mushroom spawn production technology
mushroom spawn production technology

अळिंबी स्पॉन निर्मिती तंत्रज्ञान

अळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. यामध्ये पूर्ण तयार झालेले स्पॉन वापरणे आवश्यक असते. गहू, मका, बाजरी, ज्वारी यासारख्या कोणत्याही प्रकारच्या धान्यावर अळिंबीचे स्पॉन तयार करता येतात.

अळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते. यामध्ये पूर्ण तयार झालेले स्पॉन वापरणे आवश्यक असते. गहू, मका, बाजरी, ज्वारी यासारख्या कोणत्याही प्रकारच्या धान्यावर अळिंबीचे स्पॉन तयार करता येतात. अळिंबी निर्मितीमध्ये बीजाणू हा महत्त्वाचा अंग आहे. अळिंबीचे बीजाणू एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत टिकून राहण्यास मदत करतात. हे बीजाणू अत्यंत सूक्ष्म असतात. त्यामुळे त्यांची हाताळणी अतिशय कठीण असते. बीजाणूंची उगवण व अंकुर वाढवण्यासाठी विशिष्ट वेळ आणि परिस्थितीची आवश्‍यकता असते. याकाळात प्रतिस्पर्धी बुरशी वेगाने वाढून अळिंबीची वाढ थांबवू शकते. अळिंबी धाग्यांपासून (मायसेलियम) शुद्ध कल्चर तयार करण्यासाठी प्रथम ते कृत्रिम माध्यमावर वाढविले जाते. नंतर त्यापासून जास्त प्रमाणात स्पॉन (बीज) निर्मिती करण्यासाठी योग्य त्या माध्यमावर वाढविण्यासाठी टाकले जाते. स्पॉन (अळिंबी बियाणे) 

  • माध्यमावर (उदा. भरड धान्य) निवडलेल्या शुद्ध अळिंबीच्या मायसेलियमयुक्त कल्चरची मोठ्या प्रमाणावर वाढ केली जाते. यास ‘अळिंबी बियाणे (स्पॉन)’ असे म्हणतात.
  • स्पॉनमध्ये अळिंबीचे धागे (मायसेलियम) सहाय्यक माध्यम म्हणून काम करते. ते बुरशीच्या वाढीदरम्यान पोषक अन्नद्रव्ये प्रदान करतात.
  • अळिंबी लागवडीमध्ये माध्यमासाठी (सबस्ट्रेट) स्पॉनचा वापर इनॉकुलम किंवा बियाणे म्हणून केला जातो. अळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची गुणवत्ता खूप महत्त्वाची असते.
  • गहू, मका, बाजरी, ज्वारी यासारख्या कोणत्याही प्रकारच्या धान्यावर अळिंबीचे स्पॉन तयार करता येतात. मोठ्या आकाराचे धान्य अळिंबीच्या धाग्यांना (मायसेलियमला) जास्त काळ अन्नपुरवठा करतात. त्यामुळे इनॉकुलम कंपोस्टवर स्थापित होईपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी हे धान्य मदत करते. याच कारणास्तव असे स्पॉन खराब कंपोस्ट किंवा प्रतिकूल परिस्थितीत अधिक प्रभावी असू शकते.
  • माध्यम (सबस्ट्रेट) तयारी 

  • माध्यमामध्ये अळिंबीच्या इष्ट प्रजातींना हानिकारक ठरेल असे कोणतेही प्रतिबंधक संयुग नसावे.
  • अळिंबी बुरशीच्या चांगल्या वाढीसाठी धान्य माध्यमाचा मोठा पृष्ठभाग उपलब्ध असला पाहिजे.
  • अळिंबी धाग्यांच्या (मायसेलियम) वाढीसाठी ​​माध्यमाद्वारे आवश्यक सर्व पौष्टिक घटक पुरविणे गरजेचे असते.
  • धान्य माध्यम हे रोगमुक्त असावे.
  • तृणधान्ये तुकडे झालेले, जुने, खराब व किडींनी खाल्लेले नसावेत.
  • स्पॉन तयार करण्याची प्रथमावस्था 

  • धान्यातील मातीचे कण, खडे भुश्‍श्‍याचे किंवा गवताचे तुकडे आणि तणांचे बियाणे काढण्यासाठी धान्य २ ते ३ वेळा पाण्याने चांगले धुवून घ्यावे. त्यानंतर २० ते ३० मिनिटे पुरेशा पाण्यात भिजत ठेवावे.
  • हे धान्य मोठ्या तोंडाच्या भांड्यामध्ये २० ते २५ मिनिटे घेऊन पुरेशा पाण्यात उकळून घ्यावे. यासाठी पातेले किंवा किटल्यांचा वापर करावा. साधारणत: २० किलो धान्य उकळण्यासाठी ३५ लिटर पाण्याची आवश्यकता असते.
  • उकळलेले धान्य चाळणीवर पसरून घ्यावे. जादा झालेले पाणी बारीक तार जाळी किंवा मलमलच्या कापडाने काढून टाकावे. धान्य काही तास सुकवून घ्यावे.
  • प्रति १० किलो धान्यात २०० ग्रॅम जिप्सम (कॅल्शिअम सल्‍फेट) आणि ५० ग्रॅम कॅल्शिअम कार्बोनेट पावडर मिसळून चांगली चोळावी. जेणेकरून त्याचा सामू ७.० ते ७.५ च्या आसपास येईल तसेच गुठळ्या होणार नाहीत.
  • (टीप :  वर देण्यात आलेले प्रमाण फक्त कोरड्या धान्यासाठी आहे.) मदर/मास्टर स्पॉन तयार करणे 

  • जिप्सम आणि कॅल्शिअम कार्बोनेट वापरून तयार केलेले ३०० ग्रॅम सबर्ट्रेट (धान्य) दुधाच्या किंवा शंकुच्या आकाराच्या फ्लास्कमध्ये २/३ भागापर्यंत भरावे. त्याच्या तोंडास शोषकरहित कापसाचा बोळा लावावा.
  • या बाटल्या निर्जंतुक करून घ्याव्यात. भरलेल्या बाटल्या १२६ अंश सेल्सिअस तापमान आणि २२ पौंड पीएसआय दाबावर ऑटोक्लेव्हमध्ये २ तास ठेवाव्यात.
  • त्यानंतर बाटल्या सामान्य तापमानात २४ तास ठेवून द्याव्यात.
  • निर्जंतुकीकरण केलेल्या बाटल्या ३० मिनिटे लॅमिनार एअर फ्लो कक्षात अतिनील प्रकाशात ठेवाव्यात.
  • नंतर वाढणाऱ्या शुद्ध अळिंबी कल्चरच्या मायसेलियमचा एक तुकडा या बाटल्यांमध्ये हस्तांतरित करावा. या इनॉकुलेटेड बाटल्या २५ अंश सेल्सिअस तापमानात उबविण्यासाठी ठेवाव्यात.
  • इनॉकुलेशन केल्यानंतर ५ आणि १० व्या दिवशी बाटल्या हळुवारपणे हलवून घ्याव्यात. या मदर स्पॉनच्या बाटल्या २ ते ३ आठवड्यानंतर व्यावसायिक स्पॉन तयार करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.
  • व्यावसायिक स्पॉन निर्मिती 

  • व्यावसायिक स्पॉन उष्णता प्रतिरोधक १५० गेज पॉलिप्रॉपीलीन पिशव्यामध्ये तयार केले जाते.
  • अर्ध्या आणि १ किलो वजनाच्या स्पॉनसाठी अनुक्रमे ३५ बाय १७.५ सेंमी आणि ४० बाय २० सेंमी आकाराच्या पिशव्या निवडाव्यात.
  • पॉलिप्रॉपीलीन पिशव्यांच्या तळाशी डबल सीलिंग असणे आवश्यक असते. धान्य भरल्यानंतर पिशवीच्या तोंडाला पीव्हीसी पाईपचा तुकडा ती शोषकरहित कापसाच्या बोळ्याने पॅक करावी.
  • या पिशव्या ऑटोक्लेव्हमध्ये दीड ते २ तास २२ पौंड पीएसआय दाबावर निर्जंतुकीकरण कराव्यात.
  • इनॉकुलेशन करण्यापूर्वी ऑटोक्लेव्ह केलेल्या पिशव्या चांगल्या प्रकारे हलवून घ्याव्यात. जेणेकरून आत जमा होणारे पाण्याचे थेंब धान्यांमध्ये पुन्हा शोषले जातील.
  • - निर्जंतुकीकरण केलेल्या पिशव्या किमान ३० मिनिटे अतिनील प्रकाशाच्या खाली लॅमिनार एअर फ्लो कक्षात ठेवाव्यात.
  • इनॉकुलेशन करण्यासाठी बाटली किंवा फ्लास्कमधून मास्टर स्पॉन १० ते १५ ग्रॅम प्रति पिशवी याप्रमाणे टाकावेत. मास्टर स्पॉनची अर्ध्या किलो वजनाची एक बाटली २५ ते ३० व्यावसायिक स्पॉन पिशव्या इनॉकुलेशन करण्यासाठी पुरेशी आहे.
  • इनॉकुलेटेड पिशव्या पुन्हा हलवून घ्याव्यात. जेणेकरून ते इतर धान्यांबरोबर चांगले मिसळले जाईल. तथापि, स्पॉनरनचा कालावधी (बियाणे तयार होण्याचा एकूण काळ) कमी करण्यासाठी, इनॉकुलमचे (मदर स्पॉन) प्रमाण वाढविले जाऊ शकते.
  • त्यानंतर पिशव्यातील धान्यावर मायसेलियमची चांगली वाढ होण्यासाठी त्या उष्मायन (इनक्युबेशन) कक्षात किंवा बीओडी इनक्यूबेटरमध्ये २५ अंश सेल्सिअस तापमानामध्ये उबविण्यासाठी ठेवाव्यात. उबवणी दरम्यान पिशव्यांची दूषितपणासाठी तपासणी करावी. दूषित पिशव्या तेथून लगेच काढून ऑटोक्लेव्हमध्ये निर्जंतुक कराव्यात. दूषित पिशव्या फेकून देऊ नयेत.
  • बटन अळिंबीच्या मायसेलियम (धागे)ची धान्यांच्या दाण्यांवर २० ते २५ दिवसांत तर धिंगरी अळिंबीची १५ ते १७ दिवसांत पूर्ण वाढ होते. असे पूर्ण तयार झालेले स्पॉन अळिंबी उत्पादनासाठी वापरावे.
  • - डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८११ (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com