत असताना उभी राहते, तेव्हा त्या उपकरणावर ताण आल्यामुळे किंवा स्पर्श झाल्यामुळे त्याच्या रंगामध्ये परिवर्तन होते आणि यामुळे माजावर आलेली जनावरांची ओळख करता येते.
  • योनी मार्गातील स्रावाची चाचणी : जनावरांतील माजाच्या वेळेस विशिष्ट असा पदार्थ योनीतून बाहेर येत असतो. त्या स्रावाची सूक्ष्म दर्शकाखाली चाचणी केली तर त्यात माजावरील जनावरांत फर्न वनस्पतीच्या पानाचे आकार दिसून येतो.
  • संपर्क ः डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६ (पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com