agricultural news in marathi Natural colors production business for Holi | Page 2 ||| Agrowon

होळीसाठी नैसर्गिक रंगनिर्मितीचा व्यवसाय

शुभांगी वाटाणे, डॉ. आर. एल. काळे
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

घरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे. व्यावसायिक पातळीवर उद्योग म्हणून करण्यासाठी थोडेसे प्रशिक्षण पुरेसे ठरू शकते. एकदा कौशल्यप्राप्तीनंतर दरवर्षी महिलांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय होऊ शकतो.  

घरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे. व्यावसायिक पातळीवर उद्योग म्हणून करण्यासाठी थोडेसे प्रशिक्षण पुरेसे ठरू शकते. एकदा कौशल्यप्राप्तीनंतर दरवर्षी महिलांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय होऊ शकतो. या रंगांची उपलब्धी केल्याने आपले पर्यावरण, आरोग्य यांची हानी टाळू शकतो.

माणूस आणि समाजाला जोडून ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये सण, उत्सव, उरुस, जत्रा, यात्रा यांची भूमिका मोठी असते. मात्र कोणताही आनंदी उत्सव साजरा करत असताना तो अधिकाधिक पर्यावरणपूरक कसा होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. आनंद एकमेकांसोबत वाटून घेताना त्यासोबत अपघात, दुःख आणि पर्यावरणाची हानी या बाबी आपण भेट देत नाही ना, याकडेही प्राधान्याने पाहिले जाते. अशा बाबी नक्कीच टाळल्या पाहिजेत.

येत्या काळामध्ये होळी हा सण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला (२८ मार्च) येत आहे. उत्तर भारतामध्ये होळीच्या दिवशी, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये होळीनंतर पाच दिवसांनी येणाऱ्या रंगपंचमीला रंग खेळला जातो. त्याच प्रमाणे होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदनाला होळी ज्वलनानंतर तयार झालेली राख ओली करून एकमेकांना लावण्याचीही प्रथा आहे. या तिन्ही दिवशी खेळण्यासाठी विविध प्रकारचे रंग वापरले जातात. बाजारामध्ये रासायनिक पद्धतीने तयार केलेले रंग उपलब्ध असतात. या रंगांचा वापर केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. उदा. त्वचेला, डोळ्यांना इजा किंवा हानी पोहोचणे, केस खराब होणे इ. विशेषतः लहान मुलांची त्वचा अत्यंत नाजूक असते, त्यांना याचा फटका बसू शकतो. हे टाळण्यासाठी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर करणे गरजेचे आहे.

ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असलेल्या विविध वनस्पतींपासून आपल्याला घरगुती रंग तयार करता येतो. झाडांची फुले, पाने, साली, मुळे, बिया अशा विविध भागांपासून पर्यावरणपूरक रंग तयार करता येतात. उदा. हळदीपासून पिवळा, पळसाच्या फुलांपासून केशरी, मंजिष्ठाच्या मुळांपासून लाल, निळीपासून निळा, निलगिरीच्या सालीपासून तपकिरी (काथ्या).

वैशिष्ट्ये 

 • नैसर्गिक रंग ओले व कोरडे अशा दोन्ही पद्धतीने वापरणे शक्य आहे.
 • रंग अतिशय मुलायम असतात. त्यापासून कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.
 • रंग खेळून झाल्यानंतर धुवायलाही सोपे असतात.
 • कपड्यावरील रंगही धुऊन काढणे सोपे.
 • पक्के रंग वापरल्यानंतर त्यांना धुऊन काढण्यासाठी लागणारा वेळ, पाणी व श्रम याची बचत. रासायनिक रंग धुण्यासाठी निरमा, रॉकेल, किंवा इतर हानिकारक पदार्थाची आवश्यकता पडत नाही.
 • रंग नैसर्गिक असल्यामुळे सुरक्षित असतात.

रंगनिर्मितीसाठी आवश्यक साहित्य 

 • मोठे भांडे, गॅस किंवा चूल, चाळणी, गाळणी, चमचा, पातेले, मिक्सर,
 • रंग स्रोत: आरारूट पावडर, मेहंदी, आवळा पावडर, हळद, नीळ, बीटरूट, पळसाची फुले, झेंडूची फुले, मंजिष्ठा, निलगिरी साल इ.

पद्धत 

 • रंग स्रोतांपैकी एक घटक घेऊन पाण्यात भिजवत ठेवावा किंवा त्याच पाण्यात उकळून घ्यावा. तयार झालेले रंगीत पाणी उकळून आवश्यकतेनुसार घट्ट करून घ्यावे.
 • घट्ट रंग द्रावण आरारूटमध्ये मिसळावे.
 • रंग सावलीत वाळवावेत.
 • रंग मिक्सरमध्ये बारीक व मऊ करून घ्यावे.
 • रंग चाळणीने गाळून घ्यावे.

गृहउद्योग
होळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात रंगाला मागणी असते. बाजारामध्ये नैसर्गिक रंगाची उपलब्धता कमी असल्याने आरोग्यासाठी जागरूक लोकांना नैसर्गिक रंगांना चांगलीच मागणी मिळू शकते. ग्रामीण भागामध्ये बहुतांश वनस्पती तुलनेने स्वस्तामध्ये उपलब्ध होऊ शकतात. याचा फायदा घेऊन महिला बचत गट नैसर्गिक रंगनिर्मिती नक्कीच करू शकतात. घरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे. व्यावसायिक पातळीवर उद्योग म्हणून करण्यासाठी थोडेसे प्रशिक्षण पुरेसे ठरू शकते. एकदा कौशल्यप्राप्तीनंतर दरवर्षी महिलांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय होऊ शकतो. या रंगांची उपलब्धी केल्याने आपले पर्यावरण, आरोग्य यांची हानी टाळू शकतो.

संपर्क- डॉ. आर. एल. काळे, ७३५०२०५७४६
(प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)


इतर कृषी प्रक्रिया
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....
टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरीटोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच...
आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइलव्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ...
अंड्यापासून जॅम, पनीर निर्मितीसर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ...
बहुगुणी राळाराळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या...
लसणापासून लोणचे, जेली, चटणीलसूण हा आपल्या सर्वांना परिचित आहे. लसणाचा उपयोग...
लिंबू प्रक्रियेतील संधी लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता...
अळिंबी स्पॉन निर्मिती तंत्रज्ञानअळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
खरबुजापासून पावडर, सरबतखरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात...
आरोग्यवर्धक लसूण लसणाचा उपयोग स्वयंपाकात अन्न स्वादिष्ट होण्यासाठी...