शेती व्यवस्थापनासाठी मोसमी पावसाचा घेऊ अंदाज

कोरडवाहू पिकांच्या व्यवस्थापनामध्ये मॉन्सून अत्यंत महत्त्वाचा असून, त्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या मनात येणारे प्रश्‍न व त्यांची उत्तरे या लेखातून देण्याचा प्रयत्न.
Monsson rainfall forecast for agricultural management
Monsson rainfall forecast for agricultural management

कोरडवाहू पिकांच्या व्यवस्थापनामध्ये मॉन्सून अत्यंत महत्त्वाचा असून, त्यासंदर्भातील शेतकऱ्यांच्या मनात येणारे प्रश्‍न व त्यांची उत्तरे या लेखातून देण्याचा प्रयत्न. राज्याचे अर्थकारण कोरडवाहूवर... महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र ३०७ लाख हेक्टर असून, शेतीखालील क्षेत्र सुमारे २३२ लाख हेक्टर आहे. निव्वळ पेरणीखालील क्षेत्र १७५ लाख हेक्‍टर असून, खरिपाचे १४१ लाख हेक्टर, तर रब्बीचे ५१ लाख हेक्टर एवढे क्षेत्र पेरणीखाली आहे. फळपिकाखालील क्षेत्र सुमारे साडेचौदा लाख हेक्टर, भाजीपाला पिकाखालील साडेचार लाख हेक्‍टर आणि फुलशेतीखालील सुमारे १७००० हेक्टर आहे. यातील सुमारे ४० लाख हेक्टर (२० टक्के) क्षेत्र ओलिताखाली असून, ८० टक्के पावसावर आधारित आहे. प्रत्यक्षात एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी जेमतेम साडेसोळा ते सतरा टक्के बागायती आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि व्यवस्थापनाचा सर्वोच्च वापर केल्यावरही राज्यातील सर्वाधिक ३० ते ३२ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते, असा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे). म्हणजेच किमान ७० टक्के क्षेत्र हे पावसावरच (अर्थात मॉन्सूनवर) अवलंबून असणार आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण, पूर्व विदर्भ, पश्‍चिम घाट पट्ट्यात भात, नागली, वरई; तर विदर्भ मराठवाड्यात कापूस, तूर, सोयाबीन, खरीप ज्वारी, मका आणि कोकण वगळून इतर सर्वत्र भागात कमी अधिक प्रमाणात बाजरी, मूग, मटकी, कुळीथ, तीळ, कारळा, भुईमूग इ. पावसावर आधारित पिके घेतली जातात. ही सर्व पिके अन्न सुरक्षेत येणारी आणि जैवविविधता जोपासणारी आहेत. यापैकी सोयाबीन (४२ लाख हे.), कापूस (३९ लाख हे.), भात (१५ लाख हे.) मका (८.४० लाख हे.), बाजरी (७ लाख हे.) आणि खरीप ज्वारी (५ लाख हे.) या कोरडवाहू पिकांची पेरणी आणि येणारे उत्पादन यातून महाराष्ट्रातील शेतीचे गणित ठरते. मक्याच्या एकूण पेरणीक्षेत्रापैकी ८०% शेती पावसावर केली जाते. यासोबतच बागायती पिकांपैकी ऊस (सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र), फळ बागायत क्षेत्र (विशेषतः केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, चिकू, सीताफळ, बोर आणि पेरू इ.) आणि हळद, आले व अन्य भाजीपाला पिके राज्याचे आर्थिक भवितव्य ठरवतात. कापूस आणि ऊस उत्पादनातील देशाच्या एकूण उत्पादनापैकी २२ % वाटा, तर द्राक्ष उत्पादनातील अर्ध्याहून अधिक वाटा आपल्या राज्याचा आहे. राज्याच्या एकूण उत्पादनातील सुमारे १२% वाटा हा कृषी आणि कृषिपूरक व्यवसायाचा असून, सुमारे ५% वाटा निव्वळ शेतीचा आहे. महाराष्ट्रातील पाऊस बदललाय का? मागील तीस ते पस्तीस वर्षांतील वार्षिक पावसाचा आढावा घेतल्यास, राज्यातील पावसाचे प्रमाण आणि वितरणातही फार मोठा बदल झालेला दिसून येत नाही. मात्र वादळीवारे वाहण्याच्या आणि गारपिटीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

  • -जुलै आणि सप्टेंबरमध्ये पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ तर जून आणि ऑगस्ट महिन्यामध्ये थोडीशी घट आढळून आली आहे.
  • सरासरी पावसाचा विचार केल्यास मॉन्सून हंगामात सर्वाधिक पाऊस कोकणातील जिल्ह्यात (२४००-३५०० मिमी), पश्‍चिम महाराष्ट्रात (४५०-६०० मिमी), तर सर्वांत कमी सांगली (४५४ मिमी) आणि नगर (५९१ मिमी) पाऊस पडतो.
  • एकूण सरासरी वार्षिक पावसापैकी (११४७ मिमी) मॉन्सून हंगामात ८९% पाऊस पडतो, तर कोकणात मात्र ७३-७६% इतकाच पाऊस पडतो.
  • मॉन्सून हंगामाच्या पडणाऱ्या पावसाच्या (१०२१ मिमी) प्रमाणात सर्वाधिक पाऊस ३४१ मिमी (३३%) पाऊस जुलैमध्ये, त्यानंतर ऑगस्टमध्ये २८१ मिमी (२८%) जूनमध्ये २१९ मिमी (२१%) आणि सप्टेंबरमध्ये १८०मिमी (१८%) पाऊस पडतो.
  • पावसाच्या पडण्याचा पद्धतीमध्ये मासिक तफावत जिल्हानिहाय २५ ते ७०% इतकी मोठी असून, कोकणात सर्वांत कमी तफावत (१७ ते ३५%) आढळते. म्हणजेच प्रत्येक वर्षी जिल्हानिहाय मासिक पाऊस पडण्याचे प्रमाण सारखे बदलत असते. ही मासिक पाऊस तफावत अधिक असली तरी हंगामनिहाय तफावत मात्र कमी आहे. त्याहून अधिक तफावत साप्ताहिक पावसाच्या वितरणात आढळून येते.
  • सांख्यिकीयदृष्ट्या मॉन्सूनच्या आणि वार्षिक पावसाच्या प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये वाढ झालेली दिसते, तर वार्षिक पावसाच्या प्रमाणात औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यांत घट झाल्याचे आढळून येते. खरीप हंगामातील शेतीवर याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. मात्र रब्बी आणि उन्हाळी हंगामात होणाऱ्या अवकाळी पाऊस किंवा वादळी वाऱ्यासह होणारा अधिक पाऊस किंवा गारपीट याचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील शेतीवर होताना दिसतो.
  • थोडक्यात, खरीप हंगामातील अथवा मासिक सरासरीच्या प्रमाणात पाऊस चांगला पडला म्हणजे खरीप हंगाम साधला किंवा रब्बी व उन्हाळी पिके शाश्‍वत झाली, बारमाही पिके उत्तम येतीलच, असे नाही! याकरिता पावसाचे साप्ताहिक वितरण (किमान मासिक वितरण तरी) चांगले असावे लागते. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या दिवसात काही बदल झालाय? मोसमी हंगामात पडणाऱ्या पावसाचे सरासरी दिवस १२२ आहेत. कोकणात ६० ते ७० दिवस असून, मध्य महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ व मराठवाड्यात ३५ ते ४५ पावसांचे दिवस आहेत. परंतु मध्य महाराष्ट्र व त्यास लागून असलेल्या काही जिल्ह्यांतील भागात ३७ दिवसांहून कमी पावसाचे दिवस असतात. मुसळधार पावसाच्या दिवसाचे घटनांचे प्रमाण कोकणात ८ ते ११ असून उर्वरित महाराष्ट्रात ३ ते ५ दिवस आहेत. नंदुरबार, जळगाव, भंडारा, कोल्हापूर व रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसते. एकूण पावसाच्या दिवसांत घट झाल्याचे आढळून आले आहे. पुणे, सोलापूर, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांतील बहुतांश भागात पावसाच्या दिवसात घट झालेली दिसून येते. तर उर्वरित जिल्ह्यात कुठलाही बदल जाणवत नाही. मॉन्सून येण्या-जाण्याच्या तारखेत काही बदल जाणवतोय का? मॉन्सून येण्याचा तारखेत तांत्रिकदृष्ट्या भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार बद्दल काही प्रमाणात झालेला दिसतो. ५ ते ७ जूनऐवजी १० जून ही तारीख सांगितली जाते. यामुळे शेतीमध्ये फारसा परिणामकारक फरक पडत नाही. मॉन्सून माघारी जाण्याचा काळात मात्र विलंब झालेला आढळतो. एक आठवड्याने उशिरा (१२ ऑक्टोबर) मॉन्सून निघून जाण्याची तारीख गृहीत धरलेली आहे. म्हणजेच १ ते २ आठवड्यांनी मॉन्सून हंगाम महाराष्ट्रात वाढलेला दिसतो. मागील वर्षीचा पावसाच्या अंदाज कसा होता? मागील वर्षी भारतीय हवामान विभागाने मॉन्सूनच्या आगमनाबाबत केलेल्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रात मॉन्सून वेळेवर दाखल झाला. तसेच सरासरीहून अधिक पाऊस पडण्याचे भाकीत असले तरी ओल्या दुष्काळाची स्थिती स्पष्ट अधोरेखित केली नव्हती आणि कोरड्या दुष्काळाची शक्यता वर्तवली नव्हती. सरासरीच्या स्वरूपात कोकणात २७%, मध्य महाराष्ट्रात २९% आणि मराठवाड्यात ३०% सरासरीहून अधिक पाऊस पडला. तर विदर्भात (-१० टक्के) पाऊस कमी पडला. जिल्हानिहाय विचार केला असता अकोला (-२७%) अमरावती (-२०%) व यवतमाळ (-२४%) या जिल्ह्यात मध्यम कोरडा दुष्काळ पडला. याउलट औरंगाबाद (६४%) व नगर (७८%) पाऊस झाला. यामुळे या जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती अनुभवास आली. या वर्षीच्या पावसाचा अंदाज आणि आगमनाबाबत काय सांगता येईल? सर्वसाधारणपणे अंदमान-निकोबार बेटांवर २० मे दरम्यान मॉन्सून दाखल होतो. त्याप्रमाणे तो दाखल झालाही. त्यानंतर केरळमध्ये १ जून दरम्यान येतो आणि या वर्षी तो आला सुद्धा; आणि महाराष्ट्रामध्ये ६ ते १० तारखेदरम्यान प्रवेश करतो आणि १८ ते २० जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मॉन्सून पडतो. अर्थात, ही सर्व स्थिती अवलंबून असते ती अरबी समुद्रात आणि पश्‍चिम बंगालच्या उपसागरात भारतीय भूमीच्या किनाऱ्याजवळ निर्माण होणाऱ्या वातावरणीय कमी दाबाच्या पट्ट्यावर! यामध्ये बदल झाल्यास किंवा कमी दाबाचा पट्ट्याचे रूपांतर वादळात झाल्यास किंवा त्याच्या भौगोलिक स्थानात बदल झाल्यास मॉन्सून आगमन तारखेत बदल होतो. अशाच प्रकारचा परिणाम खरीप हंगामातील पावसाच्या प्रमाणावर होत असतो. सध्या तरी मॉन्सून राज्यात वेळेवर दाखल होण्याची शक्यता आहे. या वर्षी या मोसमी पावसाच्या अंदाजानुसार सरासरी इतका (९६ ते १०३ %) पाऊस पडण्याची शक्यता ५६% आहे; सरासरीहून अधिक (अतिवृष्टी) होण्याची शक्यता ५% आहे. म्हणजेच सरासरी इतका किंवा अधिक पाऊस पडण्याची शक्यता ६१% आहे, तर सरासरीहून कमी पाऊस पडण्याची शक्यता अर्ध्याहून थोडीशी कमी म्हणजेच ३९% आहे. याचाच अर्थ, या वर्षी काही भागांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची अल्पशी शक्यता आहे. तर काही भागांत कोरड्या दुष्काळाची स्थिती उद्‌भवण्याची शक्यता अधिक आहे. मात्र सर्वसाधारणपणे राज्यात सरासरीइतका पाऊस पडेल. काही जिल्ह्यातील काही भाग दुष्काळातील सावटाखाली तर काही भागांत अतिवृष्टी अशी स्थिती असू शकेल. अशाच प्रकारची स्थिती गेल्या दोन-तीन वर्षांत आपण अनुभवली आहे. विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील काही भागांत शुष्कता काळ, पावसात मोठा खंड किंवा कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता अधिक आहे. पावसात खंड पडणे, याचा कालावधी सर्वत्र एकाच वेळी असेल असे नाही. परंतु खरीप कोरडवाहू पिकांना याचा फटका बसू शकतो. जूनचा शेवटचा आठवडा ते जुलै पहिला आठवडा, जुलैचा शेवटचा आठवडा, ऑगस्टचा पहिला पंधरवडा आणि सप्टेंबर अखेरचा काळ या काळात पावसात खंड पडू शकतो. जुलैचा दुसरा ते शेवटचा आठवडा, ऑगस्ट शेवटचा आठवडा, सप्टेंबरचा पहिला पंधरवडा या काळात अतिवृष्टी होऊ शकते. म्हणून मॉन्सून अंदाजाधारित पीक नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे आणि आर्थिकदृष्ट्या उपयोगी ठरते. डॉ. प्रल्हाद जायभाये, ७९८०६८४१८९ कृषी हवामान शास्त्रज्ञ तथा प्राचार्य, कृषी तंत्र विद्यालय, जालना अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com